28 February 2021

News Flash

मुंबईत.. बैसाखी

परंतु मुंबईत बसाखी होत नव्हती. आम्हा पंजाबी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा सण!

आज साठ र्वष झाली मुंबईत बसाखी सुरू झाली त्याला. मुंबईत पंजाबी मंडळी येऊन अनेक दशकं उलटली होती. ती मुंबईचा अविभाज्य भागही झाली होती. मुंबईतल्या सण-समारंभांत सहभागी होत होती. दहीहंडी, गणपती, दिवाळी, होळी या सणांमध्ये सगळे जण पुढाकार घेऊन धमाल करत होते. वेगवेगळ्या स्टुडिओंमध्ये ही मजा चालू असे.

परंतु मुंबईत बसाखी होत नव्हती. आम्हा पंजाबी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा सण! मकरसंक्रांत जशी दरवर्षी १४ जानेवारीलाच येते, तशी बसाखी साजरी करण्याची तारीख दरवर्षी १३ एप्रिलच असते. कधी कधी ती १४ एप्रिलही होते, परंतु ते कालगणनेवर अवलंबून असतं. ही बसाखी मुंबईत साजरी करायला आम्ही सुरुवात केली ते साल होतं १९५८! त्याची प्रेरणा होते महान अभिनेते प्राणसाहेब!

प्राणसाहेब हे चित्रपटांतले खलनायक. वरपांगी ते कठोर आणि आढय़ताखोर वाटत, परंतु अंतर्यामी अतिशय हळवे व मृदू स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यात नेहमी ‘हमारा पंजाब’ असायचं. ‘प्रीतम’मध्ये एकदा के. एन. सिंग, मदन पुरी, प्राणसाहेब, जीवन असे सगळे खलनायक जेवायला आले होते. त्यांच्या येण्याने एकदम तणाव पसरला. काहीजण सांभाळून बसले, काहीजण त्यांच्या टेबलपासून मुद्दाम दूर गेले. एवढे सारे व्हीलन! त्यांनी काही गडबड केली तर? आपण आपलं दूर बसलेलं बरं! काहींच्या चेहऱ्यावरची घृणा तर स्पष्टच दिसत होती. शेवटी प्राणसाहेबांनी त्या सर्वाना संबोधलं- ‘‘आम्ही सिनेमातले व्हीलन आहोत, प्रत्यक्षातले नाही. तुम्हाला जशी फॅमिली आहे, तशी आम्हालाही आहे. तुम्ही जसे मित्र-मित्र आहात तसेच आम्हीही सगळे मित्र आहोत. आज आम्ही इथं जेवायला आलोय.. काही कटकारस्थानं करायला नाही.’’ आणि ते जोरात हसले. बाकीचे व्हीलनही हसले आणि तणाव निवळला. जाताना प्रीतममधले ग्राहक त्यांच्या हातात हात मिळवून जाऊ लागले. हा सगळा प्रसंग पाहून प्राणसाहेब म्हणाले, ‘‘हे अंतर आपण बुजवलं पाहिजे. चलो, मुंबईतल्या सगळ्या सणांत आपण आपल्या बसाखीची भर घालू या. यानिमित्ताने मुंबईतली पंजाबी मंडळी एकत्र येतील आणि मुंबईकरांना आपण आपलं पंजाबचं समृद्ध सांस्कृतिक जीवन दाखवू!’’

ही कल्पना सर्वानीच उचलून धरली. हे सगळं माझ्या समोर घडत होतं. मुंबईतल्या पंजाब असोसिएशनचा मी सक्रिय कार्यकर्ता होतो. प्राणसाहेबांनी मला बोलावलं व त्या वर्षी ‘आपण मुंबईत बसाखी साजरी करू या’ असं सांगितलं. तोवर व्यक्तिगतरीत्या बसाखी साजरी व्हायची. परंतु प्राणसाहेबांच्या पुढाकाराने तिला  सार्वजनिक रूप आलं. आम्ही प्राणसाहेबांना सांगितलं, की तुम्हीच याचे प्रमुख व्हा. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सोहळा आयोजित करू. तेही तयार झाले. त्यांनी लगेच आपल्या डायरीतली १० एप्रिलपासूनची सर्व शूटिंग्ज रद्द केली. तिथं उपस्थित असणाऱ्या सर्वानी तेच केलं. मग नाझ सिनेमाचे मालक आर. पी. आनंद, ओमप्रकाश सगल, चरणजित राय अशा मंडळींनी आयोजनात पुढाकार घेतला. मीही होतोच. आम्ही सगळेजण मुंबईतील पंजाबी अभिनेते मंडळींतील सर्वात ज्येष्ठ असलेल्या पृथ्वीराज पापाजींकडे गेलो. त्यांनी अत्यंत आस्थेनं आमची चौकशी करून विनम्रपणे एकशे एक रुपयांची थली आमच्या हाती सुपूर्द केली. जोवर पापाजी होते तोवर त्यांनी हा शिरस्ता पाळला. आणि जोवर पंजाब असोसिएशनची बसाखी होत होती तोवर तिचं नेतृत्व करण्याची जबाबदारी प्राणसाहेबांनी निभावली. आम्ही सारे मिळून कामं करत असू आणि प्राणसाहेब व्यासपीठाजवळ विंगेत बसून सगळ्या गोष्टींवर देखरेख करत. ते माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते. त्यांच्यासोबत मार्गदर्शन करायला अभिनेते ओमप्रकाशही असायचे.

बसाखीला पंजाबीजनांत अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. नव्या पिकांचं स्वागत करण्याचा हा सण आहे. याच दिवशी सन १६९९ मध्ये मोगलांच्या अत्याचारांविरुद्ध शिखांचे अंतिम गुरू गोविंदसिंग यांनी शिखांना ‘खालसा’च्या रूपात संघटित केलं. त्यांनी एक कठोर परीक्षा घेतली. त्या परीक्षेला सामोरे गेले- लाहोरनिवासी दयाराम, सरहानपूरनिवासी धर्मदास, जगन्नाथनिवासी हिम्मतराय, द्वारकानिवासी मोहकचंद आणि बिदरनिवासी साहेबचंद. पाचही जण त्यात यशस्वी झाले. गुरू गोविंदराय यांनी या पाचही जणांना आपले खास शिष्य म्हणून नियुक्त केलं आणि त्यांना खालसाचं प्रतीक म्हणून कडं दिलं. तसेच त्यांना दाढी व केस वाढवण्याचा आदेश देऊन केस राखायला सांगितलं. केस व्यवस्थित ठेवायला कंगवा, कमरेला कच्छा आणि जनरक्षणासाठी हातात कृपाण घ्यायला सांगितलं. आणि याच दिवसापासून आम्ही स्वत:ला ‘सिंग’ म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

‘खालसा’ म्हणजे पवित्र. मराठी संत म्हणतात ना- ‘बाप रखुमादेवीवरे विठ्ठले अर्पिला’ तसं आम्ही ‘वाहे गुरू की फतेह’ असं म्हणतो. वारकरी संत कसं सर्व काही विठ्ठलाला अर्पण करतात, तसंच आम्ही आमचं सर्व काही गुरूला अर्पण करतो. ‘गुरूंचा विजय’ असं म्हणतो. पंथ कोणताही असो; समर्पणाची भावना सर्वत्र सारखीच असते, हेच खरं. बैसाखी हा तो पवित्र दिवस! या दिवशी पंजाबात घरं सजतात. अंगणात रांगोळ्या पडतात. रोषणाई होते. पक्वान्नं बनतात. गुरूद्वारांत ‘गुरू ग्रंथसाहिब’चे पाठ पढले जातात. कीर्तनं होतात. जत्रा भरतात. ढोलाच्या तालावर भांगडा नाचला जातो. असा हा सण मुंबईत साजरा करण्याचं ठरलं आणि आमच्या उत्साहाला जणू उधाणच आलं!

आमच्या पहिल्याच बठकीत प्राणसाहेबांनी सांगितलं की, नव्या कलाकारांना संधी देऊ या. मुंबईतले प्रस्थापित कलाकार हे सेलेब्रिटी म्हणून येतील. पण पंजाबातल्या गावागावांत लपलेली कला देशासमोर येऊ दे. मुंबईत कला सादर केली म्हणजे ती देशासमोरच सादर केल्यासारखं आहे. त्यांनी पंजाबच्या सांस्कृतिक संचालकांना (भानसिंग असं त्यांचं नाव असावं.. आता नेमकं आठवत नाही.) उद्देशून एक पत्र दिलं. मी, आर. पी. आनंदसाहेब आणि ओमप्रकाश सगलजी असे तिघंजण फ्राँटिअर मेलनं पंजाबला गेलो. तिथं संचालकांनी पंजाबमधल्या गावागावांत निरोप पाठवून कलाकारांना बोलावलं होतं. आजच्या एखाद्या ‘रिअ‍ॅलिटी शो’सारखी ती तयारी होती. असे तगडे कलाकार तिथं एकत्र जमले होते की बस्स! एकेकाचं सादरीकरण पाहून आम्ही स्तिमित होत होतो. त्या कलाकारांसोबत नाचत त्यात सहभागी होत होतो, जागेवरूनच त्यांच्या गाण्याला ताल देत होतो. कोणाला निवडावं आणि कोणाला नाही असं झालेलं. तीन दिवस आमची ही निवड प्रक्रिया सुरू होती. भारताच्या दऱ्याखोऱ्यांत दडलेलं ते कलाकौशल्य उसळी मारून बाहेर येत होतं. त्यात संचालक महोदयांनी आम्हाला सांगितलं की, ‘‘आम्ही पंजाब सरकारकडून पंचवीस जणांचा एक चमू तुम्हाला देऊ. त्यांचा जाण्या-येण्याचा, जेवणाचा खर्च पंजाब सरकार करेल. तुम्ही त्यांच्या राहण्याचा प्रश्न सोडवा.’’ आम्हीही वीस जण निवडले. हे कलाकार अगदी साधे होते. आम्ही तुम्हाला काय द्यावं, असं विचारल्यावर त्यातले काही म्हणाले, ‘जाणं-येणं आणि शंभर रुपये द्या.’ काहींनी सांगितलं की, ‘फक्त जेवण द्या, पसे नकोत.’ आम्ही त्या सर्वाना मुंबईत आणलं. त्यांच्या राहण्याची सोय सायनमधील पंजाब असोसिएशनच्या क्लब हाऊसमध्ये केली. मुंबईत आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबई दाखवली. कार्यक्रम जिथं होणार होता ते नॅशनल स्पोर्ट्स क्लबचे मदान दाखवले. सारे खूश झाले.

कार्यक्रमाचा रंगमंच, ध्वनी व प्रकाशयोजना सांभाळायची जबाबदारी प्राणसाहेबांनी जयराज यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारावर सोपवली. जयराज पंजाबी नव्हते. पण त्यांनी अनेक र्वष ही जबाबदारी कुरकुर न करता सांभाळली.

कार्यक्रमाची चर्चा करताना प्राणसाहेबांनी सुचवले की, ‘‘पंजाबात बसाखीदरम्यान कुस्ती होते. तुम्ही दारासिंगना बोलवा.’’ आम्ही विचार केला की दारासिंग आणि त्यांचे भाऊ यांची प्रदर्शनी कुस्ती ठेवू या. आम्ही तिघं दारासिंगजींकडे गेलो. तर ते उत्साहानं म्हणाले, ‘‘मेरे भाई के साथ कुश्ती क्यूँ? पहली बार बसाखी मनायी जा रही है, तो मैं किंगकाँग के साथ कुश्ती खेलूंगा।’’ मग तर काय, कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढण्याची हमी मिळाली! आम्ही बसाखीतला आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं, तो म्हणजे पतंगबाजी. हवेत पतंग बदवण्याची स्पर्धा! पतंगबाजीला निमंत्रण दिलं दिलीपकुमार आणि जॉनी वॉकर यांना. आमचा अंदाज होता की चार-पाचशे माणसं बसाखीसाठी येतील. आम्ही क्वालिटी रेस्टॉरंटला पाचशे लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली.. पाच रुपये ताट या दराने. त्यांनी त्यांची तयारी केली.

..आणि बसाखीचा दिवस उजाडला. आम्ही सगळे नॅशनल स्पोर्ट्स क्लबला पोहोचलो. सुरुवातीला तीन-चारशेच माणसं होती. पण जसजसा कार्यक्रम रंगत गेला, दिलीपसाब, जॉनी वॉकर व अन्य मंडळी पतंग उडवू लागली तोवर जनसमुदाय पंचवीस हजारांवर गेला! पतंगबाजीनंतर जत्रा, पंजाबी भांगडा, पंजाबी गाण्यांनी बहार उडवून दिली. ज्या पद्धतीनं मुंबईनं आमच्यासारख्यांना स्वीकारलं त्याच पद्धतीनं मुंबईने मोठय़ा दिलाने बसाखीलाही स्वीकारलं. पुढे ही बसाखी रुजली, वाढली, बहरत गेली.

मग आम्ही बसाखीचे कार्यक्रम दोन दिवस करू लागलो. बसाखीच्या आदल्या रात्री एकदम रंगारंग कार्यक्रम असायचा आणि दुसऱ्या दिवशी जत्रा असायची. रात्रीचा कार्यक्रम तिकीट लावून सादर होत असे. संध्याकाळी आठ वाजता सुरू होणारा कार्यक्रम रात्री बारा-एक वाजेपर्यंत चालत असे. रंगभवनची क्षमता २४०० खुर्च्याची होती. पहिल्या तीन रांगांचं तिकीट त्या काळात पाचशे रुपयांचं असे. नंतरचं दोनशे आणि शंभर रुपये. पण कार्यक्रम हाऊसफुल्ल! या कार्यक्रमांत पंजाबातून आलेले प्रतिभावंत कलाकार आपली कला सादर करीत असत. पंजाब असोसिएशनच्या बसाखीनं कितीतरी कलाकार सिनेजगताला दिले. जोगिंदरसिंग हा भांगडा कलाकार होता. पुढे तो हिंदी चित्रपटांत एक निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला. मनोहर दीपक हा भांगडा नृत्यातला जबरदस्त कलाकार. त्याचा भांगडा पाहून राज कपूर यांनी त्याला त्यांच्या चित्रपटांतून संधी दिली. सुलक्षणा पंडित ही सुंदर गायिका-अभिनेत्री त्यातलीच एक. तिचे वडील लहानपणीच निवर्तले होते. तिच्या गायनाचं कौशल्य पाहून पंजाब असोसिएशनने तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला. जसपींदर नुरुला हीदेखील पंजाब असोसिएशनच्या बसाखीचंच एक ‘फाइंड’ आहे.

आणखी एक फारशी माहिती नसलेली गोष्ट सांगतो. पुढे भारतातले सर्वश्रेष्ठ गझलगायक म्हणून ज्यांचं नाव झालं ते जगजितसिंग हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात आमच्या बसाखीत पंजाबातून येणाऱ्या कलावंतांची गाण्याची तयारी करून घेत. आम्ही त्यांना जेमतेम पाचशे रुपये देत असू. पण नंतर नावलौकिक झाल्यावरही अनेक र्वष त्यांनी हा परिपाठ सुरू ठेवला होता. रफीसाहेब, महेंद्र कपूर हेही बसाखीत गात असत. एका बसाखीला तर आम्ही केवळ जगजितसिंग आणि महेंद्र कपूर यांच्याच गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. बसाखीच्या रंगमंचावर एकदा बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील कलाकारांनी नाटिका सादर केली होती. इथंच दिलीपकुमार, राजेंद्रकुमार आणि राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांतले प्रसंग सादर केले आहेत.

जसे मूळ पंजाबमधले कलाकार इथं येत असत, तसेच अन्य भाषांतले, प्रांतांतले कलाकारही येत. रेखा ही दाक्षिणात्य अभिनेत्री. पण तिनं ‘या मंचावर मला गझल गायची आहे..’ अशी इच्छा व्यक्त केली. रेखा सुंदर दिसते तसंच सुंदर गातेही, हे अनेकांना ठाऊक नाही. तिला शास्त्रीय गायनाची विलक्षण समज आणि आवड आहे. तिला गझल शिकवण्यासाठी आम्ही आजचा आघाडीचा गायक शान याचे वडील मानस मुखर्जी यांना विनंती केली. मानसदा हे बंगालीतले मोठे संगीतकार. ते माझ्या मुलीला- डॉलीला संगीत शिकवायला येत असत. त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि रेखाने त्या बसाखीत अप्रतिम गझलगायन केलं.

दुसऱ्या दिवशीच्या जत्रेलाही आदल्या दिवशीचाच रंगारंग कार्यक्रम पुन्हा सादर व्हायचा. फक्त त्यात तारे-तारका नसायच्या. अर्थात त्या दिवशी राज, शम्मी, शशी हे कपूर्स, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार, सुनील दत्त, नर्गिस, गीता बाली असे कोणी ना कोणी उपस्थित असायचेच. पुढे जेव्हा रात्री दहा वाजता कार्यक्रम बंद करण्याचा फतवा निघाला त्यानंतर आम्ही रंगभवनमधला कार्यक्रम बंद केला. पंजाब असोसिएशनच्या बसाखीच्या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील तारे-तारका विनामोबदला येत आणि रसिकांना रिझवीत असत. केवढी मजा यायची तेव्हा! अगदी काल-परवाचीच तर गोष्ट वाटते ही. आज साठ र्वष झाली.. मुंबईत बसाखी सुरू झाली त्याला.

– कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:20 am

Web Title: articles in marathi on punjabi festival baisakhi
Next Stories
1 रूपेरी माणूस!
2 दिलीपसाब
3 ताठ कण्याचं झाड
Just Now!
X