शर्मिष्ठा भोसले sharmishtha.bhosale@expressindia.com

तरुण-तरुणींवर होणारा दुष्काळाचा परिणाम दाहक आहे, पण त्यावर फुंकर घालणारेही अनेक आहेत..

लातूर जिल्ह्य़ातल्या उदगीरजवळ हाळी हे गाव. १८ एप्रिलला मतदानाच्या दिवशी हाळीला गेले. तिथल्या बौद्ध विहारात काही तरुण गप्पा मारत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘दुष्काळाचा तरुण पिढीवर खूप घातक परिणाम होतोय. पण तरुणांचं भविष्य, त्यासाठीच्या तरतुदी कुठल्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात सापडत नाहीत. मतदान तर करतोच आम्ही, पण आमचा चेहरा कुठं दिसत नाही.’ ग्रामीण, निमशहरी भागातला तरुण हवालदिल झाल्याचं त्याच्याशी बोलताना लक्षात येतं. उच्चशिक्षण परवडत नाही, शिक्षण घेतलेल्यांना रोजगार नाही, मजुरी किंवा लहानसहान कामं करावीत, तर ती नियमित मिळण्याची हमी नाही. ‘आमच्या जन्माचा उन्हाळा झाला. वाटतं, पोरांचं भविष्य तरी सावलीत जावं.. पण दुष्काळ आमची पाठ सोडत नाही,’ ही आई-बापांची व्यथा; तर ‘गावात कोणी कोणी आत्महत्या केल्याच्या बातम्या येतात. खूप अस्वस्थ व्हायला होतं. आपण शिकतोय म्हणजे आधीच पिचलेल्या माय-बापावर ओझं बनतोय असं वाटतं..’ ही मुलामुलींची.

दुष्काळाचे भौतिक परिणाम किमान दिसतात, पण तरुणांच्या मानसिक-भावनिक जगाला दुष्काळ ज्या खोलवर उद्ध्वस्त करतोय, त्याचं काय करायचं? कमालीच्या हतबल अवस्थेत हातातून सुटत जाणारी शिक्षणाची दोरी तरुणांना आणखीच नराश्यात लोटते. या भीषण चित्राचे रंग थोडेफार तरी सौम्य व्हावेत यासाठी महाराष्ट्रभरात अनेक हात काम करत आहेत..

बीडच्या बलभीम महाविद्यालयातले प्राध्यापक डॉ. गणेश मोहिते सांगतात, ‘२०१६ च्या दुष्काळात अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा आणि सामाजिक कार्यकत्रे के. ई. हरिदास या दोघांनी मिळून स्वखर्चानं ‘दुष्काळ जनसंवाद यात्रा’ काढली होती. अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण-तरुणींशी संवाद केला होता. आमच्या महाविद्यालयात ते आले, तेव्हा मुलं खूप बोलती झाली होती. त्या वर्षीच विदर्भातले कवी ज्ञानेश वाकुडकर यांनीही ‘बळीराजांच्या मुलांशी संवाद’ अशी एक यात्रा काढली होती. एरवी दुष्काळ तरुण पिढीची कशी काय घुसमट करतो ते व्यक्त करण्याचा अवकाशच त्यांना मिळत नसल्याचं तेव्हा जाणवलं.’

दुष्काळग्रस्त मुलांसाठी विद्यापीठ फंड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे आणि त्यांचे सहकारी नरेंद्र काळे यांनी पुढाकार घेत विद्यापीठ आणि राज्यभरातील दात्यांना जोडून घेत एक विधायक उपक्रम सुरू केलाय. त्याबाबत करपे सांगतात, ‘मराठवाडय़ात कायम दुष्काळ असतो. सुट्टय़ांसाठी गावी गेलेली मुलं बहुतेकदा परत येतात. पण दुष्काळात मुलींची गावाकडून परत येण्याची शक्यता कमी असते. त्यांची तिकडंच लग्न लावून दिली जातात. यावर काय करता येईल याचा अंदाज घेत आधी आम्ही विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले. ८५० ते ९०० अर्ज आले. मुंबईतल्या सामाजिक भान असलेल्या काही व्यक्तींचा ‘केअिरग फ्रेंड्स ग्रूप’ म्हणून आहे. त्यांनी आम्हाला वीसेक लाख रुपयांची मदत केली. विद्यापीठातले प्राध्यापक राम चव्हाण यांनी पगारातून ५० हजार रुपये दिले, विद्यापीठानं एक समिती स्थापन केली आणि रकमेत दहा लाखांची भरही घातली. राज्यभरातले आणखी बरेच लोक या फंडात यथाशक्ती मदत करतात. गेल्या तीन महिन्यांपासून ९०० विद्यार्थ्यांच्या थेट खात्यांत ११०० रुपये आम्ही जमा करतो. त्यातून विद्यार्थी मेसचा आणि इतरही कुठकुठला खर्च भागवतात. आमच्या विद्यापीठाची ‘कमवा शिका’ योजना दर वर्षी मार्चमध्ये संपते. पण यंदा ती दोन महिने अधिकची सुरू राहणार आहे. शिवाय तिचं मानधन यंदापासून दोन हजार झालं. यातूनही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.’ सध्या फंडात चार महिने पुरतील इतके पसे आहेत.

दिवंगत शिक्षणमहर्षी विनायकराव पाटील यांनी ग्रामीण भागातल्या मुला-मुलींसाठी १९५८ साली सुरू केलेली मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्था सातत्यानं पडणारा दुष्काळ बघता दर वर्षी विद्यार्थ्यांची फी माफ करते आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण सध्या संस्थेचे कार्यकारी सदस्य आहेत. चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह फंड उभा करून २०१६-१७ या दुष्काळी शैक्षणिक वर्षांत देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहातल्या २०० मुला-मुलींना दत्तक घेतलं. त्यांच्या जेवणाचीही मोफत सोय केली. सध्याही शंभरेक मुलींच्या शिक्षणाचा कायमस्वरूपी खर्च ते करतात. वसतिगृहातल्या डॉम्रेटरीत पाचेक वर्षांपासून अनेक मुली मोफत जेवतात-राहतात.

‘प्रहार’चे ‘दोन घास’..

औरंगाबादमध्येच ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेली चारेक र्वष ‘दोन घास’ हा उपक्रम सुरू केला आहे. कल्याण जाधव, त्यांची पत्नी वैशाली, सतीश कांबळे, आकाश होशिंग आणि राष्ट्रपाल कसबे हे तिघे या उपक्रमाच्या माध्यमातून ‘ना नफा-’ तत्त्वावर सत्तरेक तरुणांना डबे पुरवतात. शिवाय स्वत:च्या मिळकतीतून जमेल तशी आर्थिक मदतही अनेकांना करतात. कल्याण सांगतो, ‘माझं गाव परतूर तालुक्यातलं वाटूरफाटा. औरंगाबाद शहरात माझं वैद्यकीय शिक्षण सुरू होतं. हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेताना मी अनेकदा चहावर दिवस काढले. दोन घासांसाठी परेशान झालो. त्यामुळे जरा आíथक स्थर्य आल्यावर हा उपक्रम सुरू करावा वाटला.’

कोल्हापूरपासून १४ किलोमीटरवर असलेल्या रुकडी गावात राहणारे ३५ वर्षीय संदीप बनकर आणि त्यांची टीम २००७ सालापासून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातल्याही अनेक गावांतल्या तरुणांना हात देणारे उपक्रम यशस्वी करताहेत. आजवर त्यांनी ५५० मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय. संदीप सांगतो, ‘जालना, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये सध्या आमचं काम सुरू आहे. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात मुरमाड, धायगव्हाण ही गावं आम्ही २०१५ पासून निवडली. माझे मित्र आणि सामाजिक कार्यकत्रे दादासाहेब थेटे यांचं ‘मत्रेय प्रतिष्ठान’ तिथं आहे. त्यामार्फत तिथल्या २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कुटुंबांना भेटलो. त्यांच्या मुला-मुलींना कायमस्वरूपी दत्तक घेतलं. त्यांचं आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण आम्ही करतोय. त्याच वर्षी चार महिलांना शिवणयंत्रं दिली.’  ४० ते ५० जणांची ही टीम प्रत्येकाच्या उत्पन्नातून दहा टक्के रक्कम दर महिन्याला टाकत पसे उभे करते.

उद्योजकांची कृतज्ञता..

तुळजापूरजवळच्या मंगरूळ या लहानशा गावातून आता पुण्यात स्थायिक झालेले राजकुमार धुरगुडे हे संघर्षांतून आलेले उद्योजक. स्वत:चे कठीण दिवस न विसरता त्यांनी शिक्षण-रोजगारासाठी मराठवाडा आणि राज्यातील इतरही भागांतून पुण्यात येणाऱ्या तरुणांसाठी हक्काचं आश्रयस्थान उभं केलंय. ‘मार्गज्ञ’ या त्यांच्या वसतिगृहात कुणीही तरुण महिना केवळ ४०० रुपये देऊन राहू शकतो.

काही आणखी हलाखीतून आलेल्यांसाठी तर मोफत व्यवस्था केली जाते. आजवर वेळोवेळी दोन हजारांहून अधिक तरुणांनी याचा लाभ घेतलाय. याशिवाय असंख्य तरुण-तरुणींना ते आíथक आणि इतर मदत करत राहतात.

पुण्यातले आणखी एक उद्योजक सचिन इटकर यांचाही समाजभान असलेल्या माणसांची साखळी तयार करून बदल घडवण्यावर विश्वास आहे. ते मूळचे लातूरचे. गेली बारा-तेरा र्वष,अनेक गरजू-मुलं मुली सतत त्यांच्या संपर्कात असतात. आजवर वैयक्तिक उत्पन्नातून त्यांनी दुष्काळी भागातल्या २८० मुलांचं शिक्षण केलं आहे. सोबतच महेश थोरवे यांच्यासारखे तरुण उद्योजकही कायम इटकर यांच्यासह विविध उपक्रमांत सक्रिय असतात. रितू छाब्रिया यांच्या ‘मुकुल माधव फाऊंडेशन’सोबत एकत्र येऊन इटकर सध्या ते तीनशे मुलांना दररोजचं जेवण मोफत देतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यानं, ‘लग्नातला एक लाख रुपयांचा खर्च कमी करून ती रक्कम दुष्काळी गरजू विद्यार्थ्यांना द्या’ असं आवाहन त्यांनी अनेकांना केलं! श्रीधर जोशी यांनी पहिल्यांदा या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यानंतर आजवर वीसेक जोडप्यांनी दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार अशी रक्कम दिली.

निम्मे नाही, पूर्ण डबे..

जालना जिल्ह्य़ातल्या अंबड गावच्या मत्स्योदरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भागवत कटारे सांगतात, ‘२०१६ साली मुलींच्या वसतिगृहाचा राऊंड घेत होतो. लक्षात आलं, की मुली १५० राहतात. डबे ७५च येतात. मी रेक्टरला विचारलं तर त्या म्हणाल्या, ‘मेसचे महिन्याला बाराशे रुपये..  एका डब्यात दोन मुली जेवतात.’ मुलींना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘घरून पसे येत नाहीत. परिस्थिती अवघड आहे.’ मी लगोलग सहकाऱ्यांची बैठक घेतली. इथं शिकणाऱ्या-राहणाऱ्या मुलींची जबाबदारी आपली मानून आम्ही काम सुरू केलं. दर महिन्याला दीड लाख रुपये खर्च यायचा. गावातल्या चार महिलांना रोजानं लावून आम्ही स्वयंपाक करून घेऊ लागलो. व्यवस्था उभी केली. महाविद्यालयातच मेस सुरू झाली. संबंधित सगळी कामं आम्ही लोक मिळून करायचे. वसतिगृहातल्या १०० मुली आणि ५० मुलांना आम्ही तीन महिने जेवू घातलं. शिवाय आमचे तत्कालीन संस्थाध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी दीडशे मुला-मुलींना बसचे पासही काढून दिले.

आमच्या तालुक्यात १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यांच्या पत्नींना आम्ही एक दिवसाचा पगार एकत्र करून प्रत्येकी ११ हजार रुपये दिले. त्यांच्या पाल्यांना महाविद्यालयानं दत्तक घेतलं. त्यांचा सगळा खर्च आम्ही करतोय. आता मी निवृत्त झालो. पण पुढच्या काळातही हे सुरू ठेवायचं आहे.’

दुष्काळाची कारणं अस्मानी-सुलतानी दोन्ही आहेत. तो दूर करण्यासाठी दूरगामी प्रयत्न करावेच लागतील, पण त्याच्या झळा प्रत्यक्ष बसत असताना त्यांच्यावर फुंकर घालण्यासाठी झटणाऱ्या हातांचं मोलसुद्धा कमालीचं जास्त आहे.