सुहास सरदेशमुख

आमचेही प्रश्न आहेत हे कोणाच्या खिजगणतीतही नाही.  दिवसभराची कमाई पाच-पन्नास रुपयांची. म्हणजे खायला मिळेल एवढीच. आमचे प्रश्न सोडवायला कोणता खासदार येतो? राज्यातील बहुतांश मोठय़ा शहरांतील मुस्लीम तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. ती कधी संपणार..

घरांच्या दाटीत रस्ता आक्रसून पडलेला. त्यात कोण कुठे दुचाकी लावेल सांगता येत नाही. दाटीवाटीने उभ्या घरांच्या दारांना झिरझिरीत साडय़ांचे पडदे. पाठीला पाठ लावून बांधलेल्या घरांच्या मध्येच दोन बंगले, त्याला संरक्षण भिंत, सहजी डोकावता येणार नाही एवढी उंच! रस्त्यांवर दुकानांची रांग. कूलर-मिक्सर दुरुस्तीशेजारी किराणा दुकान. शेजारी तयार कपडय़ाच्या दुकानाची पारदर्शी काच. थोडे पलीकडे, सोललेले बोकड लटकवून ठेवलेले. मुख्य रस्त्यावरचे दिवे हैदराबादी थाटातले. रस्त्यावरून ड्रेनेजचे वाहणारे पाणी, तेथेच फळविक्रेत्यांचे गाडे. तसा वर्दळीचा रस्ता. बुरखाधारी महिला वाट काढत जाणाऱ्या. डोक्यावरची बांधलेली ओढणी ढळू नये, याची काळजी घेत मोहल्ल्यात फिरणाऱ्या पोरी. औरंगाबादच्या या किराडपुरा वस्तीतच भेटला वाणिज्य शाखेतून पदवी मिळविलेला अजहर सिद्दिकी. चर्चा राजकारणाची होती. ‘ओवेसींकडे मुस्लिमांची स्थिती सांगणारे ‘स्टॅटिस्टिक्स’ चांगले आहे. त्यांच्या आकडेवारीवर कोणी आक्षेप घेतले नाहीत. भले त्यांना भाजपची ‘बी टीम’ म्हणतात. पण ते नसतील तर आमचा आवाज संसदेत मांडेल कोण? कोणीच नसण्यापेक्षा कोणी तरी असायला हवेच की. भाजपलाही लगेच यश मिळाले नव्हते. त्यांचेही दोनच तर खासदार होते. पण त्यांच्या हातात आता सत्ता आहे. आम्ही संख्येने कमी आहोत म्हणूनच किमान आवाज उठवणारे कोणी तरी असायला हवे ना?’

अजहर, नजीम, एजाज अहमद एकाच मोहल्ल्यातील तरुण. एका कपडय़ाच्या दुकानात राजकीय गप्पांचा फड सुरू होता. ‘आता खरे बोलणारे कोणी राहिले नाही राजकारणात. कन्हैया कुमारचे भाषण मुद्देसूद असते पण तो निवडून येणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे आमच्या वस्तीपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचलेच तरी आमच्या वस्त्यांमधील धार्मिक वातावरण त्यांना स्वीकारणार नाही. बाकी कोणी आता आम्हाला आपलेसे वाटत नाही. बघा ना.. आम्हालाही काही समस्या आहेत, आमचेही प्रश्न आहेत हे कोणाच्या खिजगणतीतही नाही. कोणी कचरा उचलत नाही. कोठे दवाखाना नाही. शाळांमध्ये नीट शिक्षण मिळत नाही. कोणी बेरोजगार नसतो. पण काम करतोच असेही नाही. दिवसभराची कमाई पाच-पन्नास रुपयांची. म्हणजे खायला मिळेल एवढीच. मग आमचे प्रश्न सोडवायला कोणता खासदार येतो?’ प्रश्न भेदक होते. २०१४ च्या संसदेत मुस्लीम खासदारांची संख्या २० होती. त्यातील एकाचे निधन झाले आहे आणि तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

या वस्तीमध्ये खूप काही सामावलेले असते. मोहम्मद अखलाक, मोहसीन शेख, ‘कहाँ है नजीब’ असा जेएनयूतून गेले कित्येक महिने गायब झालेल्या नजीब अहमदबद्दलचा प्रश्न. त्याचबरोबर येणारे तुष्टीकरण, धर्मनिरपेक्षता, त्याचा निर्माण केला जाणारा आभास, गावात घडणाऱ्या दंगली असेही खूप काही दबलेले. अव्यक्त भावनांना वाट करून देणारेही खूप जण.

हर शाम जलते जिस्मों का गाढ़ा धुआँ है शहर

मरघट कहाँ है, कोई बताओ कहाँ है शहर

औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर किंवा अहमदाबाद, लखनऊ, हैदराबाद.. अशा अनेक शहरांपैकी कोणत्याही शहरातील वस्तीमध्ये हेच प्रश्न असतील. या वस्त्या लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेला प्रश्न विचारत राहतात. कोणी उपाशीपोटी निजू नये म्हणून ‘रोटी बँक’ चालविणाऱ्या एका केंद्रामध्ये सलवाबिन तय्यब भेटल्या. १२ वीपर्यंत शिक्षण झाालेलं. ‘चौस’ समाजात सातवीनंतर लग्न लावून दिले जाते. पण वडिलांनी परवानगी दिल्याने त्या शिकल्या. आता या केंद्रात काही मुलींना वेगवेगळे कौशल्य शिकविले जाते. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी मुलगी या केंद्रात मेहंदी शिकत होती. एवढे शिक्षण झाल्यानंतर हे मेहंदीचे कौशल्य (?) कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर अनेक जटिल प्रश्न निर्माण करणारे आहे. एक तर नोकरी मिळणे तसे अवघडच. ती मिळाली तरी कंपनीमध्ये बुरखा घालून काम कोण करू देणार आणि घरातून तशी परवानगी मिळणार नाही. त्यापेक्षा या कौशल्यातून दोन पैसे कमावता आले तर बरे, असा मार्ग निवडलेला. मात्र, ‘तीन तलाक’वर बोलताना या सगळ्या जणी सरकारने या विषयात पडायला नको होते, ही भूमिका जाहीरपणे मांडणाऱ्या. त्या पुढचे राजकीय भाष्य टाळणाऱ्या. त्या वस्तीमध्ये ‘चांगले काम उभे राहावे’ असे वाटणाऱ्या अनेक जणी. उकिरडय़ावरच्या प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन जनावरांचे पोट खराब होते. शिळे अन्न बकऱ्यांना खायला दिले तर त्यांचे पोट फुगते. मग फिरदोस फातेमा यांनी शिळी रोटी गोळा करून ती गाईंना खाऊ  घालण्याचे ठरविले. अन्न जास्त असेल तर शहराबाहेरच्या गोशाळेतही इथून ते पाठवले जाते. हे काम गेली किती तरी वर्षे सुरू आहे. पण ज्यांनी हे काम सुरू केले त्या मात्र निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या. पण चांगले काम करण्याची ऊर्मी संपली आहे असे मात्र नाही. ‘वातावरणात विश्वास वाढायला हवा,’ हे मात्र सर्वाचे मत.

मराठवाडय़ातील आणि अन्य ठिकाणच्या मुस्लीम वस्त्या जरी वरून सारख्या असल्या तरी या भागातील मुस्लीम समाजाने सत्तेची चव चाखलेली आहे. निजामाची जुलमी सत्ता अनुभवणारे अनेक जण अजून जिवंत आहेत. त्यांच्या तोंडून रझाकारांचे नाव काढताच चेहऱ्यावर दाटून येणारी भीती आणि मग चीड एका बाजूला आणि दुसरीकडे समस्येच्या गर्तेत सापडलेली पुढची पिढी, अशा काहीशा गुंत्यात सापडलेल्या मानसिकतेतील तरुण काही प्रश्न टोकदारपणे विचारतो. औरंगाबादच्या महापालिकेच्या शेजारी उड्डाणपुलाजवळ चहाचे दुकान आहे, जमजम टी सेंटर. इम्रान शेख आणि त्याचे दोन भाऊ, वडील येथे काम करतात. २०१४ मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या इम्रानची स्वत:ची राजकीय मते आहेत. पुलवामा-बालाकोटबद्दल विचारले असता तो म्हणतो, ‘देश एवढा सशक्त आहे तर एवढी स्फोटके येतात कशी?’ आणि मसूद अझरला इरसाल शिवी हासडून तो म्हणतो, ‘पकडायला हवे त्याला.’

तरुणांपैकी कोणी भुर्जी-पावचा गाडा टाकतो तर कोणी भंगार गोळा करतो. अलीकडे मुला-मुलींनी इंग्रजी शाळेत शिकायला हवे असे मानणारेही अनेक जण आहेत. आपल्या लहान भावाला किंवा बहिणीला अधिक चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आग्रही असणारी तरुण पिढी म्हणते, पाकिस्तानबरोबरचे राजकीय खेळ लष्कर हाताळेलही पण आमच्या प्रश्नाचे काय, असे सारे प्रश्न रोज एकमेकांमध्ये विचारले जातात. आताशा माध्यमांमध्ये समस्या दाखविल्याच जात नाहीत, ही तक्रारही सर्व वस्त्यांमधून केली जाते. प्रश्न विश्वासाचा आहे. तो निर्माण करणारा कोणी पुढे येत नाही. मग सारे अडकत राहतात गुंत्यात, संभ्रमात. कोणत्या बाजूने वळावे कळत नाही. पण कोणी तरी आपल्याला हाताळते आहे आणि कोणाच्या तरी विरोधात उभे राहावे लागतेय, ही भावना खूप संवेदनशीलपणे व्यक्त होते-

हर एक शक्स परेशानों, दरबदरसा लगे

ये शहर मुझको तो यारों कोई भँवरसा लगे

suhas.sardeshmukh@expressindia.com