Accenture layoffs: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅक्सेंचरने गेल्या तीन महिन्यांत तब्बल ११ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत कंपनीच्या सीईओंनी देखील मोठं विधान केलं आहे. ‘आम्ही अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहोत ज्यांना आम्ही पुन्हा प्रशिक्षण देऊ शकत नाही’, असं अॅक्सेंचरच्या सीईओ जूली स्वीट यांनी म्हटलं आहे.
कर्मचारी कपातीबाबत कंपनीने काय म्हटलं?
गेल्या तीन महिन्यांत कंपनीने जगभरात जवळपास ११ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. याबाबत कंपनीने म्हटलं की, “ज्यांना एआयमध्ये प्रशिक्षण दिलं जाऊ शकत नाही, अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जात आहे. कारण अॅक्सेंचर एआयच्या युगासाठी हा प्रयत्न करत आहे. तसेच कंपनीने तीन महिन्यांत ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली असली तरी येत्या आर्थिक वर्षात कर्मचारी संख्या वाढवण्याची कंपनीची योजना आहे”, असं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त बिझनेस इनसाइडरच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
वृत्तानुसार, अॅक्सेंचरच्या सीईओ जूली स्वीट यांनी म्हटलं की, “कंपनी अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे, ज्यांना ते कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांसह पुन्हा प्रशिक्षण देऊ शकत नाही. मात्र, पुढील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची कंपनीची योजना आहे.”
कंपनी करणार १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बचत
ऑगस्टच्या अखेरीस अॅक्सेंचरची जागतिक कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ७७९,००० होती. जी तीन महिन्यांपूर्वी ७९१,००० होती. एक्सेंचरमधील कर्मचारी कपातीचा हा टप्पा या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झाला होता आणि नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहणार आहे. यामधून कंपनी १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बचत करेल असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, भविष्यातील एआयचा प्रभाव पाहता अॅक्सेंचर मोठ्या प्रमाणात त्यांच्या एआय क्षमतांचा विस्तार करत असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने २०२३ पासून त्यांच्या एआय आणि डेटा तज्ञांची संख्या दुप्पट करून ७७,००० केली आहे. तसेच५,५०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना जनरेटिव्ह एआयमध्ये प्रशिक्षित केलं आहे. प्रगत एआय आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक भाग बनत असल्याचं सीईओ जूली स्वीट यांनी म्हटलं आहे.