News Flash

तुमसा नहीं देखा!

शम्मी मेरा यार था! शम्मी.. म्हणजे शम्मी कपूर! एक अजब रसायन.

शम्मी मेरा यार था! शम्मी.. म्हणजे शम्मी कपूर! एक अजब रसायन. मस्त कलंदर. स्वत:त धुंद राहूनही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारा. त्याचं अभिनयावर मनस्वी प्रेम होतं. आपल्या पित्याची तर तो पूजा करायचाच; पण मोठय़ा भावावर- राज कपूरवरही त्याची श्रद्धा होती. ही सर्वच भावंडं परस्परांच्या खूप निकट होती. पृथ्वीराजजींची उत्तम शिकवण त्यांना लाभली होती.

शम्मी एकदम बिनधास्त माणूस. मनात येईल ते करायचा. माझ्यापेक्षा तो दोन-तीन वर्षांनी मोठा होता. त्यामुळे माझी आणि त्याची झटकन् दोस्ती झाली. मी त्यावेळी साधारण ११-१२ वर्षांचा असेन आणि तो १४-१५ वर्षांचा. राजजी वयाने खूप मोठे असल्याने त्याला समवयस्क मीच सापडलो असणार. आमच्या त्या फिल्मी गल्लीमध्ये तो धूम खेळत असायचा. तो झकास टेबल टेनिस खेळायचा. आबाधुबी, विटी-दांडू, सेव्हन टाइल्स (म्हणजे लगोरी! या खेळात इतका कडक चेंडू वापरत, की तो हातात नीट घेता आला नाही की फ्रॅक्चर ठरलेलंच.) हे त्याचे लाडके खेळ होते. हे सगळे खेळ फिल्मी गल्लीच्या (हॉलीवूड लेन) मोकळ्या रस्त्यांवर आम्ही खेळत असू. हॉलीवूड लेनमध्ये मोजून तीन मोटारी होत्या. त्यातली एका पृथ्वीराजजींची, एक आमची होती. तिसरी कोणाची, ते आता आठवत नाही. या लेनमध्ये छानशा बागा आणि मोठे फुटपाथ होते. पण मी या लेनमध्ये फारसा नसे. कारण मी शाळेत आणि पापाजींना हॉटेलात मदत करायला जात असे. शम्मीची एक गमतीशीर आठवण सांगतो. त्याच्या पापाजींनी आणि राजजींनी मिशा राखलेल्या होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एवढा प्रभाव त्याच्यावर असे, की तो काडेपेटीतल्या काडय़ा पेटवून विझवायचा आणि त्या विझलेल्या काडीच्या काजळीनं स्वत:ला मिशा काढायचा.

शम्मी अनेक गोष्टी माझ्याशी शेअर करायचा. राज कपूर मोठे हिरो झालेले. मुली त्यांच्यासाठी पागल व्हायच्या, त्यांच्याशी नातं जुळवायला अधीर असायच्या. शम्मी मात्र त्यांना भावासारखा वाटायचा. त्या शम्मीला राखी बांधायच्या. तो त्यांना मस्त भेटीही देत असे. एका राखीपौर्णिमेला त्याच्याजवळ फारसे पैसे नव्हते. राखीपौर्णिमा तर जवळ आलेली. त्यात मानलेल्या बहिणी झाल्या होत्या बारा! आता काय करावं? मग या महाशयांनी पुस्तकांच्या एका परिचित दुकानदाराला गाठलं, त्याच्याकडून वाचण्यासाठी म्हणून काही पुस्तकं आणली आणि या बारा बहिणींना भेट म्हणून दिली. त्या जाम खूश झाल्या. दुसऱ्या दिवशी या भावानं वाचण्यासाठी म्हणून ही पुस्तकं त्यांच्याकडून एकेक करून आणली व त्या दुकानदाराला परत दिली.

पुढे मात्र शम्मी धीट झाला. त्याला मी ‘पटाका’ म्हणायचो आणि तो मला ‘चिकना सरदार’ अशी हाक मारायचा. तो स्टार बनत गेला तसतसा तरुणाईत लोकप्रिय होत गेला. तरुणींचा तर त्याला वेढाच पडत असे. मुलींना गटवण्यात एक्स्पर्ट म्हणून ‘पटाका’; आणि मी असली सरदारासारखी तब्येत राखून होतो म्हणून तो मला ‘चिकना’ म्हणायचा.

शम्मीला राजजींनी एक एअरगन भेट म्हणून दिली होती. त्या गनने शिकार करायचा शौक त्याला लागला होता. आमच्या कॉलेज रोड परिसरात अनेक कबुतरं त्याची शिकार झाली होती. तो दुपारच्या वेळी आमच्याकडे यायचा. त्यावेळी प्रीतमचा व्याप फार वाढलेला नव्हता. आता जिथं प्रीतम धाबा आहे, तिथं मोकळं पटांगण होतं. झाडं होती. त्यावर अनेक पक्षी बसलेले असत. एअरगनचे प्रयोग करायला शम्मी यायचा. सुरुवातीला त्याचे नेम चुकायचे. कोणाच्या तरी घराच्या खिडकीच्या काचेवर  लागायचे आणि ती फुटायची. काच फुटली की हा लपून बसायचा. अशा बऱ्याच काचा फुटल्यावर बिजीजवळ- माझ्या आईजवळ एका बाईंनी तक्रार केली की ‘‘कुलवंतकडे कोणीतरी त्याचा मित्र येतो, तो काचा फोडतो.’’ बिजीनं मला बोलावलं. मी कधीच खोटं बोलत नाही. बिजीनं विचारलं, ‘‘काय रे, कोण हे उद्योग करतं?’’ मी आधी गप्प बसलो. दोस्ताला सांभाळायला पाहिजे ना! नाहीतर बिजी आणि जानकीचाची (शम्मीची आई- रमाचाची. तिला घरात तिच्या माहेरच्या नावानं हाक मारत. आम्हीही तिला ‘जानकीचाची’ असंच म्हणत असू.) त्याला ओरडणार. पण बिजीच्या रागापुढं माझं काय चालणार? शेवटी मी तिला सांगितलं, ‘‘हा शम्मीका बच्चा.. त्याची नवी एअरगन घेऊन येतो आणि त्याच्या हातून काचा फुटतात.’’ दुसऱ्या दिवशी दुपारी शम्मी आला. त्याला बिजीनं घरी बोलावलं व त्याचा कान पकडून दटावलं, ‘‘मैं तेनू दास देवां के एस तरां दिव्यां शरारतां, फेर ना करीं, नहीं तां हे शरारतां वारे थ्वाडे बिजीनुं दस देवां गी.’’ (परत असे उद्योग करू नकोस. नाहीतर तुझ्या आईला नाव सांगेन.) तोही घाबरला. कान पकडून म्हणाला, ‘‘नां बिजी, नां. मी असं परत कधी करणार नाही.’’ एका मोठय़ा स्टारचा मुलगा आणि तितक्याच तोलामोलाच्या स्टार दिग्दर्शकाचा भाऊ  होता तो! त्यानं खरं तर माज करायला हवा होता! पण बिजीला तो एक शब्द बोलला नाही. निमूटपणे त्यानं ऐकून घेतलं. पृथ्वीराजजींची त्याला तशी शिकवणच होती. थोरामोठय़ांचा आदर कसा करायचा हे कपूर कुटुंबीयांना माहीत होतं. रंगभूमीवरील बादशहा असलेले पृथ्वीराजजी नाटक संपल्यावर जेव्हा प्रेक्षकांना अभिवादन करून प्रेक्षकांच्या जाण्याच्या वाटेवर हातात झोळी घेऊन उभे राहायचे आणि रंगभूमीच्या मदतीसाठी पदर पसरायचे तेव्हा त्यांची मुलंही सोबत उभी असत. नम्रतेची शिकवण त्यांना तिथंच मिळत असे. शम्मी या शाळेत जास्त शिकला.

शम्मीला खरं म्हणजे वैज्ञानिक व्हायचं होतं. तो मला कधी कधी सांगायचा, की त्याला विज्ञानाची आवड असून, त्यात संशोधन करून मानवजातीच्या कल्याणार्थ काहीतरी करायचं आहे. त्याला एरोनॉटिकल इंजिनीअर बनायचं होतं! पृथ्वीराजपापाजींनंतर त्यांच्या खानदानात मॅट्रिकची परीक्षा पास होऊन कॉलेजात जाणारा तो पहिला मुलगा होता. त्याने रुईया कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळवली होती. तिथं प्रयोगशाळा नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांना रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जावं लागे. पण तो थिअरीला कंटाळायचा. मला म्हणायचा, ‘‘थिअरीपेक्षा सगळंच प्रॅक्टिकल असतं तर किती बरं झालं असतं!’’ शेवटी थिअरीला कंटाळून त्यानं कॉलेजच सोडलं. पण विज्ञानाचा पदर मात्र त्याने सोडला नाही. तो कायम अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित राहिला. त्याच्याकडे जगातली सर्वोत्तम म्युझिक सिस्टीम असायची. सर्वसामान्य लोकांना शम्मी हा भारतातल्या हॅम रेडिओचा एक प्रणेता आहे, इंटरनेटचा भरपूर प्रमाणात वापर करणारा आणि त्याचा पुरस्कार करणारा पहिल्या फळीतल्या लोकांपैकी आहे, हे माहिती नाही. तो इंटरनेट चालवणाऱ्या मंडळींच्या एका संघटनेचा पहिला अध्यक्ष होता. औपचारिक शिक्षणानं अकाली बळी घेतलेला तो एक संशोधक होता.

शेवटी वळचणीचं पाणी वळचणीलाच जाणार, या न्यायानं शम्मी आधी रंगमंचाकडे व नंतर चित्रपटाकडे वळला. एकदा मी प्रीतमच्या काऊंटरवर बसलो होतो. ती जागा अशी होती की मला हॉटेलही दिसायचं आणि रस्त्यावरील हालचालीही दिसायच्या. मला एक आकाशी रंगाची कन्व्हर्टेबल ब्यूक गाडी जाताना दिसली. तिच्या ड्रायव्हिंग सीटवर शम्मी दिसला. तो समोरच्या बँकेत गेला. मला खात्री होती, की आता पटाका इथं येणार. मी त्याची वाट बघत बसलो. थोडय़ा वेळानं तो आला. एकदम खुशीत होता. मला म्हणाला, ‘‘यार चिकने, (तो मला नावानं कधीच हाक मारत नसे. ही त्याची सवय शेवटपर्यंत होती.) कल ही मैंने एक पिक्चर साइन की है. उसका पाच हजार मिला, तो सिधा कार खरिदने गया. किसी को बताया नहीं. घरी सांगितलं, की ट्रायलला आणलीय.’’ मी त्याला विचारलं, ‘‘किती रुपयांना घेतलीस?’’ तर डोळे मिचकावून मला म्हणाला, ‘‘छोड ना यार!’’ ती कार किती रुपयांना घेतली, हे त्यानं मला कधीच सांगितलं नाही. त्याला गाडय़ांचा मोठा शौक होता. मला आठवतंय, ड्रायव्हिंग लायसन्सही मिळालं नसताना राजजींची फोर्ड कार त्यानं सुरू केली. द्वारका नावाचा एक नोकर त्यांच्याकडे होता. त्यानं कारचं दार लावायच्या आधीच शम्मीनं ती बाहेर काढली. परिणाम असा झाला.. की ते उघडं दार रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबावर आदळलं आणि निखळून पडलं.

शम्मीची व माझी दोस्ती अभंग होती. तो आमच्याकडे स्टार बनण्याआधी आणि नंतरही जेवायला यायचा. त्याला बटरवालं तंदुरी चिकन आवडायचं. ते वेगळ्या पद्धतीनं बनवावं लागे. एक आख्खी पोल्सन बटरची (त्या काळात पोल्सन बटर खूप प्रसिद्ध होतं.) मोठी वडी तव्यावर टाकून त्यात चिकन शिजवायचं आणि मग तंदूर करायचं. शम्मी अख्खी कोंबडी रिचवायचा. त्याचे अनेक ‘क्रश’ झाले, पण त्यानं लग्न गीता बालीशी केलं. ती त्याच्यापेक्षा एका वर्षांनं मोठी होती. त्याला थोडा विरोधही झाला होता. त्यावेळी तो आपल्या प्रेमाबद्दल मला म्हणाला, ‘‘गीता बाली खूप संघर्ष करून मोठी झालीय. आयुष्याचा सामना करण्याची तिची वृत्ती आणि धाडस बघून मी खूप प्रभावित झालो. त्यातही एकदा असं झालं.. तुला माहितीच आहे की मला शिकारीचा किती शौक आहे. केदार शर्माच्या एका पिक्चरचं मी कुंमाऊ  परिसरात शूटिंग करत होतो. एका शिकारीत माझ्या हातून वाघ निसटला. त्या वाघासाठी मी झुरत होतो. गीता माझं सांत्वन करत होती- की काळजी करू नकोस, तो वाघ तुला सापडेल. एका रात्री आम्ही जेवण करून परतत होतो. माझ्या पुढं गीताची जीप होती. एका पुलाच्या मध्यभागी तिची जीप थांबली आणि गीता जीपच्या बॉनेटवर उडय़ा मारू लागली. तिने मला पाहिलं आणि म्हणाली, ‘‘शम्मी, तुझा वाघ मी आत्ता इथून समोर जाताना पाहिला. जा, लवकर बंदूक घेऊन ये आणि त्याला मार.’’ यार, मैं तो हैरान हो गया. एक जंगली शेर वहाँ घूम रहा है, आणि ही नाचत होती. का? तर मला शिकार करता येऊन माझी अस्वस्थता दूर व्हावी! अब मैं उस के प्यार में पागल न हो जाऊँ  तो क्या?’’ अशी बेबंद प्रेमात पडलेली जोडी होती ती. ते एकमेकांत पूर्णपणे बुडून गेले होते. राजजींनी मध्यस्थी करून पापाजींना मनवलं. आम्ही खूश झालो.

शम्मीला मद्य खूप आवडायचं. आमच्याकडे एक वेगळा मोठा ट्रंपेटच्या आकाराचा मद्याचा प्याला होता. त्यात तो त्याची आवडती थंडगार गोल्डन ईगल बीअर घ्यायचा आणि त्यावर दोन पेग रम ओतून मग निवांतपणे ती पीत बसायचा. मी कधीच मद्य पीत नाही. मला आवडतही नाही. त्यामुळे तो माझी चेष्टा करायचा. एकदा आम्ही मुलांना घेऊन काश्मीरला फिरायला गेलेलो. श्रीनगरमध्ये आम्ही निडोजमध्ये उतरलो होतो. पण ब्रेकफास्टसाठी म्हणून आम्ही ओबेरॉयला गेलो. तर तिथं सकाळी सकाळी हे महाशय मद्य पीत बसलेले. त्यानं मला पाहिलं आणि हाक मारली. मी त्याच्याजवळ गेलो. त्याचं नुकतंच गीताबरोबर लग्न झालेलं. ‘‘सकाळी सकाळी हे काय सुरू केलंयस? आणि गीता कुठाय?’’ तर मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, रात्री खूप झाली होती. ती उतरवायला म्हणून हा अँटी डोस!’’ तेवढय़ात गीता बाली आली. मला म्हणाली, ‘‘अच्छा हुआ, आप इसको लेक्चर दे रहे हो।’’ मी हसून म्हणालो, ‘‘अरे भई, येही मुझे लेक्चर दे रहा है।’’ ती शम्मीला म्हणाली, ‘‘मी अमीरा कदल मार्केटमध्ये जाऊन येते.’’ आणि ती गेली. हा मजेत कपाळाला हात लावून म्हणाला, ‘‘गीता आता जाईल ‘कपूर अँड सन्स’मध्ये आणि हवी तेवढी खरेदी करून येईल. माझा बँक बॅलन्स खलास. तिला वाटतं की ‘कपूर अँड सन्स’ नावामुळे ते दुकान तिच्या सासऱ्याचं आहे.’’ पुढे दीर्घ आजाराने गीताचं निधन झालं. त्याने तिची खूप सेवा केली. त्यानंतर निलादेवीशी त्यानं लग्न केलं आणि ते ४१ र्वष- त्याच्या मृत्यूपर्यंत टिकलं.

शम्मी कपूर हा दिलीप-राज-देव यांच्या जमान्यानंतरचा आणि राजेश खन्नाच्या उदयापर्यंतच्या काळातला अनभिषिक्त सम्राट होता. पण त्याच्यातला माणूस कधीच हरवला नव्हता. तो दोस्ती टिकवायचा. आपण कपूर असल्याचा त्याला सार्थ अभिमान होता. मी चित्रपटाला अर्थपुरवठा करणारी एक कंपनी काढली होती. त्याचीही गंमत आहे, पण त्याविषयी नंतर कधीतरी. आम्ही शशी कपूर आणि शर्मिला टागोर हे दोघं एकत्र काम करत असलेल्या ‘अनाडी’ या चित्रपटाला फायनान्स केलं होतं. शम्मीनं मला विचारलं, ‘‘शशी कसं काम करतोय?’’ आता या विषयात काही बोलायची माझी पात्रता नाही; पण मी आपलं त्याला म्हणालो, ‘‘छान काम करतोय.’’ त्यावर शम्मी मला म्हणाला, ‘‘मग? तो मुलगा कोणाचा आहे? भाऊ  कोणाचा आहे?’’ ते खरंच होतं. नंतर नंतर आमच्या भेटी कमी होत गेल्या, पण मनाच्या गाठी घट्टच होत्या.

शम्मीला मी शेवटचं भेटलो ते त्याच्या मृत्यूपूर्वी साधारण वर्षभर. तोवर तो पूर्णपणे बदलला होता. आयुष्यानं त्याला एकदम शांत केलं होतं. तो देवधर्म करत होता. प्रवचनं देत होता. राजजींच्या निधनानंतर कपूर खानदानाची अघोषित वडीलपणाची जबाबदारी तो पेलत होता. सारे त्याचा मान ठेवत होते. एका अर्थी त्यानं निरवानिरवीची तयारी केली होती. आणि शम्मी १४ ऑगस्ट २०११ रोजी गेला. मी त्याला शांतवलेलं पाहू शकलो नाही.

बहोत आये और गये, लेकीन शम्मी, यार, तुमसा नहीं देखा!

कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:22 am

Web Title: kulwant singh kohli articles in marathi on unforgettable experience in his life part 4
Next Stories
1 राजजी
2 हॉलीवूड लेन
3 मुंबईसंगे आम्ही(बि)घडलो!
Just Now!
X