भारताची फाळणी झाली आणि सर्व गाशा गुंडाळून बी. आर. व त्यांचं कुटुंब भारतात आलं. ते हळवे होऊन सांगत होते. खरं म्हणजे हा त्यांचा मूळ स्वभाव नव्हता. ते कणखर मनाचे होते. जणू काही पत्थरच! पण काही प्रसंगी पत्थराच्या पोटातलं पाणी उसळून बाहेर येतं. नेमक्या अशाच एका प्रसंगी ते माझ्याशी बोलत होते : ‘‘सब कुछ तितरबितर हुआ था। हमारे पास कुछ फिल्मों की निगेटिव्हज् थी और दिल में हिम्मत थी। भारत देश ने अपना लिया और सब धीरे धीरे ठीक होता गया।’’

मुंबईनं प्रत्येक दशकात आपलं रूपडं बदललं आहे. मी चाळीसच्या दशकात मुंबईत आलो तेव्हा मुंबईतल्या रस्त्यांवरून ट्राम रेंगाळायची. बस धावायची. खासगी गाडय़ांची वर्दळ असायची. रेल्वे तेव्हाही जीवनवाहिनी बनली होती. बैलगाडय़ा चालायच्या. रेडी असायच्या. घोडागाडय़ा धावायच्या. पुढे पन्नासच्या दशकात मुंबईत वेगानं बदल होत गेला. मुंबई हे आधीच स्वप्नांचं महानगर होतं, ते आता स्वप्नांच्या पूर्ततेचं शहर बनू लागलं. देशभरातून जनांचे लोंढे इथं येऊ  लागले, मिळेल तिथं राहू लागले. या शहरात तीन वर्ग स्पष्ट दिसायचे : गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्ग. पण आता त्यात नवा कामगारवर्ग अधिक प्रभावी होताना दिसू लागला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा कामगारवर्ग अधिक समृद्ध जीवनाची आकांक्षा धरू लागला. त्यातून मग वेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले. श्रमिकांची स्वप्नं हा ऐरणीवरचा प्रश्न बनला. ती पूर्ण होत नव्हती, हे दुर्दैवाचं होतं. एका बाजूला श्रीमंत अधिक श्रीमंत होत होते, तर त्यांची श्रीमंती वाढवण्यासाठी झटणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या हाती मात्र पुरेसं उत्पन्न येत नव्हतं. ही भयावह स्थिती  सर्जनशील कलावंतांना अस्वस्थ करीत होती. अशा कलावंतांपैकी एक बलदेव राज चोप्रा.. अर्थात चित्रपटकार बी. आर. चोप्रा! बी. आर. हे एक अस्वस्थ पत्रकार होते. समाजात अवतीभवती काय चाललं आहे याबद्दल त्यांना खूप आस्था आणि त्याविषयी कळकळ होती.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

बी. आर. आमच्याकडे सुरुवातीपासून येत असत. माझी आणि त्यांची ओळख ते पत्रकार असल्यापासूनचीच. मुंबईत पंजाबी जेवणासाठी आमची ओळख निर्माण झाल्यापासून मूळची पंजाबमधील कलाकार मंडळी आमच्याकडे आवर्जून येत असत. बी. आर. हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. ते छानपैकी गप्पा मारायचे माझ्याशी. त्यातून त्यांची व माझी मैत्री जमत गेली. वयानं ते माझ्याहून पंधरा वर्षांनी तरी मोठे असतील; परंतु त्यांच्यासारख्या माणसाला मैत्रीसाठी वय ही अट नसते.. विचार आणि मनं मात्र जुळली पाहिजेत.

ते मूळचे लाहोरचे. लाहोरवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. त्यांच्या गप्पांत एकदा तरी लाहोर येणारच! तिथंच त्यांनी इंग्रजी विषयातली एम. ए.ची पदवी मिळवली होती. त्या काळात पदवी मिळवणं हेच अवघड होतं. नंतर एम. ए. पूर्ण करणं ही तर आणखीन मोठी गोष्ट. परंतु बी. आर. साहेबांनी त्यात यश मिळवलं होतं. शिक्षणामुळं त्यांची समाजाबद्दलची आस्था अधिक डोळस बनली होती. ‘प्रीतम’मध्ये आठवणींत रमलेले बी. आर. एकदा सांगत होते : ‘‘कुलवंतजी, लाहोरमध्ये माझी जान आहे. और सिनेमा तो मेरे रगों में ही है।’’ (त्यांच्या मनातलं लाहोरप्रेम इतकं गाढ होतं, की ‘बी. आर. फिल्म्स्’चा लोगो पडद्यावर येतो तेव्हा तुम्हाला अखंड हिंदुस्थानचाच नकाशा दिसतो. फाळणीनंतर बी. आर. भारतात आले, पण एकत्रित भारतावरचं त्यांचं प्रेम नेहमी न बोलता व्यक्त होत असे. एकदा पाकिस्तानी गायिका- नटी सलमा आगा हिचा पती पाकिस्तानातून येणार होता. त्यानं विचारलं की, ‘‘तुमच्यासाठी काय आणू?’’ बी. आर. पटकन् म्हणाले, ‘‘थोडीशी लाहोरची माती आण!’’ (शेवटच्या काही चित्रपटांत मात्र त्यांनी त्यांच्या लोगोत छोटासा बदल करून स्वतंत्र भारताचा नकाशा दिलाय!)

बी. आर. सांगत- ‘‘माझे पिताजी- दिवाण सरदारीलाल हे सिनेमातच होते. ते निर्माते होते. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी सिनेविषयक पत्रकारिता करू लागलो. १९४४ च्या सुमारास लाहोरच्या ‘सिने हेरॉल्ड’ मासिकात मी लिहू लागलो. नंतर तर मी त्याचा संपादकच झालो.’’

समाज आणि सिनेमा यांनी बी. आर. चोप्रांचं जीवन व्यापलं होतं. बी. आर. साहेबांनी पुढे त्यांच्या पिताजींच्या दोन मित्रांना चित्रपट बनवण्यासाठी मदत केली. मार्च १९४७ मध्ये त्याची गाणी रेकॉर्ड झाली. मात्र, पुढे काही महिन्यांतच भारताची फाळणी झाली आणि सगळा गाशा गुंडाळून बी. आर. व त्यांचं कुटुंब भारतात आलं. ते हळवे होऊन सांगत (खरं म्हणजे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ते कणखर मनाचे होते. जणू काही पत्थरच! पण काही प्रसंगी पत्थराच्या पोटातलं पाणी उसळून बाहेर येतं. नेमक्या अशाच एका प्रसंगी ते माझ्याशी बोलत होते.) : ‘‘सब कुछ तितरबितर हुआ था। हमारे पास कुछ फिल्मों की निगेटिव्ह थी और दिल में हिम्मत थी। भारत देश ने अपना लिया और सब धीरे धीरे ठीक होता गया।’’

बी. आर. सुरुवातीच्या काळात आमच्याकडे येत तेव्हा ते पत्रकार होते. नंतर त्यांनी ‘करवट’ नावाचा एक चित्रपट बनवला. तो जबरदस्त आपटला. परंतु ‘अफसाना’ (१९५१) चित्रपटानं त्यांचं नशीब पालटलं. अशोककुमार यांची दुहेरी भूमिका असलेला बहुधा तो पहिला सिनेमा असावा. या सिनेमामुळे मुंबईनं बी. आर. या नावाची नोंद घेतली. त्यानंतर अगदी झरझर ही नोंद एक नाममुद्रा बनत गेली. हा सगळा प्रवास मी वेगवेगळ्या भूमिकांतून अतिशय जवळून पाहिला आहे. मी त्यांचा स्नेही तर होतोच; पण त्यांच्याशी संबंधित दोन चित्रपटांशी माझा जवळून संबंध आला होता. ‘द बर्निग ट्रेन’ आणि ‘मुक्ती’ हे ते चित्रपट! ‘द बर्निग ट्रेन’ हा चित्रपट धर्मेद्र, हेमामालिनी, विनोद खन्ना, परवीन बाबी, जितेंद्र, नीतू सिंग, विनोद मेहरा, डॅनी, सिमी गरेवाल अशा बडे तारे-तारकांना घेऊन तयार केलेला चित्रपट होता. त्यांचा मुलगा- रवीने तो दिग्दर्शित केला होता. ‘मुक्ती’ बी. आर. चोप्रांचा जवळचा नातेवाईक राज तिलक याने दिग्दर्शित केला होता. बी. आर. यांचं मार्गदर्शन राज तिलकला लाभलं होतं. मी या दोन्ही चित्रपटांचे जागतिक हक्क घेतले असले आणि हे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाही तरी आमच्या स्नेहसंबंधांत त्याने कोणताही अंतराय निर्माण झाला नाही. ते नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले.

अगदी पहिल्या चित्रपटापासून बी. आर. हे अतिशय सेफ आणि व्यावहारिक निर्माते- दिग्दर्शक राहिले. त्यांनी कधीच खिशातले पैसे टाकून चित्रपट बनवले नाहीत. ते चित्रपट बनवीत असत आणि त्यांना हव्या त्या किमतीला तो विकून टाकत. अर्थात ते ज्याला चित्रपट विकत त्याला वितरकही मिळवून देत. त्यांच्या चित्रपटांना निश्चितपणे वितरक मिळत. त्यानंतर होणारा जो फायदा असे, त्यात ते काही टक्केवारी घेत. नुकसानीत मात्र त्यांचा वाटा नसे. कारण त्यांनी तो चित्रपट विकलेला असे! आणखी मजेशीर गोष्ट सांगू? त्यांच्याकडे खूप कमी पैशांत अभिनेते-अभिनेत्री काम करत असत. कारण त्यांची अशी खात्री असे की ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..’ या श्लोकानं सुरू होणाऱ्या बी. आर. चोप्रांच्या चित्रपटांत काम केल्यानं आपल्याला आणखी चित्रपट मिळतील! त्यामुळे ते मानधनात तडजोड करायला तयार होत असत. बी. आर. हे बहुतांशी त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग कारदार स्टुडिओतच करत असत. त्यामुळं आऊटडोअर खर्चाचं फारसं टेन्शन नसे. या सगळ्यामुळे बी. आर.ना चित्रपटांमुळे फक्त फायदाच झाला. शिवाय त्यांचा चित्रपट पडल्यास वितरकांनाही फारसं नुकसान नसे. वितरकांना तोटा व्हायचा तो फायद्यात. गुंतवलेली रक्कम त्यांना मिळत असे.

बी. आर. सुरुवातीला ‘प्रीतम’चे valued customer (मौल्यवान ग्राहक) होते. परंतु नंतर ते आमच्या घरचेही एक अविभाज्य हिस्सा बनले. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात बी. आर. व त्यांचं अख्खं कुटुंब हे असणारच! माझ्या लेकीचं – डॉलीचं लग्न ठरलं. माझे व्याही हे दिल्लीतलं एक बडं कुटुंब होतं. बी. आर. यांना डॉलीच्या लग्नाबद्दल कळलं. आपली डॉली आता दिल्लीकर होणार.. त्याहीपेक्षा डोळ्यांसमोर जन्मलेली, खेळलेली, वाढलेली मुलगी आता लग्न करून परक्या घरी जाणार, याने माझं बापाचं हृदय कळवळलं होतंच; पण तीच वेदना बी. आर. यांनाही झाली होती. त्यांना लग्नाचं कळल्याबरोबर ते स्वत: माझ्याकडे आले. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आपल्या डॉलीचं लग्न ठरलं. ती परायी होणार. पण ज्या घरात ती जातेय ते कुटुंब खूप मोठं आहे. रॉयल फॅमिली आहे. त्यांचं मानपान आपल्याला नीट करायला हवं.’’

‘आपल्याला?’ तसा बी. आर. आणि मी आमचा रक्तामांसाचा काही संबंध नव्हता. पण काही बंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक गहिरे असतात. अधिक जबाबदारीचे व खोलवर रुजलेले असतात. बी. आर. आणि आमचे कौटुंबिक संबंध असे खोलवरचे होते.

बी. आर. मला म्हणाले, ‘‘अपनी बेटी की शादी है. आपके संबंधी जो है वो राजघराना के है। मी त्यांना ओळखतो. खूप चांगली माणसं आहेत. त्यांच्यासाठी, त्यांच्या जानवशासाठी तुम्ही काळजी करू नका. त्यांच्याकरता आपल्याला भरपूर मोटारगाडय़ांची व्यवस्था करावी लागेल. परंतु आपण टॅक्सी आणायची नाही. माझ्याकडे चार गाडय़ा आहेत. त्यातल्या तीन तुम्हाला पाठवून देतो. आणि आपल्या मित्रांकडून आणखी काही मोटारी मिळतात का ते पाहतो.’’ आणि बी. आर. चोप्रा या महान दिग्दर्शकाने खरोखरच स्वत:च्या तीन गाडय़ा- दोन मर्सिडीज व एक ओपल- पाठवल्या. मेकर्स म्हणून स्नेही होते, त्यांनी चार कार पाठवल्या. अशा २९ गाडय़ा आमच्याकडे आल्या होत्या. खलनायकाची भूमिका करणाऱ्या प्राणसाहेबांनी स्वत:ची कार पाठवली. या सगळ्या गाडय़ांची व्यवस्था स्वत: बी. आर. साहेबांनी केली होती. ‘प्रीतम’च्या दाराशी एवढय़ा कार उभ्या राहिलेल्या पाहून सगळ्यांनी तोंडात बोटं घातली! या सर्व स्नेह्य़ांनी त्यांच्या गाडय़ा पेट्रोलच्या टाक्या पूर्णपणे भरून पाठवल्या होत्या. कोणी कोणी गाडय़ा पाठवल्या त्यांचा सारा हिशेब बी. आर. यांनी ठेवला होता. केवढं प्रेम होतं त्यांचं आपल्या मित्रावर! आम्ही धन्य झालो.

त्यानंतर माझ्या मोठय़ा मुलाचं- टोनीचं लग्न ठरलं. मी पत्रिका घेऊन त्यांना निमंत्रण द्यायला गेलो. तर त्यांनी भाभीजींना बोलावलं आणि सांगितलं, ‘‘या तारखा लक्षात ठेव. आपण संपूर्ण लग्नात तिथं असणार आहोत. यादरम्यान सर्व शूटिंगबिटिंग कॅन्सल!’’ नुसतं बोलून बी. आर. थांबले नाहीत, तर टोनीच्या लग्नात जेवढे दिवस वेगवेगळ्या रस्म चालू होत्या तेवढे दिवस बी. आर. व त्यांचं अख्खं कुटुंब हजर होतं. चित्रपट दुनियेचा व्यवहार कसा सांभाळावा, याविषयी बी. आर. हे आदर्श ठरतात. तसेच दोस्ती निभावण्यातही ते आदर्शच होते.

आम्ही सारे मूळचे पंजाबी आहोत. आमच्यात गुरूंवर, महापुरुषांवर वा महान व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट काढायचा रिवाज नाही. ज्यांच्याजवळ रुहानी ताकद आहे, त्यांच्यावर कसं काही निर्माण करणार? खरं म्हणजे बी. आर. यांना महाराजा रणजितसिंगजी यांच्यावर एक चित्रपट बनवायचा होता. एकदा मुंबईत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष भेटले होते. त्यांच्याकडे बी. आर. यांनी तो विषय काढला. अध्यक्ष म्हणाले की, ‘‘महाराजासाहेब हे काही गुरू नाहीत. तुम्ही त्यांच्यावर चित्रपट बनवायला हरकत नाही.’’ परंतु तो चित्रपट प्रत्यक्षात मात्र बनला नाही. एकेकाळी महाराजासाहेबांनी राजपुतांचं राज्य अफगाणिस्तानापर्यंत वाढवलं होतं. जर काही इतिहासाचा तपशील चुकला तर माझा समाज आणि सिनेमा क्षेत्र मला क्षमा करणार नाही, या विचारानं बी. आर. यांनी तो चित्रपट कधीच काढला नाही.

एक मजेशीर आठवण.. ऐंशीच्या दशकात आपल्याकडे रंगीत टीव्ही आले. त्यावेळी एकदा बी. आर. चोप्रांच्या घरी मी गेलो होतो. त्यांच्याकडे मोठा खोका पडलेला होता. मी त्यांना म्हणालो, ‘‘भाई, ये क्या है?’’ ते म्हणाले, ‘‘अरे कुलवंतजी, मी ५२ इंची रंगीत टीव्ही मागवलेत. चार आहेत. त्याच्याबरोबर व्हिडीओ टेपरेकॉर्डरही आहे.’’ मी उगाच विचारलं, ‘‘कोणासाठी आणलेत?’’ बी. आर. म्हणाले, ‘‘एक आमच्यासाठी, एक यशसाठी (यश चोप्रा), एक हेमाजींसाठी (हेमामालिनी) आणि एक असाच आणलाय. तुम्हाला हवाय का?’’ मी विचारलं, ‘‘किंमत किती ते सांगा.’’ (त्यावेळी परदेशात एकेका इंचाला १००० रुपये चार्ज करत असत.) बी. आर. म्हणाले, ‘‘बावन्न हजार.’’ मी त्यांना बावन्न हजार दिले आणि तो टीव्ही घरी आणला.

खरं म्हणजे तो टीव्ही बी. आर. यांनी दुसऱ्या कोणासाठी तरी आणला होता, पण तो माझ्या नशिबात होता!

माझ्या नशिबी या टीव्हीचा योग होताच;  पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या पत्रिकेत नियती आणि देवानं उंचपुरा व भव्य असा ‘बी. आर. योग’ लिहून पाठवला होता!

कुलवंतसिंग कोहली  ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर