अनेक समभाग संलग्न अर्थात इक्विटी आणि हायब्रीड फंडांना कामगिरीत मागे सारल्याने गेल्या १८-२० महिन्यांत मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंडांना गुंतवणूकदारांची पसंती लाभल्याचे दिसत आहे. सध्या, या फंड गटात २८ फंड असून फंड गटाच्या एकत्रित मालमत्तेने नुकताच १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंडाच्या व्याख्येनुसार मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड (एमएएएफ) हा असा म्युच्युअल फंड आहे जो किमान तीन वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतो आणि प्रत्येक मालमत्ता वर्गात किमान १० टक्के गुंतवणूक आहे. या मालमत्ता वर्गात सामान्यतः भारतीय समभाग, रोखे आणि मौल्यवान धातू यासारख्या जिनसांचा समावेश असतो. उपलब्ध फंडांचे विश्लेषण केले असता, या फंड गटातील फंड सात मालमत्ता वर्गात गुंतवणूक करतात. जसे की, देशांतर्गत इक्विटी, आर्बिट्राज, रोखे, मौल्यवान धातू (सोने चांदी), अन्य जिन्नस प्रकार (जस्त, तांबे, खनिज तेल), परदेशी समभाग, ‘रिट्स’, आणि ‘इन्व्हिट्स’ असे हे सात मालमत्ता प्रकार आहेत.

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाच्या मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंडाच्या ‘एनएफओ’ला ९ मे रोजी प्रारंभ झाला असून ‘एनएफओ’ २३ मेपर्यंत खुला आहे. जोखीम आणि परताव्याचा समतोल साधणे हे मुख्य उद्दिष्ट असले तरी, मालमत्ता वाटप रणनीती आणि प्रत्येक मालमत्ता वर्गातील त्या त्या वेळची जोखीम वेगाने बदलत असल्याने निधी व्यवस्थापकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. या फंडांचे प्रत्येक मालमत्ता वर्गाचे प्रमाण निश्चित करण्याची रणनीती वेगवेगळी आहे. ही रणनीती गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घेणे आवश्यक आहे. या फंड गटातील फंड सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ईटीएफ, गोल्ड फ्युचर्स किंवा भौतिक सोन्याचा वापर करतात. बहुतेक फंड गोल्ड ‘ईटीएफ’ किंवा भौतिक सोन्यात गुंतवणूक करतात. तर एडलवाइस मल्टी ॲसेट ॲलोकेशन, व्हाइटओक कॅपिटल मल्टी ॲसेट ॲलोकेशन, आयसीआयसीआय प्रू मल्टी-ॲसेट आणि टाटा मल्टी ॲसेट अपॉर्च्युनिटीज फंड कमॉडिटी डेरिव्हेटिव्हजच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. सोने आणि चांदीचे फ्युचर्स खरेदी केल्यास कमी भांडवल लागते. मागील २४ महिन्यांत व्हाइटओक कॅपिटल मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड या फंड गटात सर्वात चांगला परतावा दिलेला फंड असून त्या खालोखाल डीएसपी मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आणि आयसीआयसीआय प्रू मल्टी-ॲसेटचा क्रम लागतो.

मागील २४ महिन्यांत या फंडांनी १८ ते ११ टक्के दरम्यान वार्षिक परतावा दिला आहे. काही फंड खनिज तेल, तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियमसारख्या धातूत (नॉन फेरस) गुंतवणूक करतात. टाटा मल्टी ॲसेट अपॉर्च्युनिटीज फंड एक्स्चेंज-ट्रेडेड कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह्जद्वारे खनिज तेल, तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियममध्ये गुंतवणूक करणारा एक यशस्वी फंड आहे. टाटा मल्टी ॲसेट अपॉर्च्युनिटीज फंड एकूण मालमत्तेच्या ३० टक्क्यांपर्यंत जिनसांत गुंतवणूक करणारा फंड आहे. तर परदेशातील समभागांना प्राधान्य देणाऱ्या फंडात इन्वेस्को इंडिया मल्टी ॲसेट ॲलोकेशन (१७ टक्के), डीएसपी मल्टी ॲसेट ॲलोकेशन (१५ टक्के) आणि निप्पॉन इंडिया मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड (१० टक्के) यांचा समावेश आहे. इन्वेस्को इंडिया मल्टी ॲसेट प्रामुख्याने अमेरिकेतील कंपन्यांत गुंतवणूक करतो, तर डीएसपी मल्टी ॲसेट ॲलोकेशन आणि निप्पॉन इंडिया मल्टी ॲसेट ॲलोकेशन एकाच देशात गुंतवणूक न करता जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात. सर्व २८ मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड अभ्यासले असता कॅनरा रोबेको मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड भारतीय समभाग, भारतीय रोखे आणि दोन मौल्यवान धातू (सोने आणि चांदी) या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करणार आहे.
काही फंड मिड आणि स्मॉल कॅप समभागांत जास्त गुंतवणूक करतात. मोतीलाल ओसवाल मल्टी ॲसेट (३१ टक्के), एलआयसी एमएफ मल्टी ॲसेट ॲलोकेशन (३० टक्के) आणि एचएसबीसी मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड (२७ टक्के) हे मिड आणि स्मॉल कॅप समभागांत सरासरी सापेक्ष जास्त गुंतवणूक असलेले मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आहेत. यामुळे मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड गटात तुलनेत जास्त परताव्या सोबत उच्च अस्थिरता आणि नकारात्मक जोखीम असलेले हे फंड आहेत. अलीकडील बाजारातील मंदीच्या काळात त्यांच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होते, मोतीलाल ओसवाल मल्टी ॲसेटने एका वर्षात ९ टक्के तोटा नोंदविला होता. एचएसबीसी मल्टी ॲसेट ॲलोकेशनने गेल्या वर्षभरात केवळ ४ टक्के परतावा दिला. एलआयसी एमएफ मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड अस्तित्वात आल्याला एक वर्षापेक्षा कमी कालावधी लोटला आहे. अस्तित्वात आल्याला एक वर्षाहून अधिक कालावधी लोटलेले २५ फंड अस्तित्वात असून या फंडाची समभाग गुंतवणूक १६ ते ६५ टक्के आहे. तर यूटीआय मल्टी ॲसेट ॲलोकेशन आणि सुंदरम मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड यांची समभाग गुंतवणूक ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यूटीआय मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आणि सुंदरम मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडाने गेल्या वर्षभरात अनुक्रमे ८ टक्के आणि १२ टक्के परतावा दिला आहे. काही फंड सोन्यापेक्षा चांदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. ताजी पोर्टफोलिओ आकडेवारीनुसार कोटक मल्टी ॲसेट ॲलोकेशन, महिंद्रा मॅन्यु लाइफ मल्टी ॲसेट ॲलोकेशन आणि क्वांट मल्टी ॲसेटने सोन्यापेक्षा चांदीत अधिक गुंतवणूक केल

मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंडावर कर आकारणी फंडातील समभागाची मात्रा आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार होते. जर फंडाच्या गुंतवणुकीत समभाग मात्रा ६५ टक्के किंवा त्याहून अधिक असेल तर एक वर्षापेक्षा कमी कालावधीवर झालेल्या नफ्यावर १५ टक्के कर आकारला जातो, तर एक वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या १.२५ लाखांवरील भांडवली लाभावर १२.५ टक्के कर आकारणी होते. फंडाच्या गुंतवणुकीत समभागाची मात्रा ६५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तो डेट फंड समाजाला जातो आणि त्यानुसार कर आकरणी होते.

कॅनरा रोबेको म्युच्युअल मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड गुंतवणुकीत किमान ७० टक्के दरम्यान समभाग गुंतवणूक राखेल आणि समभाग गुंतवणुकीचा ढाचा हा ‘कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी फंडासारखा ३५ ते ४० कंपन्यांचा समावेश असलेला मल्टीकॅप घटणीचा असेल. सोने आणि चांदीसाठी ईटीएफचा वापर करणार आहे. म्हणूनच हा फंड इतर मल्टी-ॲसेट फंडांहून वेगळा असल्याने रंग माझा वेगळा असे म्हणावे लागेल.
मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य मानले जातात, ज्यांना कमी जोखीम घेण्याची इच्छा असते, परंतु त्यांच्या गुंतवणुकीवर स्थिर परतावा मिळवायचा असतो. मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड टोकाचे आळशी आणि टोकाचे उतावळे प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श फंड आहे. आळशी गुंतवणूकदार जे ॲसेट ॲलोकेशन करत नाही आणि उतावळे गुंतवणूकदार समाजमाध्यमांवरील सल्ल्यांवर विसंबून चुकीच्या वेळी चुकीच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. हा फंड अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदरांसाठी आदर्श साधन ठरेल. बहु-मालमत्ता वर्गात शिस्तबद्ध गुंतवणूक करून संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी हे आदर्श साधन ठरेल.