शारदा मोटर इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई कोड ५३५६०२)

वेबसाइट: http://www.shardamotor.com

प्रवर्तक: अजय रेलन

बाजारभाव: रु. १०३९/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: वाहन सुटे भाग

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ११.४८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६४.३१

परदेशी गुंतवणूकदार २.२५

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ११.४३

इतर/ जनता २२.०१

पुस्तकी मूल्य: रु. १८५

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: ४९६%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ५५.९

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.८

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०५

इंट्रेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ९४

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (ROCE): ३४.६%

बीटा: १.१

बाजार भांडवल: रु. ५९६४ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १३४६/६२५

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

वर्ष १९८६ मध्ये स्थापन झालेली शारदा मोटर इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख ऑटो अन्सिलरी असून ती प्रामुख्याने मोटारीचे सुटे भाग आणि व्हाइट गुड्स उत्पादन आणि जोडणी प्रक्रिया (असेंब्ली) करते. कंपनीची उत्पादने प्रवासी वाहने, वाणिज्य वाहने, ऑफ-रोड वाहने (कच्च्या रस्त्यांवर चालण्यासाठी बनवलेली वाहने), शेती उपकरणांसाठी वापरली जातात.

उत्पादन पोर्टफोलिओ

कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये उत्सर्जन नियंत्रण प्रणाली (Emission Control system), सस्पेंशन, स्पेशलाइज्ड रूफ सिस्टम, फ्रंट सस्पेंशन असेंब्ली, अप्पर आणि लोअर कंट्रोल आर्म्स, फ्रंट एक्सल असेंब्ली, सॉफ्ट-टॉप कॅनोपीज यांचा समावेश आहे. भारतात प्रवासी वाहन विभागासाठी उत्सर्जन नियंत्रण प्रणालींमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा सुमारे ३० टक्के आणि पॅसेंजर कारसाठी १० टक्के आहे. कंपनीकडे खालील चार राज्यांत आठ उत्पादन सुविधा असून त्यांची एकत्रित उत्पादन क्षमता दरवर्षी १० युनिटची आहे.

(१) चेन्नई (दोन सुविधा प्रकल्प) – एक्झॉस्ट सिस्टम्स, ट्यूब मिल्स

(२) नाशिक (दोन सुविधा प्रकल्प) – एक्झॉस्ट सिस्टम्स, रूफ सिस्टम्स, सस्पेंशन असेंब्ली

(३) चाकण (तीन सुविधा प्रकल्प) – एक्झॉस्ट सिस्टम्स, सस्पेंशन असेंब्ली

(४) साणंद – एक्झॉस्ट सिस्टम्स

कंपनीची ट्यूब मिल उत्पादन सुविधा तसेच स्टॅम्पिंग आणि वेल्डिंग सुविधा लवकरच कार्यान्वित होतील. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत ह्युंदाई, महिंद्रा, टाटा, टीएएफई, एसएमएल इसुझू, निसान, इसुझू, फोर्स मोटर्स, अशोक लेलँड, मॅग्ना, कुबोटा, जेसीबी इत्यादींचा समावेश आहे. एक्झॉस्ट व्यवसायातील प्रमुख दोन ग्राहक महिंद्र अँड महिंद्र आणि ह्युंदाई एकूण महसुलाच्या ७१ टक्के आहेत.

ग्राहक विभागणी कशी?

प्रवासी वाहने: ५५ टक्के

वाणिज्य वाहने: ४० टक्के

इतर (ऑफ-हायवे, कृषी, जनरेटर): ५ टक्के

शारदा मोटरची चेन्नई आणि दक्षिण कोरियामध्ये संशोधन आणि विकास केंद्रे आहेत. कंपनीने गेल्या २ वर्षांत १० आयपी दाखल केले आहेत. तसेच ३ बौद्धिक संपदा मिळवले आहेत. कंपनीचे बीएस-६ एक्झॉस्ट सिस्टीमसाठी एबर्सपेचर (जर्मनी), ईव्ही बॅटरी पॅकसाठी कायनेटिक ग्रीन आणि ऑटोमोटिव्ह सीट घटकांसाठी टोयो सीट (जपान) सोबत प्रमुख संयुक्त उपक्रम आहेत. या सहयोगांमुळे शारदा मोटर्सची तंत्रज्ञान क्षमता मजबूत झाली आहे.

आगामी काळात कंपनी तिच्या निर्यात संधींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल. अमेरिका तसेच युरोपमध्ये व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जागतिक ओईएमला वाढ आणि क्रॉस-सेल चालना देण्यासाठी तिने एक समर्पित निर्यात संघ तयार केला आहे.

कंपनीचे जून २०२५ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने यंदाच्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने ७५६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ८ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनी कर्जमुक्त असून कंपनीकडे रोखे आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसह ८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आहे. येत्या आर्थिक वर्षात शारदा मोटर्स सुमारे ५० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याची शक्यता आहे.

उत्तम उत्पादनांचा मोठा पोर्टफोलियो, अनुभवी प्रवर्तक आणि कुठलेही कर्ज नसलेली ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटते. सध्या १,००० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक उत्तम दीर्घकालीन आणि फायद्याची गुंतवणूक ठरू शकेल.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो. प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.