05 August 2020

News Flash

सेवा आणि स्थिरता

दुष्काळी सिन्नर तालुक्यास लागून असलेल्या या गावची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे.

चारुशीला कुलकर्णी charushila.kulkarni@expressindia.com

नाशिकच्या महाजनपूरची ओळख ‘सैनिकांचे गाव’ अशी. गावातील ५३ युवक लष्कराच्या विविध विभागांत कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्यातून मोफत लष्करी प्रशिक्षणाचा प्रकल्पही राबविला जात आहे. शेती आणि काही प्रमाणात इतर शासकीय नोकऱ्यांचा मार्ग खुला असतानाही इथल्या युवकांचा कल खडतर लष्करी सेवेकडेच आहे, तो का?

नाशिकहून औरंगाबादला जाताना हिरवाईने नटलेला निफाडचा समतल परिसर समृद्ध शेतीची प्रचीती देतो. सुजलाम-सुफलाम दिसणाऱ्या या परिसराचे मात्र वेगळेच रुदन आहे. सीमारेषेवर वसलेल्या गावांमध्ये दुष्काळ पाचवीला पुजलेला. पावसाच्या पाण्यावर थोडेफार पिकते. परंतु त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड. यावर मात करण्यासाठी स्थानिक युवकांनी मार्ग शोधला लष्करी सेवेचा. तो सेवेप्रमाणे खडतर. यामुळे दहावीत प्रवेश करतानाच बहुतेकांची तयारी सुरू होते. लष्करात दाखल होण्यामागे देशसेवेची भावना आहे, तितकाच पोटाची खळगी भरण्याचाही पर्याय आहे. कठोर परिश्रमातून अनेक जण सैन्यात दाखल झाले. त्यांनी नवोदितांना मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली. ग्रामस्थांची मदत, युवकांच्या श्रमदानातून सरावासाठी खास मैदान तयार झाले. अद्ययावत व्यायामशाळा उभारली गेली. ज्यांना भरतीत यश मिळाले नाही, त्यांनी उमेद हरली नाही. अन्य छोटे-मोठे कामधंदे स्वीकारत भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले. मैदान, व्यायामशाळेत त्यांना अव्याहतपणे धडे दिले जातात. या सामूहिक प्रयत्नांची परिणती ‘सैनिकांचे गाव’ ही ओळख निर्माण होण्यात झाली आहे.

शहरी-ग्रामीण भागात भरतीपूर्व लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय, खासगी संस्थांची कमतरता नाही. परंतु ग्रामस्थांच्या सहकार्यातून युवकांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी मोफत सुविधा देणारा, मार्गदर्शन करणारा प्रकल्प सायखेडय़ापासून सात किलोमीटरवरील महाजनपूर येथे राबविला जात आहे. दुष्काळी सिन्नर तालुक्यास लागून असलेल्या या गावची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. गावातील दराडे मामा १९७६ मध्ये सैन्यात भरती झाले. आपल्या क्षमतांच्या बळावर ते कर्नल पदापर्यंत पोहोचले. पुढील काळात त्यांचा गावाशी संपर्क तुटला. परंतु त्यांचा सैन्य दलातील प्रवेश ग्रामस्थांना प्रेरणा देणारा ठरला. गावातीलच एक व्यक्ती लष्करी अधिकारी होऊ शकते तर आपण का नाही, या विचाराने गावातील एक पिढी झपाटली. शेतीची खस्ता स्थिती पाहून कुटुंबीयांनी त्यांना पाठबळ दिले. यामुळे आज गावातील ५३ युवक भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या विभागांत कार्यरत आहेत. ज्यांना काही कारणास्तव लष्करात जाता आले नाही, त्यांनी पोलीस खात्याचा मार्ग स्वीकारला. यामुळे ३१ मुले-मुली पोलीस दलात गेली. युवक भरती होऊ लागले, तसे इतरांना प्रेरणा मिळाली. काही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांचाही कल खडतर लष्करी सेवेकडेच आहे.

त्याची कारणे सामाजिक कार्यकर्ते बच्चू फड उलगडतात. दुष्काळी भागात पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते. उन्हाळ्यात सर्वत्र कोरडा माळ पाहत आकाशाकडे डोळे लागतात. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, याकरिता नोकरीशिवाय पर्याय नाही. एकीकडे शेतमालास भाव नाही, तर दुसरीकडे शासकीय नोकऱ्यांची कमतरता, शिक्षणानुसार नोकऱ्यांचे प्रमाण नाही. त्यामुळे हाता-तोंडाची गाठ पडायला हवी म्हणून मोलमजुरी करण्यापेक्षा सैन्य दलात मुलांनी भरती व्हावेसे वाटते. देशाची सेवा होतेच, पण आयुष्याला स्थैर्य मिळते, याकडे फड लक्ष वेधतात. शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग म्हणजे सैन्य दलातील नोकरी, हे युवकांच्या ध्यानी आले. तिथे जाता यावे म्हणून ते कसून सराव करतात. प्रत्येक भरतीसाठी गावातील कित्येक मुले मुंबई गाठतात. त्यातून एक-दोन जणांची निवड ठरलेली असते. त्यांनी भरतीसाठी केलेली तयारी पाहून आसपासच्या गावांसह अन्य भागांतून मुले महाजनपूरमध्ये मार्गदर्शनासाठी येतात. तरीही कठोर मेहनत, परिश्रम करूनही प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भरतीत काही कारणास्तव निवड होऊ न शकलेल्या सागर फड याने व्यायामशाळेच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. ‘‘मला आलेल्या अडचणी इतर मुलांना येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतोय. सरपंचाच्या मागे लागून आम्ही मैदान तयार केले. त्यासाठी गावातील २५ ते ३० मुले दोन महिने काम करत होते. उंच उडी, गोळाफेक, १६०० मीटरचा ट्रॅक आदी व्यवस्था मैदानावर आम्ही केल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने अत्याधुनिक अशी व्यायामशाळाही सुरू केली. कुठलेही मानधन न घेता मुलांना व्यायामाचे धडे देत आहे. आता केवळ महाजनपूर नव्हे, तर भेंडाळी, औरंगपूर, सायखेडा येथून दररोज ५० हून अधिक युवक सरावासाठी येतात,’’ असे सागर सांगतो.

गावातील बहुतेकांचा सैन्य दलात जाण्याचा विचार पक्का आहे. त्यापैकीच एक म्हणजे अविनाश फड. युवकांचा दिनक्रम तो कथन करतो. रोज पहाटे पाच किलोमीटर पळण्याचा सराव केला जातो. गोळा फेक, उंच उडी, नियमावलीनुसार निर्धारित वेळेत अंतर पार करणे असे सर्व काही होते. सकाळ-सायंकाळ मैदानावर आणि व्यायामशाळेत सराव केला जातो. ही तयारी करताना दुसरीकडे अविनाशने गावात चहाची टपरी सुरू केली आहे. ‘‘पालकांवर आपला बोजा नको या विचाराने माझे काम सुरू असून दिवसाकाठी २००-३०० रुपये मिळतात. तीन वर्षांपासून हा नित्यक्रम झाला आहे. पण या वर्षी माझा नंबर लागणारच,’’ असे तो विश्वासाने सांगतो. लष्करी भरतीतील निकषांमुळे होणाऱ्या नुकसानीकडे श्रीकृष्ण फडने लक्ष वेधले : ‘‘सैन्य दलात दाखल होण्यासाठी ‘जनरल डय़ुटी (जेडी)’साठी १८ ते २१ आणि ‘ट्रेडमन’ पदासाठी १९-२३ वयोमर्यादा आहे. १९९४ पर्यंत वर्षांतून दोनदा, म्हणजे सहा-सहा महिन्यांनी भरती होत असे. त्यामुळे एका भरतीत नाकारलो गेलो तरी वर्षांत दुसऱ्यांदा संधी मिळत होती. मात्र, आता सर्व कारभार ऑनलाइन आहे. भरती वर्षांतून एकदाच होते. त्याची तारीख कधी येईल हे माहिती नसते. त्यात वर्ष निघून जाते. कसून सराव करूनही कधी अनुत्तीर्ण झाल्याने, तर कधी वयोमर्यादा उलटल्याने गावातील २० मुले या प्रक्रियेतून बाद झाली.’’ यामुळे सैन्यात दाखल न झाल्यास अत्याधुनिक पद्धतीने शेती करायची, भाजीपाला पिकवायचा, हे त्याने ठरविले आहे.

खेळाडूंच्या कोटय़ातून लष्करात जाण्याची कृष्णा फडची सात वर्षांपासून धडपड सुरू आहे. कयाकिंग स्पर्धेत तो राज्यपातळीवर पोहोचला. आता राष्ट्रीय स्पर्धेची तयारी सुरू आहे. प्रत्येक वेळी दोन-तीन गुणांनी यश हुलकावणी देते. यंदा खेळाडूंचा कोटाही कमी केल्याने प्रयत्न तरी कसा करायचा, अशी अगतिकता त्याने व्यक्त केली. बापू फडलाही लष्करात जायचे आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याऐवजी राजकीय पक्षातील महाभरतीकडेच साऱ्यांचे लक्ष आहे, यावर त्याने बोट ठेवले. भरतीत सहभागी होण्यासाठी त्याचा दिवस-रात्र सराव सुरू आहे. वडील नसल्याने जबाबदारी आईवर आहे. आई त्याला म्हणते, ‘‘भरपूर शिक्षण घे,पण शेती करू नको.’’ ‘‘पण प्रयत्न करूनही अपयश पदरी येते, तेव्हा आई धीर देते, खचू नको असे सांगते. पण प्रत्येक निकालाने तीच आतल्या आत खचते,’’ हे सांगताना त्याच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

प्रत्येकाची वेगवेगळी कथा आहे. पण तरीही युवावर्ग सैन्यात भरती होण्यासाठी झोकून देत सराव करत आहे. गावातील ५३ युवक सध्या सैन्यात आहेत. तेही या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. सुटीवर घरी आल्यानंतर ते मुलांसोबत मैदानावर सराव करतात. शेतीत हातभार लावतात. मुलांना तयारी कशी करायची, याविषयी माहिती देतात. काम करतानाचे अनुभव मांडतात. गावात अशी अनेक घरे आहेत, की ज्यांची दोन्ही मुले सैन्यात आहेत. लष्करातील सेवेमुळे कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊन आयुष्याला स्थिरता मिळाली आहे. अनेक सैनिकांच्या घरात टीव्ही, फ्रिज अशा वस्तूही दिमाखात विराजमान झाल्या आहेत. दारासमोर दुचाकी उभी आहे.

शेती करणाऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही. सैन्य दलात भरती झालेल्या मुलांकरता मात्र स्थळे पायघडय़ा टाकत येतात. भरतीत निवडला गेला की साखरपुडा आणि प्रशिक्षण झाल्यावर लग्न ही इथली पद्धत. नोकरी नसल्यास कोणी विचारत नसल्याची खंत अनेक युवक व्यक्त करतात. त्यामुळे एकीकडे पालकांची अपेक्षा व दुसरीकडे लग्न आणि जीवनात स्थैर्य मिळविण्यासाठी कित्येकांची शेती सोडून लष्करी सेवेत जाण्यासाठी अखंड मेहनत सुरू आहे.

भरतीची तारीख जाहीर झाली की सरावाचा वेग वाढतो. आत्मविश्वासाने सारे जोमाने तयारीला लागतात. ज्यांची छाती कमी भरते, उंची कमी पडते, त्यांना त्या अनुषंगाने व्यायाम प्रकार शिकवले जातात. ध्येय एकच, देशसेवा आणि जोडीला जीवनात स्थिरता!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:27 am

Web Title: free military training provide by 53 army youth belong to mahajanpur village zws 70
Next Stories
1 नादाचं आत्मपरीक्षण..
2 परीघ आणि केंद्रस्थान
3 पीएच.डी.धारक गर्दीचे होणार काय?
Just Now!
X