News Flash

‘किसान’ चिंतित, ‘जवान’ भरतीत..

इंजिनीअरिंगसाठी पाच-सहा लाख रुपये खर्च केल्यानंतरही सात हजार रुपयांवर नोकरी करण्याची वेळ येते.

भरतीसाठी धावणारे काही पाय बुटांमधले, बरेच अनवाणी! (एक्स्प्रेस संग्रहातील छायाचित्र)

सतीश कामत pemsatish.kamat@gmail.com

कोकणातून नव्हे, घाटावरूनच अधिक आले होते तरुण.. घरची शेती थोडीफार, तीही यंदा गेलेलीच. ‘शेतकऱ्यांच्या कमी शिकलेल्या मुलांकडे कोण पाहतंय?’ हे कटू वास्तव यापैकी प्रत्येकाला बदलायचं होतं..

रत्नागिरी शहरातला मारुती मंदिराचा परिसर विविध प्रकारच्या दुकानांची बाजारपेठ, रस्त्याकडेला ताज्या भाज्यांसह नानाविध वस्तूंच्या पथाऱ्या आणि इथल्या वर्तुळाला चारही बाजूंनी येऊन मिळणाऱ्या वाहतुकीमुळे दिवसभर गजबजलेला असतो. पण गेल्या महिन्यात (१७ ते २७ नोव्हेंबर) इथे रात्रभर काही हजार तरुणांची गर्दी फुललेली दिसे. या वर्तुळाच्या बाजूलाच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर लष्करातर्फे घेण्यात आलेल्या भरतीसाठी हे तरुण राज्याच्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतून आणि लगतच्या गोवा राज्यातून आले होते.

शारीरिक क्षमतेच्या चाचण्यांमध्ये दिवसाच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भरती प्रक्रियेची वेळ मुद्दाम रात्रीची ठेवण्यात आली होती आणि हे काम पहाटेपर्यंत चालत असे. दर रात्री, प्रत्येक जिल्ह्य़ानुसार ऑनलाइन नोंदणी केलेल्या सुमारे चार-साडेचार हजार तरुणांना या चाचण्यांसाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे पाठीवर सॅक अडकवलेल्या तरुणांचे जथे संध्याकाळपासूनच मारुती मंदिर परिसरात दिसू लागत. हळूहळू त्यांची संख्या वाढत जाई आणि मध्यरात्रीपर्यंत काही हजार तरुण या परिसरात टोळक्या-टोळक्याने बसून भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळणी करताना, चर्चा करताना, शक्य असेल तर मोकळ्या रस्त्याकडेला किंवा पदपथावर आडवे होऊन विश्रांती घेताना दिसू लागले होते.

निरनिराळ्या कारणांमुळे तरुण वयात अनेकांना लष्करी पेशाची आवड असते. काही जणांच्या कुटुंबातूनच त्याबाबतचे संस्कार लष्करात असलेल्या नातेवाईकांमुळे झालेले असतात; तर सुरक्षित नोकरीची हमी या किमान अपेक्षेनेही काही जण या क्षेत्राकडे वळताना दिसतात. रत्नागिरीत भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या याबाबत नेमक्या काय भावना आणि हेतू आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी अनौपचारिकपणे गप्पा मारल्या तेव्हा समाजातल्या काही आर्थिक, कौटुंबिक प्रश्नांचीही झळ त्यांच्या बोलण्यातून जाणवली.

स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैठक मारून दोन तरुण गप्पा मारत होते. सोलापूर जिल्ह्य़ाच्या बार्शी तालुक्यातून आलेले. ‘कुटुंबातल्या कोणी तरी सैन्यात जावं, ही काकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलोय भरतीला’- त्यांपैकी विश्वास बोराडे सांगत होता.. घरी उसाची शेती आहे. इतरही थोडं धान्य पिकतं; पण यंदा अतिवृष्टीमुळे काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे नोकरी मिळवण्याच्या हेतूनं आम्ही दोघे आलो आहोत. आमच्या गावातले आणखी २२ जण आले होते. सगळ्यांची परिस्थिती साधारण अशीच. शारीरिक मेहनत केली तर सैन्यात सहज नोकरी मिळते, म्हणून सर्व जण आलेले. त्यासाठी गेले सुमारे सहा महिने सराव करत होतो. या वेळी निवड नाही झाली तर पुन्हा प्रयत्न करायचा. विश्वासबरोबर आलेल्या अक्षय घोलपची कहाणी वेगळी होती. घरातली आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट. त्यात वडिलांना दारूचं व्यसन. धाकटय़ा भावाचं शिक्षण कमी. म्हणून तो घरची शेती बघतो. बारावीपर्यंत शिक्षण झालं असल्यामुळे अक्षय सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करतो आहे. ‘भरती झाली तर देशसेवा करूच, पण कुटुंबाचीही सेवा करता येईल. नाही तर शेतकऱ्यांच्या कमी शिकलेल्या मुलांकडे कोण पाहतंय?’ अक्षयचा बिनतोड सवाल.

इथून थोडं पुढे गेलो. सांगली आणि सातारा जिल्ह्य़ातल्या तरुणांचा जथा भेटला. एकूण पेहराव आणि बोलण्यावरून विश्वास-अक्षयपेक्षा बऱ्या आर्थिक स्तरातले दिसत होते. सांगली जिल्ह्य़ातल्या मिरजचे राहुल ओंबासे आणि सागर पाटील या दोघांच्याही घरची शेती. पण सैन्यात जाण्याच्या आवडीपोटी भरतीसाठी आलेले. त्यांच्या भागातून सुमारे शंभर मुलं आली होती. जिल्ह्य़ात लष्करात जाण्याची परंपरा असल्याने प्रेरणा मिळाल्याचंही दोघांनी सांगितलं. याच गावातला अमोल वाघमारे म्हणाला, ‘सैन्यात जाण्याच्या आकर्षणाबरोबरच नोकरीची गरज म्हणूनही आलो आहे. शिवाय, मेल्यावर पांढऱ्या कपडय़ापेक्षा तिरंग्यात लपेटून जाणं जास्त चांगलं, नाही का?’ अमेलचा थोडा वेगळाच युक्तिवाद.

त्यांच्या बाजूलाच सातारा जिल्ह्य़ातल्या वाठारचा अजिंक्य सावंत भेटला. त्याच्या गावातली २८ मुलं या भरतीसाठी आली होती. विशेष म्हणजे गावात भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी खासगी ‘अ‍ॅकॅडमी’ आहेत. दरमहा साडेआठशे रुपये शुल्क घेतलं जातं. पण घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे त्याच्यासह काही जणांनी स्वत:च्या पद्धतीने सराव केला. अजिंक्यचे आई-वडील शेती करतात. पण त्यातून भागत नसल्याने त्याने हा मार्ग निवडला आहे.

या भरतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये सर्वात जास्त भरणा नेहमीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्य़ातून होता. जिल्ह्य़ातल्या कोतोली गावचे काही तरुण मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वर्तुळाच्या कठडय़ाला टेकून गप्पा मारत उभे होते. या गावातली सुमारे ५०-६० मुलं आली होती. ‘दहावी-बारावीनंतर अन्यत्र कुठेच नोकरी मिळत नाही, म्हणून इथे आलो,’ असं सुरुवातीलाच स्पष्ट करून त्यांच्यापैकी प्रथमेश डोलवली म्हणाला, ‘जास्त हुशार मुलं पोलीस खात्यात जातात आणि इतर सैन्याकडे वळतात. इथे पगार चांगला मिळतो आणि समाजात सन्मानही मिळतो. इंजिनीअरिंगसाठी पाच-सहा लाख रुपये खर्च केल्यानंतरही सात हजार रुपयांवर नोकरी करण्याची वेळ येते. त्यापेक्षा हे केव्हाही चांगलं.’

प्रथमेशच्या शेजारीच प्रशांत लवटे हा तरुण शांतपणे उभा होता. सैन्यात भरतीसाठी त्याने चार वेळा प्रयत्न केले, पण काही ना काही कारणाने निवड झाली नाही. त्याचा सख्खा भाऊ मात्र सैन्यात आहे. भरतीसाठी केलेल्या प्रयत्नांमधून आलेल्या अनुभवांचा गावातल्या इतर इच्छुकांना लाभ व्हावा या सद्हेतूने प्रशांतनं गावातच प्रशिक्षण अ‍ॅकॅडमी सुरू केली आहे. शुल्क परवडेल असं- महिना हजार रुपये. लष्करात भरतीसाठी ग्रामीण भागातून मिळणाऱ्या जास्त प्रतिसादाबद्दल तो म्हणाला, ‘वाढत्या स्पर्धेमुळे संधी खूप कमी झाल्या आहेत. बारावीवाल्याला तर कोणीच विचारत नाही. शेतीतूनही काही हाती लागत नाही. अशांसाठी सैन्य हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे आमच्या गावातले ४०-५० जण लष्करात आहेत.’

पन्हाळा तालुक्यातल्या सौरभ पाटीलची कौटुंबिक पाश्र्वभूमी प्रशांतच्या निरीक्षणांना दुजोरा देणारी. घरी फक्त एक एकर शेती. त्यातच गेल्या हंगामात महापुराचा मोठा फटका बसला. काहीच शिल्लक राहिलं नाही. बारावी पास झाल्यानंतर कोण नोकरी देणार, या वास्तवाच्या जाणिवेतून त्याने हा पर्याय निवडला आहे.

राधानगरी तालुक्यातल्या राहुल निशिंतची परिस्थितीही फार वेगळी नाही. यंदाच्या चाचणीमध्ये धावताना दहा सेकंद वेळ कमी भरल्यामुळे बाद झालेला राहुल म्हणाला, ‘मी कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू आहे. आमची स्वत:ची शेती नाही. एक भाऊ मजुरी करतो. वडील एका दुकानात काम करतात. घरात अडचणीची परिस्थिती असल्यामुळे मी नोकरीसाठी बाहेर पडलो आहे.’

या भरती मोहिमेनिमित्त इतरही अनेक तरुणांशी बोललो; पण बहुसंख्यांची कथा हीच होती. एके काळी देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा देऊन देशाच्या सुरक्षा आणि स्थर्यासाठी या दोन्ही क्षेत्रांचं असलेलं महत्त्व अधोरेखित केलं होतं; पण परिस्थितीच्या रेटय़ामुळे आता शेतकऱ्यांच्या पोरांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हाती बंदूक घेण्याची वेळ आली आहे.

घाटावरच्या जिल्ह्य़ांच्या तुलनेत कोकणातून सैन्यामध्ये भरती होण्याचं प्रमाण खूपच कमी. ते वाढावं म्हणून गेल्या तीन वर्षांत आवर्जून यंदा दुसऱ्यांदा इथे ही मोहीम राबवण्यात आली. कारण एक तर इथल्या तरुणाला ती आवड नाही आणि जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत खूप कमी आहे. कोकणातून थोडी बरी क्षमता किंवा गुणवत्ता असलेले मुंबईची वाट धरतात. कारण लष्करी नोकरीपेक्षा ते जीवन निश्चितच कमी खडतर असतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:16 am

Web Title: maharashtra rural youth rush to join indian army maharashtra farmers
Next Stories
1 भंगलेल्या स्वप्नांचा माग..
2 मुंबईतलं ‘शेतकरी स्पिरीट’!
3 अपना टाइम आएगा!
Just Now!
X