|| कुलवंतसिंग कोहली

‘‘वीर, तुसी क्या कर रहे हो? मैंनू तुहाडेनाल गल करनी है?’’

‘‘हां जी, बोलो.. की गल है?’’

१९६२ च्या एका संध्याकाळी साध्या कपडय़ातला एक तरुण सरदारजी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो सरदारजी दादरच्या चित्रा सिनेमासमोरच्या गुरुद्वारात राहत होता. मी त्याला खूप चांगला ओळखत होतो. तो पंजाबमधून आपलं बी. ए.पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून एम. ए. करण्यासाठी मुंबईत आला होता. खालसा महाविद्यालयात तो शिकत होता. कॉलेज संपल्यावर मिळेल ते काम करत होता आणि जगत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुर्दम्य आत्मविश्वास असे. त्याचं बोलणं, चालणं, वागणं अतिशय नम्र; परंतु ठाम असे. जगण्यासाठी त्याची वाटेल त्या प्रकारच्या मेहनतीची तयारी होती. परंतु त्यासाठी तो तत्त्वात तडजोड करायला तयार नसे. वेळप्रसंगी तो उपाशी राही, पण मान झुकवीत नसे. मी त्याला गुरुद्वारात रोज भेटत असे. गुरुद्वाराच्या व्यवस्थापन मंडळाची काही जबाबदारी माझ्यावर होती. त्याचं व माझं वयही सारखंच होतं. त्यामुळे आमची दोस्तीही पटकन् झाली होती. एकमेकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी आम्ही करत असू. कित्येकदा तो ‘प्रीतम’मध्ये येऊन माझ्याबरोबर गप्पा मारत असे. परंतु तो कधीच माझ्याबरोबर जेवायला बसला नाही. त्याच्यापाशी आमच्या थाळीसाठी देण्याइतके पस्तीस रुपयेही नसायचे. पण मी कधी त्याला म्हणालो, ‘‘बुटासिंग, चल, आपण जेवू या.’’ तर तो विनम्रपणे नकार देई व म्हणे, ‘‘वीर, गुरुद्वारात आहे ना. मी जेवीन तिथं.’’ बुटासिंग उंच, धट्टाकट्टा आणि देखणा सरदारजी होता. वाहे गुरूंवर त्याची असीम श्रद्धा होती. माणसाच्या माणुसकीवर त्याचा अलोट विश्वास होता. आज प्रतिकूल परिस्थिती आहे, परंतु उद्या मी ती परिस्थिती बदलेन, हा आशावाद त्याच्यात होता.

तर.. त्या दिवशी बुटासिंगला माझ्याशी काही बोलायचं होतं. तो अधीर झाला होता. परंतु मी त्याला म्हणालो, ‘‘बुटासिंग, थोडं थांब ना. पापाजी आहेत अजून ‘प्रीतम’मध्ये. ते गेले की मी बोलतो तुझ्याशी.’’ पण तो न थांबता म्हणाला, ‘‘कुलवंत, मला दोनशे रुपये पाहिजेत.’’ माझ्याबरोबर माझ्या हॉटेलात मी विनंती केल्यावरही न जेवणारा बुटासिंग माझ्याकडे त्या दिवशी पैसे मागत होता. मला आश्चर्यच वाटलं. परंतु त्या क्षणी मी त्याला थोडं थांबायची विनंती केली. थोडय़ा वेळानं पापाजी आझाद मैदानाकडे गेले. त्यावेळी सरदार चंदूलाल शहा यांनी भारतीय चित्रपटांसंबंधी मोठं प्रदर्शन आझाद मैदानावर लावलं होतं. त्या प्रदर्शनात आम्ही एक मोठ्ठं हॉटेल लावलं होतं. पापाजी तिथं गेले. मग मी बुटासिंगला हाक मारली. बिचारा पाच वाजल्यापासून बसला होता. माझ्या मनाला थोडंसं वाईट वाटत होतं. परंतु पापाजींसमोर काही बोलायची माझी हिंमत नव्हती. आणि जर का त्यांनी नकार दिला तर त्या नकाराला होकारात बदलण्याची ईश्वराचीसुद्धा शामत नव्हती.

नि:स्पृह बुटासिंग माझ्याकडे पैसे मागतोय म्हणजे काहीतरी कारण असणार! तो आला व मला म्हणाला, ‘‘वीर, यार मला पंजाबातून शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे संत फतेहसिंगसाहेबांचा फोन आलाय. त्यांनी मला लगेचच बोलवलंय.’’

‘‘मग जा की!’’

‘‘अरे यार, त्यांनी मला खासदारकीची निवडणूक लढवायची, त्यासाठी मुलाखतीला बोलवलंय.’’

‘‘अरे, वा! फिर जा के आओ भई.’’

‘‘पण माझ्याकडे पैसे कुठे आहेत अमृतसरला जायला? तुला माहिती आहे माझी स्थिती कशी आहे ते! कसाबसा जगतोय मी इथं.’’

‘‘तुला दोनशे रुपये कशाला लागतील रे?’’

‘‘त्यांनी उद्याच बोलवलंय. म्हणजे दिल्लीला विमानानं जायला हवं. त्यासाठी नव्वद रुपये जायला हवेत. तिथून अमृतसरला जायला बस करायची तर त्याचं तिकीट अकरा रुपये. मी गुरुद्वारातलंच जेवण बांधून घेऊन जाईन- म्हणजे जेवायचा खर्च वाचेल. शिवाय अमृतसरला मंदिरात लंगर असतोच. जायला-यायला मला दोनशे दोन रुपये हवेत. तू दोनशे दे, माझ्याकडे दोन रुपये आहेत.’’

तेही खरंच होतं. बुटासिंग मुंबईत नशीब काढायला आला होता. खालसा महाविद्यालयात कष्टानं शिक्षण घेत होता आणि तिथंच छोटीशी नोकरी करत होता. बोलायला तो अतिशय मिठ्ठास होता. त्याच्याशी दोस्ती पटकन् होत असे. त्याची परिस्थिती त्याने एकदा सांगितल्यावर माझ्या परिचयाचे एक सरदारजी होते- रणजितसिंग जोहर नावाचे. ते ‘रणजित प्रेस’ चालवायचे. त्यांचं स्वत:चं नियतकालिक होतं. बुटासिंगला त्यांनी कंपोझिटरची नोकरी दिली. त्याला पंचवीस रुपये पगार होता. प्रचंड कष्ट घेऊन त्यानं पंजाबमधून बी. ए.ची पदवी मिळवली होती. पुढे त्यानं बुंदेलखंड विद्यापीठामधून पीएच. डी. पदवी प्रामाणिक संशोधन करून मिळवली आणि तो डॉ. बुटासिंग झाला.

मी बुटासिंगला म्हणालो, ‘‘यार, पापाजींना सांगायला हवं. पण त्यांनी नाही म्हटलं तर पंचाईत होईल. तेव्हा थांब! आपण काहीतरी आयडिया काढू.’’ बुटासिंग थांबला. त्या दिवशी सुदैवानं छान धंदा झाला आणि गल्ला नेमका नेहमीपेक्षा दोनेकशे रुपयांनी जास्त भरला. मी बुटासिंगला दोनशे रुपये देऊ  शकलो. त्यानं ते पैसे दोन्ही हातांच्या तळव्यात घेतले, कपाळी लावून माथ्यावर ठेवले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो अमृतसरला गेला. पापाजींना दोन-तीन दिवसांनी मी त्याबद्दल सांगितलं. पापाजी अर्थातच भडकले- मला न विचारताच पैसे कसे दिलेस? मी निमूटपणे गप्प बसलो. काही दिवसांनी पापाजींचा राग शांत झाला. ते मला म्हणाले, ‘‘बुटासिंगने पैसे परत दिले तर घेऊ  नकोस.’’ दोन दिवसांनी बुटासिंगचा मला लाइटनिंग कॉल आला. (त्याकाळी साधे फोन नव्हते. शहराबाहेर किंवा गावाबाहेर जर फोन करायचा असेल तर तो ट्रंक बुकिंग किंवा लाइटनिंग कॉल करावा लागे. म्हणजे ऑपरेटरकडे नंबर देऊन तो मागावा लागे. साधा ट्रंक कॉल दोन-तीन तासांनी मिळे, तर लाइटनिंग कॉल १०-१५ मिनिटांत लागत असे. युवा वाचकांना हे वाचताना आज गंमत वाटेल.) बुटासिंग मला म्हणाला, ‘‘वीर, लोकसभेचं तिकीट मिळालंय. आता जिंकल्यावरच भेटतो.’’

..आणि १९६२ च्या तिसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला बुटासिंग उभा राहिला आणि नंतर त्यानं आठ वेळा ही निवडणूक जिंकली.

बुटासिंग खासदार झाला. त्यानंतर त्याच्या व्यापांत अडकला. काही महिन्यांनी तो मुंबईत पहिल्यांदा आला. आल्यावर त्यानं गुरुद्वारात माथा टेकला व तिथून तो ‘प्रीतम’मध्ये आला. पापाजींना पैरीपोना केल्यावर मला उराउरी भेटला. खासदार झाल्यानंतरही साध्या बुटासिंगमध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता. तो तसाच होता. साधे कपडे, साधं वागणं आणि उबदार बोलणं. मला म्हणाला, ‘‘वीर, धन्यवाद! तू मला दोनशे रुपये दिलेस म्हणून मी खासदार होऊ  शकलो. हे पैसे माझ्यासाठी भाग्यवान ठरले. ते काही मी तुला परत देणार नाही. मी तुझा कर्जदार आहे आणि मला त्यातच राहू दे. पापाजींना तसं सांग.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘याआधीच पापाजींनी पैसे परत घेऊ  नकोस असं मला सांगितलंय.’’ त्या दिवशी बुटासिंगनं त्याला भेट आलेला एक पर्शियन गालिचा मला भेट म्हणून दिला. आजही तो माझ्याकडे आहे.

अखंड ४८ र्वष माझी व बुटासिंगची दोस्ती आहे. आम्ही दोघंही एकमेकांना ‘अरे-तुरे’तच हाका मारतो. एकमेकांच्या गळ्यात पडतो. याचं कारण दोस्ती निभावण्याचा त्याचा स्वभाव! तो त्याचे वाईट दिवस कधीच विसरला नाही आणि खडतर दिवसांतल्या दोस्तांपासून कधीही दूर गेला नाही. तो काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा घटक झाल्यानंतर इंदिराजी, राजीवजी यांच्या विश्वासातला एक सामथ्र्यशाली मंत्री (जर माझी आठवण मला दगा देत नसेल तर इंदिराजींनी ‘आय काँग्रेस’ची स्थापना केल्यानंतर पक्षाची निशाणी ठरवण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली होती.) झाल्यावरही मुंबईत जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा आपल्या मित्रांना आवर्जून भेटला. त्याने मित्रांना कधीही तो जिथं असेल तिथं बोलावलं नाही, तर तो या मित्रांना जिथं पूर्वी भेटत असे तिथंच भेटे. तो ‘प्रीतम’मध्ये येत असे आणि गप्पा मारून जात असे.

बुटासिंगजी मंत्री झाल्यानंतर मी त्यांना ‘अहो- जाहो’ करायला सुरुवात केली. त्यावेळी ते वैतागले. म्हणाले, ‘‘मित्राला कोणी अहो-जाहो करतं का?’’ पण मी ‘बुटासिंगजी’ असंच म्हणायला सुरुवात केली. त्यांनी १९८२ च्या दिल्ली एशियाड संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून नेत्रदीपक कामगिरी बजावली. त्यांचे संयोजन कौशल्य त्यावेळी बहरून आले होते. भारताचा मोठा नावलौकिक त्यावेळी झाला होता.

एक मजेदार गोष्ट. भारताचे दोन गृहमंत्री- ग्यानी झैलसिंग आणि बुटासिंग- हे माझे मित्र होते. दोघेही सौजन्यशील आणि आतिथ्यशील! आम्ही तिघं काही वेळा एकत्र भेटलो आहोत. गप्पाटप्पा केल्या आहेत. पण कटाक्षानं आम्ही राजकीय विषय टाळत असू. मी हॉटेल व्यावसायिक असल्याने राजकारणापासून नेहमी लांब राहत असे. ते दोघे पक्के राजकारणी असल्यानं राजकारण बाजूला ठेवून त्यांना गप्पा मारता येत असत! ग्यानीजी हे मुळात ज्ञानी होते. तर बुटासिंगजींनी आपल्या उपजत बुद्धीला धारदार अभ्यासानं अनेक पैलू पाडले होते. आमच्या गप्पा अतिशय चमकदार व बहारदार असत. त्यात राजकारण सोडून कोणताही विषय वज्र्य नसे. अर्थात या अतिशय व्यग्र मंडळींना फार कमी वेळा अशी संधी मिळत असे. अशी संधी आम्हाला वेगवेगळ्या घरगुती कार्यक्रमांत मिळत असे. आमची गाठभेट ही लग्नसमारंभांच्या वेळी नक्की होत असे. माझ्या मुलांच्या लग्नात बुटासिंगजी व ग्यानी झैलसिंगजी आले होते.

दिल्लीत एका लग्नाला आम्ही सारे गेलो होतो. जथेदार रजपालसिंग नावाचे आमचे दोघांचे मित्र आहेत, त्यांच्या मुलाच्या लग्नाला बुटासिंग व मी गेलो होतो. भारताचे तरुण पंतप्रधान राजीव गांधी हेही येणार होते. ते आल्यावर बुटासिंगजी मला घेऊन त्यांच्याजवळ गेले. आमचा परिचय करून दिला व मला म्हणाले, ‘‘पंतप्रधानांना तू हार घाल.’’ मी आनंदानं पंतप्रधानांना हार घातला. मग मला त्यांनी त्यांच्या बाजूला उभं करून एक छायाचित्र काढून घेतलं. नंतर मला म्हणाले, ‘‘भारताच्या पंतप्रधानांना इतक्या मोकळेपणी भेटायची दुसरी संधी तुला कशी मिळणार? यानिमित्ताने मी तुला ती संधी देऊ शकलो.’’

इंदिराजींच्या हत्येनंतर जे दंगे उसळले त्यावेळी सगळीकडून संशयाची सुई शीख समाजावर आलेली होती. त्या संपूर्ण काळात मुंबई पेटली नव्हती. मुंबई शांत होती. माझे स्नेही बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांच्या पुढाकारानं षण्मुखानंद सभागृहात एक मोठी सर्वपक्षीय सभा भरली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्या सभेस उपस्थित होते. त्या सभेत शीख समाजाला दिलासा मिळाला. मुख्यमंत्र्यांनी सर्वाना विश्वास दिला, की मुंबईत सर्व प्रकारचं संरक्षण व सुरक्षितता मिळेल व बाळासाहेबांच्या वतीनं सांगण्यात आलं की, लढाऊ  शीख समाजाला मुंबईत जरा जरी धक्का लागला तर तो शिवसैनिकाला लागला असं ते मानतील. प्रमोदजींचं अफलातून भाषण प्रभाव पाडून गेलं. त्या सभेचा वृत्तान्त गृहमंत्री असणाऱ्या बुटासिंगजींना गेला. त्या वृत्तान्तात संबंधितांनी खात्रीलायकरीत्या त्यांना सांगितलं की, मुंबईत शीख समाजाने बाळासाहेब ठाकरे यांना चार कोटी रुपये देऊन आपली सुरक्षितता सांभाळली. तसं काहीच झालेलं नव्हतं. काही दिवसांनी मुंबईतल्या शीख समाजाचं शिष्टमंडळ घेऊन मी पंतप्रधान राजीवजींना भेटायला गेलो. बुटासिंगजींनी भेटीची व्यवस्था केली होती. भेट चांगली झाली. पंतप्रधान आपुलकीनं वागले. बाहेर आल्यावर गप्पा मारताना बुटासिंगजी मला म्हणाले, ‘‘बरं झालं, तू त्यांना चार कोटी दिलेस. त्यामुळं मुंबई शांत राहिली.’’ मला त्यांचं ते वाक्य ऐकून धक्काच बसला. भारताचे गृहमंत्री असं विधान करतातच कसे? मी त्यांना म्हणालो, ‘‘बुटासिंग, तू असं कसं म्हणू शकतोस? बाळासाहेब, प्रमोद माझे मित्र आहेत. भारतीय जनतेला सौहार्दाची जपणूक करताना पैसे द्यावे लागत नाहीत, ते आतून असतं. जर कोणी त्यांना पैसे देऊ  केले असते तर मला कळलं नसतं का? तुझ्याकडे आलेल्या भाकड बातम्यांवर मुळीच विश्वास ठेवू नकोस. त्यात तथ्य नाही.’’ माझा भडिमार ऐकून खरी परिस्थिती बुटासिंगजींच्या लक्षात आली. त्यांच्या खात्यानं त्यांना चुकीची माहिती दिली होती व तशीच ती पसरली होती. या प्रसंगामुळे आमच्या नात्यात काही काळ ताण आला होता. परंतु काळानं त्यावर फुंकर घातली व तो ताण निवळला. गढूळलेलं पाणी दूर झालं आणि पुन्हा एकदा दोस्तीच्या नात्याचा नितळ तळ दिसू लागला.

आता बुटासिंगजी वयोमानानुसार थकले आहेत. आमचं वय जरी सारखं असलं तरी त्यांच्या मनानं व शरीरानं माझ्यापेक्षा अधिक ताण भोगले आहेत. आता विचार करतोय- एकदा दिल्लीला जावं अन् बुटासिंगजींना कडकडून मिठी मारावी. त्यांना विचारावं, ‘‘वीर, तुसी क्या कर रहे हो? मैंनू तुहाडेनाल गल करनी है?’’

मग तो म्हणेल, ‘‘हां जी, बोलो, की गल है?’’

मग आम्ही दोघं एकमेकांच्या पाठीवर जोरदार थाप मारून भरपूर हसू. आमच्या डोळ्यांत पाणी येईल. सगळं फिकट फिकट दिसू लागेल. आणि मागच्या ५० वर्षांच्या आमच्या दोस्तीचा चित्रपट डोळ्यांपुढून सरकत जाईल..

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर