एलआयसी एमएफ इन्कम प्लस फंड
हा फंड प्रामुख्याने एकूण गुंतवणुकीच्या ६५ टक्के गुंतवणूक अल्प मुदतीच्या ‘सीडी’ व ‘सीपी’ या गुंतवणूक साधनांत करतो. उर्वरित ३५ टक्के पर्यंतची गुंतवणूक २४ ते ३६ महिने मुदत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. फंडाच्या आघाडीच्या दहा गुंतवणुकांचा तपशील कोष्टकात (क्रमांक २) दिला आहे. ‘केअर’ या पत निर्धारित करणाऱ्या संस्थेने या फंडाला ‘CARE AAAmfs’ ही सर्वोच्च पत बहाल केली असून राहुल सिंग हे मे २०१७ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. राहुल सिंग यांनी आयआयएम, अहमदाबाद या संस्थेतून वित्तीय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली असून त्यांना दहा वर्षांचा निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका हाताळण्याचा अनुभव आहे.
रिझव्र्ह बँक व्याज दरकपातीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याने (अथवा यानंतर दीर्घकाळ व्याज कपात न होण्याच्या शक्यतेमुळे) दीर्घ मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारे ‘जी-सेक’ फंडात अथवा डायनॅमिक बॉण्ड फंडात गुंतवणूक करण्याने अधिक परतावा मिळण्याला वाव कमी आहे. म्हणून नजीकच्या काळात शॉर्ट टर्म फंडात गुंतवणूक करणे सर्वार्थाने – जोखीम व परताव्याचा दर यांच्यातील समतोल साधण्याच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. अर्थव्यवस्थेत पुरेशी रोकड सुलभता राखण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून १८ जुलै रोजी रिझव्र्ह बँकेने १२ हजार कोटींची खुल्या बाजारातून रोखे खरेदी केली. चालू आर्थिक वर्षांत एप्रिलपासून रिझव्र्ह बँकेने ५२ हजार कोटींची बँकांकडून रोखे खरेदी करून अर्थव्यवस्थेत अतिरिक्त रोकड सुलभता निर्माण केली. बँका आज पाच-सात वर्षे मुदतीचे रोखे विकून तीन-पाच वर्षांची मुदत असणारे रोखे खरेदी करीत आहेत. जेणेकरून भविष्यात कर्जाची मागणी वाढल्यास हे रोखे विकून बँका रोकड सुलभता निर्माण करू शकतील. याचा परिणाम आणखी वर्षभर तरी शॉर्ट टर्म फंडांचा परतावा ७.२५-७.५० टक्के दरम्यान राहील.
मे २००७ मध्ये फंडाच्या सुरुवातीच्या काळापासून गुंतवणूक केलेल्या १००,००० रुपयांचे २९ जुलैच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १,९५,४८५ झाले असून परताव्याचा दर ७.५८ टक्के असून हे उत्पन्न करमुक्त आहे. याच कालावधीत स्टेट बँकेत मुदत ठेवी करणाऱ्या ठेवीदाराला ८.५ टक्के परतावा मिळाला असून या व्याजावर ठेवीदारांना त्यांच्या करकक्षेनुसार कर भरावा लागला आहे.
वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com