19 October 2019

News Flash

गेलं देशांतरा कोणी..

‘मढं ठेवावं झाकून अन् रान पेरावं घातीनं’ अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे.

आजही हे चित्र अपवादाने कुठे कुठे दिसते; पण नाइलाज म्हणूनच..

दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

नव्या पिढीला शिक्षण दिले तर चांगली नोकरी लागेल, घर सुधारेल अशी भाबडी आशा मागच्या पिढीतल्या बळीराजाला होती. मात्र, शिक्षण घेऊन नोकरीच्या निमित्ताने गावातून शहरात आलेला तरुण मातीला दुरावला.. अन् श्रमापासूनही दूर गेला.

‘मढं ठेवावं झाकून अन् रान पेरावं घातीनं’ अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे. कारण खरिपाचा पेरा घातीने केला तरच मोत्याचा तुरा लाभण्याची चिन्हे असतात. परिणामी सालबेजमी होणे कठीण. याच दिवसांत पेरणीसाठी जुगाड करता करता नाकी नऊ येते. काहीतरी करून रान पेरले तरच पुढच्या दिवसांची बेजमी ठरलेली; अन्यथा घात जर हुकली, तर अख्खं साल दुसऱ्याच्या रानाची वाट तुडवूनही पोटआग विझेलच याची शाश्वती राहत नाही. म्हणूनच या म्हणीचा प्रत्यय आज बळीराजाला आल्याविना राहत नाही.

खरिपाचा पेरा हा मृग नक्षत्रावर साधला तर बाराआणे पीक येण्याची खात्री नसली तरी किमान दावणीच्या जनावरांची बेजमी होण्याची शक्यता हमखास असते. पसा दोन पसा धान्य आले तर संक्रांत गाठण्याची शक्यता असते. तेही साधले नाही, तर सगळेच मुसळ केरात जाण्याचा धोका असतो. यामुळेच शेतकरी घरात दुखण्याने आजारी असला, तरी रानात पेरणी करण्यासाठी शेजारीपाजारी मदतीला धावून येत असत आणि रान पेरून मोकळे होत. ही श्रमावर आधारित संस्कृती आजच्या व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात लोपली काय, अशी शंका येत आहे. केवळ शंकाच नाही, तर तसा प्रवाहही आजच्या काळात दिसत आहे. वस्तू विनिमय पद्धती, ग्राम संस्कृतीशी निगडित बलुतेदारी मागे पडली आणि शेतीला बाजाराची जोड मिळाली. यातून ग्रामीण भागातील श्रम-मूल्यच नाहीसे झाले.

पेरणीचा हंगाम आणि शाळा-महाविद्यालय प्रवेशाचा हंगाम हे एकाच वेळी हातात हात घालून येतात. आज १४ वर्षांपर्यंतच्या बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असले, तरी खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना यात सूट आहे. शेजारणीचे मूल गळ्यात टाय, पायात बूट घालून जाते, तर माझे अनवाणी कसे जाणार! शिक्षणाबद्दलची ही जागृती गेल्या काही दशकांत ग्रामीण भागात आली. ती नुसत्या शालेय शिक्षणापुरतीच नाही, तर महाविद्यालयीन शिक्षणाविषयीही. शिक्षण घेतले की नोकरीचा- परिणामी भाकरीचा प्रश्न निकाली निघेल, अशी एक भाबडी आशा यामागे आहे. या मन्वंतरामागचे कारण म्हणजे निसर्गात गेल्या अर्धशतकात झालेला बदल.

त्यात महत्त्वाचा ठरला १९७२ सालचा दुष्काळ. अख्ख्या महाराष्ट्रातील शेतीचे अर्थशास्त्र बदलण्याची किमया या दुष्काळाने घडवली. त्यावेळी हंगामात पावसाने पूर्ण दडी मारली. मात्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टँकरची मागणी कुठेही करण्यात आलेली नव्हती. या दुष्काळाने सुकडीवर पोट भरण्यास शिकवले. तसेच ‘रोजगार हमी’च्या कामावर केवळ हजेरी भरली, की सुकडी आणि पकाही भेटतो याची जाणीव नव्याने झाली. कामाच्या मोबदल्यात सुकडी, शाळेत मुलांना दुपारचा पोषण आहार म्हणून सुकडी आणि पाहुणा घरी आला तर सुकडीपासून तयार केलेले लाडू ही मेजवानी होती. या दुष्काळाने ग्रामीण भागाचे केवळ अर्थकारणच बदलले असे नाही, तर समाजजीवनाशी समरस असलेली कार्यसंस्कृतीच मागे पडली. ती कशी?

तर.. तत्पूर्वी घरच्या दावणीला चार-दोन जनावरे हमखास असायची. कळत्या वयातील पोरांना दावणीच्या जनावरांना रात्री-बेरात्री उठून वैरणकाडी करावी लागत होती. दिवसाचा गोंडा फुटायच्या आत शेणघाण काढून गोठा स्वच्छ करून दावणीला चघळून राहिलेली चिपाडं पाणी तापविण्याच्या चुलीपुढे पडत होती. तांब्या घेऊन पांदीला जात असताना शेणाची पाटी डोईवर आणि पाणवठय़ावरून घेऊन यायची घागर खांद्यावर असे. मुलींना उरलेल्या शेणात शेणी थापायचे काम ठरलेले असायचे. ओढापात्रात अंघोळीचे सोपस्कार झाले, की येताना पाणवठय़ावरून भरलेली घागर घेऊन घरी यायचे अन् जाणत्यांची न्याहारी घेऊन रानाकडे जायचे. रानात न्याहारी देऊन आल्यावर घासमुटका खाऊन शाळेकडे दप्तर घेऊन पळायचे. तोवर शाळेतील प्रार्थनेची घंटा कधीच झालेली असायची. शाळेच्या आवारातच ‘जन-गण-मन’ सुरू झालेले असायचे. शाळेला सुट्टी असेल, तर रानात काम असायचेच. भांगलन, ते नसले तर कोळप्याच्या पाळीसाठी दोघा जाणकारांच्या मधली पात धरायची. जर लक्ष विचलित झाले आणि कोळपं पिकांवर गेले, तर बापाचे रुमनं पाठीत बसलेच! पहाटेपासून शाळेच्या वेळेपर्यंत विहिरीवर मोट सुरू असायची, त्यावेळी पिकात दंडमोडणीसाठी थांबावे लागत असे..

पण शेतीच्या या अशा श्रममूल्य असणाऱ्या कामापासून- पर्यायाने मातीपासून आजची पिढी दूर चालली आहे, याला कारण १९७२ चा दुष्काळ आहे. या दुष्काळात घरंदाज, गोशा पाळणाऱ्या घरांतील महिलाही सुकडी आणि रोजगाराच्या आशेने उंबरठय़ाबाहेर पडल्या. मुरुमाच्या चार पाटय़ा सडकेवर विस्कटल्या तरी हजरी लागते; त्यात मुकादम ओळखीचा असल्यास सावलीला बसून हप्ता भरला तरी पगार मिळतो, याची तेव्हा नव्याने झालेली ओळखच आजच्या श्रमचोरीला कारणीभूत ठरली. या दुष्काळाने जाणवून दिले, की केवळ शेतीवर कुटुंबाचा गाडा चालणार नाही. याला पर्याय हा केवळ नोकरीचा आहे. त्यासाठी शिक्षण हवे. तालुक्यांच्या ठिकाणी, मोठय़ा गावांत मग पारंपरिक आणि संगणकविषयक शिक्षण देणाऱ्या संस्था उदयाला आल्या. त्यांत जाणारी विशी-बाविशीतील मुले-मुली हळूहळू शेतीच्या कामांपासून दूर होऊ लागली.

या काळात एकरावरील शेती गुंठय़ावर आली. कुटुंब वाढले, विभाजित झाले, तशी शेतीही कमी झाली. यातच शहराच्या अवतीभोवती असलेली शेती गुंठय़ावर खरेदी करणारे आणि मागणीपेक्षा जादा दर देणारे- शहरीकरणात बेघर असलेले – लोक पुढे आले. एकीकडे हे, तर दुसरीकडे १९७२ च्या दुष्काळाने शेतीव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला. हमखास उत्पन्न देणाऱ्या पीकपद्धतीचा अवलंब होऊ लागला. ‘बाजारपेठेशी निगडित शेती’ हा जीवन सुखी करण्याचा जणू मूलमंत्र असल्याचा आभास निर्माण झाला. मिश्र पिके घेण्याची पद्धतच मोडीत निघाली. ज्वारी-बाजरीबरोबरच हमखास एखादा पाटा कडधान्य- म्हणजे मूग, चवळी आदींचा असायचा. कमी पाण्यावर येणारी ही पिके होतीच, पण त्याचबरोबर दावणीच्या जनावरांचीही सोय यात अपेक्षित होती.

याच काळात हरित क्रांतीची स्वप्ने दाखवली गेली. काही काळात अन्नधान्य उत्पादनांत आपण स्वावलंबी झालो खरे; पण पुढील काळात कृषी-औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली साखर कारखानदारी, काही ठिकाणी कापड उद्योग उभे राहिले. यात एक पिढी स्थिरस्थावर झाली. शेतीवर यापुढील काळात गुजराण होऊ शकत नाही याची जाणीव झालेल्या या पिढीतील काहींनी नोकरी-रोजगाराच्या निमित्ताने शहरे जवळ केली. एकीकडे शहरांत नागरीकरणाचे नवे प्रश्न निर्माण झाले आणि दुसरीकडे खेडी ओस पडू लागली. नव्या पिढीला शिक्षण दिले तर चांगली नोकरी लागेल, घर सुधारेल अशी भाबडी आशा होती. मात्र, नोकरीच्या निमित्ताने गावापासून शहरात आलेला हा भूमिपुत्र मातीपासून दुरावला. जसा मातीपासून दुरावला तसाच तो श्रमापासूनही दूर गेला.

मागच्या पिढीने सोसलेले कष्ट पुढच्या पिढीला सोसावे लागू नयेत, यासाठी घरातील पाण्याचा तांब्याही उचलू न देणारे आजचे माता-पिता मुला-मुलीने शेणात हात घालण्यासारखे दुसरे कोणतेच मोठे पाप नाही असे समजू लागले. शेतीश्रमाची प्रतिष्ठा नाहीशी होण्याला हेही एक कारण. आता नोकरीच्या संधी कमी झाल्या. शासकीय नोकऱ्या कमीही झाल्या आणि स्पर्धाही भयंकर वाढली. अन्यथा वय वाढेतो शिकायचे, त्याचा व्यवहाराशी फारसा संबंधच नाही अशी आजची पिढी तयार झाली आहे. शारीरिक कष्टाची सवय जाणत्यांनाच नाही, तर मग पुढच्या पिढीचे काय? आणि आता तर.. ना. धों. महानोरांच्या शब्दांत..

‘सोडोनि संसार गेलं देशांतरा कोणी,

तळे मळे ओस झाले पाण्याच्या कारणी..’

First Published on June 20, 2019 4:58 am

Web Title: youth unemployment in rural areas rural youth leaving agricultural work