X
X

Ind vs NZ : या संघाला पॅसिफिक महासागरात बुडवायला हवं !

READ IN APP

जेव्हा बिशनसिंह बेदी भारताच्या कामगिरीवर संतापतात

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिला पराभव स्विकारावा लागला. वेलिंग्टनच्या मैदानावर न्यूझीलंडने १० गडी राखत भारतीय संघावर मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. १९६८ साली भारतीय संघाने वेलिंग्टनच्या मैदानावर आपला अखेरचा विजय मिळवला. यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकवेळा हे मैदान भारतीय संघाला विजयाला हुलकावणी देत आहे. असाच एक किस्सा घडला होता…१९९० च्या दौऱ्यात.

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी हे भारतीय संघाच्या व्यवस्थापकाचं काम पाहत होते. भारतीय संघाची या दौऱ्यातली खराब कामगिरी पाहिल्यानंतर बेदींची तारच सटकली. बेसिन रिझर्व्ह हे जगातील अतिशय घाणेरडे (lousiest) ग्राउंड आहे असे उदगार बेदींनी पत्रकारांशी बोलताना काढले. रॉथमन्स कप तिरंगी स्पर्धेत (भारत,न्यूझीलंड,ऑस्ट्रेलिया ) भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यावर बेदींचा संताप अनावर झाला. “या संघाला पॅसिफिक महासागरात बुडवायला हवं..”असे संतापजनक उद्गार बेदींनी अझरुद्दीनच्या भारतीय संघासाठी काढले.

कर्णधार म्हणून अझहरचा हा भारतीय संघाबरोब्बरचा पहिलाच दौरा ! इंदोरचे अनंत कनमडीकर व्यवस्थापक होते. बीसीसीआयचे चिटणीसपद त्यांनी १९८०-८४ या कालावधीत भूषवलं होतं. बेदींच्या या रागामुळे त्यांचीही मोठी पंचाईत झाली होती. पण पेशाने वकील असलेल्या कनमडीकरानी बेदींना शांत केलं. कपिल देव, दिलीप वेंगसरकरसारखे माजी कर्णधार तसेच सचिन तेंडुलकर, अतुल वासन, गुरुशरणसिंगसारखे नवोदित खेळाडूही या दौऱ्यात भारतीय संघात होते.

हा दौरा भारताला तसा जडच गेला. नवा कर्णधार, नवे प्रशिक्षक यामुळे संघाची घडी या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत नीट बसली नाही. भारताचे महान फिरकी गोलंदाज असा बेदी यांचा क्रिकेटजगतात लौकिक. भारतीय संघाचे कर्णधार, राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य अशी विविध जबाबदारीची पदे बेदी यांनी भूषवली होती. न्यूझीलंडनंतर इंग्लंड दौऱ्यावरही (१९९०) बेदीच संघांचे क्रिकेट व्यवस्थापक होते, तर माधव मंत्री प्रशासकीय व्यवस्थापक. या दौऱ्यातही कर्णधार अझहरुद्दीन आणि बेदी यांच्यात खटके उडतच राहिले. लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करायची असा निर्णय टीम मीटिंग मध्ये होऊन देखील कर्णधार अझरुद्दीनने इंग्लंडला फलंदाजी दिली. ग्रहम गुचने त्रिशतक फटाकवल्यावर बेदी यांनी कर्णधार अझरची खरडपट्टी काढली. यानंतर मात्र बेदी यांना व्यवस्थापक पदावरून पायउतार व्हावे लागलं. थोडक्यात काय, वेलिंग्टनमधील पराभव भारताच्या पचनी पडत नाहीत हेच खरं!

24
X