अजय वाळिंबे

मुंबई शेअर बाजार किंवा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडबद्दल विशेष काही माहिती निदान या स्तंभात द्यायची गरज नाही. बीएसई, भारतातील आघाडीच्या एक्सचेंज समूहापैकी एक असून गेल्या १४५ वर्षांत त्याने हजारो कंपन्यांना भांडवल उभारणीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. बीएसईने शेअर्स व्यवहारांखेरीज रिटेल तसेच होलसेल रोखे, डेरिव्हेटिव्ह्ज आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यापारासाठी देखील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यात लहान आणि मध्यम उद्योगांच्या (एसएमई) भांडवल उभारणीसाठी एक वेगळे व्यासपीठदेखील आहे.

बीएसई लिमिटेड हे सूचीबद्ध कंपन्यांच्या संख्येनुसार भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आणि ऑपरेटर आहे. आशियातील पहिले स्टॉक एक्सचेंज म्हणून १८७५ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. आज बीएसईवर जगभरातील कोणत्याही एक्सचेंजपेक्षा जास्त म्हणजे ५,००० हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत. जगातील दोन आघाडीच्या जागतिक एक्सचेंजेस, डॉईश बोर्स आणि सिंगापूर एक्सचेंज हे बीएसईचे धोरणात्मक भागीदार आहेत. सेन्सेक्स हा भारतातील सर्वात मोठय़ा प्रमाणावर ट्रॅक केला जाणारा भांडवली बाजाराचा मानदंड निर्देशांक आहे.  जोखीम व्यवस्थापन, क्लिअरिंग, सेटलमेंट, मार्केट डेटा सेवा, माहिती तंत्रज्ञान  सेवा आणि उपाय, परवाना, निर्देशांक उत्पादने आणि वित्तीय आणि भांडवली बाजार प्रशिक्षण यासारख्या सेवादेखील ते देते.

मार्च २०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता बीएसई लिमिटेडने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ७४३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (आधीच्या वर्षीच्या तुलनेत ४८ टक्के वाढ) २५४ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. हा नफा गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी अधिक आहे. विश्वासार्ह ब्रॅंड, व्यवहार दरातील अपेक्षित वाढ, बीएसई स्टार म्युच्युअल फंड विक्रेता मंचाची उत्तम कामगिरी तसेच आगामी कालावधीत पॉवर एक्स्चेंज, गोल्ड स्पॉट एक्स्चेंज, इन्शुरन्स प्लॅटफॉर्मसारख्या येऊ घातलेल्या नवीन योजना यामुळे हा समभाग आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल. जानेवारी २०१७ मध्ये ८०४ रुपये अधिमूल्याने बीएसईचा ‘आयपीओ’ आला होता. ज्या गुंतवणूकदारांनी अजूनही शेअर्स ठेवले असतील त्यांचे बोनस पश्चात १८ शेअर्सचे ५४ शेअर्स झाले असतील. सध्या ७०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दोन वर्षांत उत्तम परतावा देईल अशी अपेक्षा आहे.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

बीएसई लिमिटेड  (बीएसई कोड -)

शुक्रवारचा बंद भाव :                   रु. ७३२/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :            रु. १,०४७/२४७

बाजार भांडवल :                      रु. ९,८९८ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :             रु. २७.०५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  –.–   

परदेशी गुंतवणूकदार                    १२.७७   

बँक/ म्यु. फंड/ सरकार                  १.०२   

इतर/ जनता                          ८६.२१

संक्षिप्त विवरण

* शेअर गट            :            स्मॉल कॅप

* प्रवर्तक         : —-

* व्यवसाय क्षेत्र :           

शेअर / रोखे बाजार

* पुस्तकी मूल्य :                  रु. १९६

* दर्शनी मूल्य          :            रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश :                ६७५ %

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :            रु. १८.८

*  किंमत उत्पन्न गुणोत्तर :           ३८.९

*  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :      ५४.७६

*  डेट इक्विटी गुणोत्तर :             ०० 

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :          १५.८

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :      १३.६

*  बीटा :                        १.४२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.