16 January 2019

News Flash

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस दत्त!

सुनीलजींनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्या आगीत उडी घेऊन नर्गिसजींना वाचवलं.

सुनीलजींनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्या आगीत उडी घेऊन नर्गिसजींना वाचवलं.

कुलवंतसिंग कोहली

मेहबूबसाहेब ‘औरत’चा रिमेक करत होते. त्यांनी नर्गिसजींना मुख्य भूमिका द्यायचं ठरवलं. तोपर्यंत त्यातली ‘बिरजू’ची भूमिका दिलीपसाब करणार हे नक्की होतं. पण नर्गिसजीच म्हणाल्या, ‘‘ज्या व्यक्तीबरोबर मी रोमँटिक भूमिका केल्यात, त्याच्याच आईची भूमिका कशी करायची?’’ अन् मग ती भूमिका सुनीलजींकडे आली..

१९५५ ची एक संध्याकाळ. मी आमच्या ‘कोहलीज्’ या फोर्टमधल्या रेस्टॉरंटमध्ये गल्ल्यावर बसलो होतो. आठ वाजत आलेले. रेस्टॉरंट बंद होण्याची वेळ झाली होती. माझं लक्ष पूर्णपणे हिशेबात अडकलं होतं. त्याचवेळी माझ्या कानावर एक परिचित आवाज आला, ‘‘नमस्ते भाईसाहब, मेरा नाम बलराज दत्त है। मुझे आपके पापाजी को ये अठन्नी देनी है। क्या आप उन्हें दे देंगे?’’ मी वर बघितलं. आवाज ओळखीचा होता, पण चेहरा ओळखीचा नव्हता. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो तरुण पुढे बोलू लागला, ‘‘हे पैसे मी पापाजींना द्यायचे होते. ते तुम्ही द्याल का?’’

रात्री उशिरा घरी पोहोचलो. जेवताना पापाजींना विचारलं की, ‘‘तुम्ही कोणा बलराज दत्तला ओळखता का?’’ पापाजींच्या चेहऱ्यावर काही क्षण प्रश्नचिन्ह उमटलं. मी म्हणालो, ‘‘त्यानं अठन्नी आणून दिलीय.’’

‘हाऽ हाऽ हाऽ’ करत पापाजी गडगडाटी हसले.

आमचं ‘प्रीतम’ हॉटेल हे तेव्हा दोनखणी जागेत होतं. मी एकविशीचा तरणाबांड गडी होतो. मला ‘प्रीतम’ छोटं वाटत असे. त्यामुळे मी पापाजींशी भांडून फोर्ट परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियासमोर एक मोठी जागा भाडय़ानं घेऊन नवं रेस्टॉरंट टाकलं होतं. ती पीअर्सन अ‍ॅण्ड कंपनीची जागा होती. चांगली साडेसहा हजार चौरस फूट जागा आम्हाला त्या काळात फक्त पन्नास हजार रुपये अनामत रक्कम आणि पाचशे रुपये भाडय़ात मिळाली होती. तिथं आम्ही खाण्यापिण्याच्या सोयींबरोबर मॅझनिन फ्लोअरवर एक बिलियर्ड टेबल टाकलं होतं. तिथं बरीच मंडळी येऊन बिलियर्ड खेळत असत. मी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत तिथं असायचो. ‘प्रीतम’मध्ये माझे एक काका बसत असत. आणि पापाजी दोन्हीकडे येऊन-जाऊन असत.

मोठय़ानं हसत पापाजी मला म्हणाले, ‘‘ओये पुत्तर, तो बलराज दत्त होता. तीन दिन पेहले वो मेरे पास एक रुपया मांगने आया था..’’

त्याचं असं झालं की, ‘कोहलीज्’मध्ये बलराज दत्त बिलियर्ड खेळायला येत असे. मी रेस्टॉरंटच्या त्या भागात फारसा जात नसे. तिथं बेट घेऊन बिलियर्ड खेळत असत. अर्ध्या तासाला आठ आणे असं भाडं आम्ही घेत असू. खेळणाऱ्या खेळाडूंत जो गेम हरेल त्याने आठ आणे द्यायचे अशी बेट ते लावत. बलराजला बिलियर्ड खेळायला आवडे. त्यामुळे तो नेहमी तिथं येत असे. पण माझी त्याच्याशी ओळख  झाली नव्हती. त्या दिवशी तो खेळताना हरला. एकदा नाही तर दोन-तीनदा हरला. त्याच्या जवळचे पैसे संपले. म्हणून तो काऊंटरवर पापाजींकडे आला व त्यांना म्हणाला, ‘‘पापाजी, मला आज एक रुपया उधार द्याल का?’’ पापाजींना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘‘का रे बाबा?’’ बलराज म्हणाला, ‘‘पापाजी, मी आज बिलियर्ड हरलो. त्यामुळे शर्तीप्रमाणे मी पैसे द्यायला हवेत. ते पैसे परत करण्यासाठी मी जिंकेन या आशेने पुन्हा खेळलो. पुन्हा हरलो. माझ्याकडे फक्त दीड रुपया होता. तोही मी घालवला. आता मला तुम्ही एक रुपया दिला तर मी तुमचे पन्नास पैसे देईन व घरी ट्रामने वा लोकलने जाईन.’’

पापाजींनी विचारलं, ‘‘तू कुठे राहतोस?’’

‘‘मी वांद्रय़ाला राहतो.’’

‘‘कोण कोण असतं तुझ्याबरोबर?’’

‘‘इथं कोणी नाही. माझ्या काही मित्रांबरोबर एक खोली भाडय़ानं घेऊन फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावतोय.’’

‘‘वो ठीक है पुत्तर, लेकीन तुम तो पंजाबी हो और पंजाबी कभी किसी के सामने हाथ नहीं फैलाते. तुझ्याकडे पुरेसे पैसे नसताना खेळण्याच्या नशेत बिलियर्ड खेळलास- ही एक चूक आणि पंजाबी माणसानं हात पसरले- ही दुसरी चूक. तू जर खरा पंजाबी असशील तर आज घरी चालत जा. उद्या माझ्याकडे ये. मी तुला एक काय, दोन रुपये देईन.’’

दुसऱ्या दिवशी बलराज ‘कोहलीज्’मध्ये आले. मी त्यांना विचारलं, ‘‘ही काय भानगड आहे अठन्नीची? पापाजी हसले फक्त. आणि तुम्ही तर काहीच बोलला नाहीत.’’

ते हसून नम्रपणे म्हणाले, ‘‘परवा पापाजींनी माझे डोळे खाडकन् उघडले. मी खेळाच्या नशेत सारं काही विसरलो होतो. त्यांनी माझ्यातला जमीर ज़्‍ािंदा केला. मी बलराज दत्त. मी सिलोन रेडिओवर अनाऊन्सर होतो. पण आता मुंबईत चित्रपटसृष्टीत नशीब आजमावायला आलोय. पापाजी म्हणाले, पंजाबी हात पसरत नाहीत, तर मदतीचा हात देतात. मी त्या रात्री फोर्टहून वांद्रय़ापर्यंत चालत गेलो. चालता चालता मनाशी निश्चय केला, की यापुढे खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा; त्याचा जुगार करायचा नाही. आणि आयुष्याचा जुगार खेळत असताना दुसऱ्या कोणत्या नशेची गरज असते? पापाजी मेरे दुसरे पापाजी हो गये है अब। नेक पापाजी.’’

मी म्हणालो, ‘‘चलो, तो फिर हम दोनो भाई बन गये. माझं नाव कुलवंत.. कुलवंतसिंग कोहली.’’

‘‘माझं नाव बलराज. सिनेमासाठी मी नाव घेतलंय- सुनील दत्त!’’

मग माझ्या डोक्यात ‘टय़ूब’ पेटली, की हा आवाज आपण सकाळी व रात्री रेडिओ सिलोनवर ऐकत होतो! सुनीलजी व माझी दोस्ती त्या क्षणापासून बनली ती त्यांच्या अखेपर्यंत. (परवा २५ मे’ला त्यांनी हे जग सोडलं त्या गोष्टीला पंधरा वर्षे पूर्ण झाली.) त्यांनी त्यांच्या बोलण्यातली आदब सोडली नाही व मीही. ते मला ‘कुलवंतजी’ म्हणत आणि मीही त्यांना ‘सुनीलजी’! पुढे कित्येक सुख-दु:खांचे क्षण आम्ही दोघांनी ‘शेअर’ केले. सुनीलजी चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी धडपडू लागले. आमच्या ‘प्रीतम’च्या आसपास रणजित, रूपतारा, श्री साऊंड, कारदार, राजकमल असे अनेक स्टुडिओ होते. त्या स्टुडिओंमध्ये ते चकरा मारत असत. सुनीलजी ‘प्रीतम’मध्ये कार्डावर जेवू लागले. माझ्या पापाजींचे ते लाडके होते. सुनीलजींनी त्यांचा महिना कधी चुकवला नाही. वेळच्या वेळी ते पैसे आणून देत. पुढे त्यांना चित्रपट मिळू लागले. एक दिवस ते मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, मेरी एक पिक्चर अभी रिलीज हुई है.’’

मी म्हणालो, ‘‘अरे, तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना! बघितली असती आपण थिएटरमध्ये जाऊन.’’

तर ते म्हणाले, ‘‘अहो, काय कप्पाळ सांगणार! त्या पिक्चरमध्ये मी कधी आलो आणि कधी गेलो, हे माझं मलाच कळलं नाही. केवढं शूटिंग केलं होतं! पण त्यातलं काहीच ठेवलं नाही हो त्यांनी!’’

मी सुनीलजींशी काहीतरी बोलून त्यांची समजूत काढली. नंतर १९५६ साली त्यांचा ‘एक ही रास्ता’ आला आणि त्यांचं नशीब उघडलं. एका प्रामाणिक कलाकाराचा कलाप्रवास नीटस सुरू झाला. तोवर सुनीलजी नियमितपणे आमच्याकडे येत असत. ते आता चित्रपटांत व्यग्र झाले. यादरम्यान त्यांना एक ‘लाइफटाइम’ चित्रपट मिळाला- ‘मदर इंडिया’!

मेहबूबसाहेब ‘प्रीतम’मध्ये येत असत. अनेक चर्चा तिथे चालत. त्यांचा मी साक्षीदार असे. ते ‘औरत’चा रिमेक करत होते. ‘औरत’ हाही त्यांचाच चित्रपट. त्यात नर्गिसजी काम करणार होत्या. त्या आमच्या जुन्या पारिवारिक मत्रीण. राजजींसोबत नेहमी यायच्या. पण तोवर त्यांचं आणि राजजींचं बिनसलं होतं. नर्गिसजींनी स्वतंत्रपणे कामं करायला सुरुवात केली होती. मेहबूबसाहेबांनी नर्गिसजींना मुख्य भूमिका द्यायचं ठरवलं. तोपर्यंत त्यातली ‘बिरजू’ची भूमिका दिलीपसाब करणार, हे नक्की होतं. पण जेव्हा नर्गिसजींनी मुख्य भूमिका करायचं ठरवलं तेव्हा त्याच म्हणाल्या, ‘‘ज्या व्यक्तीबरोबर मी रोमँटिक भूमिका केल्यात, त्यांच्याच आईची भूमिका कशी करायची?’’ अन् मग ती भूमिका दिलीपसाब यांच्याकडून सुनीलजींकडे आली. सुनीलजी तेव्हा मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, ही तर मोठीच जबाबदारी आहे. मी ज्यांच्याऐवजी काम करणार ती व्यक्ती केवढी तरी मोठी आहे. आणि जिच्याबरोबर मी काम करणार तीही महान अभिनेत्री आहे. कैसे होगा?’’ मी हसत हसत म्हणालो, ‘‘सुनीलजी, आप क्या कम हो? सब कुछ ठीक हो जायेगा.’’

‘मदर इंडिया’ सुरू झाला. मी अधूनमधून मेहबूब स्टुडिओत या चित्रपटाच्या सेटवर जायचो. तिथं सुनीलजी, रजिंदर (राजेंद्रकुमार), राजकुमार अन् नर्गिसजी असायच्या. सगळेच माझे स्नेही. आणि मेहबूबसाहेब तर मला पापाजींसारखे. शॉटच्या अधेमधे आमच्या गप्पा व्हायच्या. एकदा सुनीलजी व रजिंदर शॉटमध्ये नव्हते. आम्ही बाजूला बोलत बसलो होतो. शॉटची तयारी सुरू होती. एक स्पॉटबॉय लाइट अ‍ॅडजस्ट करत होता. ते करताना अचानक त्याच्या हातातून लाइट निसटला. तो जिथं पडला तिथं मेहबूबसाहेब बसले होते. मात्र, एका कामगारानं तो लाइट खाली पडताना पाहिला अन् त्यानं चपळाईनं मेहबूबसाहेबांच्या खुर्चीकडे उडी मारून ती खुर्ची ढकलून दिली. मेहबूबसाहेब बाजूला जाऊन पडले. आणि पुढच्याच क्षणी ते जिथं बसले होते तिथंच तो भलामोठा स्पॉट लाइट पडला व त्यांचा कपाळमोक्ष होता होता राहिला. आम्ही सारे जण काही क्षण अवाक् होऊन बसलो होतो. कोणालाच काही सुचेना. सर्वप्रथम भानावर आले ते मेहबूबसाहेब. त्यांच्या ध्यानी आलं की, अल्लातालानं मेहरबानी केलीय. त्यांनी तिथंच नमाज़्‍ा पढला आणि शॉटच्या तयारीची आज्ञा केली. सगळं काही नेहमीच्या पद्धतीनं सुरू झालं. महान व्यक्तीचं महानपण अशा साध्या साध्या गोष्टींतून दिसतं.

नर्गिसजी नेहमी श्वेत वस्त्रं पेहेनत. त्या एखाद्या देवतेसारख्या दिसायच्या. एका संध्याकाळी मेहबूब स्टुडिओत शूटिंग सुरू असताना नर्गिसजींच्या मुलाची भूमिका करणाऱ्या रजिंदरचा घोटा दुखावला गेला आणि त्याला मरणप्राय वेदना होऊ लागल्या. नर्गिसजींनी अगदी हळुवारपणे आपल्या पर्समधून बाम काढला आणि त्यांनी रजिंदरच्या पायाला हलक्या हाताने तो बाम लावला व त्याचा मसाज करू लागल्या. त्याच्या वेदना जाईपर्यंत त्या रजिंदरच्या पायाला मसाज करत राहिल्या. एक ज्येष्ठ अभिनेत्री आपला पाय बरा व्हावा म्हणून अशी शुश्रूषा करते आहे हे पाहून रजिंदरला ओशाळल्यासारखं वाटलं. त्या क्षणी मला नर्गिसजी एखाद्या देवीसारख्याच वाटल्या. ‘मदर इंडिया’मध्ये त्या रजिंदरच्या आई होत्या, आणि प्रत्यक्षातही त्या त्याच्या आई झाल्या. नर्गिसजींना मुळातच एक परोपकारी, नम्र व सद्भावनायुक्त मन परमेश्वरानं दिलं होतं. त्यांच्यासारखी व्यक्ती क्वचितच जन्माला येते.

रजिंदर कधी कधी ‘प्रीतम’मध्ये येत असे. ‘मदर इंडिया’चं शूटिंग संपलेलं. एके दिवशी तो मला म्हणाला, ‘‘कुलवंत यार, सुनील और नर्गिसजी में कुछ चल रहा है।’’ मी थोडासा आश्चर्यचकित झालो. नर्गिसजी त्याच्यापेक्षा मोठय़ा होत्या. नंतर सरळ सुनीलजी व नर्गिसजींच्या लग्नाचीच बातमी आली. काही दिवसांनी सुनीलजी ‘प्रीतम’मध्ये आले. एकटेच. मी थोडासा घुश्श्यातच होतो. लग्नाबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं ना! सुनीलजी म्हणाले, ‘‘कुलवंतजी, तुसी नाराज ना हो।’’ मग त्यांनी सगळी हकिगत सांगितली. ‘मदर इंडिया’च्या शूटिंगमध्ये आगीचं एक दृश्य होतं. त्या दृश्यातली आग वाऱ्यामुळे प्रचंड भडकली. आजूबाजूला गवताच्या गंजी आणि मधे नर्गिसजी होत्या. आग भडकल्यामुळे त्या आतच अडकल्या आणि धगीमुळे बेशुद्ध पडल्या. सुनीलजींनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्या आगीत उडी घेऊन नर्गिसजींना वाचवलं. दोघांनाही भाजल्याने जखमा झाल्या. सुनीलजींच्या जखमा फार गंभीर नव्हत्या. पण नर्गिसजींना मात्र इस्पितळात दाखल करावं लागलं. त्यांची चौकशी करायला सुनीलजी रोज फुलांचा गुलदस्ता घेऊन जायचे. त्यांना योग्य उपचार मिळताहेत की नाहीत ते पाहायचे. त्यांच्या स्वभावातील या हळव्या कोपऱ्यामुळे नर्गिसजींच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. दोघं एकमेकांची सुख-दु:खं वाटून घेऊ लागले.

‘‘एक दिन ऐसे हुआ..’’ सुनीलजी सांगत होते, ‘‘मी खूप निराश होतो आणि ते माझ्या चेहऱ्यावर व माझ्या वागण्यातून दिसत होतं. नर्गिसजींनी मला काय झालं म्हणून विचारलं. मी म्हणालो, माझी बहीण राणीबाली ही खूप आजारी आहे. तिला टी. बी. झालाय. घरात तिची लहान मुलं आहेत. तीही या आजाराला बळी पडू नयेत असं वाटतंय. पण कुणीच मार्गदर्शन करायला नाहीए मला. त्या दिवशी मेहबूबसाहेबांना काहीतरी कारण सांगून नर्गिसजी शूटिंगमधून लवकर निघून थेट माझ्या घरी गेल्या. सोबत एक डॉक्टर घेतलेला. त्या डॉक्टरनं राणीबालीला तपासलं. माझ्या छोटय़ा भाच्यांना घेऊन नर्गिसजी आपल्या घरी गेल्या. हा सारा प्रकार मला घरी गेल्यावर राणीनं सांगितला. नंतर त्या रोज नेपियन सी रोडवरच्या आमच्या घरी येऊन राणीची चौकशी करायच्या, तिच्याशी गप्पा मारायच्या. त्यांच्या स्वभावातल्या या पलूनं मला मोहित केलं. त्या रोज आमच्या घरी यायच्या आणि मग रात्री घरी जायला त्यांना उशीर व्हायचा. मी त्यांना मरीन ड्राइव्हवरच्या त्यांच्या घरी सोडायला जायचो. आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो! एके दिवशी मनाचा हिय्या करून मरीन ड्राइव्हवरच्या सिग्नलवर मी त्यांना विचारलं, ‘माझ्याशी लग्न कराल का?’ त्या एकदम गप्प झाल्या. माझ्या मनावर ताण आला. गाडीतून उतरताना ‘माझं काही चुकलं का?’ असं मी विचारलं. तर त्या म्हणाल्या, ‘दोन दिवसांत सांगते.’ नंतर त्यांनी राणीला विश्वासात घेतलं. त्या मुस्लीम व मी हिंदू. माझ्या आईला ते कितपत रुचेल, असा प्रश्न त्यांना पडलेला. राणीनं होकार दिल्यावर त्यांनी माझ्याशी लग्न करायचं पक्कं केलं. पण हा निरोप त्यांनी राणीकडे दिला. त्यांच्या या सुसंस्कृत वागण्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर खूप वाढला. आम्ही रजिस्टर्ड लग्न केलं.’’

सुनीलजी ही इतकी गोड व्यक्ती होती की त्यांच्यावर राग कसा धरणार? त्यात नर्गिसजींचा परिचय फार पूर्वीपासून होताच. त्या दोघांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते दोघंही आमच्या घरच्या कार्यक्रमांना येत असत. आमचा स्नेह, आमचं नातं हे नर्गिसजी आणि सुनीलजींच्या अखेरीपर्यंत टिकून राहिलं.

या स्नेहाचे आणखी काही पलू पुढच्या लेखात..  (पूर्वार्ध)

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

(‘नाटक २४ X ७’ हे चंद्रकांत कुलकर्णी यांचे सदर काही अपरिहार्य कारणामुळे यावेळी प्रसिद्ध होऊ शकले  नाही.)

First Published on May 27, 2018 1:01 am

Web Title: nargis dutt sunil dutt and movie mother india