आमच्या ‘पार्क वे’ची जन्मकथा पूर्वी सांगितली आहे. ‘पार्क वे’ समुद्राजवळ आहे आणि शेजारीच प्रसिद्ध ‘शिवाजी पार्क’ आहे. ‘पार्क वे’च्या जवळ त्या काळात दादरची स्मशानभूमी होती. त्यामुळे त्या परिसरात तेव्हा फारशी वर्दळ नसे. संध्याकाळी काळोख पडल्यावर त्या रस्त्यावर सामसूम असे. एखाद्या खोलीच्या खिडकीत उभं राहिलं, की समुद्राची गाज स्पष्टपणे ऐकू येई. समुद्रकिनाराही शांत असायचा. समुद्राच्या पुळणीवरून, एकदा का तुम्ही माहीमहून चालत निघालात, की थेट प्रभादेवीपर्यंत आरामशीरपणे चालत यायचात. वाटेत कोणी थांबवणारं नसायचं. भिकारी नसायचे. क्वचित एखादा भेळपुरीवाला त्याची टोपली व ती ठेवण्यासाठी उभा वेताचा एक गोल स्टँड घेऊन समोर यायचा. त्याने भेळीसाठी कापलेल्या कांदा-कोथिंबिरीचा वास नाकात घुसायचा आणि अपरिहार्यपणे खिशात हात जाऊन दहा-वीस पशांच्या भेळीच्या पुडय़ा हातात घेऊन, पुठ्ठय़ाच्या चतकोर तुकडय़ानं ती भेळ पोटात जायची. त्या वेळी असं वाटायचं, की आपण समोरच्या समुद्राचे व त्या पुळणीचे राजे आहोत! मुलं लहान असताना मी व माझी पत्नी त्यांना त्या समुद्रकिनारी फिरायला न्यायचो. दादर स्थानकानजीकच्या वर्दळीपासून तो किनारा आम्हाला मोकळा वाटायचा. आम्ही जणू काही दूर गावी पिकनिकला आलोय अशा थाटात तिथं फिरायचो!

मोठं झाल्यावर अनेकदा माझी मुलं ‘पार्क वे’मध्ये जायची. त्याचं कारण म्हणजे समुद्राचे सान्निध्य आणि घरातील शिस्तीपासून काही काळासाठी सुटका! या मुलांच्यात तर एक स्पर्धा लागायची की, अमावास्येच्या रात्री समोरच्या स्मशानात जाण्याची कोणात हिंमत आहे? आमचा अमरदीप- म्हणजे टोनी अशा उद्योगांत अव्वल असायचा. त्याच्यातील साहसी वृत्तीला ते साजेसं होतं. ‘पार्क वे’चा असा माहौल असायचा!

तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर फक्त एकांत हवा असणारी जोडपी येत असत किंवा एकांत जरुरीचा असणारी सृजनशील मंडळी येत असत. जोडपी समुद्रकिनाऱ्यावर जायची, तर सृजनशील मंडळी ‘पार्क वे’त येऊन चिंतन करत, गप्पा मारत बसायची. चित्रपट निर्माते तर त्यांच्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेसाठी इथं येऊन राहत असत. राज कपूर यांचा ‘बॉबी’ इथंच बनला. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्या अनेक गीतांच्या चालींचा जन्म इथं झाला. प्रख्यात मराठी नाटककार व पटकथालेखक विजय तेंडुलकरही ‘पार्क वे’त येत. चित्रपट, नाटक लेखनासाठी कधी ‘पार्क वे’त राहत. डॉ. जब्बार पटेल यांचंही हे लाडकं स्थळ होतं. त्यांच्या अनेक नाटकांच्या चर्चा, चित्रपटांचा जन्म इथं झालाय!

माझा व विजय तेंडुलकरांचा जुजबी परिचय झाला होता. त्यांची शांत मुद्रा, हनुवटीवर राखलेली दाढी, व्यवस्थित विंचरलेले केस, सततची आत्ममग्न नजर, चिंतनशील चेहरा यामुळे त्यांच्याविषयी मला कायम आदर वाटत असे. ते खूप कमी बोलत असत. समोरच्याचं संपूर्ण ऐकल्याशिवाय ते अजिबात शब्दही उच्चारत नसत. ते समोरच्याचं संपूर्ण लक्ष देऊन ऐकत असत. तेव्हा ते एखाद्या तत्त्वज्ञासारखे दिसत आणि तसेच होतेही. पुढे मी त्यांची काही नाटके पाहिलीही. मला उत्तम मराठी कळत नसलं तरीही त्यांच्या नाटकांत संवादांइतकी वा काही वेळा त्यापेक्षाही क्रिया अधिक महत्त्वाची असल्यानं त्यांची नाटकं समजायला मला फारशी अडचण आली नाही. त्यांना कळलेलं मानवी जीवन हे आपल्याला कळलेल्या भाबडय़ा जीवनदर्शनापेक्षा काही वेगळंच होतं. मला वाटतं, त्यांना माणसातलं पशुत्व पटकन कळत असे आणि तेंडुलकर ते आपल्या नाटकांतून मांडत असावेत. म्हणूनच कदाचित त्यांच्या स्वभावात व बोलण्यातही काहीसा हळुवारपणा आला असावा. ज्यांना जीवनाचं खरं दर्शन घडतं; ती माणसं जीवनाचा सोस करत नाहीत, तर ते जीवन जसं आलं तसं जगतात.

अर्थात, ते ‘द ग्रेट विजय तेंडुलकर’ आहेत हे मला काळाच्या ओघात समजलं. एक तर मी ‘पार्क वे’मध्ये फारसा जात नसे. तिथं माझी दिवसभरातील एखादी चक्कर असायची; परंतु टोनी तिथं नियमितपणे जायचा. तेंडुलकरांची मुलगी सुषमा ही त्याची बॅचमेट होती. त्यांची खूप गट्टी होती. ती उत्तम अभिनेत्री होती. जर तिनं अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं तर.. जाऊ दे, त्या जरतरच्या गोष्टी आहेत. मी तिचा अभिनय तिनं व टोनीनं महाविद्यालयातील एका नाटकात एकत्र काम केलं होतं, तेव्हा पाहिला होता. टोनीनं एकदा माझा व विजय तेंडुलकर यांचा परिचय करून दिला. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकाविषयी मी ऐकलं होतं, त्याबद्दलच्या चर्चा माहीत होत्या. अशा महत्त्वाच्या कलाकृतीचा लेखक आपल्याकडे येतो, ही गोष्ट मला अभिमानास्पद वाटली. का कोण जाणे, परंतु तेंडुलकरांसोबत मी एकही फोटो नाही काढू शकलो. त्याला कारण त्यांच्या स्वभावातील चिंतनमग्नता असावी.

त्याच वेळी आमचा परिचय आणखी एका ग्रेट माणसाशी झाला, तो म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांच्याशी! आपल्या शिक्षणामुळे आणि मित्रांमुळे टोनी, गोगी ही माझी मुलं मराठी वातावरणातच कायम असायची. त्यांच्या उपजत मत्रीशील स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात काय सुरू आहे, ते त्यांना माहीत असायचं. त्यामुळे जेव्हा डॉ. जब्बार पटेल आमच्याकडे आले तेव्हा त्यांच्या येण्याचं महत्त्व टोनीला पटकन् कळलं. अर्थात त्याचीही एक गंमत झाली; ती जब्बारजींना ठाऊक असेल असं वाटत नाही. आमच्याकडे राहणाऱ्या ग्राहकांची नोंद पाहता पाहता टोनीनं ‘जब्बार पटेल’ हे नाव पाहिलं आणि तो एकदम खूश झाला. त्यानं चौकशी केली की, जब्बारजी कुठे बसलेत, ते कसे दिसतात वगरे. जब्बारजींचा ‘पार्क वे’मध्ये एक ठरलेला कोपरा होता. तिथं बसून त्यांना एकाच वेळी रेस्टॉरंटमध्ये काय चाललंय आणि रस्त्यावर काय चाललंय, हे दिसत असे. ते पुण्यात राहायचे आणि मुंबईत आले, की त्यांचा मुक्काम बव्हंशी आमच्या इथं असायचा.

जब्बारजी आणि तेंडुलकर बऱ्याचदा एकत्र असायचे. मला वाटतं, त्यांच्या ‘सामना’, ‘सिंहासन’ यांसारख्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या चर्चा ‘पार्क वे’त झाल्या असाव्यात; त्याबद्दल तेच सांगू शकतील. जब्बारजी तेंडुलकरांपेक्षा वेगळे होते. त्यांना बोलायला आवडतं. संवाद साधण्यावर त्यांचा भर असे. टोनीची आणि जब्बारजींची चांगलीच ओळख होती. त्याचं एक कारण म्हणजे टोनीचा बोलका स्वभाव! आमच्या घरात रात्री एकत्र जेवण्याची प्रथा आहे. जेवणाच्या टेबलावर अनेक गोष्टी बोलता येतात, दिवसभराचा आढावा घेतला जातो आणि कुटुंबाचं नातं पक्कं राहतं. एका रात्रीच्या जेवणाच्या वेळी टोनी शांत शांत होता. गप्प जेवला, थोडंसं इकडचं तिकडचं बोलला आणि निघून गेला. त्याचं काही तरी बिनसलंय हे लक्षात आलं. असे एक-दोन दिवस आणखी गेले. नमित्तिक कामं होत होती. परंतु नेहमीचा मुलगा दिसत नव्हता. वाढत्या वयाच्या मुलांना फारसे प्रश्न विचारायचे नसतात. मी काही विचारलं नाही. तीन दिवसांनी नेहमीचा बोलका, खेळकर टोनी दिसला. जेवताना मी त्याला विचारलं, ‘‘काय रे, काय झालं होतं?’’ तो म्हणाला, ‘‘काही नाही हो. माझं एका वर्गमत्रिणीशी भांडण झालं होतं. कारण नसताना आम्ही भांडलो होतो. मग माझा मूड गेला. आज मला डॉक्टरसाहेब भेटले.’’ ‘‘कोणते डॉक्टर?’’ मी विचारलं. ‘‘डॉ. जब्बार पटेल!’’- तो म्हणाला, ‘‘ते ‘पार्क वे’मध्ये राहिलेत. मी त्यांच्याकडे गेलो. मला वाटलं ते मला सल्ला देतील. जब्बारजींनी माझं सगळं ऐकून घेतलं. मग मला म्हणाले, ‘अरे, तिला सॉरी म्हणून टाक. त्यात काय मोठंसं! मित्रांमध्ये कुठे इगो असतो का? आणि टोनी, एक लक्षात ठेव- ज्याच्याजवळ क्षमा मागण्याची ताकद असते, तोच जीवनाला थेट भिडू शकतो आणि त्याच्याचकडे जगण्याची ताकद असते. एखाद्या व्यक्तीविषयी आपली चूक असेल, तर त्या व्यक्तीने ती चूक दाखवण्याआधीच आपली चूक त्या व्यक्तीजवळ कबूल करून टाकावी. त्यानं दोन गोष्टी साध्य होतात- एक म्हणजे आपल्या मनातली रुखरुख निघून जाते आणि दुसरी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल गरसमज निर्माण होत नाही.’ पापाजी, डॉक्टरांनी केवढी मोठी गोष्ट सांगितली! मी ती कायम लक्षात ठेवीन आणि तसंच वागेन!’’ माझा मुलगा मोठा झाला त्या दिवशी. ‘‘थँक यू डॉक्टर!’’- तेव्हा म्हणालो नाही, पण आज म्हणतो.

नंतर खूप वर्षांनी गप्पांच्या ओघात टोनीनंच एक गमतीदार आठवण सांगितली. तो खूप मस्तीखोर होता. त्याची मित्रांची एक टोळी असायची. तरुण मुलं ज्या प्रकारची मस्ती करतात, तशी मस्ती ते आपापसात करायचे. अर्थात ती मस्ती वेडीवाकडी नसायची. परंतु तारुण्यसुलभ भावना तर असायच्याच. एकदा दुपारच्या वेळी फारशी गर्दी नसताना, ही मुलं ‘पार्क वे’मध्ये काहीतरी खात बसलेली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या एका सुंदर मुलीवरती यांनी काही कॉमेंट केली. जब्बारजी जवळच्या टेबलवर बसलेले होते. ते त्या क्षणी काही बोलले नाहीत. नंतर त्यांनी टोनीला जवळ बोलावलं आणि म्हणाले, ‘‘तुमच्या ग्रूपमधील कोणीतरी त्या सुंदर मुलीवर कॉमेंट केली. ती तू ऐकलीस आणि तुम्ही सारे हसलात. खरं तर, तू ते थांबवायला हवं होतंस. तुला एक बहीण आहे. ती सुंदरही आहे. तिच्याबद्दल तुम्ही खूप जागरूक आहात. तिला कोणताही त्रास होऊ नये म्हणून तू काळजी घेतोस. मग या मुलीलाही कोणीतरी भाऊ असेल की; त्यालाही वाईट वाटेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्याला अवमानित करील, त्याची चेष्टा होईल असा कोणताही विचार मनात येणं गर नाही का? शिकल्यासवरल्या माणसाची ती खरी संस्कृती असते.’’ जब्बारजींनी टोनीला त्या वेळी एक जीवनमूल्य दिलं. परंतु ते जीवनमूल्य देताना ‘मी तुला काही शिकवतो’ असा कोणताही आविर्भाव त्यात नव्हता. जीवन समजावून सांगण्याची हातोटी होती. जब्बारजी जे बोलत असत, त्यामागे मृदूपणा होताच; परंतु त्यातील विचारांचा ठामपणा हे त्या मृदुतेचं सौंदर्य होतं.

जब्बारजी आमच्या हॉटेलात चित्रपटलेखनासाठी, त्यासंदर्भातील विविध चर्चा करण्यासाठी उतरत असत. परंतु माझ्या आठवणीप्रमाणे ते त्यांच्या रूममध्ये काहीही मागवत नसत. ते जेवण्यासाठी, न्याहारीसाठी रेस्टॉरंटमध्ये येत असत. ते मला म्हणाले होते, ‘‘कुलवंतजी, जागेवर खाणं मागवायला हरकत नाही. परंतु दिवसभर काम करताना काही काळ तुम्हाला वेगळा आराम हवा. आणि आराम म्हणजे लोळणे नव्हे. जरा खाली आलं, रेस्टॉरंटमध्ये बसलं, आजूबाजूच्या लोकांना पाहिलं, त्यांच्यातील गप्पांचा आपण गप्प राहून अंदाज घेतला, तर खूप काही शिकायला मिळतं. हेही एक कामच आहे. आराम म्हणजे कामातला बदल!’’

जब्बारजी जेव्हा केव्हा येत, तेव्हा त्यांच्या ठरावीक टेबलवर बसत. रेस्टॉरंट काही फार मोठं नाहीये. त्यामुळे टेबलं जवळजवळ असायची. जब्बारजींना लोकांचं छानपणे निरीक्षण करता यायचं. माझ्यासमोर घडलेला एक प्रसंग आठवतोय. काय असतं, काही वेळा जेवायला आलेल्या ग्राहकाला आपल्याला काय हवंय, किती हवंय, याचा नेमका अंदाज येत नाही. ते अन्न जास्त होतं आणि नंतर त्याला पश्चात्ताप होतो. मानवी स्वभावामुळे, पसे वाचवायला तो ग्राहक जेवणातच खोट काढत असतो. त्या दिवशी एका ग्राहकानं याच पद्धतीची तक्रार केली. ते म्हणाले, ‘‘हे जेवण अगदी निकृष्ट आहे, बेकार आहे.’’ परंतु ते त्या जेवणात काय कमी आहे, ते का बेकार आहे, हे सांगत नव्हते. आमच्या वेटरनं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्राहक ऐकायलाच कबूल नाही. त्यांनी वेटरला धमकी दिली, ‘‘तू आता इथं नोकरीत कसा राहतोस, तेच बघतो.’’ थोडंसं शांत झाल्यावर जब्बारजी वॉशरूमला जाण्याच्या बहाण्यानं उठले आणि त्या गृहस्थांना म्हणाले, ‘‘अहो, तुम्हाला जेवण आवडलं नाही, तर ते सांगणं योग्य आहे. पण तुम्ही जेवण निकृष्ट आहे, बेकार आहे असं म्हणताना त्यात काय बेकार आहे, ते सांगत नाही. दहा माणसांनी हेच जेवण मागवलंय.’’ ते गृहस्थ काही तरी बोलू लागले. जब्बारजींनी त्यांना बोलून दिलं व नंतर म्हणाले, ‘‘खरं म्हणजे, तुम्हाला जेवणातील त्या पदार्थाच्या आकाराचा अंदाज आला नाही. म्हणून तुम्हाला ते जास्त झालंय. आता ऑर्डर केल्यावर तो पदार्थ बनला, तो वाया नाही का जाणार? मग तो पदार्थ तुम्हाला पार्सल म्हणून घरी नेता येईल. समजा, तुम्हाला जर असं वाटलं की आपण जरा जास्त ऑर्डर केलीय, तर तसं संबंधितांना स्पष्टपणे सांगा. ते विचार करू शकतील.’’ जब्बारजी खूप शांतपणे बोलत होते, परंतु त्यांच्या बोलण्यात ठामपणा होता. त्या गृहस्थांचा राग निवळला. हा साधासा खादीचा झब्बा आणि पायजमा घातलेला माणूस आहे तरी कोण, हे जाणून घ्यायला त्या गृहस्थांनी जब्बारजींना नाव विचारलं. तर, ‘‘मी जब्बार पटेल, भेटू या पुन्हा.’’ – असं सांगून त्या व्यक्तीला काहीही बोलण्याची संधी न देता ते शांतपणे वॉशरूमकडे निघून गेले. अजूनही माझ्या डोळ्यासंमोर डोळे विस्फारलेल्या त्या गृहस्थांचा चेहरा येतोय!

दादर भाग हा मध्यमवर्गीय वस्तीचा भाग. प्रत्येक घरात काही ना काही चालू असतेच. काही वादावादीचे प्रसंग सुरू असतात. अशा वेळी समजूतदार माणसं घराबाहेर जाऊन एखाद्या निवांत जागी बसून आपले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना एकांत जागी असणारं ‘पार्क वे’ आवडत असे. ही मंडळी आपापसात बोलून चर्चा करत. कधी कधी चर्चा तापतही असे. ती चर्चा छोटय़ा जागेमुळे शेजारच्या टेबलांना ऐकू जाई. जर का जब्बारजी जवळ असतील आणि त्यांच्या कानावर ती चर्चा चुकून पडली, तर वॉशरूममध्ये जाण्याच्या निमित्ताने सहज जाता जाता त्या लोकांना सांगत- ‘‘अहो, माणसं आहेत तिथं मतभेद होणारच. भांडय़ाला भांडं लागणारच. लागू द्या की. फक्त भांडय़ाला पोचे येऊ देऊ नका, म्हणजे झालं! मूठ घट्ट बांधलेली हवी.’’ मग ते परतत असताना ती माणसं जब्बारजींचा सल्ला घेत असत. त्या लोकांना माहीतही नसायचं, की आपण भारतातल्या एका मोठय़ा दिग्दर्शकाबरोबर बोलत आहोत.

स्वत:ला विसरून, आपल्या ठरीव प्रतिमेच्या उंबरठय़ाबाहेर पडून आपल्यातला माणूस टिकवणं हे जर मोठेपणाचं लक्षण असेल, तर मी डॉ. जब्बार पटेल या मोठय़ा माणसाला भेटलोय!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर