कुलवंतसिंग कोहली

‘‘कुलवंत, एक लक्षात ठेव. कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस. नेहमी भव्य स्वप्नं पाहा. आज कदाचित तुझ्याकडे फारसं नसेल, पण उद्या मात्र तुझ्याकडे सर्व काही असेल असाच विचार कर. पसा काय, येतो आणि जातो; पण संपत्ती तयार कर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मिळवताना तत्त्वांशी व योग्य मार्गाशी कधीही तडजोड करू नकोस..’’

मी तेव्हा जेमतेम १७-१८ वर्षांचा होतो आणि हा उपदेश मला करत होते- हॉटेल व्यवसायातील तोपर्यंत एक दंतकथा बनलेले महान उद्योजक एम. एस. ओबेरॉय. ओबेरॉय हॉटेल्सचे सर्वेसर्वा.

पापाजींना दिल्लीला एका लग्नासाठी जायचं होतं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी मला पाठवलं. लग्नात एका टेबलवर मी बसलो होतो. त्याच टेबलवर एक अत्युच्च अभिरुचीचा पोषाख परिधान केलेले सद्गृहस्थ येऊन बसले होते. त्यांनी आपणहून माझी ओळख करून घेतली व स्वत:ची ओळख करून दिली- ‘‘माझं नाव मोहनसिंग ओबेरॉय. आमची काही हॉटेल्स आहेत.’’ मीही त्यांना म्हणालो, ‘‘माझं नाव कुलवंतसिंग कोहली. आमचंही मुंबईत छोटंसं हॉटेल आहे- ‘प्रीतम’ या नावाचं.’’ ते लगेच म्हणाले, ‘‘हां.. हां, मी ऐकलंय. तिथं जेवण म्हणे छान मिळतं.’’ मी लगेच त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकारलंही. तेव्हा ते मुंबईत हॉटेल उभारण्यासाठी येण्याच्या तयारीत होते. ते दिल्लीहून येत आणि ताजमध्ये उतरत.

आमच्या त्या भेटीनंतर ओबेरॉयजी मुंबईत आले आणि त्यांनी मला फोन केला, ‘‘मी काही दिवसांपूर्वी मुंबईत आलोय. मला आता पंजाबी जेवणाची आठवण येतेय. मला पंजाबी जेवण देशील का?’’ द ग्रेट ओबेरॉय मला विचारत होते की, ‘मला पंजाबी जेवण देशील का?’ मी आनंदानं म्हणालो, ‘‘अर्थात. तुमचे पाय आमच्या प्रीतमला लागणं हे आमचं भाग्यच आहे. मी तुम्हाला घ्यायला येतो.’’ १९५० साली आमच्याकडे एक साधी कारही नव्हती. ओबेरॉयजींच्या सांगण्यावरून मी त्यांना घ्यायला दादरहून बसने गेलो. बस तिकिटाचा दर चार आणे होता आणि टॅक्सीचा खर्च साधारणपणे तीन रुपयांच्या आसपास येत असे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या काळात दादर ते गेट-वे ऑफ इंडिया हे अंतर साधारणपणे वीस मिनिटांत बस कापत असे. ट्रॅमला थोडा जास्त वेळ लागत असे आणि ती स्वस्तही होती. मी बसने गेलो. ओबेरॉयजी ताजमध्ये जिथे उतरले होते तो सर्वात महागडा सूट होता. पण त्याचा त्यावेळचा दर ऐकलात तर तुम्हाला हसूच येईल. तो दर साधारणपणे प्रतिदिन अठरा ते वीस रुपये इतका होता. त्या काळात ताजमधल्या रूम्सही वातानुकूलित नव्हत्या. (पुढे माझं लग्न झाल्यावर मी पत्नीला घेऊन जेव्हा गेट-वे ऑफ इंडियाला फिरायला जाई तेव्हा ताजच्या बँक्वेट हॉलमध्ये तीन रुपयांत आमचं फूल कोर्स जेवण होई.) मी ओबेरॉयजींना घेऊन खाली उतरलो. त्यांनी विचारलं, ‘‘तुझी गाडी कुठाय?’’ मी म्हणालो, ‘‘आहे ना बाहेर!’’ बाहेर माझी गाडी दिसेना. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले.

‘‘तू दादरहून इथं कसा आलास?’’

‘‘बसने! बेस्टने एवढी मोठी गाडी माझ्यासाठी दिलीय, तिचा वापर करून आलो.’’

ते खळखळून हसले. अस्सल पंजाब्यासारखे! माझ्या पाठीवर जोरात थाप देऊन त्यांनी एक टॅक्सी बोलावली व आम्ही दादरला आलो. त्यांना आमचं जेवण खूप आवडलं. नरिमन पॉइंटला जे रेक्लमेशन चालू होतं, त्यात त्यांनी खूप कमी दरात मोठी जागा विकत घेतली आणि तिथे ते भव्य हॉटेल उभं करत होते. त्यासाठी ते अधूनमधून मुंबईत येत आणि आले की मला फोन करत व प्रीतममध्ये जेवायला येत.

प्रीतममधील त्यांच्या पहिल्या भेटीतच त्यांनी मला त्यांच्या हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशनचा सदस्य होण्याची ऑफर दिली. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘रावबहादूरसाब (ब्रिटिश सरकारनं त्यांना रावबहादूरकी प्रदान केली होती.), आमचं तर अगदी छोटंसं रेस्टॉरंट आहे.’’ तेव्हा त्यांनी मला उपदेश केला- ‘‘कुलवंत, कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस. नेहमी भव्य स्वप्ने पाहा.’’

मी मग भव्य स्वप्नं पाहायला सुरुवात केली. आज मजजवळ जे काही थोडंफार आहे, त्यामागे ओबेरॉयजींच्या या वाक्यांची प्रेरणा आहे. आमचं ‘प्रीतम’ रेस्टॉरन्ट त्या संघटनेचं सदस्य झालं. तीन वर्षांनी- म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी मी या संस्थेत कार्यकारिणी सदस्य बनलो. या संस्थेचा मी आजवरचा सर्वात तरुण सदस्य आहे, ही त्यांचीच कृपा.

ते मुंबईत आले की त्यांना भेटायला मी जात असे. मला त्यांच्याच तोंडून त्यांची जीवनकथा ऐकायला मिळाली. १९५१ च्या त्यांच्या एका मुंबईभेटीत अरबी समुद्राच्या लाटांकडे टक लावून पाहता पाहता ते आठवणींत हरवून गेले..

‘‘माझा जन्म झेलम जिल्ह्यातल्या भौन गावचा. भौन हे छोटंसं, पाचशे घरांचं गाव होतं. आज तो भाग पाकिस्तानात आहे. माझे वडील काँट्रॅक्टर होते. पण मी सहा वर्षांचा असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांनी जो काही थोडाफार पसा ठेवला होता त्यात माझी बीजी गुजराण करत असे. इंटपर्यंत कसंबसं माझं शिक्षण झालं आणि मग मात्र मला शिकवता येणं तिला अशक्य झालं. मी कॉलेज करू शकलो नाही. एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून मी स्टेनोग्राफी व टायिपगचं शिक्षण घेतलं, पण नोकरी नाही मिळाली. तेवढय़ात आमच्याकडे प्लेगची साथ आली. आम्ही काही दिवसांसाठी सिमल्याला आलो. तिथंही काही नोकरी मिळाली नाही मला. निराश होऊन आम्ही भौनला परतलो, तर माझ्या आईनं माझं लग्न लावून दिलं. आता तर नोकरी मिळायलाच हवी होती. आणि तेवढय़ात सिमल्याच्या सेसिल हॉटेलमध्ये एक नोकरी असल्याची बातमी कळली आणि मी तिथं गेलो. त्याचे मॅनेजर एक ब्रिटिश गृहस्थ होते.. मि. क्लार्क नावाचे. आणि त्याचे मालकही ब्रिटिश होते. ते वृद्ध झाल्यानं इंग्लंडला निघून गेले. क्लार्कसाहेबानं मला विचारलं, ‘‘काय काम करता येतं?’’ मी म्हणालो, ‘‘मला स्टेनोग्राफरचं काम करता येतं. पण जगायचं तर आहे; आणि आता लग्नही झालंय. पडेल ते काम करेन.’’ त्यांनी मला पन्नास रुपये पगारावर नोकरीवर ठेवलं. हळूहळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. मीही खूप काम करत असे. फ्रंट ऑफिस, बाजारहाट, आल्या-गेल्याची चौकशी, हिशेबबिशेब सारं काही. एक दिवस मि. क्लार्क म्हणाले की, ‘‘मी इंग्लंडला सुट्टीवर जाऊन येतो सहा महिने. तू सांभाळशील का हे हॉटेल?’’ मी मान डोलवली आणि त्यानुसार सहा महिने ते हॉटेल सांभाळायचं काम केलं. सहा महिन्यांनी ते परतले तेव्हा सेसिलचा कायापालट झाला होता. सेसिलच्या उत्पन्नामध्ये ८० टक्के वाढ झाली होती, त्याचा आलेख उंचावला होता. क्लार्कसाहेबाच्या मालकानं मग ते हॉटेल विकायचं ठरवलं. ते कोणाला विकावं असं क्लार्कसाहेबाला विचारल्यावर त्यानं मोहनसिंगांचं नाव सुचवलं. मालक ‘ठीक आहे,’ असं म्हणाला. क्लार्कसाहेबानं ओबेरॉयजींना विचारलं. त्यांनी ते विकत घेण्याची तयारी दाखवली. पण त्यांच्याकडे पैसे कुठे होते? त्यांनी क्लार्कसाहेबांना आपली मिळकत किती आहे ते सांगितलं आणि विश्वास दिला, की पाच वर्षांत ते सारे पैसे फेडतील. क्लार्कसाहेबांना त्यांच्याविषयी विश्वास होता. त्यांनी तशी परवानगी दिली. फक्त एक अट घातली, की ते हॉटेलचं नाव बदलणार नाहीत. आणि त्यानंतरची पाच वर्षे ओबेरॉयजींनी अफाट मेहनत केली. त्यांच्या पत्नीनं त्यांना खूप साथ दिली. चार वर्षांत त्यांनी सगळे पैसे फेडले. ‘सेसिल’ त्यांच्या नावावर झालं. पाच वर्षांच्या मेहनतीतून एक खंक माणूस हॉटेलमालक झाला. यामागे नशीब तर होतंच; पण मेहनतीचा भागही मोठा होता. त्यानंतर मात्र ओबेरॉयजींनी मागे वळून पाहिलं नाही. हॉटेल व्यवसायाला त्यांनी असं काही वळण दिलं, त्याला आधुनिकता प्राप्त करून दिली, की या व्यवसायाचे ते प्रवर्तक ठरले. ब्रिटिश सरकारनं त्यांच्या कर्तृत्वाची दखल त्यांना ‘रावबहादूर’ ही उपाधी देऊन घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कलकत्ता येथे सनिकांच्या बराकी असलेला भाग विकत घेऊन तिथं ‘ग्रँट हॉटेल’ सुरू केलं. दिल्लीत ‘इम्पिरिअल हॉटेल’ चालवायला घेतलं. मुंबईत रेक्लमेशनमध्ये जागा घेऊन ‘ओबेरॉय’ सुरू केलं. राजस्थानात, काश्मिरात पॅलेस लीजवर घेऊन तिथं हॉटेलं सुरू केली. एक नव्या विचारांची लाट त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीत आणली.

मुंबईच्या ‘ओबेरॉय’मध्ये सुरुवातीला फारसे ग्राहक येत नसत. कारण त्याचे दर त्यांनी खूपच जास्त ठेवले होते. साहजिकच त्यांना प्रारंभी फारसं यश मिळालं नाही. काही काळ त्यांनी दरात थोडीफार कपात केली. पण तरीही अन्य हॉटेल्सपेक्षा ते जास्तच होते. होणारं नुकसान सहन करण्याची त्यांची ताकद होती. एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अरबांचं मुंबईत येणं-जाणं वाढलं. पावसाळ्याच्या दिवसांत ते येत. हा प्रवाह चाणाक्ष ओबेरॉयजींनी हेरला आणि त्यांना ‘ओबेरॉय’कडे आकर्षति केलं आणि नरिमन पॉइंटचं ‘ओबेरॉय’ धाडकन् धावायला लागलं. मला एकदा ओबेरॉयजी म्हणाले, ‘‘कुलवंत, एक चीज ध्यान में रखना. हमेशा लीडर रहो, आगे रहो. दुसऱ्यानं हॉटेल काढलं आणि स्पर्धा सुरू केली म्हणून तू कधीच तुझ्या दरांत फरक करू नकोस. त्याच्यापेक्षा तुझे दर चढेच राहू देत. त्यामुळे आपल्याला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देता येते. ते समाधानी झाले पाहिजेत. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक गरजा या फाइव्ह स्टार हॉटेलने पुरवल्या पाहिजेत. आणि ते जर सांभाळायचं असेल तर आपण आपल्या दरांत कपात करण्याचं कारण नाही. जंगलात ससे, हरणं, हत्ती, वाघ असतातच. पण सिंह हा सिंहच असतो. आपण सिंह राहायचं. लोकांनी आपल्याला फॉलो केलं पाहिजे.’’ त्यांचा हा मोलाचा सल्ला मी कायम ध्यानात ठेवला. त्यामुळेच प्रीतमचा दर्जा मी कायम राखू शकलो.

ओबेरॉयजी १९५० मध्ये आमच्या फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष बनले. नंतर १९६० साली त्यांना फेडरेशनचे आजीव मानद अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यांचा आमच्याकडे एक कायम आग्रह असे, की असोसिएशनच्या प्रत्येक परिषदेला तुम्ही यायलाच हवं. पापाजी व मी नेहमी जात असू. या परिषदा उपयुक्त असत. या परिषदांना वेळोवेळी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, ज्या राज्यांत त्या भरत त्या राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री येत असतात. संपूर्ण देशभरातील हॉटेल व्यावसायिकांचे प्रश्न तिथं चच्रेला येतात. नवनव्या कल्पना सुचवल्या जातात. त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल याचा विचार केला जातो. (यापैकी एका परिषदेत संगणकाचा उपयोग हॉटेल व्यवसायात करून घेतला जाऊ शकतो, हा विचार पुढे आला. त्यातून प्रेरणा घेऊन संगणकाचा उपयोग करणारं ‘प्रीतम’ हे भारतातलं पहिलं हॉटेल होय.) ओबेरॉयजी हे या सर्व गोष्टींना वेगळं, सकारात्मक वळण देणारं नेतृत्व होतं. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात स्त्रियांना संधी दिली पाहिजे असा विचार मांडून तो अमलात आणणारे ओबेरॉयजी हे पहिले हॉटेलिअर होते. ओबेरॉयजी, जे. आर. डी. टाटा, अजित केरकर, माणेकशॉ या महान लोकांनी विसाव्या शतकात भारतातील हॉटेल व्यवसायाला जागतिक पातळीवर नेलं. हा व्यवसाय म्हणजे इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय नसून तो देशाची प्रतिमा तयार करणारा मानिबदू ठरू शकतो, या व्यवसायाचं शास्त्र असू शकतं, ही जाणीव या मंडळींनी हॉटेल व्यवसायिकांना दिली. त्यांचे आदर्श ळिरोधार्य मानून माझी आणि माझ्यानंतरचीही पिढी वाटचाल करत आहे.

जे. आर. डी. टाटासाहेब आणि आमच्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. पण एक छानशी आठवण आहे. आमची एक परिषद श्रीनगरमधल्या ओबेरॉयमध्ये होती. ते शहराबाहेर आहे, म्हणून आम्ही शहरातल्याच एका हॉटेलात उतरलो होतो. पापाजी व बीजींच्या सोबत मीही होतो. माझी पत्नी नव्हती आली. आम्ही ओबेरॉयमध्ये जाण्यासाठी रस्त्यात टॅक्सीची वाट पाहत उभे होतो. तेवढय़ात शेव्हरोलेटची छोटीशी गाडी नोव्हा आमच्या बाजूला येऊन उभी राहिली. गाडीत त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे ड्रायव्हरशेजारी जे. आर. डी. टाटा बसले होते. ते खाली उतरले. त्यांनी पापाजींना विचारलं, ‘‘मि. सिंग, कुठे निघालात? आपल्या परिषदेला का? चला, बरोबरच जाऊ या.’’ त्यांनी स्वत: कारचा दरवाजा उघडला व बीजीला म्हणाले, ‘‘मॅडम, प्लीज आत बसाल का?’’ साधा शर्ट घातलेले जे. आर. डी. हसतमुख होते. एवढा मोठा माणूस! पण किती साधा होता!! माझ्या आईची चौकशी करून त्यांनी काश्मीरविषयी काही माहिती दिली. आमची भेट कायम फेडरेशनच्या परिषदांत होत असे, त्यावेळी ते आवर्जून चौकशी करत. पण या थोर माणसाचा माझा परिचय औपचारिकतेपलीकडे कधी गेला नाही, यात माझीच मर्यादा असेल. पण तसं झालं खरं!

ओबेरॉयजी मात्र अगदी आमच्या घरातल्यासारखेच झाले होते. फेडरेशनच्या परिषदांना ते कायम असत. रात्री जेवण झालं की काही खास लोकांसाठी रात्री अकरानंतर त्यांच्या मोठय़ा सूटमध्ये खास गझल आदी गाण्याचा कार्यक्रम असे. मजा यायची. त्यात ताजचे अजित केरकर, रिट्झचे कपूर, दिल्ली अ‍ॅम्बेसिडर हॉटेलचे रामप्रसाद, पापाजी व मी असे काही जण असत. आमच्या पत्नींनाही आमंत्रण असायचं. ही मफल पहाटेपर्यंत चालत असल्यामुळे महिलावर्ग त्यात सामील होत नसे. इथं सगळे खुलून रसिकतेनं कार्यक्रमाचा आस्वाद घेत.

ओबेरॉयजी हे केवळ हॉटेल व्यावसायिक नव्हते. ते राज्यसभा सदस्य होते. लोकसभेतही त्यांनी निवडून येऊन लोकांचं प्रतिनिधित्व केलं होतं. ओबेरॉयजींना देशातील मानाचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. २००१ साली जेव्हा त्यांना तो जाहीर झाला तेव्हा त्यांचं वय १०३ वर्षांचं होतं. एकोणिसाव्या शतकात त्यांनी जन्म घेतला, विसाव्या शतकाला त्यांनी घडवलं आणि एकविसाव्या शतकाची नांदी गाऊन त्यांनी एक्झिट घेतली!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर