News Flash

भारत भूषण

अगदी खरं सांगू का? मला आठवणींतल्या माणसांची निवड करता येणं कधी कधी खूप अवघड जातं.

|| कुलवंतसिंग कोहली

या लेखमालेच्या निमित्ताने आठवणींच्या पारंब्यांना लटकून मी जेव्हा झोके घेतो तेव्हा प्रत्येक हिंदोळ्यागणिक आयुष्यात भेटलेली एकेक व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. कानात हळुवारपणे सांगत राहते, ‘अरे, मीही तुझ्यासोबत काही क्षण व्यतीत केले आहेत. मला तुझ्या झरणीतून पुन्हा एकदा कागदावर झरू दे.’

अगदी खरं सांगू का? मला आठवणींतल्या माणसांची निवड करता येणं कधी कधी खूप अवघड जातं. जवळजवळ पंच्याऐंशी वर्षांचं अगदी ‘इव्हेंटफुल’ आयुष्य मी जगत आलोय. प्रत्येक क्षण हा आनंदाचा आहे. दु:खं येत असतात, पण त्यांच्यामुळे सुखाचं महत्त्व पटतं. म्हणून दु:खाची अपरिहार्यता मला मान्य आहे. काही काही व्यक्ती माझ्या आयुष्यात सहजपणे आल्या. त्या का आल्या, याचं कारण माहीत नाही. त्या तशा येणं हे नियतीनं ठरवलं होतं. त्यांचा माझ्या आयुष्यावर कोणताही परिणाम झाला नाही, वा माझ्यामुळं त्यांच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. त्या व्यक्ती अलिप्त स्वभावाच्या होत्या. गीतेमधल्या ‘सुख-दु:ख समेकृत्वा’ अशा प्रकारच्या होत्या. त्यातीलच एक म्हणजे- नियतीनं ज्याच्या पदरात यशाचं दान घातलं ते अलिप्तपणे स्वीकारणारा आणि पदरात पडलेलं कठोर अपयशाचं दानही त्याच अलिप्ततेनं स्वीकारणारा ‘स्टार’- भारत भूषण!

भारत भूषण भल्ला हा आमच्या ‘प्रीतम’मध्ये नियमित येत असे. त्याला पहिल्यांदा घेऊन आला तो त्याचा भाऊ आर. चंद्रा! त्याला आम्ही ‘चंद्रा’ म्हणायचो. तो लखनौला त्याच्या ‘आयडिअल पिक्चर्स’च्या माध्यमातून चित्रपट निर्मिती करत असे. आमच्या ‘प्रीतम’समोर पूर्वी पंजाब नॅशनल बँक होती, त्या बँकेचे मॅनेजर होते हरनालजी. कोणताही पंजाबी अभिनेता, अभिनेत्री किंवा निर्माता, दिग्दर्शक आपलं खातं याच पंजाब नॅशनल बँकेत उघडत असे. फिल्मी लोकांच्या काही समजूती पक्क्या असतात. एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याला यश मिळालं, की सर्व त्याचं अनुकरण करतात. तशा पद्धतीनं दादर पूर्वच्या या बँक शाखेवर फिल्मी लोकांचं प्रेम होतं. हरनालजी (हरनाल हे त्यांच्या गावाचं नाव आहे, त्यांनी स्वत:चं आडनाव म्हणून गावाचंच नाव लावलेलं.) त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही कलाकाराला आमच्याकडे चहापाण्यासाठी घेऊन येत. माझी ओळख करून देत. मग पुढच्या वेळी ती व्यक्ती आपोआपच ‘प्रीतम’कडे येत असे. (आमच्या यशामागे हेही एक कारण आहे बरं!) तसाच आर. चंद्राही आमच्याकडे येऊ लागला. चंद्रा अतिशय खेळकर, गप्पिष्ट आणि दोस्तीलायक माणूस होता. आर. चंद्रा म्हणजे रमेशचंद्रा; हे त्याचं मूळ नाव आहे हे मला नंतर कळलं. त्याला चित्रपटाबद्दल अतिशय प्रेम होतं. त्यानं उत्तम चित्रपटांची निर्मिती केली.

चंद्रा आमच्याकडे नेहमी येत असे. त्याच्याबरोबर अनेक मित्र असत. एकदा असाच तो अनेक मित्रांसोबत आला होता. करण दिवाण, जेमिनी दिवाण, केदार शर्मा, पी. एल. संतोषी आणि एक लक्ष वेधलं जाईल असा तरुण, असे काही जण होते. त्या तरुणाला मी कुठे तरी पाहिल्याचे आठवत होते, पण कुठे ते नेमके आठवेना. त्या वेळचं ‘प्रीतम’ अगदी छोटंसं होतं. किचन रेस्टॉरंटला लागून होतं. त्यादिवशी किचनमध्ये अचानक एक गडबड झाली. किचनचं सांडपाणी वाहून नेणारी मोरी तुंबली आणि ते पाणी रेस्टॉरंटमध्ये वाहू लागलं. रेस्टॉरंटमध्ये गर्दी तर होतीच, पण ही स्टार मंडळी येऊन बसलेली होती. करायचं काय? पण चंद्रा, दिवाण बंधू, केदार शर्मा आदींनी पाय वर घेतले. तो तरुण अस्वस्थ दिसू लागला. तेवढय़ात आमच्या एका आचाऱ्याकडून कोळशाच्या शेगडीवर ठेवलेल्या कढईला अशा पद्धतीनं धक्का लागला की कढईतलं सारं अन्न शेगडीत पडलं. आम्ही शेगडीसाठी पक्का कोळसा वापरायचो (हा कोळसा आगगाडीच्या इंजिनसाठी वापरला जायचा), अलीकडे कच्चा कोळसा मिळतो. पक्क्या कोळशाची धग अधिक आणि ते इंधन जास्त काळ टिके. कोळशाच्या धुराचा मर्यादित प्रमाणातला गंध अन्नाला एक वेगळा स्वाद प्राप्त करून देतो. पण आता पंचाईत झाली, कोळशावर अन्न सांडलेलं. त्यामुळे शेगडी तर विझलीच, पण सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं. रेस्टॉरंटमधील प्रत्येकाला ठसका लागला, ज्याच्या-त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. हे सगळं तीन-चार मिनिटांच्या अवधीत घडलं.

मी गल्ल्यावरून पटकन धावत आत गेलो. सर्व दारं-खिडक्या उघडय़ा ठेवल्या. धूर हळूहळू गेला. सर्व ग्राहकांची मी क्षमा मागितली. चंद्राबरोबर आलेले सर्व स्टार त्या काळात शांतपणे बसून होते. तो तरुण तेवढा जरासा जोरातच म्हणाला (पण त्या बोलण्यात सभ्यता होती), ‘‘भय्या, आप मुझे ये कौनसी जगह ले आये? क्या ये बम्बई है? मुझे यहाँ नहीं रुकना है.’’ चंद्रा म्हणाला, ‘‘अरे, असं पहिल्यांदा झालंय. इथं जेवण छान मिळतं म्हणून आम्ही सारेच इथं येतो.’’ त्या भल्या लोकांनी मला सांभाळून घेतलं. तो तरुण कुरकुरत जेवला. जेवण झाल्यावर पसे देताना चंद्रानं माझी व त्या तरुणाची ओळख करून दिली, ‘‘हा भारत भूषण, माझा धाकटा भाऊ. त्याला चित्रपटात हिरो बनायचंय, म्हणून इथं आलाय. आधी कलकत्त्यात त्यानं काही फिल्म केल्या, पण आता मुंबईत आलाय.’’ मग मला आठवलं, याला आपण ‘बजू बावरा’ चित्रपटाच्या पोस्टरवर पाहिलंय!

नंतर काही वेळा चंद्रा ‘प्रीतम’मध्ये आला. भारत भूषण त्याच्याबरोबर यायचा, पण तो गाडीतच बसून राहायचा. त्याच्या मनातली ‘प्रीतम’ची पहिली भेट काही केल्या जात नव्हती. मी त्याला एकदोनदा आग्रह केला. पण तो गाडीतून उतरेना. गाडीतच बसून तो त्याच्या आवडीचा पदार्थ खायचा. मी स्वत: आवर्जून जाऊन त्याला सव्‍‌र्ह करायचो. मग पुढे कधी तरी तो ‘प्रीतम’मध्ये येऊ लागला. तो अंतर्मुख होता, शांत होता, सतत काही तरी गुणगुणत असायचा. कोणाशी काही बोलणं नाही, अवास्तव बढाया मारणं नाही. आपण बरं की आपलं काम बरं, असा त्याचा स्वभाव! आमच्याकडे त्याच्या आवडीचं पंजाबी जेवण जेवायला तो येत असे. चिकनचे वेगवेगळे पदार्थ त्याला आवडत असत. तो अनेकदा चंद्राबरोबरच येई. सकाळच्या सूर्याची किरणं जशी हळूहळू विस्तारत जातात, शांतपणे पसरत पसरत उजेड करत जातात, तसा भारत भूषण हळूहळू उलगडत गेला, पसरत गेला. माझ्याजवळ मोकळेपणाने बोलू लागला. अर्थात, त्याचा मोकळेपणा हा त्याच्यासारखाच अलिप्त होता.

एकदा भारत सांगत होता, ‘‘मेरठचे रायबहादूर मोतीलाल हे आमचे वडील. ते अतिशय कडक स्वभावाचे. दादा आणि मला चित्रपट पाहायची खूप आवड होती, पण वडिलांना चित्रपट वगरे काही आवडत नसे. त्यात माझी आई, मी दोन वर्षांचा असतानाच वारली. त्यामुळे मुलं बहकू नयेत म्हणून त्यांची शिस्त अधिकच कडक झाली. चित्रपट हा विषयदेखील आम्हाला वज्र्य होता. एकदा वडिल अंबाला येथे काही कामासाठी गेले होते. आता ते काही दिवसभर येत नाहीत, अशा हिशेबानं मी व रमेश गुपचूप सिनेमा बघायला गेलो. सिनेमाही एकदम भारी होता- ‘राजरानी मीरा’! त्यात देविकाराणी काम करत होत्या. सिनेमा संपल्यावर त्यासंबंधी गप्पा मारत आम्ही घरी आलो. आत शिरताना लक्षातच आलं नाही की घरी वडिल आले असतील म्हणून. त्यांचं काम लवकर आटोपलेलं, म्हणून ते लवकर घरी आलेले. फिर क्या, हमारी ऐसी जमके पिटाई हुई की तौबा। वडिल म्हणाले, ‘सिनेमाचं नाव तर काढा, फिर देखो क्या हालत करता हूँ, तुम दोनों की।’ मग दादानं व मी मनातल्या मनात निश्चय केला- आपण चित्रपटात जायचं! लहान वयात वेडेपणा हा स्वभाव बनतो. आम्ही सिनेमात गेलो. पहिल्यांदा रमेश गेला व नंतर मी!’’

शिक्षणाच्या नावानं भारत घरापासून दूर राहिला व स्वत:ची सिनेमा बघायची आवड पूर्ण करत गेला. त्यानं अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली. सिनेमात जायचं तर संगीत नीट यायला हवं, म्हणून त्यानं शास्त्रीय संगीताची नियमित शिकवणी घेतली. सर्व रागदारी समजून घेतली. तो खासगीत गातही असे. एकदा भारत सांगत होता की, ‘‘चाळीसच्या दशकात कलकत्ता ही भारतीय सिनेमाची मक्का होती. मी तिथं गेलो. छोटय़ा छोटय़ा भूमिका मिळतात का ते पाहात राहिलो. तुमची इच्छा असली तर देव देतोच. मला काही भूमिका मिळतही गेल्या. मीनाकुमारीच्या ‘चित्रलेखा’ या चित्रपटात मी पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर आलो, पण नायक नव्हतो. मात्र लगेचच एक फार उत्तम संधी मला मिळाली. भारतीय शास्त्रीय संगीतातले एक महान गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर हे ‘भक्त कबीर’ या चित्रपटात कबिराची भूमिका करणार होते, पण त्यांचं काही तरी कारणावरून तिथं खटकलं व त्यांनी तो चित्रपट सोडला. मग तो चित्रपट माझ्याकडे आला व मी कबिरांची भूमिका केली. मी नायक बनलो.’’

नंतर मुंबईत आलेल्या भारतला केदार शर्मानी ‘सुहाग रात’ हा चित्रपट दिला. ‘सुहाग रात’ थोडाफार हिट झाला. आता मुंबईत भारत भूषण स्थिरावला, त्याचं नाव झालं. त्याची हळूहळू चलती सुरू झाली. तो माझ्याशी मोकळेपणे बोलू लागला. सुरुवातीला अजिबात न बोलणारा भारत माझ्याशी एवढय़ा गप्पा मारू लागल्याचं चंद्राला आश्चर्य वाटत असे. त्या दोन भावांतलं नातं छान होतं, पण भारत थोडासा हट्टीही होता. पस्तिशी उलटली तरी तो लग्न करत नव्हता. १९५६-५७ च्या सुमारास चंद्रा मला एके दिवशी म्हणाला, ‘‘कुलवंत, भारतला थोडासा समजाव ना. तो लग्नच करत नाहीय. त्या एका संस्थानाची राजकन्या त्याला सांगून आलीय, पण हा ऐकतच नाही.’’ भारत माझ्यापेक्षा निदान १३-१४ वर्षांनी मोठा होता. परंतु माझं लग्न होऊन मला एक मुलगाही झाला होता. चंद्राला बापडय़ाला वाटलं, की मी सांगून तरी भारत ऐकेल. पण रामा, शिवा, गोविंदा! त्याला मी लग्नाविषयी काही बोललो की तो लगेच उत्तर देई, ‘‘लग्नाची काय गरज आहे? उगाच संसाराच्या झमेल्यात अडकून पडायचं. लग्नाच्या गरजा तर बाहेरूनही भागू शकतात की!’’ असं म्हणून त्यानं मला डोळा मारला. आता मी यावर काय बोलणार?

त्याच्या कारकीर्दीची सुरुवात १९४१ साली झाली असली तरी त्याला निखळ यश मिळालं ते १९५२ सालच्या ‘बजू बावरा’मधून. त्याला भरपूर पसे मिळू लागले. त्यानं मुंबई-पुण्यात बंगले घेतले, महागडय़ा गाडय़ा घेतल्या. त्याच्या स्वभावाला झेपेल अशी थोडीफार मौजमजा करू लागला. चंद्राच्या मदतीनं त्यानं काही सुंदर चित्रपटांचीही निर्मिती केली. म्हणजे चित्रपटासाठी पसे तो लावत असे आणि निर्माता असे चंद्रा. ‘शायराची, गायकाची किंवा एखाद्या कलाकाराची भूमिका करणारा कलाकार’ अशी भारतची प्रतिमा झाली होती. एकदा एका पार्टीतल्या गप्पांमध्ये साहीर लुधीयानवी म्हणाला, ‘‘एका चाहत्यानं माझ्याकडे माझा एक फोटो सही करून मागितला. मी सही करून फोटो दिला, तर तो चाहता म्हणाला की, ‘तुम्ही शायरसारखे दिसत नाही. भारत भूषण कसा शायर दिसतो.’’ सारे खदखदून हसले. भारत भूषण दिसायचाच कवीसारखा!

भारतने ‘मीनार’, ‘बसंत बहार’, ‘बरसात की रात’ असे काही चित्रपट बनवले. त्यात त्याला यश तर मिळालं, पण तो व चंद्रा या दोघांनाही इंडस्ट्रीतल्या लोकांनी डुबवलं. भारतचे पसे बुडीत खात्यात गेले. त्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली. त्या काळातले स्टार चित्रपट सोडून अन्यत्र गुंतवणूक करत नसत. भारतही त्याला अपवाद नव्हता. दिलीप, राज, देव या त्रिमूर्तीसमोर त्याचे रोमँटिक चित्रपट चालत असतानाच शम्मी कपूर आला आणि त्यानं सर्वाचं स्थान धोक्यात आणलं. भारतही त्या वावटळीत सापडला. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देऊ शकतील असे चित्रपट बनणं बंद झालं. तोवर भारतनं एक लग्न केलेलं, त्याला दोन मुली झाल्या. दुसऱ्या मुलीच्या बाळंतपणात त्याची पहिली पत्नी गेली. मग त्यानं ‘बरसात की रात’मधली त्याची सहकलाकार रत्ना हिच्याशी विवाह केला. ती त्याच्याबरोबर अखेपर्यंत होती. पण त्यानं त्याची वाईट परिस्थिती आल्यावर माझ्याशी संबंध संपवले.

ऐंशीच्या दशकातील ही घटना. एकदा मी वांद्रय़ाहून दादरला परत येत होतो, तर एका बसथांब्यावर भारतला उभा असलेला पाहिला. भारतीय सिनेमाचा एक काळ गाजवलेला एक कलाकार आपल्या शेजारी उभा आहे, याची बसथांब्यावरील मुंबईकरांना कोणतीही जाणीव नव्हती; तशी गरजही नव्हती त्यांना आणि अर्थातच भारत भूषणलाही. तो शांत, अलिप्तपणे उभा होता. चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. क्षणभर मला वाटलं, गाडी थांबवावी, त्याला गाडीतून हव्या त्या जागी सोडावा. मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. आरशातून मागे पाहिलं. तेवढय़ात बस आली. माणसांच्या त्या गर्दीतून तो कसाबसा आत चढला. बस मला ओलांडून पुढे गेली. भोवताली गर्दी जमवणारा एक माणूस अखेरीस गर्दीचाच एक भाग झाला.

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:07 am

Web Title: bharat bhushan
Next Stories
1 ‘भारत’कुमार
2 दिलखुलास माणूस
3 नरमदिल ग्यानी झैलसिंग
Just Now!
X