दुसऱ्या महायुद्ध काळातील कोका-कोलाचा रेसिपी फॉम्र्युला विकत घेण्यासाठी एका १५ वर्षीय तरुणाने बोली लावली आहे. यासाठी त्याने तब्बल दीड कोटी डॉलर मोजण्याची तयारी दाखविली आहे. मात्र अल्पवयीन असल्याने तीन दिवस ‘ऑफलाइन’ लिलावाची संधी कायम ठेवण्यात आली असून, त्यानंतर मात्र सदर तरुणाची बोली मान्य करण्यात येईल, असे लिलावकर्त्यांनी स्पष्ट केले.
टेन्निसन येथील एका अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमध्ये ‘कोका कोला’च्या रेसिपी फॉम्र्युलाचा समावेश होता. अनेक वर्षे गोपनीय राखलेला दुसऱ्या महायुद्धकाळातील शीतपेयाचा हा फॉम्र्युला सापडल्याने थोडी खळबळ उडाली होती. मात्र हीच नेमकी खरी रेसिपी आहे किंवा कसे, याबाबत अनेकांमध्ये मतभेद आहेत.
या पाश्र्वभूमीवर या रेसिपी फॉम्र्युलाचा लिलाव करण्यात आला. या वेळी निव्वळ प्रतिष्ठेचा भाग म्हणून एखादी प्रसिद्ध व्यक्ती या लिलावात सर्वाधिक बोली लावेल, असा जॉर्जिया अँटिक (दुर्मीळ वस्तू) डीलर कंपनीच्या क्लिफ क्लज यांचा अंदाज होता.
प्रत्यक्षात मात्र एका अल्पवयीन मुलाने यासाठी सर्वाधिक बोली लावली असून, त्याने दीड कोटी डॉलर मोजायची तयारी दर्शविली आहे.
यातील अडचण ही की बोली लावणारा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे या लिलावास कायदेशीर मान्यता मिळू शकलेली नाही. नियमानुसार, आता तीन दिवस ऑफलाइन पद्धतीने कोणी यापेक्षा अधिक रकमेची बोली लावते का, याकडे लिलाव करणाऱ्या कंपनीचे लक्ष असून बोली न लागल्यास मूळ बोली लावणाऱ्या मुलाला सदर रेसिपी हस्तांतरित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.