कुलवंतसिंग कोहली

‘‘आजपासून आपली ही ‘संगीता पिक्चर्स’ बंद, चित्रपट वितरण बंद.. आपला आणि सिनेमाचा संबंधच नको! पैची देवाणघेवाण चालेल, पण ही माणसं पैसाठी स्त्रीचा वापर करतात. मूल्य या नावाची गोष्ट जगात आहे की नाही? जिथं माणसाला चलन म्हणून वापरलं जातं, तिथं राहायचं नाही. आपण हा व्यवसाय बंद करू.’’ – मी रागानं थरथरत आमच्या ‘संगीता पिक्चर्स’च्या कॉन्फरन्स रूममध्ये शिरलो आणि माझ्या दोन्ही मित्रांना – धीरूभाई शहा व जगजित चावला यांना जोरजोरात सांगू लागलो. मी कधीही चिडत नाही. परंतु या वेळी मला एवढं चिडलेलं पाहून त्यांची पहिली व स्वाभाविक प्रतिक्रिया शांत व गप्प बसून राहण्याची होती. काही वेळानं मी शांत झालो. आम्ही तीन मित्रांनी मिळून एक चित्रपट वितरण आणि वित्तपुरवठा संस्था काढली होती-  ‘संगीता पिक्चर्स’! तिच्या संदर्भात मी बोलत होतो.

heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Firing at Sand Ghat Clan wars erupted from disputes over supremacy
यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

त्याचं असं झालं..

१९६९ च्या सुमारास माझा एक हिरेव्यापारी मित्र- धीरूभाई शहा माझ्याकडे आला. म्हणाला, ‘‘कुलवंत, यार, आपल्याला चित्रपटात पसे गुंतवायचेत. तू चित्रपटाच्या लायनीतल्या लोकांना ओळखतोस..’’ मी फटकन् तो प्रस्ताव उडवून लावला. काही दिवसांनी माझा आणखी एक मित्र- जगजित चावला मला म्हणाला, ‘‘आपल्याकडे एक मोठा माणूस त्याच्या चित्रपटासाठी फायनान्स मागायला आलाय. मी व धीरूभाई शहा आहोत, पण तू आमच्यात ये. तू आलास, तर मग अडचण येणार नाही. तुझा फिल्म इंडस्ट्रीशी असणारा संबंध इथं उपयोगी पडेल. त्या निर्मात्याला फक्त दोन लाखच हवे आहेत. आपण तिघे मिळून त्याला देऊ.’’ मी परत तो प्रस्ताव धुडकावला. चावलाला सांगितलं, ‘‘शहाणाच आहेस! वीर, तुला माझे पापाजी कसे आहेत ते माहितीय ना? मग तू मला कसं विचारतोस? पापाजींना ही कल्पना कधीही मान्य होणार नाही.’’ ‘‘ते ठीक आहे रे, पण तुला कल्पना मान्य आहे की नाही, ते सांग.’’ माझं उत्तर स्पष्ट होतं, ‘‘माझे पापाजी म्हणतील ते. त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही.’’ जगजित म्हणाला, ‘‘मी बोलतो तुझ्या पापाजींशी.’’ म्हटलं, ‘‘देख भाई, जुते तुझे खाने पडेंगे!’’

दोन दिवसांनी जित (आम्ही जगजितला ‘जित’ म्हणत असू.) संध्याकाळी पापाजींकडे आला. त्यांचं संध्याकाळचं मद्यपान सुरू होतं. पापाजी छानशा मूडमध्ये होते. जितनं इकडचं तिकडचं असं बोलणं केलं. पापाजी हुशार! म्हणाले, ‘‘जित, तुला काही विचारायचं आहे का?’’ ‘‘हां पापाजी, तुम्हाला कमाल अमरोही माहीत आहेत का?’’ ‘‘हां, मैं जानता हूँ। ‘महल’वाले.’’ ‘‘ते आता मीनाकुमारीला घेऊन एक सिनेमा करताहेत. ‘पाकीजा’ नावाचा. मात्र गाडी पशासाठी अडलीय. त्यांना फक्त दोन लाख हवे आहेत. त्यांनी आमच्याकडे पसे मागितले आहेत. धीरूभाई आणि माझ्याकडे थोडे पसे आहेत; कुलवंत आमच्यात आला, तर कमालजींची गरज आम्ही भागवू शकू.’’ कमालजींच्या ‘पुकार’, ‘महल’ आदी चित्रपटांचे पापाजी चाहते होते आणि मीनाकुमारी ही त्यांची लाडकी अभिनेत्री होती. ते क्षणभर विचारात पडले. पापाजींनी फटकन् उडवून लावलं नाही, म्हणजे ते प्रस्तावाचा विचार करत आहेत हे जितनं ओळखलं. तो पापाजींना म्हणाला, ‘‘आम्ही तिघं समान रक्कम उभी करू. हवं तर कुलवंत कमी पसे देईल.’’ पापाजींनी कटाक्ष टाकला व ठामपणे म्हणाले, ‘‘जित, तो का कमी पसे देईल. तो तुमच्याइतकेच पसे टाकेल. मला सांगा, या व्यवहाराचे सारे तपशील कोण सांभाळेल?’’ ‘‘अर्थात कुलवंत सांभाळेल! कुलवंतला इंडस्ट्रीतले सारे ओळखतात. त्या ओळखीचा फायदा होईल. आणि तो आम्हा तिघांत अधिक काटेकोर आहे.’’

झालं! पापाजींनी आम्हाला परवानगी दिली. आम्ही प्रत्येकी ७० हजार रुपये काढून ‘फायनान्सर’च्या भूमिकेत शिरलो आणि माझ्या आयुष्यात एक आनंदपर्व सुरू झालं! पापाजी तेव्हा आम्हाला म्हणाले, ‘‘हे क्षेत्र घाणेरडं आहे. इथं जास्त करून पसे बुडतात, मिळत काही नाही. तुमच्या हौसेकरता मी डुबत्या नौकेत पसे लावतोय.’’ आमच्या कंपनीचं नाव आम्ही ठेवलं- ‘संगीता पिक्चर्स’! आमच्या धीरूभाईची एक मुलगी होती. तिचं नाव संगीता. ती पायानं अपंग होती. मी तिचं नाव सुचवलं. सर्वानी मान्य केलं. या कंपनीचं तात्पुरतं कार्यालय ‘प्रीतम हॉटेल’ होतं. तिथून मी सर्वाशी संपर्क साधत असे. मी ही जबाबदारी मानद म्हणून स्वीकारली. कार्यालय सांभाळण्यासाठी म्हणून मी कोणतीही रक्कम स्वतंत्ररीत्या स्वीकारली नाही. मी नफ्यातला माझा हिस्सा तेवढा घेत असे.

मग दररोज सकाळी मी नियमतिपणे ‘पाकीजा’च्या सेटवर जात असे. कमालसाहेब मोठे कलाकार होते. फुरसतीनं ते चित्रपट बनवत होते. आम्ही वित्तपुरवठा करण्याचं ठरवलं तेव्हा कमालजी म्हणाले, की वर्षभरात ‘पाकीजा’ पूर्ण होईल. परंतु त्यानंतर पुढे तीन वर्षे लागली. दोन लाखांची गरज चार लाखांवर, पुढे बारा लाखांवर आणि चित्रपट पूर्ण होताना ती अठरा लाखांवर गेली! पापाजी अधूनमधून विचारत, ‘‘किती पसे आतापर्यंत टाकलेस? काय चाललंय?’’ मी सांगत असे, ‘‘धीरूभाई आणि जगजित पैचं सांभाळतायत. मी व्यवस्थापन पाहतोय.’’ असं ‘नरो वा कुंजरो वा’ चालू असायचं माझं. परंतु यानिमित्तानं माझं कमालजी, मीनाजी आणि राजकुमारजींसमवेत मत्र जमलं. असं काही मत्र जमलं, की त्यांच्या अंतापर्यंत ते टिकून राहिलं आणि जोवर मी आहे तोवर ते माझ्या मनात आदराचं स्थान मिळवून आहेत. कसली संवेदनक्षम माणसं होती ती! सर्वोत्कृष्ट कलाकृती साकारण्यासाठी, परिपूर्णतेसाठी हे सारे धडपडत होते. कमालजी एक-एक फ्रेम लावण्यासाठी किती कष्ट घेत होते, ते मला जवळून पाहायला मिळालं.

आम्ही वित्तपुरवठा केल्यानंतर चार वर्षांनी एक दिवस कमालजींनी घोषित केलं, की ‘पाकीजा’ पूर्ण झाला! आम्ही ‘पाकीजा’ पाहायला उत्सुक होतो. चित्रपट दाखवा म्हणून कमालजींच्या मागे आम्ही लकडा लावला. ते म्हणत होते, ‘‘जरा थांबा, त्याला संगीताची जोड देऊ द्या. माझा शूट झालेला चित्रपट चार आणे आहे, तर संगीत बारा आणे आहे. संगीताची जोड दिल्यावर मग पाहा!’’ परंतु आम्ही हौशी! वित्तपुरवठा केलेला आमचा तो पहिलाच चित्रपट! मग कमालजी तरी काय करणार? त्यात ‘पाकीजा’ची खूप हवा झालेली. केवळ भारतातच नव्हे, तरदेशाबाहेरही तो विकलेला होता. मुंबई हे वितरणासाठी सर्वात मोठं आणि महत्त्वाचं ठिकाण. तिथले वितरक होते- शंकर बिसी! बडं प्रस्थ. ते आमच्यासोबत ‘पाकीजा’ पाहायला आले. आम्ही ‘पाकीजा’ पाहिला आणि चेहरे पाडून थिएटरबाहेर पडलो. चित्रपटाचा आमच्यावर कोणताही प्रभाव पडला नाही. वाटलं, आमचे पसे पाण्यात गेले. शंकरजी तर अस्वस्थ झाले होते. थिएटरबाहेर आलो, तर सर्वत्र काळोख! तेव्हा बांगलादेश मुक्तीसंग्रामास सुरुवात झाली होती आणि त्यामुळे मुंबईत सर्वत्र अंधार करण्यात आला होता. त्या अंधारानं तर आणखीच विषण्ण वाटू लागलं.

शंकर बिसींनी दुसऱ्या दिवशी पत्र लिहून ‘पाकीजा’चं वितरण करणं नाकारलं. आमची आता खरी कोंडी झाली. ‘पाकीजा’चे संगीतकार होते- गुलाम महंमद! अप्रतिम गाणी त्यांनी तयार केली होती. परंतु चित्रपटाचं पार्श्वसंगीत करण्यापूर्वी त्यांचं निधन झालं. अशा स्थितीत पार्श्वसंगीत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. कमालजींच्या मनात नौशादजींचं नाव आलं. परंतु आपल्या साहाय्यकाच्या चित्रपटाचं पार्श्वसंगीत हा महान संगीतकार कसं करणार, या विचारात ते अडकून पडले होते. मात्र, माझ्या विनंतीचा स्वीकार नौशादजींनी केला. त्यात मीनाजींचा मृत्यूशी संघर्ष चालू होता; त्यामुळेही हा चित्रपट लवकर पुरा होणं आवश्यक होतं.

..आणि एक दिवस सर्वार्थानं चित्रपट पूर्ण झाला व प्रदर्शनास सज्ज झाला. परंतु मुंबईत आम्हाला वितरक नव्हता. जेव्हा प्रचंड विरोधी परिस्थिती तयार होते तेव्हा माणूस सर्वशक्तीनिशी प्रतिकारास तयार होतो. आम्ही तिघांनी विचार केला- एवीतेवी आपण पसे गुंतवलेत ना, चला आपण स्वत:च या चित्रपटाचं मुंबईत वितरण करू. लगोलग आम्ही ‘संगीता पिक्चर्स’ची वितरण शाखा सुरू केली. काहीच अनुभव नव्हता, परंतु प्रतिकूलताच अनुकूलतेचा मार्ग दाखवते. आम्ही आमचं काम सुरू केलं. बोनी व अनिल कपूरचे वडील सुिरदर कपूर यांना भेटलो. ते ‘राजश्री प्रॉडक्शन’मध्ये होते. त्यांनी सी. व्ही. देसाई या तरुण गृहस्थाचं नाव वितरण कार्यालय सांभाळण्यासाठी सुचवलं. देसाई त्या वेळी ‘राजश्री’मध्येच काम करत होते. ते आल्यानंतर आमचं वितरण कार्य व्यवस्थित सुरू झालं.

कमालजींनी भव्य प्रीमिअर शो आखला होता ‘मराठा मंदिर’मध्ये! कमालजी म्हणाले, ‘‘चित्रपट जोरदार चालणार, ‘मराठा मंदिर’ दोन वर्षांसाठी बुक करा!’’ ज्या बग्गीतून मीनाजी ‘पाकीजा’त वावरत होत्या, त्याच बग्गीतून चित्रपटाच्या िपट्र्स आणायचं ठरलं. हत्ती-घोडय़ांची मिरवणूक ठरली. सिनेसृष्टीतील सर्वच लहानथोर या प्रीमिअरला यायला उत्सुक होते. सर्वाना निमंत्रणं दिली. परंतु ज्यांना मिळू शकली नाहीत, त्यांनी कुठून कुठून ओळखी काढून पासेस मिळवले. प्रकृती बरी नसतानाही मीनाजी हजर राहिल्या. त्या काळात २० बाय २० वा २० बाय १० आकाराची पोस्टर्स बनत असत. परंतु कमालजींनी मीनाजींचं भव्य छायाचित्रं असलेली ४० बाय ४० आकाराची पोस्टर्स अख्ख्या मुंबईभर लावली होती. जोरदार प्रीमिअर शो झाला. परंतु काय घडलं कळेना. दुसऱ्या आठवडय़त ‘पाकीजा’ झोपला. तो पडला अशी आवई उठली. इकडं मीनाजी मृत्यूच्या अधिक निकट जाऊ लागल्या होत्या आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवडय़ात मीनाजींचं निधन झालं. ‘मराठा मंदिर’मधला दुसरा खेळ आम्ही मध्येच थांबवला आणि त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं. त्या दिवशीचे खेळ आम्ही रद्द केले आणि रसिकांनी पसे घेऊन जावे असंही सांगितलं. परंतु कोणीही पसे परत मागितले नाहीत. दुसऱ्या दिवसापासून मात्र हा चित्रपट धो-धो चालू लागला. काही दिवसांनी कमालजी म्हणाले, ‘‘मीना पाक रूह थी। कुलवंत, तुझ्यावर तिचा जीव होता. तिनं तिला आवडणाऱ्या माणसाचं कधीही नुकसान केलं नाही. मग तुझं कसं नुकसान होऊ देईल ती? बघ, स्वर्गातूनही ती तुझ्यावर मायेचा वर्षांव करतेय!’’

या दरम्यान आमच्याजवळ कार्यालय नव्हतं. आम्ही कार्यालयासाठी कुठे तरी जागा भाडय़ानं घ्यायचं ठरवलं. ‘प्रसाद चेंबर्स’चं नुकतंच बांधकाम झालं होतं. काही वितरक तिथं होते. जितेंद्रनेही तिथं जागा घेतली होती. आम्ही तिथं आधी एक ब्लॉक भाडय़ानं घ्यावा असं ठरवलं. परंतु नंतर आपण भाडय़ानं ब्लॉक घेण्यापेक्षा विकतच घेऊ या असं मला वाटलं. त्यासाठी प्रसाद चेंबर्सच्या प्रसादना आम्ही भेटलो. त्यांनी शेजार-शेजारचे दोन ब्लॉक दाखवले. धीरूभाई, जगजित यांचा माझ्यावर विश्वास होता. मी थोडीशी घासाघीस करून १२० रुपये चौरस फूट दराचे ते दोन्ही ब्लॉक विकत घेतले. आम्ही तिथं कार्यालय थाटलं. मुंबईतील त्या काळातला सर्वात मोठा इंटेरिअर डिझायनर शक्ती परमारला कार्यालय तयार करून द्यायला सांगितलं. जवळपास अडीच हजार चौरस फुटांचं ते कार्यालय म्हणजे ‘टॉक ऑफ द टाऊन’ ठरलं. त्याचं कारण तेव्हा एवढं मोठं वितरण कार्यालय कोणाचंही नव्हतं. गुलशन राय मोठे वितरक. त्यांचंही कार्यालय २० बाय २० फुटांचं होतं. आमच्या कार्यालयाचं उद्घाटन बी. आर. चोप्रांनी केलं. सारं शहर लोटलं होतं त्या वेळी. इंडस्ट्रीत एकच चर्चा, ‘‘सरदार पगला गया है.’’ तोवर ‘पाकीजा’ प्रदर्शित नव्हता झाला. ‘पाकीजा’ तिसऱ्या आठवडय़ानंतर सुपरहिट झाला आणि ‘पागल’ सरदार लोकांना एकदम ‘हुशार’ वाटायला लागला! आमच्याकडे वितरणासाठी चित्रपटांची रांग लागली. परंतु आम्ही वित्तपुरवठा करू असं सांगून त्यांना थोपवलं. आम्ही आमचे पाय जमिनीवर ठेवले.

‘पाकीजा’च्या वेळी अनेकांनी हात धुऊन घेतले. ‘पाकीजा’च्या अनधिकृत िपट्र्स दाखवल्या जाऊ लागल्या. बंगाल, पंजाबमध्ये असे प्रसंग घडत होते. कोलकात्याच्या एका चित्रपटगृहात अशी अनधिकृत प्रिंट दाखवली जातेय असं मला कळलं. त्या प्रिंटची तीन रिळे दाखवून झाल्यावर दुसऱ्या एका चित्रपटगृहात थोडय़ा उशिरानं पाकीजा दाखवला जात असे. मग त्या तीन रिळांना घेऊन एक जण त्या चित्रपटगृहात जाई आणि एकापाठोपाठ एक रिळे पाठवून चित्रपट दाखवला जाई. हे कळल्यावर मी एकटाच मुंबई उच्च न्यायालयाचं आदेशपत्र घेऊन विमानानं कोलकात्याला गेलो. तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली. संध्याकाळच्या सहाच्या खेळावर आम्ही धाड टाकली. ती रिळं ताब्यात घेतली. तिथले प्रेक्षक  खवळले, पण कायद्यापुढे काही चालेना. गुंड अंगावर धावून पुढे आले, त्यांनाही आम्ही बाजूला सारले. मी ओबेरॉय हॉटेलात उतरलो होतो. हॉटेलनं सुरक्षा वाढवली. अशात रात्री मला कोणाचा तरी फोन आला- ‘‘तुम्ही ती प्रिंट ताब्यात घेतली आहे ना? मग आता कलकत्ता सोडून पहाटेच्या विमानानं मुंबईत निघून जा. तुमच्यावर उद्या हल्ला होणार आहे.’’ मी त्या अनधिकृत प्रिंटचे हरण करून मुंबईत परतलो. हा थरारक अनुभव आहे. त्या वेळी कुठून धर्य आलं होतं, कुणास ठाऊक!

आम्हाला ‘पाकीजा’तून भरपूर पसे मिळाले असं अनेकांना वाटतं. हो, ‘पाकीजा’चे जागतिक हक्क आमच्याकडे होते. आम्ही तीन टक्के व्याजाने कमालजींना पसे दिले होते. चार वर्षांनंतर ती रक्कम खूप मोठी झाली होती. ‘पाकीजा’ धो-धो चालला. त्याचे पसेही आले. परंतु ते पसे आम्ही तिघांनी कमालजींना सोडून दिले. ‘पाकीजा’ त्यांचं स्वप्न होतं. आमचा खर्च वजा जाता जवळपास सव्वीस लाख आम्ही सोडून दिले. तो चित्रपट चालला, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं होतं.

आमच्या मोठय़ा कार्यालयात अनेकजण येत-जात. आमच्या घरचेसुद्धा मुंबई शहरात काही काम असेल, तर कार्यालयात येत व थांबत. माझा मुलगा टोनी हा एच. आर. कॉलेजात शिकत होता. तोही बऱ्याचदा येत असे, मला मदत करत असे. राज कपूरजी नेहमी येत. त्यांच्या, बी. आर. चोप्रांच्या, केदार शर्माच्या येण्यामुळे आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होत असे. आम्ही जवळपास १३-१४ चित्रपटांना अर्थपुरवठा केला. काही चित्रपटांचं वितरण केलं. ‘मुक्ती’, ‘पती, पत्नी और वो’, ‘द बर्निग ट्रेन’ हे त्यापकी काही महत्त्वाचे चित्रपट. ‘लेडीज टेलर’ हा आमचा शेवटचा चित्रपट!

ओ. पी. रल्हन हा एक खटपटय़ा कलाकार होता. टिपिकल हिंदी चित्रपट कलाकार, निर्माता. तो त्याचे नवनवे प्रकल्प घेऊन येत असे. त्याच्या कल्पनाही भव्य असत. त्यानं ‘अशोका’ चित्रपटाची घोषणा केली होती. त्यासाठी वित्तपुरवठा हवा म्हणून तो मागे लागला. परंतु तेव्हा आमचे अनेक प्रकल्प सुरू होते. आम्ही त्यास नकार दिला. एका दुपारी मी ‘संगीता पिक्चर्स’च्या कार्यालयात बसलो होतो. टोनीही आला होता. बाजूला बसून काही काम करत होता. त्या वेळी तिथं आपल्या दोन बगलांत दोन नामांकित नायिका घेऊन (मी त्यांची नावं सांगणार नाही, त्या खूप मोठय़ा नायिका आहेत) पायाच्या लाथेनं दरवाजा उघडून रल्हन कार्यालयात शिरला. त्या दोघींना पुढे करून मला म्हणाला, ‘‘आता सांग, मला चित्रपटासाठी वित्तपुरवठा करता की नाही?’’ त्याचं ते वागणं पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मी त्या दोघींना हात जोडून नमस्कार केला व रल्हनला म्हणालो, ‘‘मी तुला अर्थपुरवठा तर करणार नाहीच, पण या क्षणापासून आमची ही संस्था बंद करतोय. तू आता इथून जा.’’

मी तणतणत माझ्या भागीदारांकडे गेलो. त्यांना म्हणालो, ‘‘आजपासून आपली ही ‘संगीता पिक्चर्स’ बंद, चित्रपट वितरण बंद.. आपला आणि सिनेमाचा संबंधच नको! जिथं माणसाला चलन म्हणून वापरलं जातं तिथं राहायचं नाही. आजवर आपल्यावर असा प्रसंग आला नाही, पण आज आला. भविष्यात काहीही होईल. आपण हा व्यवसाय बंद करू.’’

आम्ही आमचा तो व्यवसाय बंद केला. त्याचा आज खेद होत नाही, की त्याची खंतही नाही. आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे मूल्य! तिचंच जतन केलं पाहिजे. मग आपण माणूस होण्याच्या पात्रतेचे होऊ!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर