चिन्मय पाटणकर

गावापासून दूर शहरात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सुटी हवीहवीशी वाटते. कधी परीक्षा संपते, कधी गावी जातो, असे वाटू लागते..  पण पुण्यात राहणारे दुष्काळी भागातील विद्यार्थी उन्हाळ्याची सुटी सुरू होऊनही घरी गेलेले नाहीत.. 

‘शेतीमध्ये गेल्या वर्षी झालेला तोटा यंदा पीक चांगलं आल्यामुळं भरून निघाला असता. मात्र, नंतर पुन्हा अख्ख्या गोदा खोऱ्यात पाणीच नसल्याने दुष्काळाची चिन्हं दिसायला लागली. बागायती भागातील शेतीला पाणी नसेल, तर कोरडवाहू शेतीला पाणी कुठून मिळणार? त्याचा मोठा आर्थिक फटका बसलाय. आज गावाकडे दुष्काळ आहे. तिकडे जाऊन करणार काय, अक्षरश: भकास वाटतं. घरी जावंच वाटत नाही. आता घरून शिक्षणासाठी पैसे मिळणार नाहीत, याची पूर्ण जाणीव आहे. मग घरी जाण्यापेक्षा इथेच राहून काहीतरी काम करतोय,’ राज्यशास्त्राचा विद्यार्थी असलेल्या औरंगाबादच्या आतिक शेख या विद्यार्थ्यांचे हे शब्द उन्हासारखेच कडक आणि दुष्काळासारखेच दाहक. त्याच्या  या शब्दांतून दुष्काळाचा फटका किती मोठा आणि व्यापक आहे हे नेमकेपणाने कळते. सुट्टी लागली तरीही पुण्यातच राहणाऱ्या या युवकांची तगमग दुहेरी आहे.. पुढल्या वर्षीच्या शिक्षणाची आर्थिक तरतूद बऱ्याच जणांना स्वत:ची स्वत:च करावी लागणार आहे.

राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका आणि दुष्काळाचा दाह सहन करावा लागत आहे. कुठे आठ दिवसांनी, कुठे पंधरा दिवसांनी, तर कुठे महिन्याभरातून एकदा कधीतरी पिण्यासाठी पाणी येते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असल्याने शेती आणि जनावरे तर संकटातच आहेत. जनावरांना चारा नाही. दुष्काळाचा दाह केवळ शेतकऱ्यांनाच जाणवतो असे नाही, तर त्या भागातून शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसतो आहे. खरेतर कधी एकदा उन्हाळ्याची सुटी सुरू होते आणि आपण घरी जातो, अशी घरापासून दूर राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भावना असते. सहा-आठ महिने घरापासून दूर राहिल्यानंतर मनात एक प्रकारे ओढ निर्माण होते. मात्र, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्थिती उलट आहे. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही विद्यार्थी विद्यापीठ किंवा महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, दुष्काळग्रस्त भागातून आलेले कित्येक विद्यार्थी उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्यानंतरही घरीच          गेलेले नाहीत. आतिक शेखप्रमाणेच ‘घरी जाऊन करणार काय, भकास वाटते’ अशी त्यांची भावना आहे.

घरी जाऊन काम नाही, नुसता उन्हाचा कडाका, पाण्यासाठी वणवण.. मग सुटीत घरी जाण्यापेक्षा छोटे-मोठे काम करून पुढच्या शैक्षणिक वर्षांची, स्पर्धा परीक्षेच्या शिकवणीचे शुल्क साठवण्यासाठीची त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे कोणी अभ्यासिकेत देखरेखीला, कोणी कापडाच्या दुकानात विक्रेता म्हणून, कोणी केटिरगमध्ये सहायक म्हणून..  अशी छोटी-मोठी कामे करून चार पैसे गाठीला जोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मित्रांच्या, नातेवाइकांच्या ओळखीतून काही विद्यार्थ्यांच्या जेवणाचा, काहींचा राहण्याचा प्रश्न सुटला आहे. पण दुष्काळामुळे पुढच्या वर्षीच्या शिक्षणासाठी घरून काहीच मदत मिळण्याची शक्यता नाही. दुष्काळामुळे या विद्यार्थ्यांपुढे आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षांच्या शुल्काचा भार घरच्यांवर पडू नये यासाठी ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. दुष्काळी भागातील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांना असणारी गावाची आणि शिक्षणाची अशी दुहेरी काळजी समोर आली.

जालना जिल्ह्य़ातील निवृत्ती तिगोटे अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करत आहे. ‘या वेळी शेतात कापूस आणि सोयाबीन लावले, पण शेतीला पाणीच नाही, पिकाला भाव नाही. त्यामुळे शिक्षणासाठी घरून पैसे मिळू शकत नाहीत. घरच्यांनीही ‘तुझ्या शिक्षणाचे तू बघ’ असे स्पष्टच सांगितले आहे. तसेही आता शिक्षणासाठी घरी पैसे मागण्याची लाज वाटते. म्हणून पुढच्या वर्षांच्या शिक्षणासाठी सध्या नोकरी करतोय. मित्राबरोबर केटिरगचे काम करायला जातो. शनिवार-रविवार दोन दिवस काम करून साधारणपणे बाराशे रुपये हाती पडतात. या पशातून कसा तरी खर्च भागवतो. पुढच्या वर्षीच्या शिक्षणासाठीचे शुल्क याच पशातून बाजूला काढावे लागते. त्यामुळे इच्छा असली, तरी घरी पाठवायला काही पैसे उरत नाहीत,’ असे त्याने सांगितले.

यूपीएससीची तयारी करत असलेला जालन्याचाच दीपक कांडाणेचीही तीच स्थिती आहे. त्याच्या घरी दोन एकर शेती आहे. पण पाणीच नाही, तर शेतीत करणार काय.. परिणामी उत्पन्न नाही. त्यामुळे त्याच्याकडेही पुण्यात राहून काम करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. परिस्थितीला सामोरे जात तोही छोटेसे काम करून आठशे रुपये मिळवतो. तर धुळ्याची सुशीला बहिरट पोलीस भरतीची तयारी करत आहे. तिच्याही घरची परिस्थिती वेगळी नाही. शेतीतून उत्पन्न नाही. म्हणून अर्धवेळ काम करून तिच्या हाती कसेबसे दोन हजार रुपये पडतात.

उस्मानाबादचा विष्णू मानेही एमपीएससीची तयारी करत आहे. त्याने काही काळ एटीएमचा सुरक्षारक्षक म्हणून काम करून पाहिले. त्यातून त्याला पाच-सहा हजार रुपये मिळायचे. पण रात्रपाळी करून अभ्यासावर ताण येतो म्हणून त्याने ती नोकरी सोडली. सध्या वेगळी काहीतरी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात तो आहे. ‘गावाकडे पिण्याचे पाणी एक-दीड किलोमीटर पायपीट करून आणावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी एवढी गंभीर परिस्थिती असताना शेतीचा विचारही करू शकत नाही. आता घरी जायचे ठरवले, तरी जाऊन करणार काय हा प्रश्न आहे. घरी गेलो, तर पाण्यासाठी आणखी एक माणूस वाढणार.. त्यापेक्षा पुण्यात राहिल्यावर काहीतरी काम करता येते. सुटी असली, तरी सद्य:स्थितीत घरी जाण्यात अर्थ नाही,’ असे त्याने स्पष्ट सांगितले. बुलढाण्याजवळच्या लोणार इथल्या विकास पाटीलला पुण्यात काम अद्याप मिळालेले नाही, पण ओळखीतून जेवणाची व्यवस्था झाली. मित्रांच्या मदतीने तो पुण्यात राहतो आहे.

एकीकडे काही विद्यार्थी छोटे-मोठे काम करून चार पैसे जमवत असताना दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी कुलदीप आंबेकर आणि त्याचे सहकारी पुढे आले आहेत. त्यांनी त्यांच्या ‘स्टुडंट्स हेिल्पग हँड’ या संस्थेच्या माध्यमातून काही संस्था-कंपन्यांच्या सहकार्याने दुष्काळी भागातील काही विद्यार्थ्यांच्या भोजनाचा भार उचलला आहे. या संस्थेकडून या गरजू विद्यार्थ्यांना भोजनाचे डबे पुरवले जातात. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातल्या या गरजू विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अर्थात, पुण्यासारख्या शहरात स्वकमाईवर शिकण्याची अनेकांची तयारी आहे. गावात पाण्याचा दुष्काळ, तर शहरात आर्थिक चणचण अनेकांना सवयीचीच झालेली आहे.

chinmay.patankar@expressindia.com