माझ्या आठवणीप्रमाणे १९४६ साल असेल. रामराया जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ. ‘प्रीतम’च्या काऊंटरवर मी बसलो होतो. हाश्शहुश्श करत एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘अण्णासाबने भेजा है. उनको किसी के लिये तंदूर चिकन और पराठा चाहिये.’’ त्याने मला ऑर्डर दिली आणि उभा राहिला. त्याला पाणी वगैरे देऊन मी सहजच विचारलं, ‘‘आपने जिनका जिक्र किया वे अन्नासाब कौन है?’’ तो अविश्वासानं माझ्याकडे पाहतच राहिला. चेहऱ्यावर असे भाव होते, की ‘तुम्हाला अण्णासाहेब माहीत नाही?’ तो मला म्हणाला, ‘‘सरदारजी, अण्णासाहेब म्हणजे शांतारामजी. व्ही. शांताराम.. ‘राजकमल’चे मालक!’’

माझा खरं तर विश्वास बसेना. एवढा मोठा दिग्दर्शक, निर्माता! पृथ्वीराजपापाजीसुद्धा ज्याला मानतात, त्याच्याकडून आपल्या हॉटेलात ऑर्डर आली! मी स्वत: त्यांना हवे होते ते सर्व पदार्थ व्यवस्थित टिफिनमध्ये घेतले अन् पापाजींना सांगून निघालो. राजकमल स्टुडिओ परळला आहे, असं त्या गृहस्थांनी मला सांगितलं. दादरहून परळ असं कितीसं लांब होतं? त्यात शांतारामजींना भेटण्याची संधी मिळणार होती. त्या गृहस्थाकडून पत्ता घेतला. त्याच्याजवळ सायकल होती. एका कामगाराला ती सायकल घेऊन यायला सांगितलं आणि त्या गृहस्थाला कारमधून सोबत घेऊन निघालो.

archana patil have large amounts of gold
अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार
Raju Shetty, hatkanangale lok sabha seat, Confident of Victory, public donation of money, lok sabha 2024, election 2024, swabhimani shetkari sanghatna, criticise maha vikas aghadi,
सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली; एक व्होट व एक नोट प्रमाणे लोकवर्गणीला प्रतिसाद – राजू शेट्टी
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
rashmi barve
रामटेकमधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण काय आहे? उमेदवाराची जातवैधता छाननी प्रक्रिया कशी असते?

अण्णासाहेब त्यांच्या कार्यालयात मोठय़ाशा खुर्चीत बसले होते. कुणीतरी त्यांच्याकडे आलं होतं. पांढऱ्याशुभ्र कपडय़ांमध्ये माझ्यासमोर भारतीय चित्रपटाचा श्वेतधवल इतिहास बसला होता. कामात व्यग्र होता तो इतिहास! सोबतच्या गृहस्थाने माझा परिचय करून दिला. अण्णासाहेब चटकन् खुर्चीतून उठले, माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही स्वत: का आलात हे सारं घेऊन? कोणी वेटर पाठवायचा. किंवा आमच्या माणसाकडे जेवण द्यायचंत हे. बसा बसा.’’ त्यांनी माझ्यासाठी थंड पाणी मागवलं. कमीत कमी बोलणं ही अण्णासाहेबांची खासियत होती. ते एवढं माझ्याशी बोलले याचं तिथं असलेल्यांना आश्चर्य वाटलं होतं! अण्णासाहेब पुढं म्हणाले, ‘‘मला पृथ्वीराजजींनी तुमच्या हॉटेलबद्दल सांगितलं होतं.’’ मी हळूच पुटपुटलो, ‘‘तुमच्याकडे यायचं होतं, म्हणूनच मी स्वत: आलो.’’ आणि त्यानंतर जेव्हा केव्हा ‘राजकमल’कडून ऑर्डर यायची, मीच ती ऑर्डर घेऊन जायचो. चित्रपटसृष्टीतील ‘राजकमल’ची एवढीशी तरी सेवा केली पाहिजे अशी माझी भावना होती. त्यानंतर प्रत्येक वेळी अण्णासाहेब मला म्हणत असत, ‘‘सरदारजी, नेहमी तुम्ही स्वत: का जेवण घेऊन येता? दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं.’’ मी फक्त हसून त्यांच्या बोलण्यावर प्रतिसाद देत असे. अण्णासाहेबांकडे सर्व जण- हिरो, हिरॉइन, कॅमेरामन, स्पॉटबॉय असे सारेच- एकत्र जेवायला बसत. खरीखुरी समानता त्यांच्याकडे होती. त्यामुळे मला सर्वानाच भेटण्याची संधी मिळे. दुसरं म्हणजे प्रीतमच्या जेवणाची पसंती किंवा त्याबाबत काही सूचनाही त्यांच्याकडून मिळत असे.

अण्णासाहेब कधी कधी प्रीतममध्ये येत असत. त्यांची लांबलचक काळी कॅडिलॅक गाडी होती. तिच्या बॉनेटवर राजकमलचा मोठा सिम्बॉल असे. ती कॅडिलॅक प्रीतमसमोर उभी राहिली की लोकांची गर्दी उसळत असे. अण्णासाहेबांची आदरयुक्त ‘क्रेझ’ होती. त्यांच्या येण्यानं आमची प्रतिष्ठा वाढत असे.

पुढे आमचा आणि अण्णासाहेबांचा स्नेह वाढत गेला. ते पापाजींच्या बरोबरीचे होते, पण माझ्याबरोबर त्यांनी एक वेगळंच नातं जपलं होतं. अण्णासाहेब नेहमी कामातच असत. नेमकं बोलणं आणि वेळ अजिबात वाया न घालवणं हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. अण्णासाहेबांमुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आमचं स्नेही बनलं. त्यांचं-आमचं घरीही येणं-जाणं सुरू झालं. दोस्तीच झाली. अण्णासाहेबांची दुसरी पत्नी जयश्री ही खूप मोठी अभिनेत्री. अतिशय देखण्या दिसायच्या त्या. त्यांना भरपूर बोलायला आवडायचं. फिरायला आणि खरेदी करायला आवडायचं. अण्णासाहेब सतत चित्रपटाच्याच दुनियेत असल्यानं जयश्रीताईंना एकटं वाटायचं. तसं झालं की त्या आमच्याकडे यायच्या. माझ्या पत्नीजवळ आपलं मन मोकळं करायच्या. त्यांना तीन मुलं होती- राजश्री, तेजश्री आणि किरण. तिन्ही मुलं अतिशय गोड होती. तिघांनाही जयश्रीताईंनी उत्तम वळण लावलं होतं. एवढय़ा महान चित्रपटकर्त्यांची आणि अभिनेत्रीची मुलं असूनही त्यांच्यामध्ये कोणताही गर्व नव्हता. सगळेच नम्रतेनं बोलायचे. ही मुलं मला ‘अंकल’ म्हणायची. आजही तेच नातं ती जपून आहेत.

त्या पेडर रोडवर राहत. जयश्रीताईंचं मुलांच्या शिक्षणावर बारीक लक्ष असे. दर रविवारी त्या मुलांना घेऊन खंडाळ्याला जात असत. तिथं जाताना त्या प्रीतममध्ये येत. इथंच थांबून जेवत. त्यांना पंजाबी मांसाहारी जेवण- त्यातही तंदुरी चिकन, तंदुरी पराठा अतिशय आवडत असे. शाकाहारी पदार्थात पालक पनीर आणि वांग्याचं भरीत! खंडाळ्याला जाताना आमच्याकडे कधी गर्दी असेल तर त्या गाडीत बसून राहत आणि राजू (राजश्री), तेजू (तेजश्री) किंवा किरण हॉटेलात येत. त्यांना हवे ते पदार्थ पार्सल करून घेत. पदार्थ येईपर्यंत ही मुलं कधीही मस्ती करत नसत. पंधरा मिनिटे, अर्धा तासभरही ती शांतपणे बसून राहत. मी मग त्यांना आइस्क्रीम वगैरे देत असे. टोनी, गोगी (माझा धाकटा मुलगा) यांच्यापैकी कोणी असेल तर मात्र ती त्यांच्याशी खेळत असत. त्यातल्या त्यात राजू थोडीशी मिश्कील होती. ‘चुलबुली’ होती.

सणावाराच्या दिवसांत जयश्रीताई आमच्या घरी येत असत. अगदी तीन जिने चढून त्या यायच्या. आमच्या पापाजींच्या त्या लाडक्या होत्या. माझ्या पत्नीची आणि त्यांची छान दोस्ती झाली होती. एकदा दिवाळीत आमच्याकडे पत्त्यांचा डाव मांडला होता. साधासा खेळ घरातली सर्व माणसं खेळत होती. गंमत म्हणजे जयश्रीताईंना पत्ते खेळता येत नव्हते. पण सगळे खेळतात तर आपणही खेळू असं त्यांना वाटलं. गढ्ढा-झब्बूचा खेळ सुरू होता. सुरुवातीला त्या हरल्या. पण नंतर जसा त्यांना तो खेळ कळला तसा त्या पहिल्या प्रथम सुटत गेल्या आणि दुसऱ्यांना त्या खेळातला गाढव करण्यात यशस्वी होत गेल्या. अर्थात, नेहमी पत्ते न खेळणाऱ्या माणसांच्याच बाजूला नशीब असतं असं म्हणतात. जयश्रीताईंवरून ते सिद्ध होताना दिसलं.  मग त्या माझ्या पापाजींनाही चिडवू लागल्या, ‘‘क्या पापाजी, आप को भी ताश खेलना नहीं आता?’’ त्यानंतरही त्या कधी फारशा हरल्या नाहीत.

राजश्रीवर अण्णासाहेबांचा जीव होता. बालकलाकार म्हणून तिने काही चित्रपट केले होते. नायिका या नात्याने तिला लाँच करण्यासाठी म्हणून त्यांनी ‘गीत गाया पत्थरोंने’ या  चित्रपटाची निर्मिती केली होती. जितेंद्रचाही तो पहिला सिनेमा होता. पहिल्याच चित्रपटाने दोघांनाही स्टार बनवलं. प्रीतमचं नूतनीकरण व्हायच्या आधी आम्ही रात्री एक छानशी पार्टी दिली होती. त्यावेळी अण्णासाहेब राजश्री आणि देखण्या जितेंद्रला घेऊन या पार्टीला आले होते. एवढीशी पाहिलेली राजश्री आता एका चित्रपटाची नायिका होणार, हे पाहून आम्ही सारे हरखून गेलो होतो. तिनं त्यावेळी आम्हाला साऱ्यांना खाली वाकून नमस्कार केला होता. मी म्हणालो, ‘‘आमच्यात मुली पाया पडत नाहीत.’’ त्यावर कधीही न बोलणारे अण्णासाहेब म्हणाले, ‘‘असू दे सरदारजी (अण्णासाहेब मला नेहमी अशीच हाक मारत.), मोठय़ांचे आशीर्वाद हवेत.’’

पुढे राजश्री खूप मोठी अभिनेत्री झाली. तिच्याभोवती चाहत्यांचा कायम गराडा असायचा. पण कुठंही आम्ही दिसलो की ती धावत यायची. एकदा आम्ही काश्मीरला गेलो होतो. पहेलगाम परिसरातून आम्ही घोडय़ावरून सोनमर्गला जायला निघालो होतो. वाटेत एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. पोरं मागे लागली की- शूटिंग पाहू या. आम्ही घोडेवाल्याला सांगून थांबलो. जरा पुढे जातो तो जयश्रीताई दिसल्या. तिथं राजश्रीचं शूटिंग सुरू होतं.. ‘सगाई’ नावाच्या चित्रपटाचं. हिरो होता विश्वजीत आणि निर्माता होता एस. डी. नारंग. राजश्रीनं आम्हाला पाहिलं आणि ती धावतच आली, खाली वाकून तिनं नमस्कार केला आणि म्हणाली, ‘‘अंकल, कितना अच्छा लगा आपको देख के.’’ विश्वजीतलाही आनंद झाला. नारंग म्हणाला, ‘‘सरदारजी, तुम्ही इकडं कुठं? चला, मजा आली. आज शूटिंगला सुट्टी.’’ मग काय, आमचा गप्पांचा फडच काश्मीरच्या त्या धुंद हवेत भरला. धमाल केली आम्ही साऱ्यांनी. राजश्रीचं माझ्यावर खूप प्रेम होतं.

‘अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ या चित्रपटात ती राज कपूरसोबत काम करत होती. त्यावेळीच ती लॉस एंजलिस येथे राहणाऱ्या चॅपमन नावाच्या अमेरिकन माणसाच्या प्रेमात पडली होती. पण ते गुपित तिनं कोणालाही सांगितलं नव्हतं. मला फक्त म्हणाली, ‘‘अंकल, मी अशोक अपार्टमेंटमध्ये एक घर घेतलंय. फक्त तुम्हाला सांगतेय. कोणाला सांगू नका. पण मी हे सगळं सोडून पळून जाणार आहे.’’ ‘त्या घराचं पुढं काय करणार आहेस?’ या माझ्या प्रश्नावर गूढ हसून ती गप्प व्हायची. जसा चित्रपट पूर्ण झाला तसं तिनं घरात सांगितलं, की ती ग्रेग चॅपमन नावाच्या अमेरिकन माणसाच्या प्रेमात पडली आहे आणि आपण अमेरिकेला जाणार आहोत. सगळेच अवाक् झाले. जयश्रीताईंना तर धक्काच बसला होता. ‘राजश्रीला समजावून सांगा..’ अशी त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. पण ती ऐकेचना. शेवटी ‘ब्रह्मचारी’, ‘अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’सारखे हिट् चित्रपट देणारी आमची राजू त्या ग्रेग चॅपमनबरोबर निघून गेली. ग्रेग चॅपमन हा तसा फारसा श्रीमंत नव्हता. तिच्या लग्नानंतर जयश्रीताई पेडर रोडवरून अशोक अपार्टमेंटमध्ये राहायला गेल्या. त्यांना अपेक्षा होती की राजश्री परत येईल.. पाश्चात्त्य जगात तिचं मन रमायचं नाही. पण राजू अतिशय निश्चयी होती. तिनं ते लग्न जिद्दीनं निभावलं.

लग्नानंतर ती मला तिच्या अमेरिकेतल्या घरी नेहमी बोलावत असे. तीन-चार वर्षांनी मी माझ्या एका अमेरिका दौऱ्यात लॉस एंजलिसमधील तिच्या घरी जाऊन आलो. तिचं घर फारसं मोठं  नव्हतं. तीन-चार बेडरूम्सची एक अपार्टमेंट होती. भारतातली आघाडीची आणि उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री राजश्री प्राप्त परिस्थितीत तिथं आनंदानं राहत होती. तिनं माझं, माझ्याबरोबर आलेल्या माझ्या पुतण्याचं आणि त्याच्या पत्नीचं हर्षोल्हासानं स्वागत केलं. उत्तम आदरातिथ्य केलं. अशा पद्धतीनं ती तिथं राहत होती, की मागचं सारं आयुष्यच जणू ती विसरून गेलीय. तिनं ते नातं आजही जपून ठेवलंय.

तसंच नातं किरणनेही जपलंय. त्याने लहानपणापासून आमच्या परिवाराशी व्ही. शांतारामजींचं असलेलं नातं पाहिलंय. जयश्रीताई पापाजींना आणि मला कशा पद्धतीनं मान देत असत ते त्याने पाहिलंय. त्यामुळं फिल्मी दुनियेत राहूनही तो ते नातं आजही जपून आहे. तो अधूनमधून आम्हाला भेटायला येत असतो.

मी गेल्या सात दशकांत मुंबईतली  चित्रपटसृष्टी खूप जवळून पाहिलीय. अगदी अपघातानं मी तिच्या निर्मितीशीही काही कारणानं जोडला गेलो होतो. (त्याविषयी नंतर कधीतरी.) रूपेरी पडद्यावरील राजे आणि राजकुमारांचं आयुष्य फारसं मजेदार नसतं. कित्येकदा कॅमेऱ्यासमोरील रंगीत प्रकाशयोजनेमुळं त्यांच्यासमोर एक झगझगीत दुनिया उभी राहते. मात्र, ती झगझगीत, नकली दुनिया त्यांना वास्तवापासून दूर नेते. त्यांचं जग हे फक्त कॅमेऱ्यापुढचं जग बनतं. ती रूपेरी चौकट आणि त्या चौकटीतली दुनिया हेच त्यांचं वास्तव बनतं. ३५ एम. एम. किंवा ७० एम. एम.च्या सिनेमास्कोपिक विहिरीतील डबक्यालाच ते अवघं विश्व मानू लागतात. जे या डबक्याबाहेर पडले ते मोठे झाले अथवा संपले. व्ही. शांतारामजी हे त्या चौकटीपलीकडील जगाला जाणून घेणारे होते, तिला नव्याने मांडू पाहणारे होते. म्हणूनच ते महान बनू शकले. राजश्रीनं या जगाला स्वत:च्या अटींवर जाणून घेतलं, स्वत:च्या अटींवरच ते जग तिनं स्वीकारलं आणि या फिल्मी दुनियेच्या अटी न मानता तिनं ते जग नाकारलंही. कधी कधी नकाराच्या स्वीकारातच स्वानंदाच्या स्वर्गाचा लाभ होत असतो. राजश्रीला तो स्वानंद-स्वर्ग लाभला. खूप कमी जणांना तो स्वर्ग लाभतो.

काय गंमत आहे नियतीची; पित्यानं रूपेरी पडद्यावर ‘नवरंग’चा स्वर्ग निर्माण केला, तर कन्येनं त्या स्वर्गाचा त्याग करून स्वत:चा स्वतंत्र स्वर्ग उभा केला. दोघंही मनस्वी.. दोघंही आयुष्याचे तपस्वी!

– कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर