05 August 2020

News Flash

आशादायक कवडसे..

दीपक व त्याचे सहकारी कंपनीतून पैसाच कमवत आहेत असे नाही, तर ते सामाजिक भानही जपतात.

बिपीन देशपांडे bipin.deshpande@expressindia.com

इतरांना दिसतात, जाणवतात, भेडसावतात ते प्रश्न याही तरुणांना चुकलेले नाहीत; पण तंत्रज्ञानाचा उपयोग करून ते उत्तरांपर्यंत पोहोचतात.. यापैकी आजघडीला ३८ तरुण-तरुणींकडे आपापल्या उत्पादनाचे ‘पेटंट’ आहे!

चौकात आंदोलन सुरू झाले की बाहय़ा सरसावून पुढे येणारी तरुणाई एका बाजूला; दुसरीकडे मोबाइलवरून- ‘ए भावा, आता आपलीच हवा’ म्हणत ‘फुकटचे वायफाय मिळाले तर बरे’ अशा मानसिकतेतील टोळके..  पण याच तरुणाईत एक वर्ग प्रश्नांची उत्तरे शोधणारा!  ही उत्तरे तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या पदरात पाडून घेणारा. त्यांची संख्या तशी कमी, पण ती विचार करायला लावणारी आहे.

रस्त्यातील खड्डय़ांमुळे घडणारे अपघात तेजस ढोबळेला अस्वस्थ करून जातात. त्याच्या मते, रात्रीच्या वेळी दुचाकीचे अपघात घडतात ते अंधुक प्रकाशामुळे. तेजस हा तंत्रनिकेतनचा विद्यार्थी. वडिलांचे दुचाकीचे गॅरेज. तेजस सांगतो, ‘‘गॅरेजवर येणारे शेतकरी खड्डा आल्यानंतर वेग कमी केला तर दुचाकीचा प्रकाश मंद पडतो, अशी अडचण सांगायचे. वाहन जेवढे जुने, तेवढा त्याचा प्रकाश मंद.’’ त्यावर उत्तर शोधण्यासाठी त्याने एक किट तयार केले. त्याचे निर्मितीमूल्य फक्त सात रुपये. त्याने ते दोन-तीन प्रयत्नांत तयार केले. हे किट बसवले, की प्रकाश अधिक पडतो. आता हे किट साडेतीनशे दुचाकींना बसवले आहे. या संशोधनाचे त्याने पेटंटही मिळवले आहे. तेजस सांगतो, ‘‘या किटची संकल्पना मला उगवता सूर्य आणि मध्यान्हीचा सूर्य यांतून सुचली. सकाळचा सूर्य आपण पाहू शकतो, पण दुपारचा नाही. एक अधिक एक बरोबर दोन, या सूत्रानुसार दुचाकीतील बॅटरी आणि त्यातून प्रवाहित होणारा वीजप्रवाह यांची सांगड घालून दुचाकीचा प्रकाश अधिक मोठा पडू शकतो, हा प्रयोग घडून आला.’’

मराठवाडा तसा दुष्काळी; पण कधी पिकलेच तर पिकांवर फवारणी करण्यासाठी औषधाची टाकी पाठीवर वाहून नेण्याची गरज पडू नये असे फवारणी यंत्र अंकुर अनपटला बनवायचे होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना धनंजय बांदल, सुमित बालुनावर आणि शुभम शिकारे यांच्याशी अंकुरचे मैत्र जुळले. त्यांनी मिळून शेतीत शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि कष्ट कमी करण्याच्या विचाराने एक यंत्र विकसित केले. ‘दत्तधनुष’ असे त्या यंत्राला दिलेले नाव! या यंत्रामुळे फवारणी तर सहज होतेच; शिवाय पाणी उपसा, भारनियमनाच्या वेळी बॅटरी म्हणूनही या यंत्राचा उपयोग होऊ शकतो. बगिच्यामध्ये झाडाला पाणी द्यावे, तशी सहज फवारणी करता येणारे आणि पाणी उपसा करणारे हे ‘दत्तधनुष’ यंत्र आहे. अंकुरला पुढे उद्योजक व्हायचे आहे. आता यंत्राची मागणी आणि होणारी कमाई पाहून घरच्यांना या तरुणांबद्दल विश्वास वाटू लागला आहे. अंकुर आणि त्याच्या मित्रांनीही स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे.

अशा कल्पक मुलांची यादी मोठी आहे. घरातच ऊर्जानिर्मिती करता येईल असे सांगणारी पूनम बडगुजर, उन्हाच्या काहिलीमुळे हैराण झालेल्या आपल्या रिक्षाचालक वडिलांना रिक्षातच कुलर बसवून वातानुकूलित यंत्राएवढी थंड हवा देणारा मिर्झा अयान.. असे किती तरी युवक सभोवती आहेत. सर्वसामान्य घरांतील, कुठल्याही उद्योजक घराण्याचा वारसा नसलेली ही सर्व धडपडी तरुण मंडळी म्हणजे अस्वस्थ वर्तमानातील आशादायक कवडसे!

दीपक कोलतेचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले. पदवी हातात, पण नोकरी नाही. अभियांत्रिकीमध्ये ‘रोबोटिक्स’ या विद्याशाखेला मोठे महत्त्व आले आहे. पण ते तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग एकत्रित मिळत नाहीत. असे सुटे भाग कंपन्या आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही एकाच ठिकाणी मिळावेत असे प्रयत्न दीपकने सुरू केले. या क्षेत्रातील अधिक माहिती देणारे प्रशिक्षणही दीपक आणि त्याचे मित्र घेतात. ‘रोबो’ तयार करण्याच्या प्रयोगशाळा भविष्यात निर्माण होतीलच; त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचा उद्योग तो करणार आहे. आता दीपकचा दहा-बारा मित्रांचा चमू आहे. ‘‘समाज, विद्यार्थी, कंपन्यांचे प्रश्न आम्ही अभ्यासतो आणि वेगवेगळे प्रयोग करून त्यावर उत्तरे शोधतो,’’ असे तो सांगतो. शालेय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे धडे वा अक्षरओळख करून देणारा एक अभ्यासक्रमही त्यांनी तयार केला आहे.

दीपक व त्याचे सहकारी कंपनीतून पैसाच कमवत आहेत असे नाही, तर ते सामाजिक भानही जपतात. आठवडय़ातील अखेरचे दोन दिवस गडकिल्ले, टेकडी चढाईचे कार्यक्रम आखतात आणि तेथे स्वच्छता मोहीम राबवतात. याच उपक्रमात अश्विनी पाटील ही तरुणी दीपक व सहकाऱ्यांच्या कंपनीशी जोडली गेली. अश्विनी इंटेरिअर डिझायनर. मध्यमवर्गीय घरातील. आठ-नऊ महिने तिने नोकरी करून पाहिली; पण मन रमेना. अखेर एके दिवशी अश्विनीनेही नोकरी सोडली. धाडस करून स्वतंत्र काम सुरू केले. अश्विनी ‘टेरेस गार्डन’ विकसित करण्याच्या कामासह सप्ताहअखेरच्या सहलीचे नियोजन आखते. सनी सुरवडे, निमिष पाटणी, अभिजित बेडके, अश्विनी मुळे, कुलदीप देसले, चेतन पवार, जैमिन पांचाळ हे दीपकच्या कंपनीतील अन्य सहकारी. त्यातला सुनील अंभोरे हा डोंबिवलीचा. त्याला आता औरंगाबादेतच स्थिरस्थावर व्हायचेय. त्याचे कारण सुनील सांगतो, ‘‘मुंबईत घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालावे लागते. त्या संस्कृतीशी माझा स्वभाव जुळत नाही.’’ अभियंता असला तरी ‘टुरिझम’मध्ये रस असल्याने तो सहलींचे आयोजन करतो.

पूनम बडगुजर सध्या बंगळूरुत एका कंपनीत काम करते आहे. ती मूळची औरंगाबादची. तिला आपला उद्योग थाटण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करायची आहे. घरातल्या घरात आवश्यक तेवढी वीजनिर्मिती करून उर्वरित विजेची विक्रीही करता येईल, असे यंत्र तयार करणारा कारखाना तिला सुरू करायचाय. तसे यंत्र तिने विकसित केले आहे. कंपनीच्या शेडवरील फिरत्या पंख्यातून लोहचुंबक आणि तांब्याच्या तारेचा वापर करून वीजनिर्मिती होऊ शकते. त्यातील वीज काही प्रमाणात एका यंत्रात साठवता येईल, असेही यंत्र तिने विकसित केले आहे. त्याची क्षमता साधारणत: ३२० व्होल्टपर्यंत आहे. विजेचा वापर झाल्यानंतर उरलेली वीज अन्य जणांना देता येऊ शकते. मात्र तशी परवानगी पूनमला मिळवायची आहे.

ऑटोरिक्षा चालवणारे वडील उन्हाळ्यात घरी लवकर का येतात, असा प्रश्न अयान मिर्झाला पडला होता. ते यायचे तेव्हा सतत त्रासलेले असायचे. त्या वेळी मराठवाडय़ातील तापमान ४५ अंशांच्या घरात होते. त्यामुळे मिर्झा कुटुंबीयांच्या एकूण अर्थकारणावर परिणाम झाला होता. त्यातून कौटुंबिक किरकिर वाढलेली असे. यावर उत्तर शोधायचे ठरवून दहावीतला अयान कामाला लागला. त्याने ऑटोरिक्षात कूलर बसविण्याचा प्रयोग हाती घेतला. पहिल्या वेळी तो फसला. नंतर मात्र त्याला यश आले. आता अयानला कूलर बसविण्यासाठी ३० ऑटोरिक्षाचालकांची मागणी आहे. तो उद्योजक होऊ पाहतोय. उत्तरे शोधणारी माणसे ही अशी असतात.

‘नवनिर्माण’ या शब्दाला आपल्याकडे बरेच राजकीय अर्थ आहेत. पण तरुणाई तो शब्द किती वेगळ्या पद्धतीने अनुभवतेय, याची उदाहरणे अनेक आहेत. कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अशा मुलांचा एक स्वतंत्र गट असतो. ते एकूण राजकीय, सामाजिक प्रश्नांवर फारसे भाष्य करतच नाहीत. थेट हाती उत्तर घेऊन फिरतात. त्याला तंत्रज्ञानाची जोड असते. वेळ असतो तेव्हा तेही समाजमाध्यमांवर तेच म्हणतात- ए भावा, आता आपलीच हवा! मदर्स-डे, फादर्स-डे, रोझ-डे, व्हॅलेन्टाइन-डे हे त्यांच्या जगण्याचे भाग आहेतच; पण ठरावीक वेळेला ते कमालीचे गंभीर असतात. विशेष म्हणजे त्यांच्या हातात उत्तर असते. अशा उत्तरे शोधणाऱ्या नवउद्यमींसाठी मराठवाडय़ातील उद्योजकही पाठबळ देत आहेत. अलीकडेच ‘चेंबर ऑफ मराठवाडा अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ या उद्योजकांच्या संघटनेने अशा नवउद्यमींसाठी नवउपक्रमांची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत २२५ जणांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी ३८ जणांकडे पेटंट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 12:53 am

Web Title: 38 young people of maharashtra have patent of their own product zws 70
Next Stories
1 जीव टांगणीला..
2 विद्यापीठात जात असताना..
3 ‘पुढच्यास ठेचे’नंतर मागचे..
Just Now!
X