Foxconn $1.5 billion plant India: ‘भारतात ॲपलच्या उपकरणांचे उत्पादन घेऊ नका, त्याऐवजी अमेरिकेत कारखाने सुरू करा’, अशी सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टीम कुक यांना केली होती. यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. मात्र ॲपलचे उत्पादन घेणारी भागीदार कंपनी फॉक्सकॉनने आता भारतात १.५ अब्ज डॉलर्सचा विस्तार करण्याची योजना आखल्याचे वृत्त समोर आले आहे.

या आठवड्यात लंडन स्टॉक एक्सचेंजला फॉक्सकॉन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युझान टेक्नॉलॉजिज (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भारतात १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या कंपनीचा प्रकल्प तमिळनाडूमध्ये उभारण्यात येणार आहे. आयफोनचे उत्पादनही तमिळनाडूमध्येच घेतले जाते.

द इंडियन एक्सप्रेसने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, पुरवठा साखळी एका रात्रीत उभी राहत नाही. ॲपल सारखी मोठी कंपनी काही महिने आणि वर्षानुवर्ष रणनीती आखून पुरवठी साखळी निर्माण करत असते. ॲपलकडून भारतातील उत्पादन दुप्पट वेगाने होणार आहे. एखादे चुकीचे विधान हा वेग कमी करू शकणार नाही.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तमिळनाडू सरकारने चेन्नई पासून ८० किमी अंतरावर असलेल्या कांचीपूरम येथील युझान टेक्नॉलॉजिच्या १३,१८० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. फॉक्सकॉनतर्फे आता लंडन शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवी गुंतवणूक या प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे.

ॲपल कंपनी चीनमधील आपले उत्पादन कमी करून भारतातील उत्पादन हळूहळू वाढवू इच्छित आहे. सध्या एकूण आयफोनपैकी भारतात १५ टक्के आयफोनचे उत्पादन होत आहे. येत्या वर्षात हे उत्पादन एक चतुर्थांशने वाढविण्याची कंपनीची योजना आहे. आयफोनने भारतात उत्पादन वाढविणे हे सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे यश असल्याचे मानले जाते.

सदर विषयावर द इंडियन एक्सप्रेसने ॲपलची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या यावर व्यक्त होण्यास त्यांनी नकार दिला.

ॲपलचे सीईओ टीम कुक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प टीम कुक यांना काय म्हणाले होते?

डोनाल्ड ट्रम्प दोहा येथे दौऱ्यावर असताना म्हणाले होते की, “मी टीम कुक यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, टीम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मी ऐकत आहे की तुम्ही भारतात कारखाने उभारत आहात. तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने उभारले, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता आम्हाला तुम्ही भारतात कारखाने स्थापन करावेत, असे मला वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत असे आम्हाला वाटते.”