बुद्धिबळ या खेळात जागतिक स्तरावर भारताच्या खेळाडूंनी गेल्या काही वर्षात उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे या खेळाची लोकप्रियताही गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. अनेक उमेदवारांच्या छंदांमध्ये बुद्धिबळाचा उल्लेख असतो, म्हणूनच या खेळावर सविस्तरपणे आम्ही आज लिहीत आहोत.

बुद्धिबळ या खेळाचा उगम कोणत्या देशात आणि केव्हा झाला? या खेळाची भारतात प्रचलित नावे कोणती होती? मध्ययुगीन भारतातील कोणत्या सम्राटाने जिवंत हत्ती, घोडे, उंट याचा वापर करत बुद्धिबळ खेळ खेळला? बुद्धिबळ या खेळामध्ये भारताचे योगदान काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वांगीण विचार करून या प्रश्नच उत्तर अपेक्षित आहे. बुद्धिबळामधल्या भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना भारताचे महत्त्वाचे खेळाडू, त्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही खेळाडू, त्यांनी जिंकलेल्या स्पर्धा, भारताने टीम म्हणून जिंकलेल्या स्पर्धा अशा सर्व बाबतीत थोडक्यात बोलता आलं पाहिजे. तुमचा आवडता बुद्धिबळपटू कोण हा प्रश्नही अपेक्षित आहेच. त्यात पुढे त्या खेळाडूच्या खेळण्याच्या शैलीबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. बुद्धिबळाच्या पटाविषयी नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे त्यावर पांढरे आणि काळे असे एकूण किती चौकोन असतात? बुद्धिबळात ५० चालींचा नियम आपणास माहिती आहे का? रशिया या देशाचे या खेळावर वर्चस्व आहे का? हा खेळ रशिया मध्ये अतिशय लोकप्रिय का आहे? भारतीय बुद्धिबळ आणि पाश्चिमात्य देशातील बुद्धिबळ यात नेमका कोणता फरक आहे? बुद्धिबळ खेळ आणि गणित यामध्ये काही संबंध आहे का?

बुद्धिबळ खेळाचे जलद (रॅपिड), पारंपरिक (क्लासिकल), अतिजलद (ब्लिट्झ) असे सर्वसाधारण प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकाराबद्दल पुरेशी माहिती असली पाहिजे. प्रत्येक प्रकारातला डाव हा किती मिनिटांचा असतो, तुमचा आवडता खेळाडू कुठल्या प्रकारात पारंगत आहे, भारताचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रसिद्ध खेळाडू कुठच्या प्रकारात चांगले खेळतात हेही माहिती असलं पाहिजे.

बुद्धिबळ हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहे का? ऑलिम्पिकमध्ये हा खेळ समाविष्ट नसण्याची कारणे काय आहेत? याच प्रश्नाच्या अनुषंगाने उमेदवाराचे मत विचारणारा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुमच्या मते बुद्धिबळ हा खेळ आहे का? तुम्हाला काय वाटतं हा मैदानी खेळ नाही, नुसता बैठा खेळ आहे का ? खेळ म्हटल्यावर ज्या चपळ हालचाली, स्टॅमिना या गोष्टी येतात त्यातली कोणतीही गोष्ट यात नाही मग याला खेळ म्हणायचं का? बुद्धिबळ खेळ हा भारतात फक्त शहरी भागात आणि सुशिक्षित वर्गामध्ये लोकप्रिय आहे का आणि जनमानसात तो लोकप्रिय करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलाल?

आजकाल कॉम्प्युटर बुद्धिबळ स्पर्धेत मानवाला हरवत आहे का? अल्फाझीरो, स्टॉकफिश या AI प्रोग्रॅम चा बुद्धीबळ खेळाशी काय संबंध आहे? बुद्धिबळ खेळाचे आंतराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? या खेळाचे नियम कोणत्या संस्था ठरवतात? भारतात बुद्धिबळ खेळासंबंधी काही संस्था आहेत का? ग्रँडमास्टर हा किताब कोणाला मिळतो? भारतातल्या महत्वाच्या ग्रँडमास्टरची नावे सांगा हेही अपेक्षित प्रश्न असतात. जगात आणि भारतात सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर कोण आहे? उमेदवाराचे मत आजमावणारे किंवा त्याला बॅलन्स मत मांडता येतं का हे पाहणारे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ- बुद्धिबळ खेळामध्ये भारतात डोम्माराजू गुकेश, प्रज्ञानंद, कोनेरू हम्पी या आणि इतर दक्षिण भारतीय खेळाडूंचा मक्ता आहे असं तुम्हाला वाटतं का? दक्षिण भारतीय खेळाडू या खेळात जास्त प्रमाणात चमकन्याच कारण काय असावं? याबरोबरच आणखी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात जे खेळाडूंच्या वागण्याबद्दलचे असू शकतात. याचही उदाहरण पाहू, विश्वनाथन आनंद हा भारताचा खूप महत्वाचा बुद्धिबळपटू आहे त्याने भारत सोडून स्पेनमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? भारतात पुरेशा सुविधा नाहीत म्हणून परदेशात जायची वेळ विश्वनाथन आनंद वर आली असं तुम्हाला वाटतं का? प्रवीण ठिपसे या मराठी बुद्धिबळ पटूच्या नावावर कोणते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत? मॅग्नस कार्लसन हा खेळाडू इतर खेळाडूंबद्दल वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असतो, ते तुम्हाला योग्य वाटतं का? पोल्गार भगिनी या बुद्धिबळ खेळावर वर्चस्व असणाऱ्या महिला खेळाडू आहेत. त्यापैकी एका खेळाडूने असं मत व्यक्त केलं होतं की पुरुष आणि स्त्री खेळाडूंना वेगवेगळे ग्रँडमास्टर पुरस्कार देऊ नयेत. पुरुष आणि स्त्रयिा यांचे एकत्रति रँकिंग असावे. तिच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?

बुद्धिबळ खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, या खेळाचा अधिक प्रसार करण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं ? तुम्ही क्रीडा विभागात असाल तर तुम्ही बुद्धिबळाला प्रोत्साहन देण्यासाठी काय कराल?

बुद्धिबळ या खेळाच्या सर्व बाजुंचा वेध घेणारे प्रश्न आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी काही वेगळ्या खेळांबद्दल पुढच्या काही लेखांमधून आम्ही लिहीत राहू.

mmbips@gmail.com

supsdk@gmail.com