16 January 2019

News Flash

लोकनेते गोपीनाथजी

उत्साहानं रसरसलेला, हसतमुख चेहरा घेऊन एक तरुण मला काही वेळा प्रमोदजींच्या बरोबर भेटलेला.

शब्दांकन : नीतिन आरेकर

एन्रॉनप्रकरणाच्या वेळी मला मुंडेजींची काळजी वाटत असे. भले आम्ही राजकारणावर कधीही बोलत नसू, पण त्यावेळी मी त्यांना काळजी घ्याअसं म्हणालो. मुंडेजी छानसं हसले व म्हणाले, ‘‘कोहलीजी, धन्यवाद. काळजी करू  नका. आपण लोकहिताची भूमिका घेतली आहे. लोकच आपल्याला सांभाळतील.’’

या मुंबईनं अशी काही जादू माझ्या परिवाराच्या आयुष्यात घडवली, की काय सांगावं! पापाजी हट्टानं मुंबईत आले. मुंबईनं त्यांना चटकन् स्वीकारलं नाही. दुसऱ्या प्रयत्नात मुंबईनं त्यांना आपलंसं केलं. असं काही आपलंसं केलं, की परत सोडलंच नाही! आम्ही साऱ्यांनीच जगातली अनेक मोठमोठी शहरं पालथी घातली आहेत. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आम्ही जगभर फिरत असतो. काही दिवस परदेशात राहिलं की मग मुंबईच्या समुद्राची, तिची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल गाडय़ांची, रस्त्यावरून सतत धावणाऱ्या वाहनांची, त्या वाहनांच्या ‘पाँ..पाँ’ हॉर्नची आणि माणसांच्या अद्भुत गर्दीची आठवण येऊ  लागते. जीव उकलू लागतो व कधी एकदा मुंबईत परततो असं वाटू लागतं. परंतु काही माणसं मला अशी भेटली, की मुंबईत आल्यानंतरही त्यांचा जीव त्यांच्या गावाच्या मातीत अडकलाय.. त्या मातीचा गंध त्यांना खेचून गावाकडे नेत असतो. त्या माणसांना त्यांच्या गावाचं गावपण टिकवून तिथे मुंबईच्या सुधारणा न्यायच्या असतात. आपल्या परिसराला त्यांना प्रगतिपथावर न्यायचं असतं. प्रमोदजी महाजनांमुळे माझ्या आयुष्यात आलेला माझा एक मित्र असाच होता- ज्याची नाळ आपल्या मातीशी, आपल्या लोकांशी कायम जुळलेली असायची. हा मित्र म्हणजे गोपीनाथजी मुंडे!

उत्साहानं रसरसलेला, हसतमुख चेहरा घेऊन एक तरुण मला काही वेळा प्रमोदजींच्या बरोबर भेटलेला. सच्च्या कामाची लगन त्याच्या चेहऱ्यावर कायम दिसायची. प्रमोदजींची त्या काळात तो सावली होता. पण काही वर्षांतच या माणसानं स्वत:ची अशी मोठी सावली निर्माण केली, की त्या सावलीत आज हजारो माणसं विसावतात. गोपीनाथजींचं व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक होतं. उंचपुरे गोपीनाथजी मला नेहमी पंजाबीच वाटत. प्रमोदजींनी माझी व त्यांची ओळख करून दिली- ‘‘हे माझे मित्र गोपीनाथजी मुंडे. आम्ही संघर्षांच्या दिवसांपासून एकत्र आहोत.’’ प्रमोदजी त्यांना ‘मुंडेजी’ असंच हाक मारत. नंतर मला कळलं, की गोपीनाथजी हे प्रमोदजींचे मेव्हणे आहेत. मुंडेजी नंतर दोन-तीन वेळा आले. प्रारंभी ते काहीसे बुजरे होते. प्रमोदजींपेक्षा त्यांचा स्वभाव वेगळा होता. पण आम्हा दोघांत एकदम छान मैत्री झाली.

मी त्यांना ‘गोपीनाथजी’ किंवा ‘मुंडेजी’ अशी हाक मारत असे. प्रमोदजी असत तेव्हा ‘मुंडेजी’; परंतु आम्ही दोघं असू तेव्हा मी त्यांना ‘गोपीनाथजी’ अशी हाक मारी. तेही मला ‘कोहलीजी’ अशी साद देत. गोपीनाथजी हे अगदी कौटुंबिक व्यक्ती होती. एकदम घट्ट पारिवारिक नातं जपणारा माणूस! ते मूळ परळीचे. ते फारसे नॉस्टॅल्जिक नव्हते. पण जेव्हा कधी त्यांच्या बालपणाचा विषय निघे, तेव्हा मात्र ते वडिलांच्या आठवणीनं हळवे होत. त्यांच्या आई-वडिलांनी अपरिमित कष्ट करून त्यांना वाढवलेलं. शिक्षण दिलेलं. जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना त्यांच्या मोठय़ा भावानं जबाबदारीनं शिक्षण देऊन वाढवलेलं. एकदा गप्पा मारताना गोपीनाथजी म्हणाले, ‘‘माझ्या छोटय़ाशा गावात भिंतींची शाळा नव्हती. एका झाडाखाली आमची शाळा भरे. एकच शिक्षक सगळी शाळा चालवत. झाडाची सावली जशी बदलत जाई तशी शाळेच्या वर्गाची जागा बदलत जाई. झाडाला रिंगण घालत आमचं शिक्षण झालं. म्हणून आमचं शिक्षण चौकटीत बंदिस्त झालं नाही. त्याला विस्तारणारी गोलाई आली.’’

मुंडेजी माध्यमिक शिक्षणासाठी परळीला आले आणि अंबाजोगाईला त्यांनी बी. कॉम. ही पदवी मिळवली. तिथंच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडलं. मुंडेजी सांगत, ‘‘प्रमोदजींची व माझी भेट अंबाजोगाईला झाली व मला एक दिशा मिळाली. आमच्या घराण्यात राजकारणाची परंपरा नव्हती. पण मला समाजकारणात प्रमोदजींनी ओढून आणलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चुंबक होतं. त्यांच्यामुळे मी विद्यार्थीजीवनात महाविद्यालयीन राजकारणात उतरलो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करायला लागलो. मला स्ट्रॅटेजी आखायला आवडते. मी महाविद्यालयीन जीवनात निवडणूक जिंकलो नाही, पण आमचं पॅनेल जिंकायचं. आम्ही त्या काळात आणीबाणीला विरोध केला. तेव्हा प्रमोदजींबरोबर मलाही तुरुंगवास झाला होता. आणीबाणी उठेपर्यंत आम्ही तुरुंगात होतो. तुरुंगातल्या जीवनानं मला खूप काही शिकवलं. नवा विचार करायची ताकद दिली. नंतर जनता पक्षाचं राजकारण केलं. पुढे भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून आम्ही भाजपचं काम करू लागलो. राजकारण करायचं ते सत्ता मिळवण्यासाठीच. पण त्या सत्तेचा गोरगरीबांसाठी उपयोग करण्यात त्या राजकारणाची इतिश्री असते, हे सूत्र मनात ठेवलं.’’

मुंडेजी रेणापूरशी.. बीडशी घट्ट जुळलेले होते. ते दादरहून नांदेडला रात्री साडेनऊच्या सुमाराची ट्रेन पकडून जात असत. त्यावेळी त्यांच्या पत्नीसह साधारण तासभर आधी ते ‘प्रीतम’मध्ये येत. तिथं जेवत आणि मग ट्रेन पकडायला जात. पहिल्याच वेळी जेव्हा ते पत्नी व पंकजासह आले आणि जेवले तेव्हा ‘त्यांच्याकडून पैसे घेऊ  नका,’ असं मी आमच्या मॅनेजरला सांगितलं. मुंडेजी म्हणाले, ‘‘अहो, असं करू नका. मग आमची पंचाईत होईल. तुमचा हा व्यवसाय आहे.’’ मी म्हणालो, ‘‘ते ठीक आहे हो. पण तुम्ही प्रमोदजींचे मित्र आहात आणि प्रमोदजी मला भावासारखे आहेत.’’ मग मुंडेजी म्हणाले, ‘‘मग काय बोलायलाच नको. त्यात ही (म्हणजे त्यांची पत्नी प्रज्ञा!) प्रमोदजींची बहीण आहे. तेव्हा या नात्यात येणारा मी कोण?’’ तेव्हा मला कळलं, की मुंडेजी हे प्रमोदजींचे मेव्हणे आहेत! तोवर दोघांनीही त्यांच्यातलं नातं सांगितलं नव्हतं. काय विलक्षण माणसं होती ती! नात्याचा हक्क गाजवण्याच्या काळात त्यांनी नात्याचं नावही काढलं नव्हतं. नंतर प्रमोदजी भेटले तेव्हा त्यांना हा किस्सा सांगितला. त्यानंतरच्या राखी पौर्णिमेला ते मला घेऊन प्रज्ञाकडे गेले. आणि मुंडेजी माझेही मेव्हणे झाले. पंकजाच्या लग्नात मुलीचा मामा म्हणून मी शगून घेऊन गेलो आणि त्यांनीही मुलीचा मामा म्हणूनच मला मान दिला. प्रीतमच्याही लग्नात मामाने करायच्या सर्व गोष्टी मी केल्या. त्यांच्याकरता मी दुसरा प्रमोदच होतो! आमची मैत्री हा माझ्या मर्मबंधातला ठेवा आहे.

प्रीतमबद्दल लिहिताना एक गंमत आठवली. मुंडेजींचं कुटुंब आणि आमचं कुटुंब यांत अगदी जवळचं नातं तयार झालेलं. बीडला जाताना तयारी करण्यासाठी म्हणून काही वेळा प्रज्ञा आणि मुंडेजी घरी येत. मला वाटतं, १९८२ च्या मध्यावर कधीतरी मुंडेजी आणि प्रज्ञा घरी आले होते. प्रज्ञाला फारसं बरं वाटत नव्हतं. ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. तिला बाहेर यायला काहीसा वेळ लागला. बाहेर आली तेव्हा ती घामानं थबथबली होती. तिनं पदरानं चेहरा पुसला. काहीशी थकलेली वाटत होती. माझ्या पत्नीनं तिला पाणी दिलं. मी गमतीत मुंडेजींना म्हटलं, ‘‘भई, आपने कुछ गडबड तो नहीं की है ना?’’ ते गडगडाटी हास्य करत म्हणाले, ‘‘कोहलीजी, इस बार बेटा हुआ या बेटी, मैं उसका नाम ‘प्रीतम’ रखूंगा!’’ काही महिन्यांनंतर मुंडेजी प्रज्ञा व पंकजासोबत एका छोटय़ा बाळाला घेऊन ‘प्रीतम’मध्ये आले. त्या छोटय़ाशा बाळाला माझ्या हाती देऊन म्हणाले, ‘‘कोहलीजी, ही ‘प्रीतम’! तुमच्या हॉटेलची मालक आहे आता!’’ मीही आनंदानं म्हणालो, ‘‘अलबत! ही काय सांगायची गोष्ट आहे?’’ आजही डॉ. प्रीतम गमतीत म्हणते की, ‘‘अंकल, हे हॉटेल माझं आहे.’’ ती खासदार झाल्यानंतर ‘प्रीतम’मध्ये आलेली नाही. ती दिल्लीतच असते. पण पंकजा असो, प्रीतम असो किंवा यशश्री असो; या मुली जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा ‘‘अंकल, कसे आहात?’’ असं म्हणून खाली वाकून नमस्कार करतात. शेवटी आई-वडलांचे संस्कार अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून दिसतात.

दिवस कसे भराभरा जातात ना! काल-परवा फ्रॉकमध्ये पाहिलेल्या या चिमुरडय़ा पाहता पाहता मोठय़ा होतात, आपल्या भागाचं, राज्याचं नेतृत्व करतात, स्वतंत्र कामगिरी बजावतात. पंकजाला एक जबाबदार मंत्री म्हणून कामगिरी बजावताना पाहताना ऊर भरून येतो. ‘जलयुक्त शिवार’ योजनेची ज्या धडाडीनं तिनं अंमलबजावणी केली ती पाहताना तर मला मुंडेजींची आठवण येते. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रानं दुष्काळाची भीषण स्थिती पाहिली नाही. प्रमोदजी, गोपीनाथजी आज असते तर त्यांना तिचा अभिमान वाटला असता. प्रमोदजींना किंवा मुंडेजींना आपल्या

सत्तेचा कधीही दर्प नव्हता. ते कायम सर्वसामान्य माणसांचे आप्त राहिले. या मुलीही तशाच आहेत.

मुंडेजींचं ‘प्रीतम’ हॉटेलवर खूप प्रेम होतं. दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि रेल्वेस्थानकाजवळच्या या हॉटेलमध्ये ते अनेकदा राजकीय खलबतं करायला येत. त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते असत. नेते असत. ते रेस्टॉरंटमध्ये बसत नसत, तर धाब्यात बसत. काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर ते मॅनेजर भूषणला सांगत, ‘‘शेठजी कुठे आहेत?’’ मी नसलो तर सांगायचे, ‘‘त्यांना बोलावू नका. त्यांना त्यांचं काम करू दे. जरा कोपऱ्यातलं टेबल दे.’’ भूषण त्यांना तसं टेबल मिळवून देई. मी एक सूचना देऊन ठेवली होती की, ‘‘मुंडेजींना काहीसा एकांत मिळवून द्यायला आजूबाजूची टेबल्स रिकामी करून देत जा.’’ आमच्या इथं घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीची वाच्यता किंवा चर्चा होणार नाही याची त्यांना खात्री असे. मुंडेजी मांसाहार करत असले तरी आमच्याकडचा कढी-पकोडा व तंदूर रोटी त्यांना खूप आवडे.

मुंडेजींनी पराभव कधी पाहिला नाही. ते सतत जिंकत गेले. आमदार असणारे मुंडेजी विरोधी पक्षनेते झाले. मात्र, त्यांच्या वागण्यातलं सौजन्य कधीही हरवलं नाही. माणूस कोणीही असो- मी त्यांना लोकांबरोबर मैत्रीच्या नात्याने वागताना पाहिलं आहे. ‘एन्रॉन’ प्रकरणाच्या वेळी मला त्यांची काळजी वाटत असे. भले आम्ही राजकारणावर कधीही बोलत नसू, पण त्यावेळी मी त्यांना ‘काळजी घ्या’ असं सांगितलेलं मला आठवतंय. त्यावेळी मुंडेजी छानसं हसले अन् म्हणाले, ‘‘कोहलीजी, धन्यवाद. काळजी करू नका. आपण लोकहिताची भूमिका घेतली आहे. लोकच आपल्याला सांभाळतील.’’ त्यांचा विश्वास खरा ठरला.

मी मुंबईचा शेरीफ झालो त्यावेळी त्या निर्णयप्रक्रियेत मुंडेजींचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून समावेश असणारच. पण त्याविषयी ते कधीही बोलले नाहीत. पण जेव्हा मला शेरीफपदाची शपथ दिली गेली तेव्हा प्रमोदजी, जोशीसर, मुंडेजी आदी सगळे नेते केसरी रंगाचे फेटे घालून आले होते हे मला आठवतंय.

मी शेरीफ असताना खालसा संस्थापनेची तीनशे वर्षे पूर्ण होणार होती. मी हा विषय एकदा मुंडेजींकडे काढला. जोशीसर मुख्यमंत्री होते. एक समिती त्यानंतर गठित झाली. मुख्यमंत्री अध्यक्ष व मी कार्यकारी अध्यक्ष अशी रचना झाली. मुंडेजी त्या समितीत होते. एका मीटिंगमध्ये मी मुंडेजींजवळ विषय काढला की, ‘‘मुंबई विद्यापीठात गुरू गोविंदसिंग यांच्या नावे एक अध्यासन असावे. त्यासाठी केंद्र सरकारकडून काही निधी मिळवून द्याल का?’’ त्यावर मी हा विषय प्रमोदजींजवळ काढावा असं मुंडेजींनी सुचवलं. काही दिवसांनी मुंडेजींचा मला फोन आला, ‘‘कोहलीजी, तुमचं काम झालंय! प्रमोदजींनी अध्यासनासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर करून आणलाय.’’ कालांतराने सरकारी कामाच्या खाक्याप्रमाणे ती रक्कम हाती येता येता सत्तापालट झाला. खालसा पंथाची स्थापना झाल्याला तीनशे वर्षे झाली त्यावेळी निर्माण झालेली समिती तरीही कार्यरत होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याजवळ विषय काढल्यावर त्यांनी समितीचे कार्य पूर्ण झाले नसल्यामुळे ती तशीच चालू ठेवायला सांगितलं. पन्नास लाखांची मंजूर रक्कम हाती आल्यावर गुरू गोविंदसिंग अध्यासनाची सुरुवात माझे मित्र- तत्कालीन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते केली. त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. या कार्यक्रमाला मुंडेजींनी शुभेच्छा दिल्या होत्या.

मुंडेजींसारखी माणसं सत्तेवर असोत वा नसोत, दुसऱ्यांसाठी कायम कार्यरत असतात. ही बाबच अशा लोकनेत्यांना सत्तेपर्यंत नेते. मुंडेजी उपमुख्यमंत्री असताना मी कित्येकदा कामानिमित्त त्यांच्याकडे जात असे. त्यांच्या दालनात मला मुक्त प्रवेश असे. सचिवांसह काही महत्त्वाच्या बैठका चालू असल्या तरीही ते मला बाजूच्या सोफ्यावर बसायला सांगत.

ते खासदार झाले. माझ्या नातवाचं लग्न होतं. मुंडेजी भलाथोरला शगून घेऊन लग्नाला सपत्निक तर आलेच; परंतु संपूर्ण लग्न लागून रात्री वरात परतल्यावर मगच निरोप घेऊन गेले. माझ्या मुलांशी, नातवांशी त्यांच्या कुटुंबाचं खास नातं होतं. मुलं आपसात नेहमी भेटत असत. माझ्या नातवानं पुण्यात ‘टरटुलिया’ नावाचं एक रेस्टॉरंट सुरू केलं. तिथं प्रीतम नेहमी जात असे.

प्रमोदजी होते तोपर्यंत मी प्रज्ञाकडे राखी पौर्णिमेसाठी जात असे. पण त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर प्रज्ञा कोशात गेली. आम्ही नंतर राखी पौर्णिमा साजरी केली नाही. पण नातं एकदा मानलं की कधी तुटत नाही. रक्ताच्या नात्याइतकीच मनाची नातीही घट्ट असतात.

मुंडेजी केंद्रीय मंत्री झाले तेव्हा मी त्यांना भेटायला दिल्लीत गेलो. त्यावेळीही ते प्रेमाने भेटले व माझ्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मला म्हणाले, ‘‘मुंबईत आलो की येतो. पण हे मंत्र्याचं अवडंबर घेऊन नाही, तर कोहलीजींचा मित्र म्हणून येतो.’’ परंतु.. तसं घडलं नाही. एका अपघातात ते गेलेच.

आजही मी ‘प्रीतम’ धाब्यात गेलो की आपसूक माझी नजर मुंडेजी ज्या टेबलावर बसत त्या टेबलाकडे जाते. मी मनानं त्या टेबलाजवळ जातो, तिथं बसलेल्या मुंडेजींची विचारपूस करतो. ‘कढी-पकोडा पाठवू का?’ असं विचारतो. ते मनापासून हसतात. ‘पाठवा, पाठवा’ असं म्हणतात. मला धूसर धूसर दिसायला लागतं. डोळ्यांतून पाणी झरू लागतं. शेजारचा मॅनेजर विचारतो, ‘‘पापाजी, काय झालं?’’ डोळ्यांतलं पाणी पुसत मी म्हणतो, ‘‘काही नाही, तंदूरचा धूर डोळ्यात गेला.’’ मी पापण्यांच्या आड मुंडेजींच्या आठवणी ठेवतो आणि कोरडय़ा डोळ्यांनी  व्यवहार पाहायला सुरुवात करतो..

ksk@pritamhotels.com

First Published on June 10, 2018 12:32 am

Web Title: article on loknete gopinathji munde kulwant singh kohli