भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या नियमानुसार फोकस्ड फंड जास्तीत जास्त ३० कंपन्यांत गुंतवणूक करू शकतात. या फंडांसाठी ‘मार्केट कॅप’ अर्थात बाजारभांडवलाची मर्यादा नाही. निधी व्यवस्थापक त्यांच्या मर्जीने गुंतवणूक करू शकतात. फोकस्ड फंडामध्ये कंपन्यांचे ध्रुवीकरण झाल्याने अन्य फंडांच्या तुलनेत (सेक्टोरल फंड वगळता) जोखीम अधिक असते. तरीही अतिरिक्त ध्रुवीकरणामुळे, निधी व्यवस्थापकाला ज्या कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबत दृढविश्वास आहे, अशा कंपन्या अन्य फंडात कमाल मर्यादेमुळे घेऊ शकत नाही आणि अशा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा फोकस्ड फंडास आहे. त्या दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून गुंतवणूकदारांसाठी ‘अल्फा’ तयार करण्याची क्षमता असते. प्रत्येक कंपनी फंडाच्या एकूण कामगिरीत लक्षणीय योगदान देतात. तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये एक किंवा दोन फोकस्ड फंड (एकूण गुंतवणुकीच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावे) असल्यास परतावा जोखीम गुणोत्तर परताव्याच्या बाजूला झुकवता येते. आज दिवाळी विशेष गुंतवणुकीसाठी कॅनरा रोबेको फोकस्ड फंडात गुंतवणूक करून गुंतवणूकदार ‘अल्फा’ तयार करू शकतात.
कॅनरा रोबेको फोकस्ड फंड हा फोकस्ड फंडाच्या व्याख्येनुसार, २८-३० कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. कंपन्यांची निवड ‘बॉटम-अप’ पद्धतीने होते. कंपन्या निवडताना फंड मूल्य आणि वृद्धी शैलींचा वापर केला जातो. पोर्टफोलिओमधील बहुतेक समभाग तीन ते पाच वर्षे राखून ठेवण्यासाठी खरेदी केले असले तरी बाजारातील परिस्थितीनुसार (अपेक्षित किंमत आधी मिळाल्यास) त्या कंपन्यांचे समभाग विकून अधिक चांगला परतावा कमावण्यासाठी काही बदल केले जातात. फंडाचा पोर्टफोलिओ मल्टिकॅप घाटणीचा, परंतु लार्जकॅपकडे झुकलेला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर रोजी फंडाचा ८४.३९ टक्के पोर्टफोलिओ लार्ज-कॅप कंपन्यांत, ६.३ टक्के पोर्टफोलिओ मिड-कॅप कंपन्यांत आणि ३.९ टक्के पोर्टफोलिओ स्मॉल-कॅप कंपन्यांत आणि उर्वरित गुंतवणुका अन्य गुंतवणूक साधनांत आहेत.
फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा अमित कदम आणि श्रीदत्त भांडवलदार यांच्याकडे आहे. फंडाच्या पोर्टफ़ोलिओत २३.९० टक्के गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, १५.७१ टक्के गुंतवणूक विविध सेवा देणाऱ्या कंपन्या, १३.१४ टक्के आरोग्यनिगा, १०.३१ टक्के वाहन आणि वाहन पूरक उत्पादनात गुंतविली आहे. अलीकडच्या काळात निधी व्यवस्थापकांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या मात्रेत घट करून लार्जकॅपमधील मात्रा वाढवली असल्याचे दिसते.
या फंडाची शिफारस करण्याची चार मुख्य करणे आहेत.
पहिले कारण कॅनरा रोबेको फोकस्ड फंड २३ एप्रिल २०२१ पासून अस्तित्वात आला. या फंडाचा मानदंड ‘निफ्टी ५०० टीआरआय’ आहे. या फंडाने मानदंड सापेक्ष अव्वल कामगिरी केली आहे. फोकस्ड फंड गटातील स्पर्धक फंडांच्या तुलनेत, गेल्या २३ एपिल २०२१ पासून १ वर्षाच्या चलत सरासरी (रोलिंग रिटर्न) आधारावर, या फंडाने ‘निफ्टी ५०० टीआरआय’च्या तुलनेत ९४.२२ टक्के वेळा अधिक परतावा मिळविला आहे. ही टक्केवारी अतिशय उच्च दर्जाची टक्केवारी आहे. फंडाच्या आघाडीच्या १० कंपन्यांच्या गुंतवणूक एकूण फंडाच्या मालमत्तेच्या ४८ टक्के आहे. ‘शार्प रेशो’ने मोजलेल्या जोखीम-समायोजित परताव्याच्या बाबतीत, हा फंड एसबीआय फोकस्ड आणि एचडीएफसी फोकस्डनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला फंड आहे. ‘शार्प रेशो’ बाजारातील तेजीत सहभागी होण्याची आणि घसरणीत मुदलाला कमीत कमी नुकसान करणारा फंड आहे. फंडाच्या या क्षमतेमुळे अस्थिर बाजारात फंडाच्या ‘एनएव्ही’त कमीत कमी अस्थिरता येते. एका वर्षांच्या चलत सरासरी नुसार हा फंड वर्ष २०२३ आणि वर्ष २०२४ मध्ये ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये होता.
दुसरे कारण फंड घराण्याच्या तत्वानुसार दर्जेदार, स्थिर, दीर्घकालीन वृद्धीची क्षमता असलेल्या कंपन्यांचा समावेश पोर्टफोलिओमध्ये होतो. फंडाच्या पोर्टफोलिओमधील आघाडीच्या कंपन्यांत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि लार्सन ॲण्ड टुब्रो, इटर्नल लिमिटेड, इन्फोसिस, टीव्हीएस मोटर्स, भारती एअरटेल, जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडिया अशी नावे आहेत. गेल्या दोन वर्षांच्या अस्थिर बाजार पेठेत ध्रुवीकृत बाजारात, यापैकी इन्फोसिस वगळता, अन्य कंपन्यांनी फंडला निर्देशांकावर मात करण्यास मदत केल्याचे दिसते. फंडाने अशा काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्या कंपन्यांना पुढील काही वर्षांत ‘अर्निंग पर शेअर’ म्हणजेच प्रतिसमभाग उत्पन्नामध्ये वाढ दिसून येईल. उदाहरणार्थ, लार्सन अँड टुब्रो, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, इंटरग्लोब एव्हिएशनसारख्या कंपन्या फंडाच्या पोर्टफोलिओचा भाग आहेत.
तिसरे कारण या फंडाची बाजार घसरणीत तोटा रोखण्याची क्षमता अधिक आहे. कॅनरा रोबेको फोकस्ड तुलनेने स्थिर लार्जकॅप कंपन्यांत गुंतवणूक करतो. वेळेप्रसंगी नफावसुली करण्यासाठी किंवा तोटा होत असल्यास विकून बाहेर पडण्यास निधी व्यवस्थापक कचरत नाहीत. फंडाचा ‘मार्केट कॅप्चर रेशो’ हा म्युच्युअल फंड योजनेच्या मानदंड निर्देशांकाच्या तुलनेत वाढत्या आणि घसरत्या बाजारपेठांमध्ये कामगिरीचे मोजमाप आहे. ‘अप साइड मार्केट कॅप्चर रेशो’ आपल्याला सांगतो की, बाजाराच्या तेजीत किती टक्के सहभाग घेतला तर ‘डाउन साइड मार्केट कॅप्चर रेशो’ने बाजारातील घसरणीत किती टक्के मुदलाचे संरक्षण केले. गेल्या एका वर्षात कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी फंडचा ‘अप मार्केट कॅप्चर रेशो’ ११८ टक्के होता, ज्याचा अर्थ असा की, जर मानदंड एका महिन्यात १०० ने वाढला तर फंडाची ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’ ११८ पर्यंत वाढते. फंडाचा ‘डाउन-मार्केट कॅप्चर रेशो’ ९५ होता, ज्याचा अर्थ असा की जर बेंचमार्क इंडेक्स एका महिन्यात १०० ने कमी झाला, तर फंडाची ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’ ९५ ने कमी होते. कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी फंडाचे ‘मार्केट कॅप्चर रेशो’ हे फंडाच्या उच्च जोखीम समायोजित परव्याची ग्वाही देतात.
चौथे कारण म्हणेज अनेक फ्लेक्झीकॅप आणि मल्टीकॅपच्या तुलनेत मानदंड सापेक्ष निर्देशांकापेक्षा अधिक परतावा कमविला असून जोखीम मल्टीकॅपपेक्षा कमी परंतु फ्लेक्झीकॅपपेक्षा जास्त आहे. सप्टेंबरअखेरीस फंडाची मालमत्ता २,७४९ कोटी होती. कॅनरा रोबेको फोकस्ड फंडात ५ वर्षे गुंतवणूक राखून ठेवण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केल्यास हा फंड गुंतवणूकदारांना निराश करणार नाही. कॅनरा रोबेको फंड घराण्याची प्राथमिक विक्री सुरू आहे. जे कोणी बाजारातील थेट गुंतवणूक टाळू इच्छितात, अशा गुंतवणूकदारांनी कॅनरा रोबेको फोकस्ड फंडाचा नक्की विचार करावा.