05 August 2020

News Flash

गांधीवाद साकारणारे तरुण..

महात्मा गांधींनी दिलेला विचार आजही तेवढाच प्रस्तुत आहे, जितका तो आधीही होता.

संकेत मुनोत changalevichar1@gmail.com

‘गांधीवादी तरुण’ आजही आहेत.. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून परिवर्तनाचं, गावात रुजणारं काम ते करताहेत आणि त्यांची यादी न संपणारी आहे! गांधीकाळातलं काम आज होत नसलं आणि काही प्रकारचं सामाजिक कार्य तर संगणक, इंटरनेटचाही आधार घेत असलं, तरी या तरुणांच्या कामामागची प्रेरणा गांधीवादाचीच आहे..

महात्मा गांधींनी दिलेला विचार आजही तेवढाच प्रस्तुत आहे, जितका तो आधीही होता. जगभरातील अनेक जण त्यांच्याकडे एक अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोत म्हणून पाहताहेत. इथेच अनेकांची तक्रार असते की, गांधीविचार परदेशांत अनेकांना प्रेरणा देत आहे, पण खुद्द त्यांच्या देशात त्याचे काय होते? आपल्याकडे तर त्यांच्या विचारांची चेष्टा उडवली जाते, त्यांचा द्वेष केला जातो, ते का? हे खरे की, चेष्टा उडवली जाते, द्वेष पसरवला जातो; पण हे करणारे फारच कमी लोक आहेत. मात्र, या थोडक्या लोकांचा आवाज मोठा असल्यामुळे (आणि बाकीचे शांत असल्यामुळेच) ते यशस्वी होताना दिसताहेत. पण त्याहीपल्याड चिकाटीने गांधीविचारांवर प्रेम करणारे, ते आचरणात आणणारे, त्यातून स्वपरिवर्तन करत समाजपरिवर्तनाचे ध्येय बाळगणारे असंख्य तरुण-तरुणी आपल्या अवतीभोवती आहेत.

खरे तर, आजची तरुण पिढी ऐंशी-नव्वदच्या दशकांत जन्मलेली आहे. या पिढीला लोकशाही व त्यासोबत येणारे शांततामय सहजीवन आणि बरेच काही तसे आयतेच मिळाले आहे. तसेच याआधीच्या पिढीला गांधीजींच्या समकालीनांच्या संघर्षांविषयी ऐकायला मिळाले; ते आताच्या पिढीला नाही. पुन्हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब यांच्या व्यवधानांत अनेकांना ते सारे जाणून घेण्याचा अवकाशच उरला नाही. अशात व्हॉट्सअ‍ॅप, ऐकीव गोष्टी आणि काही चुकीचे ‘पर्सेप्शन’ तयार करणारे चित्रपट, नाटके आदींमधून गांधीजींबद्दलच्या तिरस्काराचा प्रवाह अखंड वाहता ठेवलेलाच आहे. ५५ कोटी, फाळणी, भगतसिंगांना फाशी वा स्वातंत्र्य उशिरा मिळण्यास गांधीजीच जबाबदार असे अनेक गैरसमज मनामनांत पेरले गेले आणि हा माणूस वाईटच म्हणून अनेकांनी त्यांना जणू वाळीतच टाकले. माझ्या मनातही गांधीजींबद्दल सुरुवातीला आदरभाव नव्हताच, अिहसा वगैरे तर बावळटपणाच वाटे; पण सर्व बाजू वाचल्यावर खरे गांधी ‘समजू’ लागले. याचे कारण गांधीविचार तुम्हाला आतून बदलवतो. ‘जो बदल तुम्हाला जगात घडवायचा आहे, तो आधी स्वत:त घडवा,’ हे गांधीजींचे बोलणे पटत जाते. परंतु हे पटण्यासाठी खूप साऱ्या सहनशक्तीची, स्वत:तील उणिवा मान्य करून त्यात प्रामाणिक सुधारणा करण्याची गरज असते अन् ते करणे वाटते तेवढे सोपे नाही.

तरी अनेकांना ‘ओल्ड फॅशन्ड’ वाटणाऱ्या या विचारांकडे आजच्या ‘मॉडर्न’ जगात वावरणारे अनेक तरुण-तरुणी ‘जीवनमार्ग’ म्हणून वळताहेत. गांधीजी ज्यास ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हणत, तो महाराष्ट्रही यास अपवाद नाही. महाराष्ट्रातली तरुणाई गांधीविचारांनी प्रेरित होऊन ‘स्व’बरोबरच समाजपरिवर्तनाच्या कार्यासाठी धडपडते आहे.

आजच्या तंत्रज्ञानस्नेही पिढीला गांधीजी तंत्रज्ञानविरोधी होते असे वाटते. पण गांधीजींचा तंत्रज्ञानाला नव्हे, तर तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे उद्भवणाऱ्या बेरोजगारीला, माणूस आळशी होण्याला विरोध होता. अनेकांना हे ठाऊक नसेल की, तार आणि टेलिफोन यांवरील गांधीजींचा खर्च हा तेव्हाच्या व्हॉइसरॉयपेक्षाही जास्त होता! आणि चरखा हेही यंत्रच आहे की! हा अंतर्विरोध नाही, हे जाणणारे तरुणही आहेत. निखिल जोशी हा त्यांपैकी एक. तो सांगतो, ‘‘लहानपणी गांधी जयंतीच्या किती वर्षे सुट्टय़ा झोडल्या, पण गांधी काही कळले नाहीत. पुढे डॉ. अभय व राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेसोबत काम केले, तेव्हा गांधींची ओळख व्हायला सुरुवात झाली. त्यांचे विज्ञान आणि सहिष्णुता यांबद्दलचे विचार मला अधिक भावले. गांधीजी स्वभावाने ‘सायंटिस्ट’ होते. जीवनशैलीचे त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच आहे- ‘माझे सत्याचे प्रयोग’! त्यांच्या विज्ञानाचा उद्देश होता सवरेदय. म्हणूनच ते विकेंद्रीकरणाच्या मार्गाने जात.’’ या विचारांची प्रेरणा घेऊन निखिल आता ‘पाणी फाऊंडेशन’सोबत काम करतो. तो सांगतो, ‘‘गांधीजींची सहिष्णुतादेखील मला खूप भावते. इंग्रजांचादेखील त्यांनी कधी द्वेष केला नाही. आपण मात्र एकच हेतू असणाऱ्या, पण मार्ग वेगळे असणाऱ्या भारतीयांचादेखील द्वेष करतो.’’

आज हा असा द्वेष पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर होतो आहे. त्यातून द्वेषाची विषवल्ली पसरवली जात आहे. पण याच माध्यमांचा उपयोग गांधीजींचा प्रेमभावी संदेश देण्यासाठीही होतो आहे, हेही तितकेच खरे. ‘नोइंग गांधीझम- ग्लोबल फ्रेण्ड्स’ हा तरुणाईचा समाजमाध्यमी गट यात अग्रेसर आहे. प्रेम आणि संवाद यांनी अनेक गोष्टी साध्य होऊ  शकतात, असा गांधीजींचा संदेश. त्यास अनुसरून सध्या नात्यांमध्ये जे ताणतणाव सुरू आहेत, ते कमी करण्यासाठी, नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी नाते समृद्ध करणारी ‘नाते टिकवू या’ ही सामाजिक चळवळ एका तरुणाने सुरू केली; त्याच्याशी चार हजारांहून अधिक जण जोडले गेले आहेत.

ज्या काळात फक्त चूल आणि मूल एवढय़ापर्यंतच महिलांना मर्यादित ठेवले होते, घराबाहेर पडून दिले जात नव्हते, त्या काळात गांधीजींनी महिलांना मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्यलढय़ात आणून त्यांना राजकारण, अर्थकारण, समाजकारणात सक्रिय केले. याच दृष्टीने काही युवतींनी एकत्र येऊन ‘विमेन एम्पॉवरमेन्ट’ हे व्यासपीठ सुरू केले. त्यात महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या महिला व सामान्य गृहिणी, विद्यार्थिनी यांना एकत्र आणून सबलीकरण, हक्कांची जाणीव, पीडित महिलांचे समस्या निवारण, विचारमंथनातून प्रगल्भता यांसाठी प्रयत्न केले जात आहेत.

गांधीजी देशाबद्दल, समाजाबद्दल जरूर बोलतात; पण त्यांच्या लेखनाचा भर हा ‘व्यक्ती’वर असतो. ते म्हणत, स्वत:त बदल केला की देश आपोआप बदलेल. त्यामुळे गांधीजींना वाचताना माणूस हळूहळू बदलू लागतो. काही काळाने त्याला त्याच्यातले बदल आवडू लागतात आणि त्याला याचीही अलगदपणे जाणीव होते की, माझ्या जन्माला, जगण्याला काही तरी अर्थ आहे. असा अर्थ गवसलेली तरुणाई आजूबाजूला आहे. उदाहरणे अनेक आहेत. उदाहरणार्थ, माणिक शेडगे. वैद्यकीय शिक्षण घेताना, शेवटच्या वर्षांत असताना त्यांनी अटेनबरोचा ‘गांधी’ चित्रपट पाहिला आणि त्यांच्या विचारांना दिशा मिळाली. आज साताऱ्यातील त्यांच्या गावी त्यांनी गांधीजींच्या ग्रामविकासाच्या संकल्पनेद्वारे आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. असेच एक विनायक देवकर. गांधीजींच्या आफ्रिकेतील टॉलस्टॉय आश्रमाची प्रेरणा घेऊन विनायक यांनी ‘महात्मा गांधी स्कूल’ ही शाळा येरवडा येथे सुरू केली. या शाळेत घटस्फोटित, विधवा महिलांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते.

गांधीजींच्या ‘खेडय़ाकडे चला’ या विचाराला अनुसरून तन्मय जोशी व श्वेता भट्टड हे छिंदवाडा येथे सेंद्रिय शेती करतात आणि जगातल्या विविध कलाकारांना एकत्र आणून ग्रामीण व शहरी प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. मंदार देशपांडे हेही सेंद्रिय शेती व ग्रामउद्योग आधारित स्वावलंबी, परस्परसहकारी, शोषणमुक्त जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात, ‘‘आजचा जीडीपीकेंद्री विकास विनाशाकडे नेतोय. आजकाल मोठय़ा मोठय़ा गोष्टी ‘बोलण्यावर, लिहिण्यावर’ आपला भर असतो. पण ‘करण्यावर’ कमी. गांधीजींनी सांगितले होते ‘कर के देखो’; त्यांनी ‘सोच के देखो’ म्हटले नव्हते!’’

नीलेश शिंगे या तरुणालाही गांधीजींच्या ‘नयी तालीम’ व गांधीवादी शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता यांनी प्रभावित केले आणि तो आपली नोकरी सांभाळत सुट्टीच्या दिवशी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून मुलांना विज्ञान शिकवत असतो. विनोद पगार यांनी गांधींजींच्या लघुउद्योगांच्या कल्पनेने प्रेरित होऊन ‘खान्देशी गोधडी’ची निर्मिती करून धुळ्यामध्ये शेकडो महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. अमित सरोदे, अमृत बंग यांसारखे तरुण परदेशात मिळणारी घसघशीत पगाराची नोकरी धुडकावून स्वदेशी राहून आपापल्या गावातील लोकांच्या विकासासाठी कार्य करत आहेत.

ही यादी न संपणारी आहे. गांधीविचार अमलात आणणे म्हणजे घरदार सोडून त्यास वाहून घेणे असा काहींचा समज आहे. पण वर उल्लेखलेले तरुण कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ही कार्ये करत आहेत. शेवटी परिवर्तन हे एका दिवसात होत नसते. परिवर्तन ही निरंतर चालणारी क्रिया आहे. गरज आहे ती गांधीविचारांची कास धरण्याची आणि स्वत:वर विश्वास ठेवण्याची. हे केले की, तुमच्यामध्ये चमत्कारिक बदल घडून येईल आणि हा चमत्कार गांधीविचारांचा असेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 2:32 am

Web Title: gandhi jayanti 2019 youth adopt gandhian principles zws 70
Next Stories
1 काम करणारे.. आणि ‘कार्यकर्ते’!
2 सेवा आणि स्थिरता
3 नादाचं आत्मपरीक्षण..
Just Now!
X