गणेश पोकळे ganeshpokale95@gmail.com

जिथे विचारांचा परीघ वाढायला हवा तिथे तो इतका आकुंचन का पावतो आहे, हा प्रश्न विद्यापीठांमध्ये स्वत:ची जातीय ओळख नकोइतकी जपणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून पडतो..

विद्यार्थीदशेत वाढत्या वयानुसार जसे वर्ग बदलत जातात तसा विचाराचा परीघही विस्तारत जाणं अपेक्षित असतं. विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर शिक्षणासाठी येतो तेव्हा त्याच्या विचारांच्या पातळीवर ज्या काही धार्मिक, जातीय, भाषिक, विभागीय अशा अनेक चौकटी- ज्या विद्यार्थी म्हणून सर्वागीण विकासाच्या आड येताहेत- गळून पडायला हव्यात.. तेव्हाच आपण एका समृद्ध आणि प्रगल्भ राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर आहोत असं म्हणता येईल. मात्र अनेक कारणांनी, ज्यांना ‘विचारपीठ’ म्हणायला हवे अशा विद्यापीठांतही जातीय आणि धार्मिक झाकोळ फार वेगाने पसरू लागला आहे. या पसरणाऱ्या झाकोळाला आटोक्यात आणण्याऐवजी आगीत तेल ओतल्यासारखे त्याला पोषक वातावरण निर्माण करणारे पहिल्या रांगेतही असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती नाकारता येत नाही.

स्थळ : औरंगाबादचा क्रांती चौक. पर्यावरण जनजागृतीसाठी पाच जून या पर्यावरणदिनी काही मित्रांनी इथं ‘मानवी साखळी’ हा सामाजिक उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला हजार लोक येतील असा अंदाज वर्तवला होता, मात्र प्रत्यक्षात १०० च्या आतच उपस्थिती. हेच ठिकाण होत जिथं मराठा मोर्चाला लाखोंची गर्दी जमली होती. हेच ठिकाण होतं जिथं भीमा कोरेगाव प्रकरण झालं तेव्हा लाखोंची गर्दी जमली होती. आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर हेच ठिकाण होतं, जिथं इम्तियाज जलील खासदार झाल्यावर जल्लोष करणाऱ्यांची गर्दी उसळली होती. मात्र, पर्यावरण दिनासाठी याच जागी, १०० च्या वर तरुण फिरकले नाहीत. या उपक्रमाच्या आयोजनात विद्यापीठात शिकणाऱ्या काही मुलांचा पुढाकार होता; मात्र मानवी साखळीसाठी सहभाग फारच कमी होता. त्याच वेळी मनात आलं, नैसर्गिक प्रदूषणापेक्षा सामाजिक प्रदूषण किती वाढलंय.

औरंगाबाद शहर आणि त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेली काही वर्ष जवळून पाहता आलं. इथल्या तरुणांच्या मनात धार्मिक तेढ इतकी निर्माण झालीय (किंबहुना ती केली गेलीय) की, दोन्ही बाजूंच्या (!) लोकांनी कायम सावधान स्थितीत असल्यासारखं वागावं. कधी कोण कुणावर धावून जाईल, याचा नियम नाही. इथे टप्प्याटप्प्यावर जातीय समीकरणं मजबूत होताना दिसली आणि विद्यार्थी म्हणून या वर्गातून पुढच्या वर्गात वाटचाल झाली; मात्र विचारांची पातळी नको त्या जातीय आणि धार्मिक पातळीवर स्थिरावत असल्याचा अनुभव आला.

भारतीय समाज हा संमिश्र, वैविध्याने नटलेला आहे. इथे भाषा, धर्म, जात, वंश हे सगळं वेगवेगळं असलं तरी देशातली ही सर्व माणसं आपली आहेत ही भावना जिथं वाढायला हवी, त्या विद्यापीठ पातळीवरच- हा माणूस कोणत्या धर्मात आणि कोणत्या जातीत जन्माला आला, हा विचार बळकटी घेताना दिसतोय. बरं, हे घडतंय कुठं? तर, ज्या माणसाने आपली हयात जात नष्ट व्हावी यासाठी खर्ची केली, त्या माणसाच्या नावानं असलेल्या विद्यापीठात. पण फक्त याच विद्यापीठात ही स्थिती आहे आणि बाकी सर्व विद्यापीठं ही धुतल्या तांदळासारखी आहेत, असं मुळीच नव्हे.

विद्यापीठात संबंधित विभागात प्रवेश झाल्यावर सुरुवातीचे चार-सहा महिने अगदी गुण्यागोविंदानं जातात. कुणी कुणाचा डबा खातं, कुणी कुणाच्या रूमवर राहतं, कुणी कुणाला लागेल ती मदत करतं. हा सर्व प्रवास फक्त मित्र किंवा मत्रीण म्हणून सुरू झालेला असतो. मात्र, जेव्हा सुरुवातीचे हे चार-सहा महिने सरळमार्गी निघून जातात आणि मग समोर एक घाट येतो, ज्या घाटात जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतीय, पक्षीय अशी अनेक सामाजिक दुही निर्माण करणारी वळणं असतात. मग वर्गातल्या तीस-चाळीस मुलामुलींत चार-चार गट पडलेले असतात. सर्वाशी प्रेमाने कितीही घसा कोरडा केला तरी रूममध्ये आपल्याच जातीतले मित्र वा मत्रिणी कसे घेता येतील, यासाठी शर्थीचे प्रयत्न असतात. कुलगुरू कुठल्या जातीचे आहेत आणि अधिसभा सदस्य कुठल्या जातीचे आहेत, यावर विद्यार्थी संघटना आपापला आक्रमकपणा दाखवतात. अपवाद सगळीकडं आणि सगळ्या क्षेत्रांत असतातच, तसे इथंही सापडतीलच; मात्र अपवादांना झाकोळून टाकतील इतकं या जातीय आणि धार्मिक भेदभावाची गर्दी इथं झालेली दिसते. जेवणासाठी मेस लावली तरी मराठय़ांच्या मुलांनी मेसवाला मराठय़ाचा पाहावा, दलितांनी दलितांचा पाहावा आणि वरून ‘कशाला लोकांना मोठं करायचं, होऊ द्या आपला मोठा होतोय तर’ असं म्हणत आपल्याच जातीय आणि धार्मिक कृतीचं समर्थन करून मोकळं व्हायचं! हे सर्रास होत नसलं, तरी मोठय़ा प्रमाणात होतं आहे, हे नक्की.

डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी होते त्या दिवशी ‘आज त्यांचा सण आहे’ म्हणून;  ‘आपला’ आणि ‘त्यांचा’ काहीही संबंध नाही या आविर्भावात काही विद्यार्थी रूममधून बाहेर येतच नाहीत आणि काही आले तरी गणपतीच्या मिरवणुकीत आपल्या अंगावर गुलाल पडू नये म्हणून कोपऱ्या कोपऱ्याने निघून जाणाऱ्यांसारखे, नाहीतर अंग चोरून गर्दीतून बाहेर पडल्यासारखं निसटतात. हीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाही. आपण कुठं बाहेर फिरायला जाऊ म्हणत चारदोन मित्र सोबत घेऊन त्या दिवसापुरते विद्यापीठ सोडलं जातं. या दोन्हीकडे, विचारांच्या पातळीवर सर्वागीण विचार करणारे आणि जातीय विचारला तिलांजली देणारे दिसतीलही- जे दोन्हीही जयंतीला उस्फूर्तपणे सहभागी होतात- मात्र, ‘हे त्यांचं आणि हे आमचं’ म्हणून दडून बसणारांची आणि कायम जातीय पातळीवर विचार करणारी संख्या यांच्यापेक्षा जास्त आहे व ती संख्या विद्यापीठात शिक्षण घेते आहे!

उच्चशिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांत अशा जातीय-धार्मिक गोष्टींची मोठय़ा प्रमाणात वाढ होतीये. वर्गात शिकवणारा शिक्षक कितीही जीव तोडून शिकवत असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून तो कुठल्या जातीचा आहे, याची चौकशी करण्यासाठी इथला विद्यार्थी जास्त जीव तोडतोय. मराठा विद्यार्थ्यांनी दलित शिक्षकाला शिव्या द्याव्यात, दलित विद्यार्थ्यांनी मराठा शिक्षकाला शिव्या द्याव्यात आणि या दोन्हीकडील विद्यार्थ्यांनी ब्राह्मण शिक्षकाला शिव्या द्याव्यात, ही विद्यापीठातली वर्णव्यवस्था! ‘आपण विद्यार्थी म्हणून या शिक्षकांकडून आवश्यक ते ज्ञान घेऊन जाऊ’ या भावनेपेक्षा जातीतून आलेली द्वेषाची भावना अधिक बळकट झाल्याने कितीतरी विद्यार्थ्यांनी तो अमक्या-अमक्या जातीचा शिक्षक आहे म्हणत आपल्याला हयातभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी गमावली आहे. आपण विद्यार्थी म्हणून किती खोल आहोत, हे पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी हा शिक्षकच किती तळातला आहे हे पाहणं पसंत केलं. वास्तविक, आपण विद्यार्थिदशेत असताना ज्ञानाच्या पातळीवर गुरूकडून जे घेता येईल ते घेण्यापेक्षा जातीय आणि धार्मिक पातळीवर जाऊन ते का नाकारावं?

याखेरीज, कित्येक मुलं-मुली ऐन उमेदीच्या काळात जातीय विळख्यात अडकल्याने आपलं जीवन संपवताहेत. आत्महत्येची कारणं सगळीच जातीय नसली तरी शंभरातल्या ९० आत्महत्यांमागे जातिभेद हे एक कारण असतं, हे नाकारता येणार नाही. बरं, ही गोष्ट अगदी खेडय़ात वा शिक्षणाच्या अभावातून होत नसून, शिक्षणाच्या सर्वोच्च शिखरावर अशा जातीय आणि टोकाच्या घटना घडाव्यात हे आभाळ फाटण्यासारखं आहे, ज्याला कुणी शिवू शकत नाही. २००७ ते २०१५ पर्यंत उच्चशिक्षण संस्थांत ४० हून अधिक आत्महत्या झाल्यात. शिक्षण संस्थांच्या आवारात किती जातिमूलक वातावरण पसरतंय हे यावरून लक्षात येईल. यामध्ये कोणत्या समाजाच्या मुलांनी आत्महत्या केल्या, याकडे किंचितही दुर्लक्ष करता येणार नाही. खरा प्रश्न असा की, जातीच्या चौकटी जिथे गळून पडायला हव्यात, तिथे त्या इतक्या बळकट का होत आहेत? जिथे विचारांचा परीघ वाढायला हवा, तिथे तो इतका आकुंचन का पावतो आहे? जिथं एकमेकांकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी उजळत जावी त्या दृष्टीवर विषमतेचा पडदा का यावा ?

या प्रश्नांचा कधी विचार होणार की नाही? कारण ही असंख्य प्रश्नांची जंत्री जिथे सुटली पाहिजे तिथेच ती निर्माण झाली आहे आणि ती वाढतेच आहे.