मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड आणि मल्टी कॅप फंड एकच असतात का?श्रद्धा कारेकर
उत्तर : तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्ये ज्या दोन फंडांविषयी उल्लेख आला आहे, त्यातील मल्टी हा शब्द सारखा असला तरी फंडांची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. म्युच्युअल फंडाचे ‘हायब्रीड’ आणि ‘इक्विटी’ असे दोन प्रमुख प्रकार पडतात.
इक्विटी म्युच्युअल फंड हे फक्त समभागांमध्ये गुंतवणूक करतात. एखाद्या इक्विटी फंडाने कोणत्या प्रकारच्या समभागांमध्ये गुंतवणूक केली आहे, यावरून तो लार्ज कॅप, स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंड ठरतो. काही म्युच्युअल फंड योजना या तिन्ही प्रकारच्या समभागांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांना मल्टी कॅप असे म्हणतात. ‘मल्टिपल कॅपिटलायझेशन’, म्हणजेच बाजार मूल्यानुसार महाकाय कंपन्या म्हणजेच लार्ज कॅप, मध्यम कंपन्या मिड कॅप आणि बाजार मूल्यानुसार लहान कंपन्या म्हणजेच स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारांमध्ये या फंडाची गुंतवणूक असते. या फंडाचे वैशिष्ट्य असे की, निधी व्यवस्थापक (फंड मॅनेजर) तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करतो आणि त्यातून गुंतवणूकदाराला अपेक्षित फायदा मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन या प्रकाराकडे वळूया.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा उद्देश बँक किंवा तत्सम पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळवणे हा असला तरीही त्यात जोखीम आणि परतावा यांच्यातील ताळमेळ हा महत्त्वाचा मुद्दा असतो. बाजार अस्थिर असताना कोणत्या प्रकारच्या समभागांमध्ये गुंतवणूक करावी, याचा निर्णय घेणे कठीण जाते. ज्या कंपन्यांचे मूल्यांकन महाग वाटते अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणे निधी व्यवस्थापक टाळतात. मग गुंतवणूकदारांसाठी अशा परिस्थितीत कोणता आकर्षक पर्याय आहे? या प्रश्नाचे उत्तर मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड असे आहे.

यातील शब्दांचा स्वतंत्र विचार करूया.

‘मल्टी’ म्हणजे अनेक आणि ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ या शब्दाचा अर्थ बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी सर्व पर्यायांचा खुलेपणाने स्वीकार करणे. समभाग अर्थात शेअरव्यतिरिक्त रोखे (डेट), सोने या प्रकारांतही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. मल्टी अॅसेट अॅलोकेशन या प्रकारातील म्युच्युअल फंड योजना या समभाग, रोखे आणि सोने, अन्य म्युच्युअल फंड योजना यामध्ये एकाचवेळी गुंतवणूक करतात. प्रत्येक श्रेणीमध्ये निधी व्यवस्थापकाला किमान दहा टक्के रक्कम गुंतवावीच लागते. निधी व्यवस्थापक गुंतवणुकीबाबतचा आपला निर्णय बाजारातील परिस्थितीचा विचार करून घेतात. इक्विटी पर्यायामध्ये कमीत कमी ६५ टक्के, तर जास्तीत जास्त ८० टक्के इतकी गुंतवणूक केली जाते. रोखे आणि ‘ईटीएफ’ यामध्ये कमीत कमी दहा, तर जास्तीत जास्त २५ टक्के एवढी गुंतवणूक अपेक्षित असते.

अलीकडेच उदयास आलेल्या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ आणि ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ अशा पर्यायांमध्येसुद्धा गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य या फंडाला आहे. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पोर्टफोलिओमध्ये बदल करण्याचे स्वातंत्र्य. इक्विटी फंडाला पोर्टफोलिओत एका मर्यादेपलीकडे बदल करता येत नाहीत. गेल्या पंधरा वर्षांचा भांडवली बाजाराचा इतिहास लक्षात घेता दरवर्षी समभागांमधील गुंतवणूकच कायमच परतावा देईल असे नाही. याउलट गेल्या पंधरा वर्षांत सात वेळा सोन्यातील गुंतवणुकीने सरस परतावा दिला आहे. त्यामुळेच मल्टी कॅप फंड गुंतवणुकीसाठी एक वेगळा पर्याय म्हणून पुढे येत आहेत. मल्टी कॅप फंडांना हायब्रिड इक्विटी फंडात गणले जात असल्यामुळे त्याचे कराच्या संबंधातील फायदेसुद्धा गुंतवणूकदारांना मिळतात.

(म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी तुमच्या अडचणी, प्रश्न थेट आम्हाला ईमेल arthmanas@expressindia. com द्वारे कळवा)

डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड योजना आणि त्यातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, योजनेविषयीचे दस्तऐवज वाचून आणि गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are multi asset allocation funds and multi cap funds the same css