डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड
डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे. जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्मॉल अॅण्ड मिड कॅप’ प्रकारात मोडणाऱ्या फंडांचा स्वप्नवत परतावा आहे. या फंडांनी मागील तीन वर्षांत वार्षिक २० ते २५ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असल्याने, मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदरांना मिड कॅप फंडाचा मोह पडणे स्वाभाविक आहे.
जानेवारी-मार्चदरम्यान बाजारात झालेल्या घसरणीत सर्वाधिक घसरण स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारात झाली. म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण ‘सेबी’च्या आदेशानुसार १ एप्रिलपासून लागू झाले. बाजार भांडवलानुसार पहिले १०० समभागांत गुंतवणूक असणारी योजना लार्ज कॅप, अनुक्रमे १०१ ते २५० मिड कॅप त्याचप्रमाणे २५१ ते ५०० ही स्मॉल कॅप प्रकारची योजना गणली जाईल.
फंडाची गुंतवणुकीसाठी शिफारस करताना फंडाच्या दीर्घकालीन कामगिरीची नेहमीच दाखल घेतली जाते. दीर्घकालीन कामगिरीचे मूल्यमापन करताना फंडाचे कामगिरीतील सातत्य हा एक महत्त्वाचा निकष मानण्यात येतो. जानेवारी-मार्च २०१४ दरम्यान एक मिड कॅप आणि एक लार्ज कॅप फंड अचानक ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाइल’मध्ये आले. या दोन फंडाची जानेवारी-मार्च २०१७ च्या ‘क्रिसिल रॅकिंग’मध्ये ‘थर्ड क्वारटाइल’मध्ये घसरण झाल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून एक तिमाहीवगळता डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड आपले अव्वल स्थान ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाइल’मध्ये अबाधित राखून आहे. फंडाच्या प्रमाणीकरण आणि वर्गीकरणानंतर ‘पॉइंट टू पॉइंट रिटर्न’वर अवलंबून निर्णय घेणे फोल ठरले आहे. ‘पॉइंट टू पॉइंट रिटर्न’पेक्षा परताव्याचे सातत्य राखणाऱ्या फंडाला गुंतवणुकीसाठी निवड करताना प्राधान्य देणे कधीही हिताचे ठरेल. याच निकषावर दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी या फंडाची निवड करावी.
वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)