12 July 2020

News Flash

युवा स्पंदने : ‘चिठ्ठी’ ते ‘चव्हाटा’

भावना व्यक्त करण्यातले अडखळलेपण संपविणाऱ्या माध्यमांचा मोठा आधार या पिढीच्या हाती आहे..

(संग्रहित छायाचित्र)

आसाराम लोमटे

भावना व्यक्त करण्यातले अडखळलेपण संपविणाऱ्या माध्यमांचा मोठा आधार या पिढीच्या हाती आहे.. ग्रामीण भागात अनेक मुलामुलींच्या हाती मोबाइल आल्यामुळे भावविश्वात क्रांतीच झाली- प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली, तर फेसबुकसारख्या समाजमाध्यमांमुळे प्रेमाचे गुपित उघड होऊ लागले..

‘झालं का j-1..’ अशी सलगी करत कुणाच्या तरी इनबॉक्सात टपकण्याचा तो काळ नव्हता, ‘बदाम’ किंवा ‘स्मायली’ टाकून आपल्या भावनांना चिन्हांकित करण्याचीही सोय नव्हती. ‘लायकी’वरून समाजमाध्यमातले आपले स्थान जोखण्याची मापनपद्धती विकसित झाली नव्हती. फेसबुकच्या भिंतीवर लक्ष वेधून घेण्याच्या पर्वाला सुरुवात झालेली नव्हती.. तशी एक ‘व्हर्च्युअल’ भिंत असायची, ती शाळेत मुलामुलींमध्ये असलेली अदृश्य भिंत! गावात शाळा जरी दहावीपर्यंत असली तरी मुलीचे शिक्षण सातवी-आठवीत थांबवले जाई. वर्गात गुरुजींच्या अनुपस्थितीत मुलांचा आरडाओरडा आणि गडबड-गोंधळ चाललेला असला तरी मुली एका कोपऱ्यात बिचकून बसलेल्या असत. मुली स्वत:हून मुलांशी बोलत नसत आणि एखाद्याने धिटाईने प्रयत्न केला तर आपल्या या अस्फुट संवादाचे कुणी साक्षीदार तर नाही ना याची खातरजमा करूनच धडधडत हे तुटक संभाषण अगदीच थबकल्यापुरते होई. त्यात ठामपणा नसायचा. एखादीला ‘चिठ्ठी’ देणे हे अचाट धर्याचे साहस-कर्म असायचे. पूर्वी वह्य़ा-पुस्तकांमधून ज्या चिठ्ठय़ांचे वहन केले जायचे ती चिठ्ठी कुणाच्या नजरेला पडू नये म्हणून जिवाची घालमेल असायची. जणू सर्वत्र खडा पहारा. या चिठ्ठय़ांमुळेही काहींना शाळेलाच सोडचिठ्ठी द्यावी लागलीय. आता हे चिठ्ठय़ांचे युग अस्तंगत झाले. दररोज शाळेच्या फाटकातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा गावात दर्शन झाले तरी एकमेकांना ओळख दाखवायची नाही. थेट डोळ्याला डोळा भिडवणे तर दूरच. भेटीगाठी सहज नसायच्या. अशा वेळी कोणत्या तरी निमित्ताने भेट झालीच तर भेटीचे हे स्थानमाहात्म्य सहजासहजी विसरले जायचे नाही. ती जागा आणि तिथले संदर्भ अमीट मुद्रेसारखे उमटलेले असायचे. पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर अशा जागांचे कढ व्यक्त करणाऱ्या कविता वाचायला मिळायच्या. ‘तू गेलीस आणि आता त्या झाडाखाली कसं थांबवत नाही, त्याची सावलीही पोळू लागते’ किंवा ‘तो आठवणींचा पारही आता कसा सुना सुना वाटतोय’ अशा आशयाच्या त्या कविता असत. त्यांचा अंमल बऱ्याच जणांवर असायचा. ‘तुझ्या डोळ्यात अमुकतमुक दिसतेय’पासून ते ‘तुला अगदी चांदण्या खुडून आणून देईन’ अशी प्रेम व्यक्त करण्याची कृत्रिम शब्दकळा बऱ्याच कवितांमधून दिसायची. हातात हात घालून घेतलेल्या आणाभाका, डोळ्यांच्या कथित भाषेची लिपी, भेटीतली परिपूर्ती आणि कधी विरहानंतरची तगमग, ताटातुटीनंतरचे उसासे या अनेकांसाठी जीव लावून वाचण्याच्या गोष्टी असायच्या. अगदी नव्वदच्या दशकातही हे चित्र होते.

..आता भेटी सहज झाल्यात आणि प्रेम व्यक्त करण्यातले बिचकून जाणेही उरले नाही. समाजमाध्यमांनी थेट व्यक्त होण्याची परिभाषा दिली आहे. ज्या गावांतून मुलींना शिक्षणासाठी बाहेर ठेवणे शक्य नव्हते ती गावे दोन दशकांनंतरच प्रचंड बदलली. आता अगदी सहज फेसबुक अकाऊंट उघडले जाते आणि त्यावर आपले चरित्र आपल्या शब्दांत रेखाटले जाते. बिचकत अडखळत होणारा संवाद ते थेट समाजमाध्यमांवर जाहीर ‘कमेंट’ देण्याइतपत आलेली धिटाई हे सारे बदल झपाटय़ाने झाले आहेत.

आता शिकणाऱ्या तरुणाईच्या हाती मोबाइल आहे. ग्रामीण भागातही जवळपास प्रत्येकाकडेच तो आढळतो. मोबाइलने या भावविश्वातही मोठी क्रांती केलीय. अपेक्षित व्यक्तीशी होणारा संवाद यातून कोणत्याही मध्यस्थांशिवाय घडतो. भावना पोहोचल्यानंतर लगेचच हा संवाद पुसून पुरावा नष्टही केला जातो. पूर्वी प्रेम व्यक्त करण्यातली धडपड, पायांना सुटणारा कंप, ओठातून शब्दच न फुटणे आणि कानशिलं गरम झाल्यानंतर आधी जुळवलेल्या शब्दांचा लोळागोळा होणे या गोष्टी कदाचित आजची पिढी अनुभवत असेल की नाही माहीत नाही. कारण भावना व्यक्त करण्यातले अडखळलेपण संपविणाऱ्या माध्यमांचा मोठा आधार या पिढीच्या हाती आहे.

पूर्वी अगदी तालुक्याच्या ठिकाणापर्यंत जेव्हा ‘नेटकॅफे’ आले तेव्हा या ‘नेटकॅफे’वर गर्दी उसळलेली असायची. पोरं-पोरी छुपेपणाने अशा ठिकाणी यायची. ज्या गोष्टीबद्दल फारच लपून-छपून ऐकलं, बोललं जातं ते अगदीच उघडपणे दिसण्याची सोय झाल्यानंतर हे ‘नेटकॅफे’ काही वर्षे अगदीच फुल्ल चालले. तासावर पैसे आकारून त्यांचा धंदा चाललेला असायचा. आता मोबाइल हाती आल्यानंतर आणि त्यातच ‘नेट’ उपलब्ध झाल्यानंतर मग या ‘नेटकॅफें’वरील गर्दी हळूहळू ओसरत गेली. आता अनेक ठिकाणी कॉफी शॉप असतात. अशा ठिकाणी असलेल्या पडद्याच्या आडोशाआड मुलं-मुली दोन दोन तास गप्पा मारत असतात. ‘कॉफी’च्या दरापेक्षा तिथे बसण्याचा दर किती तरी पटीत असतो.

सुरुवातीला प्रेम व्यक्त करण्यातली धडपड आणि आपल्या उच्चाराला समोरून कसा प्रतिसाद असेल याबद्दलची अनाम भीती वाटायला लावणारी हुरहुर.. एखाद्यावर जीव जडणं.. क्षणोक्षणी त्याच्या सहवासात राहावंसं वाटणं.. प्रत्येक गोष्ट त्याला विश्वासाने सांगाविशी वाटणं.. त्याच्याशिवाय जगूच शकणार नाही ही भावना प्रबळ होणं.. या अशा गोष्टी सहजपणे घडतातच, पण त्यातूनच येणारी मालकीची भावना कधी कधी हिंसेलाही जन्माला घालते. ‘तू माझी आहेस म्हणजे तू दुसऱ्याची झालेली मला चालणार नाही, मी तसे होऊ देणार नाही’ या हिंसक पातळीवर हे जेव्हा येतं तेव्हा त्याने धारण केलेली विकृती ही थरकाप उडवणारी असते.

१९९०च्या दशकारंभी लातूर जिल्ह्य़ात सत्त्वगुणी जाधव या नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अक्षरश: जिवंत जाळून मारण्यात आले तेव्हा या घटनेने अवघे समाजमन हादरून गेले होते. एक भयप्रद सन्नाटा त्या वेळी सगळीकडे पसरला होता. ती घटना या भागातील पहिलीच, म्हणून आजही अनेकांना आठवते; पण कालांतराने अशा हिंसक पातळीवर उतरण्याच्या घटना वाढायला लागल्या तेव्हा प्रेमाचा सहजसुंदर आविष्कार काळवंडण्याचेही प्रकार घडायला लागले. यात कधी मुलगी, कधी मुलगा, तर कधी दोघेही हिंस्र प्रवृत्तींचे बळी ठरायला लागले.

विशिष्ट दिवशी हातात धागे बांधणं, भेटकार्ड देणं,भेटवस्तू- गुलाबाचं फूल देणं याचं लोण आता अगदी जिल्हा-तालुका पातळीवर आलंय. कधी काळी तथाकथित संस्कृतिरक्षकांचा याला विरोध असायचा, ‘ही आपली संस्कृती नाही’ वगैरेसारखी भाषा वापरून प्रेमी जोडप्यांना धमकावणे, त्यांना हाकलून लावणे असेही प्रकार घडायचे, आता छोटय़ा छोटय़ा गावांपर्यंत हे साहित्य मिळू लागले आहे. ‘रिलेशनशिप’, ‘ब्रेकअप’ या शब्दांचे अर्थही विनासायास कळायला लागले आणि त्यात बिचकून जाण्यासारखे काहीच नाही असेही वाटायला लागले. भावना व्यक्त करण्याचाही ‘इव्हेंट’ झाल्यानंतर आणि त्यातली सहजता जाऊन ते प्रदर्शनीय झाल्यानंतर व्यावसायिकपणाने त्याचा ताबा घेतला. यातही तसे बिचकून जाण्यासारखे काय आहे म्हणा!

aasaramlomte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2019 1:21 am

Web Title: yuva spandane article by asaram lomte 2
Next Stories
1 लग्नाच्या बाजारात..
2 समाजबदलासाठीचे बंड..
3 समाजमाध्यमातून.. समाजकार्यात!
Just Now!
X