04 July 2020

News Flash

खूप लोक आहेत..

गेली तीन वर्ष ‘अक्षरमैफल’ हा अंक संपादित करणारा मुकुल रणभोर हा तरुण या प्रश्नाचं उत्तर देतो, ‘‘समाजमाध्यमांवर भरपूर लेखन होतं आहे

|| मानवेंद्र प्रियोळकर

आज पंचविशीत असलेले तरुणही छापील दिवाळी अंक काढतात, सलग गेली काही वर्ष नेटानं चालवतात, यामागे भूक आहे ती नव्या आशयाची, आपापल्या अभिव्यक्तीची आणि नेहमीपेक्षा निराळ्या मजकुराची..

दिवाळी अंकांची परंपरा शंभर वर्षांहूनही जुनी. पहिला दिवाळी अंक- ‘मनोरंजन’- प्रसिद्ध झाला, त्याला २००९ साली शंभर वर्ष झाली. या काळात दिवाळी अंकांना ‘पब्लिक स्फीअर’चं स्वरूप मिळालं. या शंभरीनंतरही आता दशकभराचा काळ लोटला आहे. या दशकभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यात समाजमाध्यमांच्या अवतरण्यानं बरीच घुसळणही झाली आहे. कुठलीही घुसळण नव्या शक्यतांना जन्म देत असतेच; समाजमाध्यमांच्या फोफावण्यानंही अशा शक्यता निर्माण केल्या. विशेषत: दिवाळी अंकांच्या बाबतीत तर ते ठळकपणे जाणवतं. गेल्या दशकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या विविध भागांतून धडपडय़ा तरुणांच्या गटांकडून निघणारे दिवाळी अंक ही या घुसळणीची सकारात्मक शक्यता. प्रस्थापित किंवा काही दशकं सातत्याने प्रसिद्ध होत असलेले, वाचक-जाहिरातदारांचं जाळं विणलेले दिवाळी अंक एकीकडे आणि राज्याच्या विविध भागांतून नवे तरुण लेखक, नवे विषय व तुटपुंजा साधनांनिशी निघणारे अंक दुसरीकडे अशी विभागणी करता येईल, एवढी अंकसंख्या आता मराठीत आहे. एके काळी ‘सत्यकथा’च्या विशुद्ध वाङ्मयीन अभिरुचीविरुद्ध बंड करणारे तापसी तरुण आणि त्यांची ‘लिटिल मॅगझिन’ची चळवळ महाराष्ट्रानं पाहिली आहे. अगदी तसंच काही नसलं, तेवढी बौद्धिक/भावनिक तीव्रताही नसली, तरी आताची लिहिती-वाचती तरुण पिढी दिवाळी अंकांच्या मुख्य प्रवाहाबाहेर राहून आपापले छापील अंक काढते. नवं तंत्रज्ञान, त्यातून आलेली माध्यमं हाताशी असतानाही दिवाळी अंकांसारख्या पारंपरिक प्रवाहात डुबक्या घ्याव्यात असं या तरुणांना का वाटतं आहे; ही कसली भूक आहे?

गेली तीन वर्ष ‘अक्षरमैफल’ हा अंक संपादित करणारा मुकुल रणभोर हा तरुण या प्रश्नाचं उत्तर देतो, ‘‘समाजमाध्यमांवर भरपूर लेखन होतं आहे. मात्र, त्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन तसा ‘अनौपचारिक’च असतो. त्यातल्या चांगल्या लेखनाला व्यासपीठ मिळावं आणि त्याचं संदर्भमूल्यही राहावं, यासाठी अंक काढावा असं वाटलं.’’ दिवाळी अंक म्हटलं की, कथा- कविता- ललित लेख- व्यक्तिचित्रणं असा साचा ठरलेलाच. पण ही चौकट न पाळता पंचविशीतला मुकुल आणि त्याचे सहकारी गेली तीन वर्ष दिवाळी अंक संपादित करताहेत. पहिल्या वर्षी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीवरील आणि गतवर्षी हिंदी लेखकांची ओळख करून देणारा अंक काढल्यानंतर, यंदा त्यांचा संपूर्ण अंक ‘वेबसीरिज’वर आहे. मराठीत जो ‘मजकूर’ सहसा वाचायला मिळत नाही, असा मजकूर देण्यावर भर असतो, असं मुकुल सांगतो.

मोतीराम पौळ हा परभणीतला तरुण तर गेली सहा वर्ष दिवाळी अंक संपादित करतो आहे. २०१४ सालापासून आपल्या समविचारी मित्रांना घेऊन ‘अक्षरदान’ हा अंक काढतो आहे. तो सांगतो, ‘‘मुख्य प्रवाहातल्या अंकांमध्ये नव्या- तरुण लेखकांना, त्यांच्या विषयांना स्थान मिळेलच असं नाही. तरुणांना अनेक विषयांवर व्यक्त व्हावंसं वाटतं, पण प्रस्थापित माध्यमांत ती संधी मिळेलच, याची शक्यता नसते. त्यामुळे आपल्याला जे सांगायचं, ते सांगण्यासाठी स्वत:चं व्यासपीठ हवं, असा विचार करून दिवाळी अंक सुरू केला.’’ पहिला अंक ललित साहित्य समाविष्ट करून प्रसिद्ध केल्यानंतर त्यानंतरचे पाचही अंक विशिष्ट विषयांवरचे आहेत. त्यात संत वाङ्मयाबद्दलचा अंक जसा आहे, तसाच राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांवरील अंकही आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांमधील यशोगाथा सांगणारा आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाचा मागोवा घेणारा अंक संपादित केल्यानंतर यंदा ‘अक्षरदान’चा संपूर्ण अंक बोलीभाषांचा वेध घेणारा आहे.

वरील दोन अंकांच्या उदाहरणांतून एक बाब समोर येते; ती म्हणजे- प्रस्थापित, रुळलेल्या अंकांमध्ये ज्या विषयांना, कल्पनांना स्थान मिळत नाही, त्यांना हे नव-अंक सर्जनशीलपणे स्थान देण्याचं ‘धाडस’ करतात. नामदेव कोळी हा धडपडय़ा तरुणही गेली काही वर्ष ‘वाघूर’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध करतो आहे. याबद्दल त्याचं म्हणणं असं की, ‘‘बदलत्या काळानुसार नवे विषय, नवी मांडणी, नवे विचार, नवी मतं, नवे लेखक आपला स्वत:चा अवकाश आपल्याला हव्या त्या पद्धतीनं भरून काढत आहेत. दिवाळी अंक हे त्यासाठीचं व्यासपीठ आहे.’’ वाङ्मयीन तोंडवळा असणारा त्याचा ‘वाघूर’ हा अंकही अनेक नव्या लिहित्यांना संधी देणारा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या अंकात यंदा मराठीतील १५ तरुण कादंबरीकारांच्या आगामी कादंबऱ्यांचे अंश प्रसिद्ध केले आहेत.

तरुणांनी काढलेल्या अशा दिवाळी अंकांची संख्याही वाढलेली आहे. भवतालातले अनेक आशय हुडकणं आणि ते आपल्या भाषेत, आपल्याला हव्या त्या पद्धतीनं मांडणं याकडे या साऱ्यांचा ओढा आहे. उदा. ‘अक्षरलिपी’ हा अंक. वृत्तकथा (रिपोर्ताज) हे या अंकाचं ठळक वैशिष्टय़.

ही व्यक्त होण्याची भूक आहे. ती भागवायची तर त्यासाठीचं अर्थकारण आलंच. दिवाळी अंकांचं सारं अर्थकारण हे त्यातील जाहिरातींवर अवलंबून असतं. मुख्य प्रवाहाबाहेरील काही अंकनिर्मात्यांना जाहिराती मिळवण्याचं ‘गणित’ जमतं, ते अंक काढतातही. मात्र, त्यात ‘व्यावसायिकते’ऐवजी ‘व्यापारी’ वृत्तीच अधिक असते. अशात सर्वार्थानं नवख्या अंकांना- तेही तरुणांनी काढलेल्या अंकांना जाहिराती कशा मिळणार? मुकुल रणभोर सांगतो, ‘‘मजकुराची अडचण कधीच नसते; अडचण असते ती जाहिरातींचीच. जाहिरातदारांची आणि वर्गणीदारांची म्हणून एक मानसिकता असते. अंक किती प्रसिद्ध आहे, त्यातले लेखक किती प्रसिद्ध आहेत, असे त्यांचे काही ठोकताळे असतात. त्यामुळे तरुणांच्या अंकांना जाहिराती मिळवताना अडचणी येतात.’’ नामदेव कोळी सांगतो, ‘‘नव्या अंकांना जाहिरातदार सहसा जाहिरात देत नाहीत. जाहिरात मिळाली, तरी त्याचं बिल मिळवणं मोठी कसरत असते.’’ मोतीराम पौळचा अनुभव असा की, ‘‘सुरुवातीला दोनेक वर्ष नवीन अंक म्हणून जाहिराती मिळणं कठीण गेलं; पण नंतर जाहिराती मिळू लागल्या. यंदा मात्र, आर्थिक मंदीचं कारण सांगत काहींनी जाहिरात देण्यास नकार दिला.’’

तरीही हे तरुण अंक काढतात. विचक्षण वाचक शशिकांत सावंत यांचं निरीक्षण असं की, ‘‘तरुणांनी काढलेल्या अंकांचं निर्मितीमूल्य उत्तम आहे. तरुणाईची ऊर्जा अशा अंकांमध्ये दिसून येते. समाजमाध्यमांवर त्यांची प्रसिद्धीही बऱ्यापैकी होते. वर्तमानपत्रांच्या शहर आवृत्त्यांनी ज्याप्रमाणे स्थानिक लेखकांना लिहितं करण्याचं, त्यासाठीचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं, तसंच हे दिवाळी अंकही करताहेत. परंतु प्रश्न आहे तो त्यांच्या वितरणाचा. पुण्या-मुंबईतल्या स्टॉल्सवर प्रस्थापित अंक दिसतात, पण हे अंक क्वचितच दिसतात.’’ हाच मुद्दा ‘पुस्तकपेठ’च्या संजय भास्कर जोशी यांनीही अधोरेखित केला. ते सांगतात, ‘‘तरुणांच्या दिवाळी अंकांतून ‘ताजं’ साहित्य येतं आहे. नवे लेखकही त्यांतून लिहिते झाले आहेत. परंतु व्यावसायिकता आणि वितरणात ते कमी पडतात.’’

एकुणात, अभिव्यक्तीची भूक भागविण्यासाठी आजच्या तरुण पिढीला ‘दिवाळी अंक’ जवळचे वाटतात, यातून माध्यम म्हणून ‘दिवाळी अंकां’तील अंगभूत सर्जनशील अवकाश अधोरेखित होतो. त्यामुळेच तरुणांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठं अनेकदा त्यांच्यातल्याच कोणा चित्रकारानं चितारलेली वा छायाचित्रकारानं टिपलेली असतात. अशा अंकांनी आणलेल्या नव्या विषयांच्या रेटय़ामुळे प्रस्थापित, मुख्य प्रवाहातील अंकांनाही तरुणाईचे विषय आपल्या अंकांत घ्यावे लागले आहेत. तरुण समीक्षक दत्ता घोलप सांगतो की, ‘‘अलीकडच्या काही रुळलेल्या दिवाळी अंकांमध्ये तरुणाईशी संबंधित विषयांची खास पुरवणी, विभाग येऊ लागले आहेत. काही व्यावसायिक जम बसवलेल्या दिवाळी अंकांनी तर ‘युवा दिवाळी अंक’ प्रसिद्ध करण्यासही सुरुवात केली आहे.’’

‘परंपरा’ ही प्रवाही असते, असं म्हणतात. दिवाळी अंकांकडे वळलेले हे तरुण पाहिले की या म्हणण्याचा प्रत्यय येतो. समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीची मुक्त संधी उपलब्ध झाली. त्यात अनेक लिहिते झाले. तरुणांच्या दिवाळी अंकांकडे किंवा मुख्य प्रवाहातील अंकांकडेही नजर टाकल्यास असे अनेक लिहिते दिसतील. आशयाचा अखंड शोध घेत राहणारे हे ‘खूप लोक आहेत’; एकाच विषयाला निरनिराळ्या अंगांनी भिडणारेही खूप लोक आहेत.. प्रश्न आहे- आपण त्यांचं वाचणार का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2019 2:55 am

Web Title: first diwali entertainment famous akp 94
Next Stories
1 तरुणांचा पक्ष आकांक्षांचा..
2 ‘उमेद’ टिकून आहे..
3 झेंडाविरहित आंदोलनातील तरुणाई
Just Now!
X