सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच ३ मार्च २०२५ रोजी विश्लेषण केलेला आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप (जुने नाव आदित्य बिर्ला फ्रंटलाइन इक्विटी) हा फंड पुन्हा कशाला असा वाचकांना कदाचित प्रश्न पडण्याची शक्यता आहे. बदल हा निश्चित आहे. फंडाचा पोर्टफोलिओ, भारतीय बाजार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती सगळे बदललेले असल्याने आणि लार्ज कॅपचे मूल्यांकन नव्याने गुंतवणूकयोग्य पातळीवर आले असल्याने फंडाच्या विश्लेषणाची आवश्यकता भासते. तसेच ६.५ टक्के ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ (केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याचा दर) निश्चित करून जोखीम सामायोजित परताव्याच्या क्रमवारीत आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंड तिसऱ्या क्रमांकावर असलेला फंड आहे.

या फंडाने ३० ऑगस्ट २००२ ते २९ ऑगस्ट २०२५ या २३ वर्षांत वार्षिक १८.७७ टक्के दराने परतावा दिला असून मूळ १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे आज मूल्य ५२.३० लाख रुपयांवर पोहोचले आहे. फंडाच्या स्थापनेपासून सुरू केलेल्या १,००० रुपयांच्या दरमहा एसआयपी गुंतवणुकीचे २७६ हप्ते गेले असून, त्या २.७६ लाख गुंतवणुकीचे २४.१३ लाख रुपये झाले आहेत. म्हणजेच वार्षिक परताव्याचा दर १६.०७ टक्के आहे. म्हणूनच गेल्या सात वर्षांत किमान सहा वेळा या फंडाचे विश्लेषण या सदरातून प्रसिद्ध झाले आहे. म्हणूनच ‘कितीदा तुला नव्याने तुला आठवावे’ असे म्हणावेसे वाटते.

या फंडाने ३० ऑगस्ट २०२५ रोजी २२ वर्षे पूर्ण करून २३ व्या वर्षात पदार्पण केले. हा फंड ३० ऑगस्ट २००२ रोजी अलायन्स फ्रंटलाइन इक्विटी फंड म्हणून अस्तित्वात आला. पुढे तत्कालीन बिर्ला म्युच्युअल फंडाने अलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर हा फंड बिर्ला फ्रंटलाइन इक्विटी फंड म्हणून ओळखला जाऊ लागला. अदित्य बिर्ला सन लाइफ फंड घराण्यात समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात लार्ज कॅप फंड सर्वाधिक मालमत्ता असणारा आहे. मध्यंतरी कामगिरी खालावलेला हा फंड मागील २-३ वर्षांपासून कामगिरीत सुधारणा दाखवत आहे. सध्या बाजाराची स्थिती लक्षात घेता फंडात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा शिस्तबद्ध मार्ग असलेल्या एसआयपीचा अवलंब करावा.

महेश पाटील यांची २२ नोव्हेंबर २००५ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. सध्या ते आदित्य बिर्ला सनलाइफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. ते लार्ज कॅप फंड गटातील सर्वात अनुभवी निधी व्यवस्थापक आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात पाटील हे निधी व्यवस्थापक म्हणून २० वर्षे पूर्ण करतील. ते गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करण्यात माहीर आहेत आणि बाजाराच्या कठीण काळातही त्यांचे कौशल्य सिद्ध झाले आहे.

साधारण २००७ ते २०१४ पर्यंत हा फंड ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये होता. २०१४ ते २०१८ दरम्यान फंडाची कामगिरी घसरल्याने ‘लोअर मिडल क्वार्टाइल’ आणि ‘बॉटम क्वार्टाइल’मध्ये तो गेला. भांडवली बाजार नियामक सेबीच्या पुनर्वर्गीकरणानंतर फंडाच्या कामगिरीत सुधारणा होऊन, २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत फंडाची कामगिरी शिखरावर होती. पॉइंट-टू-पॉइंट आधारावर मागील १ वर्ष -०.६४ टक्के (क्रमवारीत २ रा क्रमांक), ३ वर्षे १५ टक्के (क्रमवारीत ८ वा क्रमांक), ५ वर्षे १८ टक्के (क्रमवारीत २ रा क्रमांक) आणि १० वर्षे १२.०७ टक्के (क्रमवारीत १२ वा क्रमांक) असा त्याचा परतावा आहे. १० वर्षे वगळता इतर कालावधीतील वार्षिक परतावे १४ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. या फंडाची त्याच्या मानदंड सापेक्ष कामगिरी चांगली असून फंडाने, ‘निफ्टी १०० टीआरआय’ला मात देत वेगवेगळ्या कालावधीत ०.५० टक्के ते ३.०० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळविला आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत (जून २०२० ते जून २०२५) तीन वर्षांच्या रोलिंग रिटर्नचा विचार केला तर, फंडाने सरासरी १८.१ टक्के परतावा दिला आहे. तुलनात्मकदृष्ट्या, निफ्टी १०० टीआरआयने सरासरी १७.४ टक्के परतावा दिला आहे, लार्जकॅप फंड गटात बेंचमार्कसापेक्ष सरस कामगिरी करणे कठीण असते. लार्ज कॅप गटात ६५ टक्के फंड बेंचमार्कला मागे टाकण्यात अपयशी ठरत असताना मागील पाच वर्षे सातत्याने बेंचमार्कला मागे टाकणे हे निधी व्यवस्थापकाचे कौशल्य आणि अनुभवाला अधोरेखित करणारे आहे.

तसेच, वर उल्लेख केलेल्या कालावधीत, ३ वर्षांच्या परताव्याच्या चलत् सरासरीनुसार या फंडाने त्याच्या मानदंडसापेक्ष ‘निफ्टी १०० टीआरआय’ला जवळजवळ ६९ टक्के वेळा मागे टाकले आहे. या कालावधीत ९६ टक्क्यांपेक्षा जास्त वेळेला १२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ८२ टक्के वेळेला १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळविला आहे. गेल्या ५ वर्षांत फंडाचे एसआयपी रिटर्न (एक्सआयआरआर) १८.४ टक्के होते याच कालावधीत निफ्टी १०० टीआरआयमधील एसआयपीने १७.४ टक्के परतावा दिला आहे.

महेश पाटील यांची पोर्टफोलिओ बांधणी अन्य लार्ज कॅप फंडांच्या तुलनेत वेगळी आहे. ते पोर्टफोलिओच्या तळाकडील पोर्टफोलिओत संख्येने जास्त परंतु टक्केवारीने कमी गुंतवणुका राखतात. ते गुंतवणुकीची संधी हुडकून त्यात गुंतवणूक करतात. विशेषतः त्यांच्या पसंतीच्या कंपन्यांत जरी ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नसले तरीही. जोपर्यंत ते अतिरिक्त ’अल्फा’ निर्माण करू शकतात तोवर ते अशा कंपन्यांमध्ये कमी मात्रेची गुंतवणूक राखतात. लार्ज कॅप फंडांना किमान ६५ टक्के मालमत्ता लार्ज कॅपमध्ये गुंतवणे सक्तीचे असताना निधी व्यवस्थापकाने सरासरी ८५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप, ७ ते १० टक्के मिड कॅप आणि ३-४ टक्के स्मॉल कॅपमध्ये केली आहे. पोर्टफोलिओत आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय लाइफ, महिंद्र अँड महिंद्र यांचे गुंतवणुकीतील प्रमाण मानदंडसापेक्ष थोडे जास्त आहे. या कंपन्यांनी फंडाला चांगला परतावा देण्यात मोठे योगदान दिले आहे. फंडाच्या गुंतवणुकीत बँका आणि सॉफ्टवेअर कंपन्यांना अधिक प्राधान्य देण्याची परंपरा आहे. ही उद्योग क्षेत्रे वगळता या फंडाने अन्य उद्योग क्षेत्रांची निवड निर्देशांकातील त्यांच्या प्रभावानुसार कमी-अधिक केली आहे. गुंतवणुकीत सरासरी ७५ कंपन्यांचा समावेश असला तरी आघाडीच्या दहा कंपन्या पोर्टफोलिओचा ५० टक्के हिस्सा व्यापतात. एकंदरीत, सात वर्षांनंतरच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंड योग्य आहे. जे किमान सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घकालीन गुंतवणूक शोधत आहेत ते एसआयपी मार्गाने गुंतवणुकीचा विचार करू शकतात. काल पायघड्यांवरून घरोघरी गौरींचे आगमन झाले. याच पायघड्यांवरून आणावा असा हा फंड आहे.

(लेखातील सर्व आकडेवारी फंडाच्या ‘रेग्युलर प्लॅन (ग्रोथ)’च्या २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या ‘एनएव्ही’नुसार)