माझा पोर्टफोलियो : संकटाला धावून येई सत्वरी

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी म्हणून ओळखली जाते.

अजय वाळिंबे

नुकताच एलआयसीचा (आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा) ‘आयपीओ’ यशस्वी झाला असताना, एसबीआय लाइफचा शेअर पोर्टफोलियोसाठी सुचविलेला पाहून वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल. मात्र भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांत विमा कंपन्यांना  व्यवसायवृद्धीसाठी भरपूर वाव आहे. आपल्या देशात सध्या ५७ विमा कंपन्या कार्यरत असून त्यातील २४ जीवन विमा व्यवसायात आहेत. त्यातील एलआयसी ही सावर्जनिक क्षेत्रातील एकमेव आणि सर्वात मोठी कंपनी आहे. उदारीकरणाचे धोरण राबविल्यापासून अनेक खासगी कंपन्यांनी विमा क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यात प्रामुख्याने शेअर बाजारात नोंद झालेल्या प्रुडेन्शियल, एचडीएफसी लाइफ आणि एसबीआय लाइफ या तिन्ही कंपन्यांचा एलआयसीचे स्पर्धक म्हणून समावेश करावा लागेल. अर्थात, या तिन्ही कंपन्यांचा बाजार हिस्सा वाढता असला तरी आजही एलआयसीचा बाजार हिस्सा सर्वात जास्त म्हणजे सुमारे ६४ टक्के इतका आहे.  

आज सुचविलेली एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. २१ वर्षांपूर्वी तिने व्यवसायास सुरुवात केली. एसबीआय लाइफ आज भारतातील अनेक खेडय़ांत पोहोचली आहे. भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत जीवन विम्याचे प्रमाण नगण्य असल्याने खासगी कंपन्यांना विस्तारासाठी भरपूर वाव आहे. जीवन विम्याबरोबरच युलिप्स, आरोग्यविमा तसेच अनेक आकर्षक योजना खासगी कंपन्या बाजारात आणत आहेत. एसबीआय लाइफ सर्वासाठी विमा प्रवेशयोग्य बनविण्याचा प्रयत्न करते, देशभरात कंपनीची ९५२ कार्यालये, १८,५०० हून अधिक कर्मचारी, सुमारे १,४६,००० एजंट यांचे एक मोठे जाळे असून कंपनी आपले ५० कॉर्पोरेट एजंट, १४ भागीदारांचे व्यापक बँकअश्युरन्स नेटवर्क, २९००० भागीदार शाखा, आणि इतर विमा विपणन संस्थांद्वारे विविध विमा योजनांची विक्री व विपणन करते. करोना कालावधीत जीवन विम्याचे प्रमाण वाढले आणि त्याचा फायदा इतर विमा कंपन्यांप्रमाणे एसबीआय लाइफलादेखील झाला. आज खासगी विमा कंपन्यांमध्ये एसबीआय लाइफचा बाजार हिस्सा २४ टक्क्यांहून अधिक आहे.

मार्च २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी तसेच आर्थिक वर्षांसाठी कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून ते अपेक्षेनुसार आहेत. विमा कंपन्यांची कामगिरी तपासताना काही गुणोत्तरे अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. यांत प्रामुख्याने सरासरी हप्ते उत्पन्न (एपीई), नवीन व्यवसायातून मिळकत (व्हीएनबी), अंत:स्थापित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू- ईव्ही) तसेच सोल्व्हन्सी रेशो यांचा समावेश होतो. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत कंपनीने या तिन्ही बाबतीत उत्तम कामगिरी बजावली आहे. कंपनीचा एपीई ११,५०० कोटींवरून १४,६०० कोटींवर गेला आहे, ईव्ही ३६,४०० कोटींवरून ३९,६०० कोटींवर गेले आहे, तर व्हीएनबी २,७०० कोटींवरून ३,७०० कोटींवर गेली आहे. मार्च २०२२ अखेर समाप्त आर्थिक वर्षांत कंपनीने ८२,९८३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,५०६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीच्या युलिप्स तसेच बँकअश्युरन्स भागीदारांमध्येदेखील चांगली वाढ झाली आहे. आगामी कालावधीतदेखील कंपनी अशीच प्रगतिपथावर राहील अशी अपेक्षा आहे.

पाच वर्षांपूर्वी ‘आयपीओ’द्वारे कंपनीने ६९० रुपये अधिमूल्याने बाजारात शेअर्सची नोंदणी केली होती. सध्या १,०४० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर १२-१८ महिन्यांत ४० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकेल.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कं.

(बीएसई कोड – ५४०७१९)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,०४५/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. १,२९३ / ९५७

बाजार भांडवल :

रु. १,०६,१०० कोटी

भरणा झालेले भागभांडवल :

रु. १,००० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक             ५५.४८

परदेशी गुंतवणूकदार      २४.१५

बँक/ म्यु. फंड / सरकार १२.४६

इतर/ जनता           ७.९१

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           :  लार्ज कॅप

* प्रवर्तक         :    स्टेट बँक ऑफ इंडिया

* व्यवसाय क्षेत्र :      जीवन विमा

* पुस्तकी मूल्य :       रु. १४६

* दर्शनी मूल्य         : रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश :     २० %

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न : रु. १५.०५

*  पी/ई गुणोत्तर: ६९.४ 

*  समग्र पी/ई गुणोत्तर : ५६.४

*  डेट इक्विटी गुणोत्तर : ००

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ——

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १५.३

*  बीटा : ०.७८  सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Profile for sbi life insurance co zws

Next Story
लक्ष्मीची पाऊले..: म्युच्युअल फंडातील ‘स्मार्ट फॅक्टर’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी