Albanias AI Minister Pregnant: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता केवळ संशोधनापुरते मर्यादीत राहिले नाही तर त्यापुढे जाऊन प्रशासकीय कामातही एआयने हस्तक्षेप केला आहे. अल्बेनिया देशाने काही दिवसांपूर्वी सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी एआय मंत्र्यांची नियुक्ती केली होती. आता या एआय मंत्री गर्भवती असल्याची माहिती अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी दिली आहे. एआय मंत्री डिएला लवकरच ८३ एआय मुलांना जन्म देणार असल्याचे एडी रामा यांनी सांगितले. ही ८३ मुले संसदेतील समाजवादी पक्षाच्या प्रत्येक सदस्याचे सहकारी म्हणून काम करतील.
बर्लिन येथे ग्लोबल डायलॉग (बीजीडी) मध्ये बोलत असताना एडी रामा म्हणाले, आज आम्ही डिएलाबरोबर मोठा धोका पत्करला आहे. डिएला पहिल्यांदाच गर्भवती राहिली असून ती ८३ मुलांना जन्म देणार आहे.
या एआय मुलांचे काम काय असणार? याचीही माहिती पंतप्रधान एडी रामा यांनी दिली. ते म्हणाले, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याबरोबर हे एआय सहाय्यक म्हणून कामात मदत करतील. ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतील आणि संसदेच्या सदस्यांना तशी माहिती अवगत करून देतील. या मुलांकडे आईप्रमाणेच ज्ञान असेल.
डिएलाची सप्टेंबरमध्ये मंत्री म्हणून नियुक्त झाली होती, तेव्हा पंतप्रधान एडी रामा यांनी तिच्या नावाची माहिती दिली होती. डिएला नावाचा अल्बेनियन भाषेत सूर्य असा अर्थ आहे. ती मंत्रिमंडळाची एक सदस्य आहे. ‘सार्वजनिक प्रकल्पांच्या निविदा १०० टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील याची खात्री करण्यास डीएला मदत करेल. यामुळे जलद आणि पूर्ण पारदर्शकतेने काम करण्यास सरकारला मदत होईल,’ असा दावा पंतप्रधान एडी रामा यांनी केला होता.
एखाद्या एआयला अधिकृतपणे सरकारी मंत्री म्हणून नियुक्त करणारा अल्बेनिया हा पहिला देश ठरला आहे. डिएला कोड आणि पिक्सेलने बनलेली आहे. २०२६ च्या अखेरीपर्यंत ही प्रणाली पूर्णपणे कार्यरत होईल, असा रामा सरकारचा अंदाज आहे.
डीएला या वर्षाच्या सुरुवातीला ‘ई-अल्बेनिया’ सार्वजनिक सेवेत ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून दाखल करण्यात आला. ११ मे रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत १४० पैकी ८३ विधानसभा जागा जिंकून रामा यांच्या समाजवादी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली. पक्ष एकट्याने राज्य करू शकतो आणि बहुतेक कायदे पारित करू शकतो, परंतु संविधान बदलण्यासाठी त्यांना दोन तृतीयांश बहुमत किंवा ९३ जागांची आवश्यकता आहे.
