05 August 2020

News Flash

पीएच.डी.धारक गर्दीचे होणार काय?

विद्यापीठ अनुदान आयोगा(यूजीसी)ने नुकतेच पीएच.डी.संदर्भात काही नवे नियम लागू केले आहेत.

गणेश पोकळे

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संशोधनाऐवजी इतर कामे सांगणारे प्राध्यापक, जातीग्रस्त झालेला संशोधनव्यवहार आणि अधिछात्रवृत्तीतून मिळणाऱ्या रकमेमुळे संशोधनकार्य रेंगाळत ठेवण्याची मानसिकता; आणि अखेर पीएच.डी.धारक होऊनही नोकरीची शाश्वती नाहीच.. मग या पीएच.डी.धारक गर्दीचे होणार तरी काय?

सद्य:स्थितीत नैसर्गिक आयुष्यातून बाहेर येऊन भौतिक सुखाच्या उंबऱ्यात न थांबता थेट पोटमाळ्यावरच जाऊन गडगंज स्वप्नांचे बाळसे धरलेल्या आजच्या तरुणाला आपले तरुणपण आणि आपले बाळसे केव्हा खंगले, याची जाणीवच या हव्यासी वातावरणात होईनाशी झाली आहे. या सगळ्या मिळकतीच्या वातावरणात कित्येकांचे ऐन तारुण्यातले आयुष्य हातातल्या वाळूप्रमाणे निसटत चालले आहे. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे, पीएच.डी.धारकांचे वास्तव या वर्णनापेक्षा फारसे निराळे नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगा(यूजीसी)ने नुकतेच पीएच.डी.संदर्भात काही नवे नियम लागू केले आहेत. या नियमावलीनुसार लेखी परीक्षेसाठी ५० आणि मुलाखतीसाठी ५० टक्के भारांश निश्चित केला आहे. त्यासोबतच पीएच.डी. प्रवेशासाठी देशपातळीवर परीक्षा घेण्याचे संकेतही आयोगाने दिले आहेत.

आता मुद्दा येतो, हे निर्णय आयोगाला का घ्यावे लागले? उत्तर स्पष्ट आहे : कित्येक पीएच.डी.धारकांची बुद्धिमत्ता एमएच्या विद्यार्थ्यांपेक्षाही फिकी आहे आणि हे सार्वत्रिक चित्र आहे. मात्र यास विद्यार्थ्यांइतकेच त्यांचे मार्गदर्शकही जबाबदार आहेत, हे इथे नाकारता येणार नाही. यातही खंत वाटावी अशी बाब म्हणजे, पीएच.डी.चे विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक यांचे ‘नाते’च एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचले आहे. कित्येक विभागांत अपवाद वगळता, ज्या जातीतील मार्गदर्शक असेल त्याच जातीतील संशोधक विद्यार्थी आहेत. त्यापल्याडचीही खंत म्हणजे, संशोधनासाठी घेतलेला विषयसुद्धा त्याच जातीवर आधारित असतो. (स्वजातीपेक्षा निराळ्या जातीविषयी संशोधन करणारा विद्यार्थी इथे विरळाच!) विषयपातळीवर विज्ञान शाखा अपवाद आहे; परंतु मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारे हेवेदावे सारखेच! सध्या संशोधक विद्यार्थी किती जीव लावून संशोधन करतोय, हे पाहायला मार्गदर्शक प्राध्यापकाला वेळच नसल्याने परिस्थिती जरा जास्त हाताबाहेर गेली आहे. त्यातही वस्तुस्थिती अशी की, संशोधक विद्यार्थ्यांला संशोधनासंबंधीची कामे सोडून इतर कामे सांगण्यात प्राध्यापक सध्या पुढे आहेत आणि हे काम करण्यात विद्यार्थी आणखी दोन पावले पुढे आहेत. त्यामुळे वास्तविक एम.फिल.चा कार्यकाळ १८ महिन्यांचा; परंतु बहुतेकांचे एम.फील. व्हायला किमान चार वर्षे लागतात. बऱ्याचदा यामागे अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) मिळत असल्याचे कारण असते. अशी अधिछात्रवृत्ती मिळाल्यावर पुस्तकांच्या दुकानांकडे न वळता दुचाकी घेण्यासाठी शोरूम्समध्ये जाणारे कित्येक सापडतील इथे! पीएच.डी.लाही हीच परिस्थिती. कित्येक विद्यार्थी विद्यापीठांतच रमलेले दिसतात. काही काळानंतर हे विविध पक्षांचे, संघटनांचे नेते होतात. या साऱ्यात मग पीएच.डी., त्यासाठीचे संशोधन हे सगळे काही राहिले बाजूलाच! हे रमणीय दिवसांचे वास्तव प्राध्यापकाला निवृत्तीचे दिवस जवळ येईपर्यंत आणि संशोधक विद्यार्थ्यांला नोकरीच्या कार्यकाळातील अर्धा कार्यकाळ संशोधनातच संपत येऊन पार टाळू उघडा पडेपर्यंत लक्षातच येत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१४ ते २०१९ या कार्यकाळात साडेआठशेहून अधिक पीएच.डी. दिल्या गेल्या आहेत. पीएच.डी. सुरू असलेले आणि होत आलेले वेगळेच! महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांचीही हीच स्थिती आहे. एमए करण्यासाठी म्हणून आले आणि पीएच.डी. करून गेले, असे अनेक विद्यार्थी सापडतील इथे. आज काय अवस्था झाली आहे त्यांची? एक तर शिक्षक भरती गेल्या नऊ वर्षांपासून बंद होती; तिला आताशा कुठे धुमारे फुटू लागले आहेत. यात अगदी विषयाच्या मुळाशी जाऊन संशोधन केलेल्यांनी आणि काठावर उभे राहून तीन-साडेतीनशे पानांचा निबंध लिहिलेल्या कित्येक ‘संशोधकां’(?)नीही प्राध्यापकाची भरगच्च पगाराची नोकरी मिळवून सुखाच्या सरींनी व्यापलेले आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांना आज महाविद्यालयांत पाच तर कुठे आठ हजारांवर नोकरी करण्याची वेळ आली आहे. त्यात आता ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने काही अनुदानित महाविद्यालयांत २०१८ मधील एका निर्णयाप्रमाणे ४१७ रुपये प्रति तासिका आणि प्रॅक्टिकलसाठी ७०० रुपये असे भाव ठरल्याची वार्ता आहे या बाजारात.

आपला मुलगा पीएच.डी. करून प्राध्यापक होईल, एवढेच पीएच.डी.बद्दल शेतकरी पालकाला माहिती असते. त्यामुळे मुलगा प्राध्यापक होईल आणि आपल्यावर आलेली वेळ यांच्यावर येणार नाही, हे त्यांचे पहिले स्वप्न. पण पीएच.डी. करण्याचा विचार करताना, किंबहुना प्रत्यक्ष पीएच.डी. करताना या स्वप्नापासून कोसो दूर जाऊन बसलेली असतात ही मुले. यात बऱ्याचदा ओळखीतले कोणी पीएच.डी. करताहेत म्हणून आपणही करून पाहू, असा विचार करणारे प्रयोगवादीही असतात. असे स्पर्धेचे, किंवा चढाओढीचे वातावरण जिथे असेल, तिथे पीएच.डी.ची सहजता अधिक असणार, हे उघड आहे.

इकडे विद्यार्थ्यांचे वय वाढत जाते, तसे त्याच्या वडलांचेही. रोज उठून चार गाईंच्या धारा-पाणी करून रानात बलासोबत राबणाऱ्या या बापाची हाडे पार खिळखिळी झालेली असतात. पण मुलाच्या सुखी आयुष्याच्या स्वप्नात हे दुख तो कायम लपवत असतो आणि पोराला लागतील तसे पैसे पुरवत असतो. त्याला खरी ज्या वयात आधाराची गरज असते, तेव्हा मुलगा/ मुलगी पीएच.डी. करत असतात. दारातली गुरेढोरे सांभाळून त्याने चारदोन एकर शेती वहीत ठेवायची. त्यात मुलाने/मुलीने तिशी ओलांडली हा घोर वेगळाच. पीएच.डी.ला प्रवेश मिळताच, सुरू होणाऱ्या अधिछात्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना आणि कुटुंबीयांनाही कसलीच जाणीव होत नाही. विद्यार्थी तर मिळणाऱ्या पशांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात मशगूल असतात पूर्णपणे. बाकी जमेल तसे संशोधन सुरू असते काठी टेकत टेकत.

आधीच काबाडकष्ट करून मुलांना प-प गोळा करून पैसा पुरवलेला असतो. त्यात, शिक्षक होण्यासाठी संस्थाचालकांनी जे दर ठेवलेत, ते कित्येक घरादारांना वर्षांनुवर्षे सावकाराकडे व्याज भरायला लावणारे, कारखान्यावर ऊस तोडायला लावणारे, जमीन विकायला लावणारे आणि शेवटी हे नाहीच झेपले तर आत्महत्या करायला लावणारे आहेत. मराठवाडय़ासारख्या ठिकाणी आजघडीला पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे शिक्षक म्हणून पात्र आहेत, त्यांना नोकरीसाठी तब्बल ३० ते ३५ लाख मोजावे लागतात, तर कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पात्र असणाऱ्यांना २० ते २५ लाख मोजावे लागताहेत. कुठून आणायचे हे पैसे? ज्याला दीड एकर जमीन, ज्याच्या घरात दोन मुली लग्नाला आलेल्या, सावकारासह बँकेचे अडीच-तीन लाखांचे कर्ज.. आणि त्याच घरात एक मुलगा/मुलगी पीएच.डी.धारक आहे. काय करायचे अशा कुटुंबांनी? बरे, हा जाच एकाच कुटुंबाला नाही. जो पीएच.डी.धारक आणि सेट-नेट झालेला आहे, तो या ३०-३५ लाखांची तयारी आधी दुसऱ्याच्या घरापासून करतोय. याची जी फाटकी परिस्थिती आहे, त्यापेक्षाही फाटक्या घरात मुलगी पाहायला हा गेला तरी हा २० लाख, कुठे ३० लाख रुपये हुंडय़ाची मागणी करतोय. प्राध्यापक होणारे, डॉक्टर होणारे, अधिकारी होणारे सर्रास २५/३० लाख हुंडा मागताहेत, तर इतरांचा काय हिशेब मांडणार? शेवटी मुलगी उजवायची आहे म्हणून बाप जमवतो ओढूनताणून पैसे; पण परतफेडीने नाकीनऊ येतात तेव्हा त्यालाही आत्महत्येच्याच दारात उभे राहावे लागते. जिथे एका पीएच.डी.धारकाच्या आयुष्यासाठी दोन कुटुंबे मरणाच्या दारात उभे ठाकतात.

हे सारे पाहता, प्रश्न पडतो की, मग या पीएच.डी.धारक गर्दीचे होणार तरी काय?

ganeshpokale95@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 3:48 am

Web Title: article about life of a phd holder struggles of phd students zws 70
Next Stories
1 तिच्या शिक्षणाला दुष्काळाचा फास
2 आशादायक कवडसे..
3 जीव टांगणीला..
Just Now!
X