कुलवंतसिंग कोहली

आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी बोलता बोलता दिलीपसाब अचानक थांबले. आठवण होती बेचाळीसच्या लढय़ातल्या त्यांच्या सहभागाविषयीची. शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहून ते एका मोर्चात सहभागी झाले होते, लाठीमारही खाल्ला होता. पण त्याविषयी बोलता बोलता ते गप्प झाले. खोदून खोदून विचारल्यावर ते एवढंच म्हणाले, ‘‘आपल्या देशाकरता आणि आईकरता आपण काय केलं हे कधी सांगू नये.’’

आज १ एप्रिल. आजची तारीख जगभरात मस्तपकी ‘सेलिब्रेट’ केली जाते. कोणी ना कोणी, कोणाला ना कोणाला तरी गंडवत असतो, फिरकी घेत असतो आणि मजा लुटत असतो. वर्तमानपत्रांत विशेष सदरं असतात, टीव्ही वाहिन्यांवर मस्ती चालू असते. मीही ते मनसोक्त एन्जॉय करत असतो. फक्त कोणाची फिरकी कधी घेत नाही! दुसऱ्यांच्या आनंदात मी आनंद मानत राहतो. त्यांची मस्ती पाहात राहतो. धमाल चाललेली बघून बरं वाटतं.

तसा मी अंतर्मुख, कुटुंबवत्सल माणूस आहे. आम्ही सारे सण साजरे करतो- आम्हा पंजाबी मंडळींचे आणि आपल्या मुंबईतलेसुद्धा! काही दिवसांतच सुरू होणारी बसाखी आणि नुकताच झालेला गुढीपाडवासुद्धा! प्रत्येक सणाचं महत्त्व आपल्या घरातल्या लहानांना समजावून देणं हे मला आद्य कर्तव्य वाटतं. जी माणसं आपल्या परंपरा विसरतात ती उत्तम भविष्यापासून वंचित राहतात, अशी माझी धारणा आहे. जे आपल्या कुटुंबाला वेळ देत नाहीत, त्यांना कुटुंब करण्याचा हक्क नाही. तुमच्या दिवसभरातल्या काही क्षणांवर तुमच्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क असतो, तो त्यांना द्यायला हवा.

माझी टोनी, गोगी, डॉली ही मुलं लहान असताना त्यांना घेऊन मी शिवाजी पार्कवर, समुद्रावर जात असे. ती मुलं पुळणीवर खेळत असत. मी व पत्नी बाजूला बसून मुलांना खेळताना पाहात असू. त्या विशाल पश्चिम समुद्राकडे पाहताना कित्येकदा माझ्या मनात विचार येई- कुठे होतो अन् कुठे आलो? डोंगरदऱ्या, सकस जमीन, बारमाही नद्यांच्या प्रदेशातून आलेल्या माझ्यासारख्या लहानग्याचं रोपटं उद्योगक्षम मुंबईत लावलं गेलं आणि ते सहजपणे रुजलंही. त्याचं कारण सर्वसमावेशक महाराष्ट्रभूमी! या भूमीनं खूप काही दिलंय. जगायला तर दिलंच, परंतु त्याबरोबर ते जगणं समृद्ध करणारी माणसंही दिली.

मला नेहमी वाटतं, आपल्या देशाला तीन व्यसनं आहेत- चित्रपट, क्रिकेट आणि गाणी! त्यातल्या चित्रपटांनी तर भारतीय मनाला पार वेडं करून सोडलंय. चंदेरी दुनियेतले सितारे लोकांना नेहमीच दुष्प्राप्य असतात, ते सितारे माझ्या आयुष्यात सहजपणे आपल्या पायांनी चालत आले. ज्यांनी भारतीय चित्रपट कलेला घडवलं ते कपूर परिवार, व्ही. शांताराम परिवार, चोप्रा परिवार, कारदार परिवार.. या परिवारांतली माणसं माझ्या जगण्याचा एक भाग बनली. परंतु मुलांना घेऊन दादर चौपाटीवर गेलं, की मनातल्या मनात मी अरबी समुद्राला सांगायचो, ‘भई, ये सब तो अपने दोस्त बन गये लेकीन तो अजब कलाकार अजून आपल्यापासून दूरच राहिलाय..’ तो कलाकार म्हणजे- दिलीपकुमार! त्यांच्या संवेदनशील अभिनयानं साऱ्या भारतीय मनावर गारुड केलंय. त्यांनी त्यांचा खाली झुकलेला चेहरा जरासा वर केला, डोळे किलकिले करून पाहिलं, उजव्या हाताच्या अंगठय़ानं कपाळावर जरासं चाचपडलं की जगातलं सारं दु:ख, जगातली सारी वेदना तिथं पाझरायला लागते. असा हा प्रतिभावान अभिनेता चित्रपटांत भेटतो, परंतु आपल्याला अजून भेटायचा आहे, याची रुखरुख मनात होती.

आणि एके दिवशी अरबी समुद्राच्या साक्षीनं ते मला भेटले! १९५५ चा सुमार असेल. मरीन ड्राइव्हवर अनेक जिमखाने आहेत, त्यांपकी एका जिमखान्यावर कोणत्या तरी कौन्स्युलेटने एक पार्टी ठेवली होती. अनेक निमंत्रितांपकी मी एक होतो व दिलीपकुमारही. पार्टी संपता संपता मी निघालो आणि दिलीपकुमार समोरून आले- ‘‘अरे कुलवंत, कसा आहेस? तुझ्याबद्दल, ‘प्रीतम’बद्दल बरंच ऐकून होतो. ‘प्रीतम’चं जेवणही जेवलोय, पण ते बनवणारा आज पहिल्यांदा भेटतोय. वैसे तो अपना खाने का रिश्ता हैही!’’ असं म्हणत ते हसले, त्यांनी मला छानशी मिठी मारली, पाठीवर थोपटलं आणि म्हणाले, ‘‘चलो मेरे साथ.’’ मी त्यांच्या मर्सिडिजमध्ये बसलो. काही क्षणानंतर स्थिरावलो. ज्यांना भेटायची उत्सुकता होती ते दिलीपकुमार साक्षात समोर होते! आम्ही गप्पा मारत होतो. मला म्हणाले, ‘‘कुलवंत, सारखं दिलीपसाब दिलीपसाब काय करतोस? आपण एका भागातले आहोत. मला युसूफ म्हणून हाक मार!’’ मी कसाबसा म्हणालो, ‘‘दिलीपसाब, तुम्ही माझ्यासमोर सर्वार्थाने मोठे आहात. तुम्हाला युसूफ कसं म्हणू? दिलीपसाबच ठीक आहे.’’ त्यांनी ‘समजलं’ अशा अर्थानं मान हलवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एवढे बारीकसारीक तपशील इतक्या वर्षांनंतरही माझ्या लक्षात कसे राहतात? आपण आपलं जगणं भरभरून जगलो व महत्त्वाच्या क्षणी मन जागं ठेवलं, तर सारं काही लक्षात राहत. इथे तर खुद्द ‘दिलीपकुमार’ होते!

त्यानंतर मात्र दिलीपसाब व माझ्या दोस्तीचा सिलसिला सुरू झाला. मी अंतर्मुख व तेही अंतर्मुख. आम्ही दोघंही कमी बोलणारे. एकमेकांची पर्सनल स्पेस सोडून आम्ही आमचं नातं जपलं. दिलीपसाब हे टिपिकल फिल्मी नव्हते. त्यांना पाटर्य़ाना जाणं आवडत नसे. फार मोजक्या ठिकाणी ते जात. आमच्याकडच्या डिनर पार्टीनाही ते क्वचित येत. एकदा मी त्यांना याविषयी विचारलं तर ते म्हणाले, ‘‘रात्रीची अशी जागरणं तुमच्यातल्या अभिनेत्याला झोपवतात. पार्टी अ‍ॅनिमल बनण्यापेक्षा मला रुपेरी पडदा जास्त महत्त्वाचा वाटतो.’’ महान अभिनेता बनल्यावरही दिलीपसाब या पद्धतीनं विचार करतात, हे पाहून मला एक धडा मिळाला.

दिलीपसाब व आमच्या गप्पा वेगवेगळ्या विषयांवर चालत असत. अर्थात, तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आम्ही कधीच बोलत नसू. तसे ते गंभीर प्रकृतीचे होते. ते ज्या प्रकारच्या भूमिका करत असत, त्या भूमिका ते प्रत्यक्षात मनात वागवून जगत असत. अनेक ट्रॅजिक भूमिका केल्यानंतर ते एकदा मला म्हणाले, ‘‘यार, इन सब चीजोंने मुझे पुरी तरहसे थकाया है। अब मैं ब्रेक लेता हूँ।’’ दिलीपसाब फार कमी चित्रपट करायचे. वर्षांला एक किंवा दोन. मी त्यांना त्याविषयी विचारलं तर म्हणाले, ‘‘कुलवंत, काम थोडंच करा, पण असं करा की जग लक्षात ठेवेल. मी जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा ती शंभर टक्के नाही तर दीडशे टक्के देऊन करतो.’’ मला ते पटलं.

ते बालपणीच्या आठवणींत कधी कधी हरवून जात. ते त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. तिच्या अवतीभवती घुटमळायचे. अशीच एक आठवण त्यांनी सांगितलेली : ते एका जागी कधी स्थिर नसत. अनपेक्षित असं काही तरी करत. पेशावरला असताना एकदा थंडीच्या दिवसांत त्यांनी घराजवळ असलेल्या व गोठून गेलेल्या तळ्यातल्या बर्फाळ पाण्यानं तोंड धुतलं. त्यामुळे सारं तोंड रक्ताळलं. छोटा युसूफ आईकडे गेला. तिनं बदामाचं तेल लावलं. हळूहळू तो बरा झाला. दिलीपसाहेबांनी हळवेपणानं ही आठवण सांगितली होती.

त्यांच्या बालपणीचा काळ अतिशय धामधुमीचा होता. स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. पेशावरच्या बाजारात पोलिसांनी जमावावर अचानक गोळीबार केला. लहानगा युसूफ बाजारात फिरत होता. घाबरून तो रडायला लागला व जमिनीवर आडवा पडला. थोडय़ा वेळाने सर्व शांत झाल्यावर तो उठला. उठताना त्याच्या लक्षात आलं, की ज्याच्या अंगावर तो हात टाकून आडवा झाला होता ते गोळीबारात मृत्यू पावलेलं एक प्रेत होतं. त्यानंतर अनेक रात्री तो दचकून जागा होत असे.. एकदा लहानग्या युसूफला बाजारात दूध आणायला पाठवलं होतं. तिथं एक पिसाळलेला कुत्रा त्याच्या मागे लागला. कुत्र्याने त्याच्या पायाचे लचके तोडले. त्या लचक्यांचे व्रण कायम राहिले होते.

आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी बोलता बोलता दिलीपसाब अचानक थांबले. ती आठवण होती बेचाळीसच्या लढय़ातल्या त्यांच्या सहभागाविषयीची. शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहून ते एका मोर्चात सहभागी झाले होते, लाठीमारही खाल्ला होता. पण त्याविषयी बोलता बोलता ते गप्प झाले. खोदून खोदून विचारल्यावर ते एवढंच म्हणाले, ‘‘आपल्या देशाकरता आणि आईकरता आपण काय केलं हे कधी सांगू नये.’’

एकदा दिलीपकुमार यांचा वाढदिवस होता. मी काही मित्रांना घेऊन त्यांच्याकडे गेलो. हातात सुंदर पुष्पगुच्छ होता. त्यांच्या खोलीत दिलीपसाब एकटेच होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सारी भावंडं घरात गोळा झालेली होती. आनंदी वातावरण होतं. पुष्पगुच्छ दिल्यावर काही वेळानं हसून म्हणाले, ‘‘मुझे और थोडा बुढा क्यूँ बनाते हो भाई?’’ ते त्यांच्याच विचारात मग्न होते. काही क्षण शांततेचे गेल्यावर, मग एकदम खळखळून हसून त्यांनी जोरात कोणाला तरी हाक मारली, ‘‘अरे, माझ्या मित्रांसाठी मिठाई आणा. आम्हाला मजा करू दे.’’ नंतरचे धमाल करणारे दिलीपसाब काही वेगळेच होते!

मी पंजाब असोसिएशनचं काम करायचो. प्राणसाहेब आमचे आधारस्तंभ होते. एकदा मी दिलीपसाबना पाहुणे म्हणून याल का, असं विचारलं. ते लगेच तयार झाले. त्यांनी त्या वर्षीच्या आमच्या संमेलनात अस्खलित पेशावरी पंजाबीमध्ये भाषण करून सगळ्यांना खूश करून टाकलं. सर्वाना भेटले, फोटो काढून दिले. आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडण्याची ती संधी त्यांनी साधली.

एक गमतीदार आठवण. ‘प्रीतम’मध्ये एक नौजवान पंजाबी गायक उतरला होता. तो भारतीय नागरिक नव्हता. बर्मिगहॅमला राहत असे. त्याचं नाव मलकित सिंग. ‘तुतक तुतक तुतीया आय लव्ह यू’ या त्याच्या गाण्यानं तेव्हा सर्वत्र लोकप्रियता मिळवली होती. माझ्या एका कर्मचाऱ्यानं तो आपल्या इथं राहिलाय असं सांगितलं. मी त्याच्या रूममध्ये फोन करून, ‘‘मला तुम्हाला भेटायचंय,’’ असं म्हणालो. तर तोच मला म्हणाला, ‘‘तुम्ही येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो.’’ तो माझ्याकडे आला. मला वाटलं होतं, की तो चाळिशीचा असेल. परंतु तो जेमतेम सव्वीस वर्षांचा तरणाबांड जवान होता. मला परीपौना केलं. मग गप्पा मारत बसला. बोलता बोलता मला म्हणाला, ‘‘पापाजी, मी तीन दिवसांनी बर्मिगहॅमला जाणार आहे. मला दिलीपकुमार साहेबांना भेटायची इच्छा आहे.’’ मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. ही इच्छा पुरी करण्याचा आपण प्रयत्न करू या.’’ त्याचा विश्वास बसेना. मी लगेच दिलीपसाबना फोन केला. त्यांना मलकित सिंगबद्दल सांगितलं व त्याची इच्छाही सांगितली. त्याला घेऊन घरी येऊ का म्हणून विचारलं. दिलीपसाब म्हणाले, ‘‘क्यूँ भई, मंही आता हूँ उसे मिलने। मी त्याचं गाणं नेहमी ऐकतो. त्याला विचार, मला काही गाणी ऐकवशील का?’’ मलकित सिंग एका पायावर तयार झाला.

ज्या पहाटेच्या विमानानं मलकीत सिंग परत जाणार होता, त्या रात्री नऊ वाजता मी एक छोटीशी पार्टी आयोजित केली. प्राणसाहेब, कपूर परिवार, चोप्रा परिवार, रामानंद सागर परिवार अशा काही जवळच्यांना निमंत्रण दिलं. दिलीपसाब एकटेच येणार होते. रात्री साडेआठ वाजताच मलकित सिंग तयार होऊन खाली आला होता. पांढरे कपडे व पांढरंच जाकीट त्यानं घातलेलं. सारखं मला विचारत होता, ‘‘दिलीपसाब येणार आहेत ना नक्की?’’ साधारण पावणे दहाच्या सुमारास दिलीपसाब आले. त्यांना पाहून मलकित सिंगचा चेहराच बदलला. देव पाहिल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सुरुवातीला मी दोन नवोदित गायकांना गाण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. दिलीपसाब आल्यानंतर दहाच्या सुमारास मलकित सिंगनं गायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक सगळ्या थाटाची गाणी गात त्यानं सर्वाना धुंद करून सोडलं. मौजेची गोष्ट ही की, स्वत: दिलीपसाब त्याच्याबरोबर गात होते, नाचत होते. दिलीपसाबनी चित्रपटांत गाणी गायली आहेत हे मला माहिती होतं, परंतु त्यांची गाण्याची समज व माहिती पाहून आश्चर्य वाटलं. अखेरीस गीत-संगीतानं रंगलेली ती रात्र विमानाची आठवण झाल्यानं संपली. रात्री तब्बल दीड वाजता सर्वानी जेवण केलं. मलकित सिंगचं सामान मी आधीच एका कारने पुढे पाठवून त्याचं चेक इन करून ठेवलं होतं. पहाटे साडेचारची फ्लाइट पकडायला मलकित सिंग कसाबसा पोचला. त्यानंतर त्याचे व माझे ऋणानुबंध असे काही जुळले की जणू आमचं नातं देवानं घडवून पाठवलंय. परंतु आमच्यातला समान धागा म्हणजे- दिलीपसाब!

अलीकडे दिलीपसाहेबांची तब्येत बरी नसते. मी अनेक वर्षांत त्यांना भेटलो नाहीये. पण त्यानं काही बिघडत नाही. देवाला रोज थोडंच भेटायचं असतं, तो तर मनात असतो!

ksk@pritamhotels.com