माझा पोर्टफोलियो : आकाश लांघण्याची महत्त्वाकांक्षा

डेटा पॅटर्न तिच्या एकूण विक्रीतून सुमारे ५० टक्के उत्पन्न सरकारी संस्थांसोबतच्या करारातून मिळविते.

अजय वाळिंबे

सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रति शेअर ५८३ रुपये अधिमूल्याने ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात पदार्पण करणारी डेटा पॅटर्न्‍स संरक्षण आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी मुख्यत्वे संरक्षण क्षेत्रासाठी विकसित स्वदेशी उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनी संरक्षण व अंतराळ क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असून तिने या क्षेत्रावर स्वत:च्या डिझाइन व विकास क्षमतेची छाप पाडत, आपला अनुभव सिद्ध केला आहे.

डेटा पॅटर्न्‍स ही कंपनी आज भारतातील डिफेन्स आणि एरोस्पेस प्लॅटफॉर्ममधील संपूर्ण स्पेक्ट्रममधील (अंतराळ, हवा, जमीन आणि समुद्र) वावर असणारी आहे. यात प्रोसेसर, पॉवर, रेडिओ फ्रीक्वेन्सी आणि मायक्रोवेव्ह उपकरणे, एम्बेडेड सॉफ्टवेअर तसेच फर्मवेअर आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगसह रणनीतिक एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्सच्या संपूर्ण आयामात तिने डिझाइन क्षमता सिद्ध केली आहे.

कंपनीच्या मुख्य उत्पादन भांडारामध्ये रडार, अंडरवॉटर इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन्स/ इतर सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, ब्रह्मोस प्रोग्राम, एव्हिऑनिक्स, छोटे उपग्रह, संरक्षण आणि एरोस्पेस सिस्टमसाठी एटीई, कमर्शियल ऑफ द शेल्फ (कोट्स) इ.चा समावेश होतो. कंपनीचा उत्पादन प्रकल्प चेन्नईमध्ये असून यात संरक्षण आणि एरोस्पेस अ‍ॅप्लिकेशन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च-विश्वसनीयता इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचे डिझाइन आणि इतर अद्ययावत उत्पादन होते. डेटा पॅटर्न्‍स सध्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए), एचएएल ध्रुव, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयूएच) आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र कार्यक्रमासह भारतातील अनेक प्रतिष्ठित संरक्षण प्रकल्पांना महत्त्वपूर्ण उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनीमध्ये सध्या ७०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी आहेत.

कंपनीचा व्यवसाय भारत सरकार आणि संबंधित संस्था जसे की संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अवकाश संशोधनात गुंतलेल्या सरकारी संस्थांनी हाती घेतलेले प्रकल्प आणि कार्यक्रम यावर अवलंबून आहे. डेटा पॅटर्न तिच्या एकूण विक्रीतून सुमारे ५० टक्के उत्पन्न सरकारी संस्थांसोबतच्या करारातून मिळविते. मार्च २०२२ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने गत-वर्षीच्या तुलनेत ३९ टक्के वाढीसह ३११ कोटींची उलाढाल साध्य करून ९४ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ६९ टक्क्यांनी अधिक आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे सरकारी धोरण आणि वाढती तरतूद पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव अपेक्षा आहेत. मार्च २०२३ साठी कंपनी ४२५ कोटी रूपयांचा टप्पा गाठून १२० कोटी रुपयांचा नफा कमावू शकेल अशी अपेक्षा आहे. सध्या रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम कालावधीत ३० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकेल.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

डेटा पॅटर्न्‍स (इं.) लि.

(बीएसई कोड – ५४३४२८)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ७१७/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ९३५ / ५७५

बाजार भांडवल :

रु. ३,७२० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १०.३८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                    ४५.६२   

परदेशी गुंतवणूकदार            १.४८   

बँक/ म्यु. फंड/ सरकार          ८.०१   

इतर/ जनता                 ४४.८९

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           :      स्मॉल-कॅप

* प्रवर्तक         :          श्रीनिवासागोपालन रंगराजन

* व्यवसाय क्षेत्र :            संरक्षण क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक्स

* पुस्तकी मूल्य :              रु. १११

* दर्शनी मूल्य         :      रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश :           १७५%

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. १८.१ 

*  पी/ई गुणोत्तर :            ३९.६ 

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       २३.२

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०२

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १२.६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ३३.६

*  बीटा :                      १ 

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Company profile for data patterns india ltd zws

Next Story
रपेट बाजाराची : अमेरिकी ‘फेड’च्या पवित्र्याकडे लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी