25 February 2021

News Flash

लग्नाच्या बाजारात..

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे हा अट्टहास आजही धरला जातो आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

घरची आर्थिक स्थिती व्यवस्थित असूनही, ‘मुलाला नोकरी नाही’ म्हणून अनेक तरुणांची लग्ने अडून राहिली आहेत. सुशिक्षित मुलींना शेतीत जन्म काढायचा नाही, हे त्याचे एक कारण. मात्र ‘गर्भजल चाचणी केंद्रां’च्या नंतरच्या एका पिढीत मुली संख्येने कमी; त्यामुळे नवे प्रश्न उभे राहू लागले आहेत..

गावातील कोणत्याही गल्लीत गेले आणि जर ‘बाळूऽऽ’ म्हणून हाक मारली, तर किमान चार-पाच जण  ‘ओ’ देतील, असे म्हटले जाई. ती स्थिती आजही ग्रामीण भागात पाहण्यास मिळत असली तरी गेल्या दशकापासून, ‘लग्नाळू कोणी आहे काऽऽ?’ अशी विचारणा केली तरी प्रत्येक गल्लीत दहा-पाच तरुण ‘ओ’ देतील ही वस्तुस्थिती आहे. खेडेगावातच नाही तरी अगदी शहरी भागातही लग्नाळू तरुणांच्या संख्येत वर्षांकाठी भर पडत आहे.

नोकरीची शाश्वतीच नाही तर छोकरी कोण देणार आणि कोणती छोकरी वरणार, असा प्रश्न आज पाच-दहा घरांमागे एका घरात पडला आहे. अगदी वयाची चाळिशी उलटली तरी अद्याप वधू संशोधन सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ही स्थिती गरीब-मध्यमवर्गीय घरांत दिसत असली तरी या सामाजिक प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने लक्ष गेल्याचे दिसत नाही. विशेषत: ज्या समाजाने ‘मुलगाच वंशाचा दिवा’ असे गेल्या दशकभरापूर्वीपर्यंत मानले त्या समाजात आज मुलींचे प्रमाण कमी नसले तरी अपेक्षित स्थळ दिसत नसल्याने मुलांना मुलींनी देण्यास नकार देण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आर्थिक स्थितीच कारणीभूत आहे असे मात्र म्हणता येणार नाही.

मुली अलीकडच्या काळात सुशिक्षित झाल्या आहेत. ‘आईबापाने दिल्या घरी’ समाधानाने संसार करणे, अपेक्षांचे ओझे मनातच ठेवणे या गोष्टी टाळून स्वत:चे मत तयार करू लागल्या आहेत. यातून चौकोनी कुटुंबाचा आग्रह, शहरी वातावरणाची गरज, छानछौकी राहणीमान हवे, नोकरदार पती असावा आणि शासकीय, बँकिंग क्षेत्रातील कायमस्वरूपी नोकरी हवी, अशा अपेक्षा मुलींच्या आहेत. तसेच राहायला बंगला नसला तरी हक्काचे घर हवे, घरात सुखसोयी हव्यात, दूधदुभते हवे, मात्र जनावरांची उसाबर करण्याची सक्ती नको आहे. यातून अपेक्षेप्रमाणे मिळेलच असे स्थळ देवदुर्लभ झाल्याने स्थळ नाकारण्याचे प्रमाण मुलींमध्ये वाढले आहे. परिणामी लग्नाळू तरुणांची संख्या वर्षांगणिक वाढत चालली आहे.

घरातील छोटय़ा पडद्यावर दिसणारे छानछौकी जीवन वास्तवात असू शकत नाही याची जाणीवच मुलींना आईबापाकडून करून दिली जात नाही. यामुळे रोजच्या मालिकामधील जग पाहून अशाच पद्धतीने आपले घरकुल असावे, स्वप्नातील राजकुमारही असाच असावा, या कल्पनेच्या राज्यात मुली गुंतत चालल्याने अपेक्षाभंग होत आहेत. यातून एकीकडे मुलींची अवस्थादेखील बिकट होते आहे. अपेक्षित स्थळ लवकर मिळेलच याची खात्री नाही. प्रतीक्षा करून मिळालेल्या घरात मनातील सर्व कल्पना सत्यात उतरतील याची खात्री देता येत नाही, त्यामुळे आयुष्याचा कोंडमारा पदरी येत आहे.

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे हा अट्टहास आजही धरला जातो आहे. यातून अवांच्छित मुलींचा गर्भ खुडण्याचा मार्ग स्वीकारला जातो. यातूनच पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात बीड, म्हैसाळसारखी बेकायदा गर्भपात केंद्रे राजरोसपणे उघडली गेली, हा इतिहास ताजा आहे. याचे दुष्परिणाम आज अख्ख्या समाजाला भोगावे लागत आहेत. ज्या तरुणाला नशिबाने नोकरी मिळाली अशा तरुणांना मुलीचे आईबाप पायघडय़ा घालण्यास एका पायावर तयार आहेत. अशा मुलांची लग्ने होण्यात फारसे काही अडत नाही.      मात्र शेती पाणस्थळ, दावणीला चारदोन जनावरे, वर्षांला उसापासून- द्राक्षापासून दहा-वीस लाखांची कमाई असणाऱ्या मुलांची लग्नाच्या बाजारात हेळसांड होत आहे. गावगाडय़ात राहण्यास शिक्षित मुलींची नाखुशी हे जसे कारण आहे तसेच शेती व्यवसाय बेभरवशाचा वाटू लागल्याने मुली अशी स्थळे नाकारत असल्याचे चित्र दिसत आहे.

मुलींचा नकार येत असल्याने मुलीकडे हुंडा मागण्याची पद्धत मात्र आजकाल बऱ्यापैकी बंद झाली आहे. मुलीलाच हुंडा देण्याची तयारी अनेक वरपिते दर्शवू लागले आहेत. दुसऱ्या बाजूला जातीपातीची बंधनेही लग्नाळू तरुणांमुळे गळून पडू लागली आहेत.

गुपचूप विवाहांचे एजंट

एकर-दोन एकर द्राक्षबाग असलेला द्राक्ष बागायतदार असो वा ऊस बागायतदार असो, दारात बुलेट आहे, राहायला आरसीसी इमारत आहे, चार पैसे बँकेत आहेत, तरीही केवळ ‘मुलाला  नोकरी नाही’ या कारणावरून स्थळे नाकारली जात असल्याचे प्रकार घडू लागल्याने लग्नाळू तरुणांना मुली मिळवून देणारा नवीन व्यवसाय उदयास आला आहे.

या व्यवहारात मुलाकडच्या बाजूने चार-पाच लाख रुपये खर्चाची तयारीही पाहिली जात असून अशा कुटुंबांकडून अन्य जातींतील मुलीही स्वीकारल्या जात आहेत. यातून फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. मात्र सगळा व्यवहारच जातीपातीच्या, भावकीच्या परवानगीविना केला जात असल्याने दादही मागायची कोणाकडे, असा प्रश्नही उभा ठाकला आहे.

लग्नाळू तरुणांना मुली मिळवून देणारे एजंट तयार झाले असून सांगलीजवळ आष्टा येथे या एजंटांनी चोरटी कार्यालयेही काढली आहेत. नदीकाठच्या सधन भागात सुबत्ता असूनही लग्नाळू तरुणांची संख्या जास्त आहे. अशा तरुणांची आणि त्यांच्या कुटुंबांची मानसिकता अन्य जातीतील मुलींचा स्वीकार करण्याची निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन कर्नाटकातील अन्य जातीच्या मुली दाखविण्याचा कार्यक्रम एखाद्या हॉटेलमध्ये आयोजित केला जातो. तिथे मुलींच्या पालकासोबत आर्थिक व्यवहार निश्चित केला जातो. मग एखाद्या मंदिरात वधू-वरांनी एकमेकांना हार घातले की झाला लग्नविधी.

अशा मुलींना समाजाच्या देवळात प्रवेश नाकारण्याचा प्रकारही मध्यंतरी मिरज तालुक्यात घडला होता. अशा आठ मुलींना मंदिरप्रवेश देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थानिक शाखेने प्रयत्न केले. मात्र या मुलींच्या माहेरच्या माणसाबद्दल फारशी माहिती कुणालाच असत नाही. चार-सहा महिने मुलगी सासरी नांदते, एखादे कृत्य मनाविरुद्ध घडले तर अंगावर घातलेल्या सुवर्ण-अलंकारासह पोबारा करते. पुन्हा या मुलींचा शोध घ्यायला गेले तर ना तिचे पालक भेटतात, ना एजंटांनी शाश्वती दिलेली असते. यात तरुणांची मानसिकता बिकट बनत चालली आहे. अशा पद्धतीने लग्न लावून देणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी लावला होता. मात्र त्याचा लग्नाच्या बाजारावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आजही मुलींची अशा रीतीने खरेदी-विक्री करणारी आणि लग्नानंतर फसवणूक करणारी टोळी काही ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसत आहे.

माणूस हाही एक प्राणीच आहे. त्यालाही भूक, भय या नैसर्गिक प्रेरणांबरोबरच लैंगिक प्रेरणाही तितकीच आहे. घरात पोटाला ददात नाही, मात्र लैंगिक भूक भागविण्यासाठी समाजाने केलेली विवाहव्यवस्थाच पूर्ण होऊ शकत नसल्याने तरुणांचा होत असलेला कोंडमारा विलक्षण नराश्याकडे नेत आहे. लग्न ठरत नसल्याच्या नराश्यातून मंगळवेढा तालुक्यातील सलगरच्या सुरेश घायगुडे या २४ वर्षांच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली, ही घटना गेल्याच आठवडय़ातली.

लग्नापुरती नोकरी?

लग्नासाठी नोकरदार मुलांना मुली अग्रहक्काने पसंती देत आहेत हे लक्षात आल्यावर घरची सुबत्ता आहे, द्राक्षबागेत कामाला रोज चार माणसे आहेत अशा सुखवस्तू शेतकरी कुटुंबातील लग्नाळू तरुण एमआयडीसीमध्ये एखाद्या कारखान्यात महिन्याला चार-पाच हजारांसाठी कामाला जात असल्याचे चित्र शहराजवळच्या ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.

यापेक्षा वेगळा प्रकार वाळवा तालुक्यात दिसून आला. मुलाचे लग्न होईपर्यंत हंगामी नोकरी देण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. या मुलांना पतसंस्थेत नोकरी देण्यासाठी पाच लाखांची ठेव ठेवावी लागते. या बदल्यात नोकरीही दिली जाते, अगदी कागदोपत्री पगाराची स्लिपही दिली जाते. ही स्लिप दाखवून वधू मिळविण्याचे प्रकारही घडत आहेत. सहकारी बँकांमधून वसुलीसाठी कंत्राटी पद्धतीने तरुणांना नोकरीवर घेतले जाते, या बदल्यात राजकीय स्वार्थ तर साधला जातोच, पण लग्नाळू तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सोडविल्याचे पुण्यही पदरी घेणारे पुढारी आज पाहण्यास मिळत आहेत.

लग्नाळू तरुणांच्या स्वप्नांची दुनिया एकीकडे काळवंडत असताना याच युवकांकडून देश तर लांबच, घराला घरपण देण्याची अपेक्षा कशी धरायची याचा घोर पालकांना लागला आहे. आज ही समस्या प्रामुख्याने जैन समाजात असली तरी अशीच स्थिती बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजातही नजीकच्या काळात दिसण्याची चिन्हे आहेत. जमीनजुमला आहे, मात्र मुलगी लग्नाला राजी होत नाही. यातून विनादावणीच्या जनावराची जी अवस्था होते त्या अवस्थेकडे लग्नाळू तरुणांची वेगाने वाटचाल सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 1:05 am

Web Title: unemployed youth not get married
Next Stories
1 समाजबदलासाठीचे बंड..
2 समाजमाध्यमातून.. समाजकार्यात!
Just Now!
X