देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

विदर्भ हा एकेकाळचा काँग्रेसचा गड; तर आता भाजपचा बालेकिल्ला! इथल्या तरुणांना आपल्याकडे वळवण्याची जी प्रक्रिया भाजपने सुरू केली; तिला सर्वात मोठे यश मिळाले ते २०१४ मध्ये.. ते यश, ती उमेद आजही दिसते का?

नाव ॐकार दाणी. २०१४ पासून भाजपच्या म्हणजेच मोदींच्या प्रेमात पडलेला ॐकार अभियांत्रिकी पदवीधर आहे. गेली तीन वर्षे नोकरीच्या शोधात असूनही त्याला संधी मिळाली नाही. आता तो बँकांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. तरीही त्याचे मोदीप्रेम तसूभरही कमी झालेले नाही. ‘बँकांच्या जागा आजकाल निघत नाहीत. याला बँकांची २०१४ पूर्वीची थकीत कर्जे कारणीभूत आहेत. विद्यमान सरकार याला जबाबदार नाही,’ अशी त्याची ठाम धारणा आहे. ‘गेल्या पाच वर्षांत सरकारने ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन दिल्यामुळे जगण्याच्या दैनंदिन स्थितीत बराच फरक पडला. साध्या ट्विटरवर तक्रार केली तरी प्रशासन दखल घेते. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी भाजपकडे वळण्यात काहीच चूक नव्हती,’ असे ॐकारला वाटते.

युवावर्गातील दुसरे उदाहरण अगदी विरुद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसकडून भाजपकडे वळलेल्या एका पदवीधराला मोदी तरुणांची भाषा बोलतात, असे वाटायचे. त्याने कर्ज काढून प्लास्टिक पिशव्यांवर प्रिंटिंगचा व्यवसाय थाटला. नोटाबंदी जाहीर झाली व हा व्यवसाय पार बुडाला. अखेर तो गुंडाळून या तरुणाने नोकरीसाठी रायपूर गाठले. हा अनुभव सांगणाऱ्या या तरुणाला आता भाजपबद्दल राग आहे. म्हणूनच तो नाव उघड करायला तयार नाही.

तिसरे उदाहरण आणखी वेगळे आहे. महेश मस्के हा तरुण अभियंता पाच वर्षांपूर्वी भाजपसमर्थक झाला. त्यालाही मोदींचे आकर्षण. ‘पंतप्रधानांनी ऑनलाइनला बळ दिले, त्यामुळेच माझ्या मार्केटिंगच्या धंद्यात बरकत आली,’ असे महेश सांगतो. सरकारचे काही निर्णय पटले नाहीत, पण तरीही पक्षप्रेम कायम असलेल्या महेशला ‘भविष्यात काँग्रेसने अशी धडाडी दाखवली तर त्यांच्या पाठीशी उभे राहू,’ असे सांगण्यात काहीही गैर वाटत नाही.

वर्धा जिल्ह्य़ात एका गावात राहणारा विवेक पिल्लेवार पाच वर्षांपूर्वी भाजपशी जुळला. या पक्षात जातीपातीला स्थान नाही. नेत्यापेक्षा संघटना सर्वोच्च आहे व जो काम करतो त्याला संधी मिळते, असे सांगणारा विवेक पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला आहे.

विदर्भात ठिकठिकाणी फिरले की असे अनेक तरुण भेटतात. एकेकाळी काँग्रेसचा गड अशी विदर्भाची ओळख होती. पाच वर्षांपूर्वी ही ओळख पूर्णपणे पुसली गेली व या प्रदेशावर भाजपचा एकछत्री अंमल सुरू झाला. यातील मुख्य कारण होते तरुणाईचे काँग्रेसकडून भाजपकडे वळणे. या तरुणांचा एका विचाराकडून दुसरीकडे झालेला प्रवास एका निवडणुकीत झाला नाही हे खरे! स्थित्यंतराची ही प्रक्रिया गेली काही वर्षे सुरू होती. त्याला मोठे बळ मिळाले ते २०१४ मध्ये. तेव्हा आलेल्या लाटेत विदर्भातील तरुण मतदार मोठय़ा संख्येत भाजपकडे वळला. हे वळणे इतके जबर होते की या पक्षाचे अनेक उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून आले. ज्यांना कुणी ओळखत नाही असे परप्रांतीय कंत्राटदारसुद्धा विजयी झाले. पण हा बदल घडण्याआधी, विशेषत: तरुणांच्या मनात वैचारिक बदलाची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती. काँग्रेसची सत्ता असताना या पक्षाच्या त्याच त्याच नेत्यांचे चेहरे बघणे, त्यांचे तेच तेच बोलणे ऐकणे याला तरुणाई कंटाळली होती. अनेक वर्षांच्या राजकारणातून काँग्रेसमध्ये पिढीजात नेतृत्वाची परंपरा सुरू झाली होती. वडील, नंतर मुलगा, नंतर पुतण्या, सून अशांनीच राजकारणात यायचे व इतरांनी त्यांना केवळ मते द्यायची, असाच हा कालखंड होता. राजकारणात स्थिरावून पक्के दरबारी झालेल्या या नेत्यांच्या शिक्षण संस्थाही भरपूर. नोकरीची गरज असली की त्यांच्यामागे फिरायचे. प्रसंगी पैसे मोजायचे. यासाठी या नेत्यांची साधी भेटही घ्यायची म्हटले की त्यांच्या भव्य निवासस्थानातील पाच दरवाजे पार करून जावे लागायचे. एवढे करूनही नोकरी मिळेल याची शाश्वती नाहीच. मिळाली तरी तुकडे फेकल्यासारखी मिळायची. त्या तुलनेत भाजपचे वैदर्भीय नेतृत्व नवखे नसले तरी सहज उपलब्ध होईल असे होते. विशेष म्हणजे, ते शिक्षणाच्या धंद्यात नव्हते. उद्योग, त्यातून रोजगार, स्वयंरोजगार अशी या भाजप नेत्यांची भाषा होती. काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे डाग होते. त्या तुलनेत भाजप नेत्यांची प्रतिमा निदान या कारणाने तरी मलिन झालेली नव्हती. काँग्रेसकाळात पाणीपुरवठा, पशुसंवर्धन अशी दुय्यम खाती वैदर्भीय नेत्यांच्या वाटय़ाला यायची. भाजप नेते प्रचारात हा मुद्दा हटकून वापरायचे. या पाश्र्वभूमीवर काही तरी बदल हवा, असे वाटणारा तरुण भाजपकडे वळला. विदर्भातील कोणताही प्रकल्प असो वा विकासकामे, काँग्रेसकडून नेहमी आश्वासने दिली जायची. निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना थोडी मदत करायची व त्या बळावर निवडणुका जिंकायच्या. रोजगाराच्या मुद्दय़ावर कुणी बोलायचेच नाही. वस्त्रोद्योगाची भाषा ऐकून ऐकून इथले तरुण म्हातारे झाले. सूतगिरण्या निघाल्या, त्यात या पक्षाच्या नेत्यांचीच धन झाली. काँग्रेसचे नेते केवळ स्वार्थ बघतात, असा संदेश यातून गेला आणि तरुणांमधील हे स्थित्यंतर पाच वर्षांपूर्वी घडून आले. भाजप तरी आपले प्रश्न सोडवेल, आपल्याकडे लक्ष देईल या आशेवर हा तरुण एकशे ऐंशीच्या कोनात वळला.

पाच वर्षांत प्रत्यक्षात काय झाले? या तरुणांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले की संमिश्र भावना समोर येतात. मोदीप्रेम अथवा भाजपप्रेमामुळे भारून जे तरुण पक्षात कार्यकर्ता म्हणून सक्रिय झाले; ते काही मिळाले नाही तरी आजही पक्षप्रेमाचे गोडवे गाताना दिसतात. अमरावतीचा बादल कुळकर्णी त्यातलाच एक. तो अजून त्याच्या व्यवसायात स्थिरावला नसला तरी सरकारला अधिक वेळ द्यायला हवा, असे त्याला वाटते. ‘यूपीएच्या काळात घोटाळे घडले. या सरकारच्या काळात नाही,’ असे तो सांगतो. तुषार वानखेडे या तरुणाला ‘भाजप अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करत नाही म्हणून आवडतो’. मोदींची कौशल्यविकासाची योजना ‘गेमचेंजर’ आहे, असे त्याला वाटते. यातून कितींना रोजगार मिळाला, याचे आकडे मात्र त्याच्याजवळ नसतात. ‘सरकार बदलले तरी प्रशासनाची मानसिकता बदलली नाही,’ असे ठेवणीतील उत्तर तो देतो. धर्मराज नवलेला गेल्या पाच वर्षांत युवकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तरी हेच सरकार पूर्ण करेल असे वाटते. श्रीयुत शिरभातेला राहुल गांधींपेक्षा मोदी जोरकसपणे मुद्दे मांडतात असे वाटते. काँग्रेससारखी घराणेशाही या पक्षात नाही, असे नीलेश थिटे बोलून दाखवतो. ऑनलाइन योजनांमुळे शासकीय योजनांचा लाभ मिळू लागला असे आकाश ठाकरेला वाटते. सध्या भाजयुमोत काम करणारा दिनेश रहाटे आधी युवक काँग्रेसमध्ये होता. येथे कार्यकर्त्यांच्या कामावर लक्ष ठेवले जाते व नंतर संधी दिली जाते, अशी त्याची भावना आहे. या साऱ्या भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना पक्षाने त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांमध्ये बेमालूमपणे सामावून घेतले आहे हे दिसून येते. त्यामुळे या साऱ्यांच्या प्रतिक्रिया झापडबंद स्वरूपाच्या वाटू लागतात. दुसरीकडे काँग्रेसमध्ये तर एवढाही बदल अथवा कार्यकर्त्यांच्या आयुष्यात अशा घडामोडी घडून येत नव्हत्या, हे सत्यसुद्धा जाणवत राहते.

भाजपला मत दिले पण कार्यकर्तापण स्वीकारले नाही, अशा तरुणांशी बोलले की एक नवी बाजू समोर येते. २०१४ च्या निवडणूक काळात विदर्भातील तरुण जथ्याच्या जथ्याने भाजपमध्ये सामील होत होते. रोज शंभर, पन्नास तरुणांचे गट भाजप नेत्यांच्या घरी जायचे. उपरणे घालून त्यांचे स्वागत केले जायचे. लगेच प्रसिद्धिपत्रक काढले जायचे. गेल्या पाच वर्षांत हे ‘इन कमिंग’ आटले आहे. या वेळच्या निवडणूक काळात असे पक्षप्रवेश दिसले नाहीत. रोजगाराच्या मुद्दय़ावर, उच्चशिक्षणातील शिष्यवृत्ती वाटपावर या जथ्यातील अनेक तरुण नाराज झाले. गेल्या पाच वर्षांत या सरकारकडून नोकरीच्या कमीत कमी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे अनेकांची निराशा झाली, असे उत्तर नागपुरात वाचनालयात अभ्यास करणारे तरुण सांगतात. ‘या पाच वर्षांत शिष्यवृत्तीत कपात व वाटपात जेवढा घोळ घातला गेला तेवढा कधीच झाला नव्हता. त्यामुळे निराशा पदरी पडली व परत जुन्या वळणावर यावे लागले,’ असे तरुण बोलतात. अर्थात ते नाव वापरू द्यायला तयार नसतात. भाजपकडून फक्त नागपूर व चंद्रपुरात रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यातून काहींना संधी मिळाली. इतर ठिकाणी मात्र मेळावेसुद्धा झाले नाहीत. ज्या पक्षाचे समर्थन केले, त्यांचे सरकार आल्यावर काम मिळेल या आशेवर अनेक तरुण सत्तेच्या वर्तुळात दाखल झाले.

याच सरकारने बेरोजगारांना १० लाखांपर्यंतचे थेट कंत्राट देण्याची योजना ऑनलाइन केली. त्यावर बरेच निर्बंध घातले. पारदर्शकतेसाठी हे हवे होते, पण त्यामुळे काही तरी काम मिळेल या आशेवर असलेला हा वर्ग हिरमुसला. सरकारच्या हे लक्षात आल्यावर यात सुधारणा करण्याचे प्रयत्न झाले; पण न्यायालयाने ते हाणून पाडले. यामुळे २०१४ च्या स्थित्यंतरात सामील झालेला तरुणांचा एक मोठा वर्ग भाजपपासून दुरावला. याच काळात बेरोजगारांचे अनेक मोर्चे अगदी स्वयंस्फूर्तीने विदर्भात निघाले. हा तरुण हातून निसटू नये म्हणून भाजप नेत्यांनी या काळात भरपूर प्रयत्नही केले. काही ठिकाणी अभ्यासिका झाल्या. अगदी शेवटी ‘मेगाभरती’ काढण्यात आली. त्याचा कितपत फरक पडला हे येणारा काळच सांगेल.