News Flash

मुंबईतलं ‘शेतकरी स्पिरीट’!

नोकरी, अभ्यास आणि घरची परिस्थिती यांचा विचार करून मेंदू पिळवटून निघतो.

 

|| नमिता धुरी

मुंबईला शिक्षणासाठी ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वाटचालीवर यंदा गावातल्या अवकाळी पावसाचा, पुराचा झाकोळ आहे.. उत्पन्न आधीच कमी, यंदा तेही बुडणार अशा स्थितीतल्या शेतकरी कुटुंबांमधील हे युवक, याही स्थितीत हिंमत टिकवून आहेत..

‘पोरगं मुंबईला शिकेल आणि आमचं नशीब उजाडेल’ या  एका आशेवर ग्रामीण महाराष्ट्रातल्या काही हजार आईवडिलांचे आयुष्य पुढे सरकते आहे. कुठे ओला तर कुठे सुका; पण दुष्काळ आहेच. अशा परिस्थितीत आईवडिलांपासून दूर जाण्याची इच्छा कोणाचीच नसते. पण ही परिस्थिती बदलायची तर व्यावहारिक निर्णय घ्यावा लागतो. नुकतीच ‘कायद्याने सज्ञान’ झालेली मुले-मुली उज्ज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन गाव सोडतात. मुंबईत आल्यानंतर स्वत:च्या गुणवत्तेवर मिळवलेली शासकीय वसतिगृहे हा त्यांचा एकमेव आधार असतो.

नव्या जगाशी जुळवून घ्यायचे तर जुन्या आठवणी कुरवाळत बसून चालत नाही. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देतात. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट या सगळ्यामध्ये दिवस कसा जातो कळतच नाही. मात्र रात्री वसतिगृहात परतल्यानंतर गावची आठवण उचंबळून येते. आईवडिलांना फोन करून खूप काही सांगायचे असते. मात्र पलीकडून येणाऱ्या आवाजातील वेदना नि:शब्द करते. पाऊस पडला तरी शेती नासते, नाही पडला तरी नासते. शिक्षणसुद्धा जेमतेमच असल्यामुळे इतर काही रोजगार मिळण्याची शक्यताच कमी. अशा आईवडिलांकडे रोजच्या जेवणासाठी आणि प्रवासासाठी पैसे कसे मागायचे? मग स्वत:च काही तरी बारीकसारीक कामधंदा करून दिवस ढकलण्यापुरते पैसे कमवायचे..

नोकरी, अभ्यास आणि घरची परिस्थिती यांचा विचार करून मेंदू पिळवटून निघतो. अभ्यासावरचे लक्ष विचलित होते; पण तरीही या विद्यार्थ्यांना नापास होण्याचा अधिकार नसतो. कारण यामुळे वर्षभराचा शैक्षणिक खर्च वाया जातो. शिवाय फेरपरीक्षेसाठी अतिरिक्त खर्च येतो. ‘ही परिस्थिती कधी तरी बदलेल’ या आशेवर हे विद्यार्थी पुढचे शिक्षण घेत राहतात.

नांदेडचा रमेश शेळके वरळी येथील मागासवर्गीय मुलांसाठीच्या शासकीय वसतिगृहात राहातो. एमएस्सी पूर्ण केल्यानंतर त्याने शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. ‘‘काही वर्षांपूर्वी वडील वारले. स्वत:चे शेत नाही, पण भाऊ लोकांच्या शेतात काम करून ५० ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न घेतो. त्यापैकी २५ हजार रुपये महाविद्यालयाचे शुल्क भरण्यातच जातात. त्यामुळे रोजचे खर्च भागवण्यासाठी एका कोचिंग क्लासमध्ये शिकवतो. प्रत्येक तासिकेसाठी ३०० रुपये मिळतात,’’ असे रमेश सांगतो.

साठय़े महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेणारा भगवान बोयाळही नांदेडचाच, कुंचली गावचा. वडील गवंडी आणि आई शेतमजूर. मात्र शिक्षणाची इच्छा जबर. चारही भावंडांनी पदवी गाठली, त्यामुळे भगवानचे कुटुंब हे त्याच्या गावातील पहिले पदवीधर कुटुंब आहे.

आपल्या मुलांनी शेतकरी बनावे असे भगवानच्या पालकांना कधीच वाटत नाही. भगवानचे नाव फक्त उदाहरणापुरतेच आहे.. कारण हीच कथा ग्रामीण भागातून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची आहे. त्यातून येतो निराळा प्रश्न.

सरकारी वसतिगृहे आणि प्रवेश शुल्कांच्या सवलती यामुळे शिक्षण पूर्ण होईलही.. पण मग पुढे काय? हा तो प्रश्न. तो भेडसावतो आहेच. गाव प्रत्येकालाच आवडते. मात्र तिथे जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. मुंबईत राहूनच काही तरी कामधंदा शोधण्याशिवाय पर्याय नाही. तोटय़ातली शेती हेच गावी परत न जाण्याचे कारण नाही. तिथल्या संथ जगण्याला आणि राजकारणालाही हे तरुण कंटाळलेले आहेत. मुंबईचे गतिशील जगणे आता अंगवळणी पडले आहे आणि वैचारिक खाद्याचीही चटक लागली आहे.

सोलापूरचा राजेश पाटोळे मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये पीएचडी करतो आहे. वसतिगृहाचे शुल्क वार्षिक साडेपाच हजार रुपये आणि भोजनगृहाचा खर्च महिन्याला किमान तीन हजार रुपये. कुटुंबाचे शेतीतील उत्पन्न वार्षिक ६० हजार रुपये. सचिन शिवशरण सध्या कीर्ती महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांला शिकतो आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे त्याला शक्य झाले नाही. महाविद्यालय आणि वसतिगृहाचा खर्च फारसा नाही, पण प्रवासखर्चासाठी सरकारकडून मिळणारा भत्ता बंद आहे. त्यामुळे पुढचे शिक्षण नोकरी करून पूर्ण करण्याचा विचार त्याने केला आहे, पण यामुळे अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहेच.

निर्मला निकेतन महाविद्यालयात समाजकार्य-शाखेत पदव्युत्तर पदवीचे (एमएसडब्ल्यू) शिक्षण करणारा अमित घयाल मूळचा बीडचा. बऱ्याच वर्षांनी त्याच्या गावात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, पण या वर्षीच्या पाऊसकाळात पाण्याचे हाल सरले. मात्र या अतिपावसाचा आणि नंतरच्या अवकाळीचा दुष्परिणाम असा झाला की, यंदा शेती उत्पन्न निम्म्यावर आले. ही परिस्थिती बदलावी म्हणून भविष्यात ग्रामीण विकासासाठी काम करण्याची अमितची इच्छा आहे. वाईट काळात सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी. त्याआधी महाविद्यालयातील ‘प्लेसमेंट’ हा अमितसारख्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे.

राज्यात या वर्षी आलेल्या पुराचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावरही वाईट परिणाम झाला आहे. पूरग्रस्त गावांतील मुले सध्या शिक्षणासाठी मुंबईत आहेत. मुंबईतल्या विविध वसतिगृहांमध्ये ही मुले राहात आहेत. त्यांच्या प्रश्नांनाही घरचे उत्पन्न (किंवा काही जणांचे घरही) बुडल्याच्या दु:खाची काजळी आहे. याविषयी पीएचडी विद्यार्थिनी कविता वारे म्हणाल्या : ज्यांना आरक्षण आहे त्यांना वसतिगृह आणि महाविद्यालयाचा खर्च यातून सूट मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र ज्यांना आरक्षण नाही अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची भीती आहे. पहिल्या सत्राचे शुल्क वर्षांच्या सुरुवातीलाच भरले असले तरी, पुढच्या सत्राचे शुल्क भरणे अजून बाकी आहे. विद्यापीठाने शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात शासन निर्णय निघालेला नाही. जातपात किंवा स्त्री-पुरुष असा भेद न करता सरसकट शुल्कमाफी मिळाली पाहिजे. नाही तर पुढच्या सत्राचे शुल्क भरायला पैसे नाहीत म्हणून आईवडील मुलांना गावी परत बोलावतील व यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

यावर उपाय काय? कविता वारे म्हणतात : सरसकट शुल्क माफ करणे शक्य नाही असे नाही. एखादी आपत्ती आल्यानंतर त्याचे नियोजन करण्यासाठी जशी आपल्याकडे यंत्रणा असते तशीच शैक्षणिक आपत्तीसाठी नियोजन यंत्रणा असणे आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी काही प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, पण ते पुरेसे नाही. पदव्युत्तर स्तरावरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य शासनाने मोफत पुरवावे.

ही अपेक्षा पूर्ण व्हावी, यासाठी काही विद्यार्थी संघटना लढतही आहेत. वसतिगृहातले विद्यार्थी जमेल तसा पाठिंबा या आंदोलनांना देतात, पण पहिले लक्ष अभ्यासाकडेच. परिस्थिती काहीही असो, आत्मविश्वास ढासळू द्यायचा नाही, आशावाद गमवायचा नाही हे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना परिस्थितीनेच शिकवले आहे. त्यामुळे कधी मित्रांकडून पैसे उसने घेऊन तर कधी स्वत: नोकरी करून रोजचे जगणे सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांसाठी आपण एकमेव आशा आहोत याची जाणीव या विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे शानशौकीच्या गोष्टींचे आकर्षण टाळून, प्रसंगी शैक्षणिक साहित्यात तडजोड करून या मुलांनी शिक्षण सुरू ठेवले आहे. भविष्यात जे वाढून ठेवले असेल ते असेल, पण सध्या हार मानायची नाही आणि मागे फिरायचे नाही असा निर्धार करून ही मुले पुढची वाटचाल करत आहेत.

namita.dhuri@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2019 2:39 am

Web Title: mumbai farmer spirit akp 94
Next Stories
1 अपना टाइम आएगा!
2 अस्वस्थ तरुणाईची ‘महापरीक्षा’!
3 तरुण आमदार, काय करणार?
Just Now!
X