लहान मुलांच्या तयार कपडय़ाचे उत्पादन करणारी एस पी अपॅरल्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून कंपनीची तामिळनाडूमध्ये २१ उत्पादन केंद्रे आहेत. यामध्ये १६,८७६ स्पिंडल्स, ४८७४ शिलाई मशीन्स, ७९ एम्ब्रॉयडरी मशीन्स, २२ डाइंग मशीन्स तर १७ प्रिंटिंग मशीन्स आहेत. सध्या कंपनी आपला विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीच्या स्पिंडल्सची संख्या २२,२७२ तर शिलाई मशीन्स ५,२०० वर जातील. तसेच कंपनी ४० विणकाम करणारी मशीन्स बसवत असून, त्यामुळे कंपनीच्या उत्पादनात भरीव वाढ होईल आणि कंपनी आपल्या निर्यातीत वाढ करू शकेल. कंपनीकडे असलेला महत्त्वाचा ब्रॅण्ड ‘क्रोकोडाइल’च्या विस्तारीकरणासाठी कंपनीकडे ८५ वितरक तर ४,००० विक्री दालने आहेत. ऑनलाइन शॉपिंगमुळे तसेच उत्तम वितरण व्यवस्थेमुळे आता कंपनीकडे वाढती बाजारपेठ आहे. कंपनीचे आतापर्यंतचे आर्थिक निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे आहेत. गेल्या तिमाहीसाठी कंपनीने १२८.८४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४.०३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या ४१० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा समभाग तुम्हाला वर्षभरात २० टक्के परतावा देऊ शकेल.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअर्समधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.