Bangkok Road Sinkhole Video: थायलंडची राजधानी बँकॉकमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका वर्दळीच्या रस्त्यावर सुमारे ५० फूट खोल खड्डा पडल्याचे व त्यामुळे तीन कार आणि विजेचे खांब त्यामध्ये पडल्याचे दिसत आहे. बँकॉकचे गव्हर्नर चॅडचार्ट सिट्टीपुंट यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना माहिती दिली की, या घटनेमध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचबरोबर या घटनेमागील प्राथमिक कारण भूमिगत बांधकाम असल्याचे म्हटले आहे.
रस्त्याला जेव्हा हा भला मोठा खड्डा पडला त्या क्षणाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रशियन सरकारी कंपनी आरटीने शेअर केलेल्या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये ही दुर्घटना घडताना दिसत आहे. हा खड्डा हळू हळू मोठा होत गेला आणि चार पदरी रस्ता पूर्णपणे तुटला. यावेळी रस्त्यावरील अनेक गाड्या मागे हटण्याचा प्रयत्न करत होत्या.
या घटनेमुळे जवळच्या एका रुग्णालयाला सेवा बंद करावी लागली आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते दोन दिवसांसाठी बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवणार आहेत. बँकॉक शहराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या इमारतीवर परिणाम झाला नाही, परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलीस स्टेशन आणि जवळच्या इतर इमारतींमधून लोकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी परिसरातील वीज आणि पाणी बंद केले आहे. मुसळधार पावसामुळे आणखी नुकसान होऊ शकते या चिंतेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी शक्य तितक्या लवकर खड्डा बुजवण्याचे काम करत आहेत, असे चॅडचार्ट यांनी सांगितले. दरम्यान, बँकॉकमध्ये सध्या पावसाळा सुरू आहे.
जरी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेमुळे बँकॉकच्या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. २८ मार्च रोजी झालेल्या भूकंपात बांधकाम सुरू असलेली राज्य लेखापरीक्षण कार्यालयाची इमारत कोसळल्यानंतर काही महिन्यांनीच ही घटना घडली आहे, ज्यामध्ये किमान ९२ लोकांचा मृत्यू झाला होता.