News Flash

अर्ध्यावरती डाव मोडला..

किशोरचं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच घडवून देवानं त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं.

कुलवंतसिंग कोहली

त्या दोघांबद्दल काय लिहू आणि कसं लिहू? दोघंही माझे जवळचे होते. दोघंही माझे सगे होते. दोघंही काही काळ माझ्या आयुष्याला व्यापून होती. ती खळखळून हसायची तेव्हा सहस्र चंद्र एकाच वेळी प्रकाशमान व्हायचे. आणि तो गायचा तेव्हा सहस्र सूर्याची किरणं प्रकाशमान व्हायची. ती अभिनय करायची तेव्हा लाखो हृदयं धडकायची. आणि तो अभिनय करायचा तेव्हा लाखो लोक दु:ख विसरून हसायचे. ती गेली तेव्हा करोडो चाहते रडले. आणि तो गेला तेव्हाही करोडोंनी अश्रू ढाळले. दोघांनीही रसिकांच्या मनात घर केलं. त्या घराचे नंतर महाल झाले. आणि आता ते प्राचीन शिल्पासारखे अजरामर झाले आहेत. दोघंही यशस्वी होते, दोघंही महान होते. आणि फारच क्वचित असं घडतं- की दोन यशस्वी, महान व्यक्तिमत्त्वं एकत्र येऊन त्यांचं एकत्र येणंही यशस्वी ठरतं. त्या दोघांच्या बाबतीतही असंच झालं. दोघंही आयुष्यातली अपरिहार्यता म्हणून एकत्र आले. तिच्या अंतापर्यंत एकत्र राहिले. परंतु दोघंही त्यात समाधानी नव्हते. कधीच! मी मधुबाला आणि किशोरकुमार यांच्याबद्दल बोलतोय.

किशोरकुमार आणि मधुबालानं लग्न केल्याची बातमी माझ्यापर्यंत येऊन धडकली तेव्हा मला त्याबद्दल अंदाज होताच. ‘ढाके की मलमल’ या चित्रपटात दोघं प्रथम एकत्र आले होते. नंतर त्यांनी ‘चलती का नाम गाडी’ केला. अर्थात त्यापूर्वीपासूनच मधूला तो ओळखत होता. ‘महल’च्या वेळी तो मुंबईत आला होता. तिचं दैवी सौंदर्य त्यानं पाहिलं होतं. परंतु त्याच्या मनात मुंबईत येऊन स्वत:ला घडवायचं होतं. त्याला गायक व्हायचं होतं आणि अशोककुमार त्याला सांगत होते, ‘‘तू अभिनय चांगला करू शकशील.’’ शिवाय- ‘‘केवळ गाण्यावर तुझं पोट कसं भरणार? त्यामुळे तू अभिनय केलास तर बरे पैसे मिळतील..’’ असंही त्यांचं चालायचं. किशोर पिसाटायचा. नाराज झाला की तो ‘बॉम्बे टॉकीज’च्या ऑफिसमधून थेट ‘प्रीतम’मध्ये उगवायचा. मला सांगायचा, ‘‘ये मेरा बडा भाई है ना, वो किसी की नहीं सुनता। अपने बाप की भी नहीं। मला अ‍ॅक्टिंग करायची नाहीये आणि हा मला तेच करायला लावतोय. मला गायचंय.. सैगलसारखं! लेकीन लोगों को भी इस के जैसा ही लगता है। ये अशोककुमार का भाई है, अ‍ॅक्टिंग तो करेगाही। मला माहीत आहे, की मी अ‍ॅक्टिंगच काय, दुनियेतली कोणतीही गोष्ट करू शकतो. आणि तीही मस्तपैकी करू शकतो..’’

ते खरंही होतं म्हणा!

किशोरचं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच घडवून देवानं त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं. दादामुनींचा- म्हणजे अशोककुमारजींचा हा धाकटा भाऊ  एकदम कलंदर होता. इतक्या नाना कळा देवानं त्याच्यात ठासून भरल्या होत्या, की बस्स! तो कलागुणांचा स्फोटक दारूगोळा होता. सनकी आदमी था। जो मन में आएगा, वही करेगा। नहीं तो किसी की एक नहीं सुनेगा। एक दिवस या महाशयांनी मोठय़ा भावाला सांगितलं, ‘‘मला माझ्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगू द्या.’’ शेवटी दादामुनींनी त्याच्यापुढे हात टेकले.

किशोरचं पाळण्यातलं नाव- आभासकुमार! तो लहानपणापासून अतिशय हट्टी आणि मनात येईल तेच करायचा. त्याला गाण्याची खूप आवड होती. पण गळा खराब. दादामुनी मला एकदा सांगत होते, ‘‘आभास लहानपणी जेव्हा गात असे तेव्हा अक्षरश: रेकल्यासारखा गात असे. मला थोडीफार गाण्याची समज होती आणि त्या काळात पाश्र्वगायन रूढ झालं नव्हतं, म्हणून चित्रपटातली माझी गाणी मीच गात असे. आणि हा तर सारखी गाणीच गात बसायचा. त्याचं गायन भयानक वाटायचं. मैं बहोत डाटता था उसको। आभास बचपन से शैतान था। एका जागेवर कधी थांबत नसे. सारखा धावतपळत असायचा. अभ्यासाचं नाव नाही. एकदा अशीच मस्ती करताना त्याचं बोट कापलं गेलं आणि मग मोठी जखम झाली. भरपूर रक्त जात होतं. मलमपट्टी करताना त्यानं आधी दवाखाना आणि नंतर घर डोक्यावर घेतलं होतं. ती जखम सारखी ठणकत असे. आणि तो मोठमोठय़ानं भोकाड पसरून रडत असे. त्यावेळी आम्हाला ते त्रासदायक झालं होतं. पण त्या रेकण्यामुळे किंवा कसं कोण जाणे, आभासचा आवाज मोकळा झाला.’’

किशोर हा पहिल्यापासून- मराठीतला योग्य शब्द वापरायचा तर ‘अतरंगी’ होता! एका किशोरमध्ये अनेक किशोर दडलेले असायचे. आणि या सर्व किशोरकुमारांचे अनेक उद्योग वेगवेगळ्या प्रकारे चालायचे. दादामुनींनी त्याची एक आठवण तो गेल्यानंतर मला सांगितली.. ‘‘किशोरचा आवाज मोकळा झाल्यावर तो मोकळेपणे गात सुटायचा. त्याच्या गायकीमुळे तो कॉलेजात लोकप्रिय झाला होता. पण तो अतिशय लाजराही होता. तो गर्दीला घाबरायचा. लोक दिसले की त्याची तंतरायची. म्हणूनच कॉलेजच्या गॅदरिंगला हा पडद्याच्या आड उभं राहून गाणं म्हणायचा. नंतर मात्र तो बदलला.’’

मी एकदा किशोरला विचारलं, ‘‘यार, तुझा आभासचा किशोर कसा झाला?’’ ‘‘अरे सरदारजी, ये तो एक लंबी कहानी है।’’ असं म्हणून त्यानं दीर्घ श्वास घेतला. जणू काही आफत कोसळणार होती! आणि मग जोरात हसला. इतका, की त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. ‘‘कुलवंत, तू पहले ये बता- तू सरदार है की नहीं? (असले प्रश्न फक्त तोच विचारू शकत होता. तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. लेकीन हम लोग की दोस्ती थी। मीही त्याच्याशी ‘अरे-तुरे’तच बोलत असे.) ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये मतभेद झाल्यानंतर दादामुनींनी आपल्या काही मित्रांसमवेत गोरेगावला ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’ सुरू केला. मैं भी वहाँ जाता था। शूटिंग बघत बसायचो. ‘फिल्मीस्तान’मध्ये ‘शिकारी’चं शूटिंग सुरू होतं आणि अचानक एका पात्राची गरज भासली. वाच्छा म्हणून दिग्दर्शक होते, त्यांनी समोर बसलेल्या मला तो छोटासा शॉट द्यायला सांगितला. मी तर झटकन् झिडकारूनच टाकलं. पण दादामुनी घुस्सा झाले. दिग्दर्शकाला उलट बोलणं त्यांना आवडलं नाही. मला त्यांनी एका जवानाला पाणी पाजण्याचा तो सीन करायला लावला. मग माझी भूमिका वाढवली गेली. चित्रपटात आभासकुमार हे नाव योग्य वाटणार नाही असं वाटून दादामुनींचे पार्टनर शशधर मुखर्जीनी माझं नाव ‘किशोरकुमार’ ठेवलं. तुझं नाव बदलू का, असं मला विचारलंही नाही! बडा भाई आखीर बडा ही निकला। त्यांनी मला अभिनय करायला भाग पाडलं आणि नावही बदलायला भाग पाडलं!’’

किशोर खरं म्हणजे उत्तम अभिनेता होता. त्यानं तीही कारकीर्द नीट मनावर घेतली असती तर कदाचित तो सैगलजींच्या तोडीचा झाला असता. पण.. या ‘पण-परंतु’ला आयुष्यात अर्थ नसतो. जे आहे ते आहे. त्याच्या अभिनय कारकीर्दीच्या प्रारंभीच्या दिवसांत एक गमतीदार घटना घडली होती; ज्यामुळे अनेक वर्ष देव आनंदने त्याचा आवाज पाश्र्वगायक म्हणून घेतला नव्हता. हा किस्सा मला किशोरनेच सांगितला. देव आनंद व अशोकजींच्या एका चित्रपटात अशोकजींनी किशोरला एक छोटीशी भूमिका करायला सांगितली होती. त्या सीनमध्ये किशोरनं देवसाबना जरा उलटं बोलायचं होतं. किशोरला मुळातच काम करायचं नव्हतं. त्यात त्या सीनच्या शूटिंगच्या वेळी देवसाब नव्हते. त्यांची डमी वापरून चित्रण होणार होतं. किशोर सांगत होता, ‘‘मला राग आला. एक तर मी भूमिका करायला तयार नव्हतो, त्यात देवसाबही उपस्थित नव्हते. डमीबरोबर शूटिंग म्हणजे काय? पण दादामुनी म्हणाले तर करायला हवंच. मग काय, मी शूटला उभा राहिलो. देवसाबचा डमी होता. मी त्या भूमिकेतील देव आनंदचा अपमान करायचा होता. मग काय, मी वाटेल ते बोललो. स्क्रिप्टमध्ये नव्हत्या त्या साऱ्या शिव्या त्या पात्राला घातल्या आणि दिग्दर्शकानं ‘कट्’ म्हटल्याक्षणी मी तिथून सरळ पळालोच! रिटेक वगैरे कसलं काय? मैंने वापस मूड के भी नहीं देखा। बाद में दादामुनीने मुझे एक थप्पड भी मारा था। देवसाबना त्याचा राग आला. ‘जिद्दी’तलं माझं पहिलं गाणं मी त्यांच्यासाठीच गायलो होतो. पण रागावलेल्या देवसाबनी पुढे काही वर्षे माझा आवाज त्यांच्यासाठी घेतलाच नाही. मग सचिनदांनी (बर्मन) त्यांची समजूत काढली आणि मी त्यांचा ‘आवाज’ झालो. लेकीन क्या करू बांगडू? ऐसाही हूँ मैं।’’

हळूहळू किशोरचा जम बसला. सुरुवातीला त्याचा आवाज लोकप्रिय झाला. पण देव आनंदशिवाय त्याचा फारसा वापर कोणी केला नाही. ‘आराधना’नंतर मात्र त्याची गाडी भरधाव सुटली ती सुटलीच. त्यापूर्वी मात्र जगण्यासाठी किशोरनं चित्रपटांत कामं केली. भन्नाट गाणी गायला. ‘चलती का नाम गाडी’सारखा अफलातून चित्रपट लिहिला, दिग्दर्शित केला, त्यात अभिनय केला. जरी त्या चित्रपटात दादामुनी, अनुपकुमार, मधुबाला हेही होते, तरी अंतिमत: सबकुछ किशोरच! त्यानं ‘झुमरू’पासून गाणी लिहायला व संगीत द्यायला सुरुवात केली होती. दादामुनींनी त्यावेळची एक छान आठवण सांगितली- ‘‘किशोरला मी पूर्वी एका चित्रपटात गायलेलं गाणं हवं होतं. ‘कोई हमदम न रहा’ हे ते गाणं! सरस्वतीदेवींनी ‘जीवननैय्या’ चित्रपटासाठी त्या गाण्याची चाल बांधली होती. किशोरनं ते खांडव्यात असताना सिनेमा पाहताना ऐकलं व लक्षात ठेवलं. तो तेव्हा सहा-सात वर्षांचा असेल. मग ‘झुमरू’साठी गाणं करताना त्यानं माझ्याकडे ते गाणं वापरायची परवानगी मागितली. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, आडा चौतालातलं झिंझोटी रागातलं ते गाणं आहे. ते गाताना माझी वाट लागली होती! तू कशाला ते वापरतोस? तुझ्या आवाजाला ते झेपणार नाही.’’ तो म्हणाला, ‘‘ये आडा चौताल वगैरे मैं कुछ जानता नहीं। आप हाँ कहते हो या नहीं, वो बोलो.’’ त्याच्या आवाजाला व त्याच्या एकूण आवाक्याला मी तोवर नीट समजू शकलो नव्हतो. किशोरनं माझ्या खनपटीला लागून शेवटी परवानगी घेतलीच. मजरूह सुलतानपुरीकडून त्यानं ते नव्यानं लिहून घेतलं आणि ते त्याचंच गाणं झालं. त्यानंतर मात्र मी त्याला विरोध करायचं सोडून दिलं. माझा धाकटा भाऊ  कर्तृत्वानं माझ्यापेक्षा मोठा झाला होता.’’

किशोरकडे एक सुंदर कार होती- मॉरिस मायनॉर! त्या कारवर त्याचं मनस्वी प्रेम होतं. तिची तो खूप देखभाल करायचा. जीवापलीकडे जपायचा. त्यानं ती कार असताना दुसरी नवी  मोठी कार घेतली. नंतर ती मॉरिस कुठे दिसेना. मलाही कारचा षौक आहे. मी मॉरिसविषयी किशोरला विचारलं तर तो काहीच बोलेना. दोन-तीनदा मी त्याला छेडलं, पण पठ्ठय़ा गप्प! शेवटी मी दादामुनींना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘कुलवंत, हा किशोर म्हणजे एकदम भारी आहे. त्यानं ‘ती कार मी कोणालाही देणार नाही,’ असं सांगून त्याच्या बंगल्याच्या मागच्या अंगणात एक खड्डा खणला आणि त्यात ती कार पुरून ठेवलीय.’’ मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला!

कारवरून आठवलं- ‘चलती का नाम गाडी’मध्ये त्यांच्या वाडवडिलांपासून चालत आलेली कार त्यानं वापरली होती. ती कार, अशोकजी, अनुपकुमार, किशोर यांच्याबरोबर त्यात मधुबालाही होती. ती एकाच वेळी ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘चलती का नाम गाडी’ करत होती. एक अतिभव्य ऐतिहासिक महाकाव्य, तर दुसरा आधुनिक जीवनातील खेळकर, रहस्यपूर्ण विनोदपट. आणि त्यासोबत वाढत चाललेला तिचा आजार. मधुबाला हे सगळं कसं निभावत होती, तिचं तिलाच ठाऊक. इथेच किशोरच्या मनात मधुबालाविषयी कोमल भावना फुलू लागल्या. खरं म्हणजे किशोरची पहिली बायको रुमादेवी व मधुबाला या मैत्रिणी होत्या. त्या दोघी किशोरबद्दल चर्चाही करत असत. रुमादेवी तिच्याजवळ किशोरच्या तक्रारी करत असे आणि मधुबाला तिची समजूत काढत असे. परंतु त्यांचा संसार विस्कटला आणि किशोरनं मधुबालाशी लग्न केलं. त्यासाठी त्यानं धर्मही बदलला व ‘अब्दुल करीम’ हे नाव घेतलं. लग्नानंतर मधुबालाला वाटलं की तिचा संसार आनंदाचा होईल. पण किशोरचे आई-वडील त्याच्याकडे राहत असत, ते दादामुनींकडे गेले. दादामुनींनीही किशोरशी संबंध संपवले. लग्नानंतर ते हनिमूनसाठी यूरोपात गेले. मधुबालाच्या आजारावर उपाय करण्यासाठी त्यांनी तिथं प्रयत्नही केले. परंतु ते यशस्वी ठरणार नव्हते.

मधुबालाशी लग्न झाल्यावर किशोर त्याच्या कामात गुंतत गेला. मधूनं काम कमी केलं. पण एकटेपणा तिला घरात छळू लागला. ती परत आई-वडिलांकडे जाऊ  लागली. त्यांच्या संसाराची घडी विस्कटत गेली. मधू अनेकदा किशोरच्या कार्यालयात येई. ‘रूपतारा स्टुडिओ’त त्याचं कार्यालय होतं. ती सहसा बाहेरचं खात नसे. परंतु माझ्याकडून जेवण मागवलं की ती हमखास थोडंसं तरी खात असे. किशोरची जेवण मागवण्याची पद्धत खास किशोरकुमारी होती. त्याला चमचमीत, चटकदार जेवण आवडे. तो त्याच्या ऑफिस बॉयजवळ चिठ्ठी पाठवत असे- ‘आधा फिश करी, आधा खीमा, आधा चावल, तीन रोटी, आधा बाटली पाणी (त्याला ‘प्रीतम’मधलंच पाणी प्यायला लागे.) और एक पुरा सरदारजी!’ अशी ऑर्डर जगात फक्त एकच माणूस देऊ  शकतो.. किशोरकुमार! हे सगळं मी त्याच्याकडे घेऊन जाणं त्याला अपेक्षित असे. मीही जायचो. मधू आलेली असायची. तिला पाहून मी विचारायचो, ‘‘वीर, यार ये सब आधा आधा क्यूं मंगवाते हो? मधू भी है ना?’’ तो उत्तर द्यायचा, ‘‘अरे, ती कुठं बाहेरचं खाते? माझ्यातलंच थोडंसं खाईल. मी तरी कुठे फारसं खातो?’’ मधू हसून साजरं करायची. अर्थात तीही तोंडी लावल्यासारखीच जेवायची. त्यानंतर त्याचं लगेचचं वाक्य असायचं- ‘‘कुलवंत, यार तुम तो सरदार लगते हो।’’ त्यावर मी लगेच उत्तर देई- ‘‘हां, किशोर, मैं तो सरदारही हूँ।’’ मग तो ते वाक्य दर पाच मिनिटांनी उच्चारत बसायचा. मधुबाला त्यावर तिचं शेकडो घुंघरू कानात किणकिणत राहावेत तसं हसत राही. तो मधूला त्याच्या चित्रपटाच्या उद्योगात फारसा सामील करून घेत नसे. किंबहुना, तिला बाजूलाच ठेवी. कधीतरी ती माझ्याकडे तक्रारीचा सूर लावी. पण मी तरी काय करणार त्याच्यापुढे? तो स्वत:चंही ऐकत नसे. तो फक्त स्वत:च्या त्या- त्या क्षणाच्या मूडचं ऐकायचा.

हळूहळू त्यांच्यात अंतर पडत गेलं. ती त्याच्यासोबत खूश असायची. पण हा तिच्याबरोबर असेल तेव्हा ना! इतर वेळी त्याच्या ‘गौरीकुंज’मध्ये ती त्याची वाट पाहत बसे. पण हा दिवसचे दिवस घरात उगवायचाच नाही. पण मधूनं तिचा एकाकीपणा दूर करायला तिची लाडकी मैत्रीण मीनाकुमारी हिच्याप्रमाणे मदिरेचा आश्रय मात्र घेतला नाही. ती वाचत बसायची किंवा दिलीपकुमारचे चित्रपट घरात बघत बसायची. किशोरला ते आवडायचं नाही. त्यानं तिला घरात दिलीपसाबचे सिनेमे लावलेले बघितलं की त्यांच्यात भांडणं होत. मग तिनं एक युक्ती काढली. त्याच्या कारचा आवाज ऐकला की ती पटकन् आधीच्या चित्रपटाची रिळं काढून किशोरच्या चित्रपटाची रिळं लावत असे. मग तो खूश. पण अशी संधी क्वचित मिळे.

ते दोघं मनानं एकमेकांपासून दूर होत गेले. मधुबालावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्या जबाबदारीतून काही र्कज निर्माण झाली होती. मधुबालाच्या आयुष्याच्या समईतलं तेल संपत आलं होतं, त्यावेळी देणेकऱ्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. एकदा एक देणेकरी सव्वा लाख रुपयांसाठी येऊन बसला होता. मधू त्याची समजूत घालत होती, पण तो ऐकत नव्हता. तेवढय़ात किशोर तिथं आला. ती सारी कटकट तो ऐकत होता. त्याने आपला काही संबंधच नाही असा चेहरा करून ते ऐकलं आणि थोडय़ा वेळानं काहीही न बोलता तो तिथून निघून गेला. आयुष्याला कंटाळलेल्या मधूला याचा धक्काच बसला. किशोर त्याच्या ‘रूपतारा’च्या कार्यालयात गेला. नेहमीसारखं ‘आधा खीमा, आधा चावल व एक पूरा सरदारजी..’ असं जेवण मागवलं. मी जेवण घेऊन गेलो. किशोर नेहमीसारखा दिसत नव्हता. गप्प गप्प होता. त्यानं एक फोन फिरवला. आम्ही चूप होतो. अर्ध्या तासानं एक माणूस आला. त्याच्या हातावर त्यानं सव्वा लाख रुपये मोजून ठेवले व खेकसून म्हणाला, ‘‘परत तिला त्रास द्यायला जाऊ  नकोस.’’ तो माणूस खाली मान घालून निघून गेला. थोडय़ा वेळानं त्याला मधूचा फोन आला- ‘‘शुक्रिया किशोर. मैं गलत थी।’’ किशोर म्हणाला, ‘‘नहीं मधू, ऐसा ना बोलो..’’ नेहमी हसत राहणाऱ्या आणि हसवणाऱ्या किशोरचं हे विकल रूप मला विलोभनीय वाटलं. त्या दोघांच्या अंत:करणात परस्परांबद्दल असणारी माया त्याच्या डोळ्यांतून पाझरताना दिसत होती. परंतु तरी त्यांच्या संसाराचा डाव जमला नाहीच.

पत्त्यांमध्ये इस्पिक एक्का, किलवर राजा, बदाम राणी असा क्रम जमत असेलही; पण आयुष्यात तसा तो चालत नाही. तिथं एकाच रंगाची आणि एकाच प्रकारची पानं एकत्र आली तरच डाव जमतो. मधुबाला आणि किशोरच्या आयुष्यात तसा डाव जमला नाही. इथं पृथ्वीवर जो डाव जमला नाही तो आता स्वर्गात कसा जमावा? अशा वेळी वाटतं, देवानं पुन्हा पानं पिसावीत व नवा डाव जमवावा अन् त्या दोघांना एकाच रंगाची, एकाच प्रकारची पानं यावीत! मग डाव रंगेल..

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:01 am

Web Title: story about kishore kumar madhubala life
Next Stories
1 हृदयरोगी हृदयसम्राज्ञी!
2 स्वप्नपक्षी.. मधुबाला!
3 ये है मुंबई  मेरी जान : निखळ  मैत्र
Just Now!
X