प्रदीप नणंदकर

ग्रामीण भागातल्या मुलींनी शिकायचे, त्यासाठी गावातून जवळच्या शहरांत यायचे.. आणि जग पादाक्रांत करू पाहण्याची आकांक्षा जागी झाल्यावरही, या मुलींनी गावातल्या मुलीसारखेच वागायचे? विद्यार्थी म्हणून मुलगे आणि मुलींनी मर्यादा ओळखायला हव्यात हे खरे; पण अवघड वयात सर्वानाच सारे निभावता येते का?

‘आमचं कोणी ऐकून घेत नाही, समजून घेत नाही’ या विचाराची परिणती म्हणून चक्क दोन मुली व एक मुलगा असे तिघे अल्पवयीन मित्र लातूरहून कोणालाही न सांगता गोव्यात गेले व सर्व प्रकारची ‘मज्जा’ करून परत आले. पालकांना मुलांचा शोध लागला तेव्हा त्यांना आपली चूक कळली. अशा घटना आश्चर्य वाटण्यासारख्या नसल्या तरी याची संख्या वाढती आहे हे वास्तव आहे.

‘आमचा काळ कसा सुवर्णकाळ होता’ असं म्हणत भूतकाळात रमणाऱ्या पालकांच्या पिढीची, वर्तमानकाळातील वास्तवाकडे डोळे उघडे ठेवून सामोरे जाण्याची तयारी नसल्यानेही समस्यांचा गुंता वाढतो आहे. गेल्या दोन दशकांत मुलींच्या शिक्षणाबाबतीत प्रचंड क्रांती झाली आहे. मुलगा असो वा मुलगी ते शिकले पाहिजेत, हा समज ग्रामीण भागातही वाढीस लागला आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत चुकवण्याची तयारी पालकांची आहे. कधी शाळेसाठी तर कधी महाविद्यालयीन शिक्षणासाठी घरापासून दूर शहरात मुलींना पाठवण्याचा कल कमालीचा वाढला आहे. लातूर हे शहर १९९० च्या दशकापासून अशा शैक्षणिक आकांक्षांचे केंद्र ठरले आहे.

यातूनच, स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असे सकारात्मक बदल आजूबाजूला घडले. इंजिनीयर, डॉक्टर, प्राध्यापिका, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांत ग्रामीण भागातील मुली स्थिरस्थावर झाल्या आहेत. त्याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी शिक्षणाची ‘आस’ निर्माण होते आहे व त्याची पूर्ती करण्यासाठी पालक सगळं काही पणाला लावण्याच्या मन:स्थितीत आहेत.

आपल्या पाल्याबद्दल सगळं चांगलं व्हावं, नीट निभावून निघावं, असं सर्वच पालकांना वाटणं स्वाभाविक; मात्र शालेय पातळीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पावलोपावली अडथळ्यांची शर्यत आहे. दररोजचा उगवणारा दिवस नव्या समस्या घेऊन जन्माला येतो आहे. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या म्हणीची प्रचीती गावोगावच्या पालकांना रोज येते आहे.

या समस्या केवळ सामाजिक किंवा केवळ मानसिक नाहीत. शिकताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचायचा कुठे? मनातील प्रश्नांचा, संशयाचा, गुदमरलेपणाचा निपटारा कसा करायचा? हे प्रश्न साधे वाटले, तरी ते या भागातल्या अनेकांपुढचे यक्षप्रश्न आहेत. अवघड वयातले प्रश्न. प्रेशरकुकरमधील वाफ जर बाहेर निघाली नाही तर स्फोटच होणार ना? मग ‘गोव्यात जाऊन मज्जा’सारख्या घटना ऐकल्या, कानावर आल्या, पाहिल्या, की काळजाचा ठोका चुकतो. मनात संशयाचे, भीतीचे धुके दाटू लागते.

शाळेत, महाविद्यालयात, रस्त्यावर कुठेही सुरक्षित वाटावे असे वातावरण शिल्लक राहिले आहे, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. छेडछाड, रस्ता अडवणे, पाठलाग, धमकावणे हे प्रकार नित्याचेच झालेत. सभोवतालचे वातावरण, आयुष्याबद्दलची अस्वस्थता, अनिश्चितता, शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवर होत असणारे बदल यातून आपण जे करतो आहोत ते बरोबर की चूक हेही ठरवता येत नाही. मनासारखे खावे, प्यावे, ल्यावे, बागडावे, मौजमजा करावी. आयुष्याचा आनंद घेऊन पाहावा असे ऐकलेले असते.. मात्र ते वास्तवात आणताना कधी, कसे, किती व्यक्त व्हावे हे समजत नाही व त्यातूनच प्रश्नांचे गुंते वाढतात.

हाती मोबाइल, इंटरनेट आले, त्याचा नको तसा वापर सुरू झाला. सगळे काही पाहता येऊ लागले. त्याचे प्रात्यक्षिक करण्याचा मोह वाढू लागला. बॉयफ्रेंड नसणे हे मागासलेपणाचे लक्षण मानण्याची प्रथा ही आता केवळ पुणे, मुंबईच्या मुलींची मक्तेदारी राहिली नाही. बंदी असलेल्या गर्भनिरोधक गोळय़ा चारशेपट किमतीने विकत घेतल्या जातात व तेवढय़ाने नाही निभावले तर गर्भपात केंद्राकडे एकटीने जाण्याचे धाडसही वाढले आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही संकल्पना फार काही धक्कादायक वाटत नाही तसेच याचेही होते आहे.

मला माझ्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे. माझा विचार कोणी करत नसेल तर मी तरी इतरांचा विचार का करू? असा विचार प्रबळ होतो आहे. काही जणी अजाणतेपणी अडकतात व त्यातून बाहेर पडता येत नाही अशा मन:स्थितीत जातात. ‘मन मेरा अनंत कहाँ सुख पावे, जैसे जहाज को ऊडी पंछी जहाज पे पाछो आवे’ असे सूरदासांचे पद सांगते- अथांग समुद्रातून निघालेल्या जहाजावर पक्षी बसला असेल तर उडता येत असतानाही चहूबाजूंनी अथांग सागर असल्याने तो उडून जाईल कुठे? त्याला पुन्हा जहाजावरच यावे लागेल ना?

सगळी प्रलोभने समजा बाजूला ठेवली तरीही घर, गाव सोडून अन्य शहरांत शिक्षणासाठी राहताना वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी, संस्कृतीतील बदल, मित्रमत्रिणींतील वैचारिक बदल, मोकळेपणाच्या मर्यादा असे अमर्याद ताण वाढत आहेत.

मुलींनी तर काटय़ाकुटय़ांच्या रस्त्यातून, वाटेवरच्या काचांमधून स्वत: सुरक्षित बाहेर पडायचे. ही कसरत रोज करायची. या अग्निदिव्याची सवय करण्यावाचून मुलींना तरी सध्या पर्याय नाही.

सगळीकडून आगडोंब उसळतो आहे असे वातावरण असताना याही स्थितीत आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहात वाटचाल करणारे पाल्य आणि पालक कमी नाहीत. सगळेच आपल्या मनासारखे होणार नाही, तडजोडीचे गाठोडे म्हणजेच आयुष्य असते, अशी आयुष्याची व्याख्या मनाला पटवून नवी पाऊलवाट निर्माण करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. नव्या पिढीला, त्यांच्या ताणांना समजून घेऊन त्यांची अधिकाधिक स्वप्ने पूर्ण करण्यातच आपल्या पालकत्वाची धन्यता आहे असा समंजस विचार करणाराही वर्ग वाढतो आहे हे सुचिन्हच.

pradeepnanandkar@gmail.com