मुलीच्या लग्नाला हजर राहण्यासाठी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेला बेंगळुरू स्फोटातील आरोपी आणि केरळस्थित पीडीपी नेता अब्दुल नासीर मदानी याने आपल्या गावी जाऊन वयोवृद्ध वडिलांची सोमवारी भेट घेतली. वडिलांना भेटण्यासाठी आलेला मदानी रविवारी रात्री येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात राहिला. या वेळी त्याच्या समर्थकांनीही त्याची भेट घेऊन स्वागत केले.
मुलीच्या विवाहाला हजर राहता यावे तसेच वयोवृद्ध वडिलांना भेटता यावे यासाठी मदानीला ८ ते १२ मार्च या काळात जामिनावर तुरुंगातून बाहेर जाण्याचा निर्णय बेंगळुरू न्यायालयाने दिला.
रविवारी मुलीच्या लग्नादरम्यान मदानीने केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले असून जामिनाच्या अटींचा त्याने भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
जुलै २००८ मध्ये बेंगळुरू येथे एका व्यक्तीचा बळी घेणाऱ्या आणि २० जणांना जखमी करणाऱ्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असल्याच्या आरोपावरून २०१० मध्ये मदानीला अटक करून बेंगळुरू तुरुंगात ठेवण्यात आले आहे.