|| कुलवंतसिंग कोहली

‘‘यार, आज शाम को क्या कर रहे हो?’’

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

‘‘कुछ नहीं पापाजी.. बस हॉटेल! आणि काय असणार माझ्याकडे?’’

‘‘तर मग आज संध्याकाळी घरी पार्टी आहे. नक्की ये..’’

पार्टी कशासाठी आहे, काय आहे, हे विचारायच्या आधीच फोन बंद झाला. हा फोन अशा माणसाचा होता, की त्यांनी मला फक्त ऑर्डर करायची आणि मी ती पाळायची. मी संध्याकाळी पार्टीला गेलो. अख्खी फिल्म इंडस्ट्री तिथं लोटली होती. कोण नव्हतं असं नाही. कारण ती पार्टी रामानंद सागर यांची होती. मी तिथं पोहोचल्यावर मला कळलं, की रामानंद सागरजींना भारत सरकारची ‘पद्मश्री’ जाहीर झाली होती, त्या आनंदाप्रीत्यर्थ ती पार्टी होती. मी पापाजींचे (रामानंद सागरजींना मी ‘पापाजी’ म्हणत असे. माझे पापाजी, पृथ्वीराजजी व रामानंदजी यांनाच फक्त मी ‘पापाजी’ या संबोधनानं हाक मारत असे.) चरणस्पर्श केले, त्यांना बधाई दिली. पापाजी म्हणाले, ‘‘उपरवालेने मेहरबानी की है। वाहे गुरु के आशीर्वाद है.. आणि तुझ्यासारख्या मित्रांच्या शुभेच्छा आहेत. अजून काय पाहिजे?’’

पापाजी आमच्या ‘प्रीतम’च्या गोतावळ्यातले एक महत्त्वाचे सदस्य. ते माझ्या पापाजींचे स्नेही नंतर झाले; आधी माझे स्नेही झाले. ते मला नेहमी ‘यार’ म्हणत असत. ते ‘प्रीतम’मध्ये येऊ लागण्याआधीपासून मी त्यांना ओळखत  होतो. ते जुन्या पंजाबमधील ‘डेली मिलाप’ नावाच्या एका वर्तमानपत्रात कथालेखन करत असत. ‘मिलाप’ अतिशय लोकप्रिय होतं. आणि आजच्या पाकिस्तानातील पंजाबात खूप लोक ते वाचत असत. पापाजी नंतर त्याचे संपादकही झाले होते. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो. त्यामुळे ते जेव्हा ‘प्रीतम’मध्ये पहिल्यांदा आले तेव्हा त्यांचं स्वागत करायला मीच धावत गेलो होतो असं मला आठवतं. एक मोठा लेखक आपल्याकडे आला याचाच मला आनंद झाला होता. अभिनेत्यांचं मोठेपण मान्य करूनही त्यांना घडवणाऱ्या सृजनशील लेखकाचं महत्त्व व अप्रूप मी जाणून होतो. सेल्युलॉइडवर एकदा का अभिनय गेला की गेला.. त्यात बदल संभवत नाही. पण सृजनशील लेखकानं लिहिलेले संवाद, त्याची निर्मिती ही काळाच्या कसोटीवर तगून राहते आणि ती प्रत्येक रसिकाला त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे कोणत्याही काळात भुरळ घालत राहते. रामानंद सागरजींचं लिखाण मला त्या दर्जाचं वाटत असे. म्हणूनच ते आल्याचा मला पराकोटीचा आनंद झाला. आमच्या पहिल्या भेटीपासूनच त्यांनी माझ्यावर पुत्रवत माया केली. ते माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होते, पण मला ते ‘बेटा’ म्हणत नसत, तर ‘यार’ म्हणून संबोधत असत.

मध्यम उंचीचे आणि भक्कम बांध्याचे पापाजी बोलायला लागले की स्तिमित होऊन ऐकत राहावंसं वाटे. प्रचंड कर्तृत्व गाजवूनही हा माणूस विलक्षण साधा होता. त्यांचं त्यांच्या परिवारावर नितांत प्रेम होतं. त्यांच्या ‘सागर व्हिला’मध्ये सारे सागर एकत्र राहत असत. परस्परांवरील मायेचा तो ‘सागर’ होता. त्यांना एकूण पाच मुलं- चार मुलगे व एक मुलगी. या सर्वाबरोबर माझा दोस्ताना होता व आहे. सुभाष, मोती, प्रेम, आनंद ही मुलं आणि नीलम ही मुलगी. या प्रत्येकासाठी त्यांच्या प्रचंड ‘सागर व्हिला’मध्ये स्वतंत्र जागा होत्या. एकत्र कुटुंबपद्धतीवर त्यांची श्रद्धा होती. पापाजी होते तोवर हे सारे सागर कुटुंबीय एकाच टेबलावर जेवायला बसत. माझाही एकत्र कुटुंबावर विश्वास आहे. वेगवेगळे राहणाऱ्या आजच्या पिढीच्या जगात आम्ही कोहली मात्र अजूनही एकत्रच राहतो. माझ्यासमोर आमच्या पंजाबातील कुटुंबाप्रमाणेच ‘सागर’ परिवाराचाही आदर्श आहे. पापाजींची सर्व मुलं सिनेमातच आहेत. आणि त्यांच्यापैकी प्रत्येक जण सिनेमाच्या एकेका क्षेत्रात प्रवीण आहे. त्यांना सिनेमा निर्माण करताना कधीही बाहेरच्या व्यक्तींवर अवलंबून राहावं लागलं नाही. पापाजींच्या दूरदर्शीपणाचं हे फलित आहे.

पापाजी गप्पिष्ट होते. माझ्याशी त्यांच्या वेगळ्या विषयावर गप्पा चालायच्या. ते आठवणींत रमून जायचे. आमच्या दोघांचीही मूळं मूळच्या पंजाबातली असल्यानं आणि मलाही आठवणींत रमून जायला आवडत असल्यानं आमच्या छान गप्पा रंगत.

एकदा पापाजी रंगून सांगत होते, ‘‘माझं रामानंद हे मूळ नाव नाही, तसंच सागर हेही मूळ आडनाव नाही.’’ मी एकदम चकित झालो. मिश्कीलपणे हसत पापाजी म्हणाले, ‘‘माझं नाव आहे- चंद्रमौली चोप्रा.’’

मी तर अवाक् च झालो. त्यांना विचारलं, ‘‘पापाजी, मग ‘रामानंद सागर’ हे तुम्ही लिखाणासाठी टोपणनाव स्वीकारलंत की काय?’’

ते म्हणाले, ‘‘छे रे! लिखाणासाठी मी वेगवेगळी नावं घेतली. रामानंद चोप्रा, रामानंद बेदी, रामानंद काश्मिरी.. पण ‘रामानंद सागर’ या नावाची गोष्ट अगदी ड्रॅमॅटिक आहे. माझ्या आईच्या आईला- म्हणजे माझ्या आई-आजीला मुलगा नव्हता. तेव्हा तिचा वंश पुढे चालावा म्हणून मला दत्तक घेतलं तिनं.. आणि माझं नाव ठेवलं- रामानंद. आजचा मोठा निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आहे ना- तो माझा सावत्र भाऊ. माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. तिचा विधू हा मुलगा. तो माझ्यापेक्षा ३४ वर्षांनी लहान आहे.’’

मी थक्कच झालो. त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्यावरच एक सिनेमा झाला पाहिजे.’’

ते हसले. पापाजी तसे सामाजिक क्रांतिकारी होते. त्यांचं लग्नाचं वय होऊ लागलं तसं त्यांच्या दत्तक आईनं त्यांचं लग्न जुळवायला घेतलं. लग्न ठरलं आणि त्या काळाप्रमाणे हुंडय़ाचा विषय निघाला. पापाजींनी ‘मला हुंडा घ्यायचा नाहीए..’ असं सांगितलं. झालं! त्यांचे पालक रागावले. ‘हुंडा घेतला नाहीस तर तुझ्यातच काहीतरी कमी आहे असं लोक म्हणतील..’ अशी त्यांची यामागची भूमिका होती. पण पापाजी स्वत:च्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी ‘मी हुंडा घेणार नाही,’ असंच सांगितलं. या हट्टापोटी या दत्तक पुत्राला त्याचं घर सोडावं लागलं. ते तत्त्वासमोर कसलीही तडजोड करत नसत. म्हणूनच त्यांच्या लेखनात तीव्रता आली असावी. त्यांनी किती वेगळ्या प्रकारचं लेखन केलं होतं. ते सारं मी वाचलं होतं. त्यांना १९४२ साली क्षयाची बाधा झाली होती. क्षयरोग लपविण्याच्या त्या दिवसांत त्यांनी ‘डायरी ऑफ अ टी. बी. पेशंट’ हे पुस्तक लिहिलं होतं.

जेव्हा मला त्यांनी आपलं घर सोडण्याविषयी सांगितलं, तेव्हा मी त्यांना विचारलं, ‘‘नंतर काय केलंच?’’

‘‘यार.. मग काय? थेट आयुष्यालाच भिडलो. जगायला जे जे करावं लागतं ते ते केलं. मी हातगाडी चालवली. टांगा चालवला. भाजी विकली. ऑफिसात शिपाई झालो. सोनाराच्या पेढीवर काम केलं. ट्रकचा क्लीनर झालो. पण जिद्द सोडली नाही. दिवसभर काम करायचो आणि रात्री पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करायचो.’’ त्यांनी मला अभिमानानं एकदा सांगितलं, ‘‘मी संस्कृत आणि पíशयन भाषांत पदवी मिळवली आणि विद्यापीठात पहिलाही आलो होतो.’’ त्यांनी पीएच. डी. संपादन केली होती. पापाजी हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होतं. एवढं सारं यश संपादन करूनही हा माणूस कायम धरतीशी निगडित राहिला. पापाजींच्या प्रत्येक चित्रपटात ते स्वत: एखादं छोटंसं व्यक्तिमत्त्व साकारत. ते व्यक्तिमत्त्वही हातगाडीवाला, शिपाई, भाजीवाला अशाच स्वरूपाचं असे. त्याबद्दल ते सांगत, ‘‘मी माझे स्ट्रगलचे दिवस या छोटय़ा छोटय़ा भूमिकांतून जगत असतो.’’ पापाजी सांगत, ‘‘ज्यानं जमीन सोडली त्याला आकाशही लांब असतं. तेव्हा आपली जमीन सांभाळून ठेवायची.’’

भारताची फाळणी झाल्यानंतर पापाजी भारतात आले आणि मुंबईत त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. (फाळणीच्या अनुभवांवर त्यांनी त्यांची मास्टरपीस ठरलेली साहित्यकृती ‘और इन्सान मर गया’ लिहिली.) त्यावेळी ते पृथ्वीराजपापाजींकडे त्यांचे साहाय्यक म्हणून काम करत होते. कपूर खानदानाशी ते जवळून संबंधित होते. कपूर मंडळींमुळे ते ‘प्रीतम’मध्ये आले. राज कपूरना त्यांची ओळख निर्माण करून देणारा ‘बरसात’ हा चित्रपट त्यांनी लिहिला होता. आगळावेगळा दिग्दर्शक आणि आगळावेगळा लेखक! त्यानंतर पापाजींनी राजजींकडे काम केलं नाही किंवा राजजींनीही त्यांना आपल्याकडे बोलावलं नाही. असं का झालं, असा प्रश्न मला नेहमीच पडला होता. दोघंही आमचे जवळचे स्नेही होते. पण आम्ही हा प्रश्न त्यांना कधी विचारला नाही. ही जोडी जर टिकली असती तर..? दोघंही भव्य स्वप्नं पाहणारे आणि ती भव्यता सेल्युलॉइडवर साकारणारे. पण असं का घडलं, असा प्रश्न कधी कुणाला विचारू नये. त्याचं उत्तर कदाचित निराश करणारंही असू शकेल. अधिकच आग्रह आपण धरला या उत्तराचा, तर नियतीच त्याचं उत्तर देऊ शकेल.

चित्रपटासाठी काम करताना लाहोरमध्ये पापाजींनी १९३२ साली ‘रेडर्स ऑफ द रेल रोड’ या चित्रपटासाठी क्लॅपर बॉयपासून सुरुवात केली. ही सुरुवात करताना मी कोणी मोठा शिकलेलो आहे असा विचार त्यांच्या मनात कधी आला नाही. शिकायचं आहे ना, मग त्यासाठी आपण कोणतंही काम करायची तयारी ठेवायची- अशी त्यांची भूमिका होती. याच भूमिकेतून त्यांनी त्यांच्या मुलांनाही घडवलं होतं.

पापाजींनी परंपरेची कास कधीच सोडली नाही. त्यांनी परंपरा विकसित केली. तिला नवा आयाम दिला. भारतीय विचारधारेला त्यांनी नवसंजीवन दिलं. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. पण त्यांच्यापेक्षाही ‘परजायजी’- म्हणजे त्यांची पत्नी लीलावतीजी अधिक धार्मिक होत्या. या दोघांचाही दिवस देवपूजा केल्याशिवाय सुरू होत नसे. लोकांना सदैव काही ना काही देत राहावं, ही त्यांची वृत्ती होती. याच वृत्तीतून त्यांनी दूरदर्शनवर क्रांती घडवणारी व भारतीय परंपरेचा अभिमान उंचावणारी ‘रामायण’ ही मालिका निर्माण केली. मला आठवतंय, ही मालिका सुरू असताना आमची हॉटेलं टेलिकास्टच्या काळात ओस पडलेली असत. आमचे वेटर्सही टी. व्ही.ला हार घालून ‘रामायण’ बघत असत. पापाजी आमच्याकडे सर्वाच्या परिचयाचे होतेच; पण ‘रामायण’ सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा सर्वाचा दृष्टिकोन अधिकच आदराचा झाला होता.

त्या काळातलीच एक गंमत. आमच्या ‘मिडटाऊन प्रीतम’चं उद्घाटन आम्ही १ ऑगस्ट १९८८ रोजी संध्याकाळी पाच वाजता करायचं ठरवलं होतं. त्यावेळी माझे पापाजी हयात नव्हते. पृथ्वीराजजींचंही निधन झालं होतं. पण बी. आर. चोप्रा आणि रामानंद सागर होते. या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते आमच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन करायचा घाट मी घातला. त्याकरता मी पापाजींना फोन केला. ते तेव्हा उंबरगावला ‘रामायण’ मालिकेचं शूटिंग करीत होते. मी त्यांना माझा विचार सांगितला. ‘शूटिंगच्या व्यापामधून येता येणं अवघड आहे..’ असं ते म्हणाले. मग मी पुत्रहट्ट धरला आणि ते यायला राजी झाले. ‘‘कोण कोण येणार आहेत?,’’ असं त्यांनी मला विचारलं. मी सांगितलं, ‘‘पापाजी तुम्ही, बी. आर. चोप्रा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले आठ मंत्री.’’ पापाजींनी तिकडे कपाळाला हात लावला असणार! मला म्हणाले, ‘‘मी आणि बी. आर. ठीक आहे रे. पण एखादा मंत्रीही येताना मुश्कील होते.. आणि तू तर इथं आठ आठ मंत्री बोलावून ठेवले आहेस. बघ, त्यांची नावं छापतोयस, पण जर कोणी आलं नाही तर पंचाईत होईल आपली. आपल्या हॉटेलला सुरुवातीलाच नाट लागायला नको.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘पापाजी, सगळे येतील असा विश्वास तरी वाटतोय मला. पाहू या.’’

१ ऑगस्टला तुफान पाऊस पडत होता. बी. आर. चोप्रा पावणेपाचला आले. सारे मंत्रिगणही त्याच दरम्यान पोहोचले. आणि पापाजी उंबरगावहून बरोबर पाच वाजता येऊन पोहोचले. त्यांचं स्वागत करून आम्ही त्यांना घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. पापाजींनी सगळीकडे नजर फिरवून पाहिलं. आमंत्रण पत्रिकेत नावे छापलेली सगळी महनीय मंडळी त्यांना आलेली दिसली. स्थानिक खासदार, आमदार, मुंबईचे महापौर, शेरीफ, कमाल अमरोहीसाहेब, प्राणसाहेब, सुनील दत्त, रजिंदर, संजीवकुमार, राजकुमार असे सारे सितारे पाहून त्यांनी समाधानानं मान डोलवली. आणि माझ्या पाठीवर जोरात शाबासकीची थाप मारून पापाजी म्हणाले, ‘‘पुत्रा, रब तेरे नाले. तेरी ओपिनग तो हिट् हो गयी.’’ मी म्हणालो, ‘‘पापाजी, तुम्ही आलात आणि मग ती हिट् झाली.’’

पापाजींना भारत सरकारनं ‘पद्मश्री’ किताब प्रदान केला आणि काही वर्षांतच पापाजींचा स्वर्गवास झाला. त्यांनी केलेल्या सच्च्या कामामुळे त्यांना नक्कीच स्वर्गवास मिळाला असणार. अशा वेळी मला देवाचा हेवा वाटतो. जगातली सर्व चांगली चांगली माणसं स्वत:जवळ गोळा करून देव त्यांच्यासमवेत आनंदात राहतो. आणि आम्ही? आम्ही मर्त्य जगात त्यांच्या आठवणी काढत राहतो.

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर