अनेक लेखांमधून गुंतवणूकतज्ज्ञ सतत तुमच्या फंडाच्या पोर्टफोलिओचा आढावा घ्या, असे सांगत असतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी नेमका हा आढावा घ्यायचा असतो म्हणजे काय करायचे असते?
आर्थिक नियोजनात गुंतवणूक नेमकी कुठे करावी, ही पहिली पायरी असेल तर या नियोजनातील अखेरचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या ध्येयाप्रमाणे काम करत आहेत किंवा नाही? याची पडताळणी घेणे आवश्यक आहे.
बऱ्याचदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदार छोट्या रकमेपासून गुंतवणुकीची सुरुवात करतात. एक किंवा दोन फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेला ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक सुरू केली जाते. जसजसे उत्पन्न वाढते तसतसे नवीन फंड विकत घेतले जातात. अशा वेळी दोन ते तीन वर्षांतून एकदा तुम्ही विकत घेतलेले फंड तुमच्या गुंतवणूक ध्येयाशी जुळत आहेत का? याचा आढावा घ्या. उदा. एखाद्या तरुण गुंतवणूकदाराने गुंतवणुकीला सुरुवात केली असेल तर त्याची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते. अशा वेळी आपल्या गुंतवणुकीत सर्वाधिक प्रमाण ‘इक्विटी फंड’ योजनांचे असायला हवे. ज्यावेळी गुंतवणुकीला सुरुवात केली जाते, त्यावेळी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी उत्तम परतावा देणारा फंड निवडला जातो. फंडाचे यश निधी व्यवस्थापक (फंड मॅनेजर) आणि संशोधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. काही वेळा उत्तम परतावा देणारा फंड काही वर्षांनी इतरांच्या तुलनेत अत्यंत सुमार परतावे देतो, हे लक्षात यायला लागल्यावर ताबडतोब त्या फंडातील गुंतवणूक थांबवणे आणि नवीन फंडात गुंतवणूक सुरू करणे हा उपाय करायला
एक-दोन महिने फंडाची कामगिरी चांगली नसली याचा अर्थ लगेचच फंड बदलावा, असा होत नाही. किमान दोन ते तिमाही म्हणजे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ फंड इतरांपेक्षा कमी परतावा देत असेल, याचा अर्थ तो आपल्या पोर्टफोलिओमधून कमी करायची वेळ आली आहे, असे समजावे.
पोर्टफोलिओचा आढावा घ्यायचा यात आणखी एक मुद्दा असतो तो म्हणजे, तुम्ही जो ‘सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन’ (एसटीपी) सुरू केला आहे, तो नक्की सुरू आहे ना? बऱ्याच गुंतवणूकदारांच्या बाबतीत असा अनुभव आलेला आहे की, लिक्विड फंड योजनेत एकरकमी पैसे ठेवून त्यातून इक्विटी फंडामध्ये पैसे दर महिन्याला ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवले जातात. पण आपल्या लिक्विड फंड योजनेतील पैसे संपत आले आहेत, गुंतवणूक सुरू राहण्यासाठी लिक्विड फंडात परत पैसे जमा करायला हवे, हे विसरले जाते. तसेच अचानकच काही वर्षांनी लक्षात येते की, आपली गुंतवणूक बंद आहे म्हणजे येथे नुकसान झाले नसून आपण स्वतःचा फायदा करून घेतला नाही, अशी स्थिती आहे.
जेव्हा शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झालेले असतात, त्यावेळी हमखास जवळपास सर्वच फंड योजना उत्तम परतावे देतात. बाजारातील तेजीचा लाभ करून घेण्यासाठी गुंतवणूकदार सर्रासपणे सेक्टोरल फंडांचा (एका विशिष्ट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे फंड ) वापर करतात. दर दोन ते तीन वर्षांनी पोर्टफोलिओचा अभ्यास करून तुम्ही ज्या क्षेत्रातील फंड विकत घेतला होता किंवा त्यात ‘एसआयपी’ सुरू केली असेल, ती आज तितकीच तेजीत आहे का? नसेल तर त्या गुंतवणुकीचा पुनर्विचार होण्याची गरज आहे.
गुंतवणूक करण्याचा निर्णय जेवढा महत्त्वाचा तेवढाच योग्य वेळी गुंतवणुकीतून पैसे काढून घेण्याचा असतो. दीर्घकाळपर्यंत गुंतवणूक केलेल्यांना त्यांचे परतावे आकर्षक दिसू लागतात आणि त्यामुळे गुंतवणूक कधीच विकू नये, अशी भावना तयार होते. एखाद्या मोठ्या खर्चासाठी (लग्न, शिक्षणाचा खर्च) गुंतवणूक केलेली असते. ज्यावेळी तुम्हाला अंदाज येईल की, आपल्याला पुढच्या तीन ते चार महिन्यात पैसे लागणार आहेत तेव्हा बाजारातील जोखमीचा अंदाज घेऊन गुंतवणूक विकून पैसे जमा करून घ्या. कारण नेमक्या गरजेच्या वेळी जर शेअर बाजार अस्थिर असतील किंवा तात्कालिक कारणामुळे ते घसरले तर कष्टाने कमावलेल्या पैशातील थोडासा का होईना हिस्सा गमवावा लागू शकतो.
म्युच्युअल फंडात नव्याने गुंतवणूक सुरू केलेल्या आणि बऱ्याचदा इंटरनेटवरील जाहिराती किंवा माहितीवर आधारित गुंतवणूक निर्णय घेणाऱ्या मंडळींनी एकाच प्रकारच्या विविध फंड घराण्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेली असते. लार्ज कॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप असे वैविध्य आवश्यक आहे, पण एकाच लार्ज कॅपचे पाच फंड पोर्टफोलिओ असणे योग्य नाही. भविष्यात असे पोर्टफोलिओ सांभाळणे अधिक किचकट होते.
मोजक्याच पण सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचा लाभ देणाऱ्या योजनांचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी तीन ते पाच वर्षांनी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून आपल्या पोर्टफोलिओचा नक्कीच आढावा घ्यायला हवा.